महिला दिन: सुरुवात आपल्या घरापासून !
8 मार्च जागतिक महिला दिन जवळ आला की सुरुवात होते ती स्त्रिया किती मोठ्या पदांवर काम करतायत, कशा प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्यात याबद्दलच्या भारंभार भाषणाची! खूप साऱ्या स्पर्धा, सोशल मीडियावर शुभेच्छा... चला एक दिवस साजरा झाला की परत तेच रोजचं रहाटगाडगं सुरू होतं.
आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुलींना शिक्षण दिलं जातंय... स्वातंत्र्य दिलं जातंय... बाहेर जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री कमावते आहे. या कमावणाऱ्या किंवा आमच्यासारख्या पूर्णवेळ गृहिणीचा जॉब करणाऱ्या स्त्रियांना किती वेळा आयता चहा तरी मिळतोय? आपल्या पुढच्या पिढीतल्या मुली अनेक पदव्या घेत मोठ्या पदांवर पोहोचतात. अशावेळी मुलगा असलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक आईची ही पण एक जबाबदारी आहे की त्याला किमान स्वतःचं पोट भरता येईल एवढं तरी जेवण करायला शिकवावं, ही काळाची गरज आहे. आपल्या बहिणीला कोणीही वेगळा स्पर्श केल्यावर तिला जो त्रास होईल तोच समाजातल्या प्रत्येक मुलीला होणार आहे हे मुलाला समजून सांगायची गरज आहे. माझा एक मुलगा मी सुसंस्कृत करू शकले तरी त्यातून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातील जनजागृतीचे छोटेसे पाऊल उचलल्यासारखे आहे.
स्त्री दुर्गा आहे, तिच्या प्रत्येक हातात शस्त्र घेऊन ती सगळ्या आघाड्या सांभाळते आहे असे नेहमीच म्हटले जाते अशावेळी गरज आहे शक्य त्या आघाडीवर तिला मदत करायची....म्हणजे तीही निःशंक मनाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडेल. कोण कुठली, आपले सगळे नातलग सोडून आपल्या घरात आलेली मुलगी जर या घरासाठी सर्वस्व अर्पण करतेय, थोरामोठ्यांची सेवा करतेय तर थोडा वेळ तिचा तिला द्या.
तिला होणाऱ्या त्रासाची आस्थेने दखल घ्या. अनेकदा यामध्ये स्त्रियाच एकमेकींच्या विरोधात उभ्या राहतात. जुन्या चालीरीती, सणवार यांचं अवडंबर एवढं असतं त्यातून ती बिचारी बाहेरच पडू शकत नाही. पुढे जाणाऱ्या मूठभर स्त्रियांचा, बदल स्वीकारणाऱ्या अनेक घरांचा नक्कीच आदर आहे....पण आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय... फक्त एक दिवस घोषणा देण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थाने मुक्तपणे उडण्यासाठी! लक्षात ठेवा तुमचा एक प्रेमाचा शब्द सुद्धा तिला दहा हत्तीचं बळ देईल. आपल्या आजूबाजूला आपल्या पत्नीची काळजी घेणारा एखादा असेल तर आमचे नाहीत हो असे...असं म्हणून बरोबर वागणाऱ्याला चुकीचं ठरवू नका.
प्रत्येकीला वाटत असतंच आपल्या साथीदाराने आपली काळजी घ्यावी, प्रेमाने विचारपूस करावी. आजच्या महिलादिनी आपल्या सहचारिणीला फक्त दोन प्रेमाचे शब्द द्या.. एखादा फक्कड चहा द्या...छानसा गुलाब द्या! फार मोठ्या अपेक्षा नसतात तिच्या... शारीरिक, मानसिक सर्व बाबतीत तिला साथ मिळेल असा विश्वास वाटू दे आपल्या साथीदाराबद्दल मग बघा तिच्या चेहऱ्यावरचं समाधानी स्मितहास्य घराची फुलबाग कशी सुगंधित करील ते! मिनल सरदेशपांडे