गार्लिक ब्रेड
आमच्या घरी सगळ्यांना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. नेहमी विकत आणतो, ह्यावेळेस घरी करायचाच विचार केला. नेटवर ४-५ रेसिपी पहिल्या आणि त्यातल्या त्यात सोप्पी रेसिपी करून बघितली . एकदम सोप्पी रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात छान जमला. फक्त वेळखाऊ प्रकरण असल्याने हाताशी वेळ असेल तेव्हाच करावे .
साहित्य - पाव कप दूध,
१ टि स्पून यीस्ट,
१ टि स्पून साखर,
२ चमचे लसूण पेस्ट,
१ चमचा ओरेगॅनो,
३ चमचे बटर
१ वाटी मैदा,
चीज ,मीठ, कोथिंबीर, तेल
कृती -
१. सर्वप्रथम गरम दुधात यीस्ट आणि साखर घालून छान एकत्र करून ५ मिनटे ठेवावे.
२. नंतर ह्या मिश्रणात १ चमचा लसूण पेस्ट , १/२ चमचा ओरेगॅनो, थोडेसे मीठ आणि मैदा घालून मळून घ्यावे. ह्या मिश्रणाला थोडेसे तेल लावून उबदार जागी एक तासभर ठेवावे.
३. एका तासाने हा गोळा आकाराने दुप्पट झाला असेल.
४. आता उरलेल्या बटर मध्ये चिरलेली कोथिंबीर आणि ओरेगॅनो घालून मिक्स करून घ्यावे.
५. मैद्याच्या पिठाची थोडीशी जाडसर पोळी लाटून बटर चे मिश्रण लावावे.
६. आणि अर्ध्या भागावर चीज किसून घालावे पोळी मध्यातून दुमडून बंद करून घ्यावी (करंजी प्रमाणे).
७. ह्या पोळीवर परत बटर चे मिश्रण लावावे.
८. कुकर मध्ये जाळी ठेवून ५-७ मिनिटे प्रिहिट करून मग हा ब्रेड ठेवावा. कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढावी. हि स्टेप केक प्रमाणे आहे, मावे मध्ये पण होईल मी कधी केला नाहीये मावे मध्ये.
९. मस्त पैकी गरमा गरम गार्लिक ब्रेड तयार आहे.
करून बघा आणि नक्की सांगा.