या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254
तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257
तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289
तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306
तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318
तुझमे तेरा क्या है - ६
https://www.maitrin.com/node/3460
पुढे चालू
माझ्या दिवाळीची सुरुवात खूप मस्त झाली होती. आई बाबा आणि मी पहाटे उठलो. अभ्यंगस्नान आवरून आईने केलेला फराळ खाऊन मस्त गप्पा मारत बसलो होतो. मस्त वाटत होतं. कालचे साडीवरचे फोटोज शर्वरीने पाठवले होते. निनादने आमच्या तिघांचं ग्रुप चॅट सुरु केलं होतं. कालची इथ्यंभूत माहिती दोघांनी मिळून दिली होती मला. शेवटी माझे मित्र आणि मैत्रीण एकमेकांचे जिवलग झाले होते. त्यांना यथेच्छ चिडवून झाल्यावर मी फोन खाली ठेवला तर काही अनरिड मेसेजेस होते मोबाईलमध्ये. एक दोन ऑफिसच्या अजून कलिग्जचे, एकदोन नातेवाईकांचे. त्यांना रिप्लाइज केले आणि माझा हात त्या मेसेजवर थबकला. तो अनिरुद्धचा मेसेज होता. पहाटे आलेला.
मीरा,
दिवाळीच्या खूप शुभेच्छा. हि दिवाळी तुझ्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि सुख घेऊन येवो.
-अनिरुद्ध.
मी त्या मेसेजची अक्षरश: पारायण केली. त्याने मेसेज केलाय, इतक्या पहाटे? मेसेजची वेळ होती ४:००. तेंव्हा मी उठलेही नव्हते. बाबांनी मला उठवायला हाक मारली ४:३० ला. तेंव्हा उठल्यावर आज आपण सवयीप्रमाणे मेसेजेस का नाहीत बघितले याचा मला पश्चात्ताप झाला. आता दुपारचे १२ वाजत आले होते. आणि मी आता त्याला रिप्लाय केला तर त्याला काय वाटेल? काय मुलगी आहे ही? पण रिप्लाय न करणंही... त्याला काय वाटेल यापेक्षा मलाच कसंतरी वाटेल रिप्लाय नाही केला तर.
मी रिप्लाय लिहिला.
अनिरुद्ध, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हि दिवाळी तुला खूप आनंदाची जावो.
मीरा.
मग त्याला माझा मेसेज वाचून काय वाटलं असेल असा विचार करत बसले. संध्याकाळी आम्ही तिघे बाहेर जेवायला गेलो. मला आठवतंय तेंव्हापासून हा बाबांचा शिरस्ता होता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी रात्री बाहेर जेवायला जायचं. ते म्हणायचे दिवाळीचे ईतके पदार्थ करून आई दमलेली असते, तिचीही हि दिवाळीच आहे ना, तिलाही अाराम नको का एखादा दिवस? तसाही बाबा फराळ करतानाही आणि एरव्हीही आईला घरकामात मदत करायचे. त्यांचं म्हणणं होत तुझं काम माझं काम असं काही नसतं घरात. हे घर आपलं आहे तसं कामही आपल्या सर्वांचं आहे. मला खूप आवडायचा बाबांचा हा विचार.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं अगदी जीवावर आलं होतं माझ्या. अगदी आवरल्यानंतर मी सरळ मेल केला अनिरुद्धला आणि सिक लिव्ह टाकली. आई आणि मी बाजारात जाऊन ताज्या भाज्या घेऊन आलो. मला आवडते म्हणून बाबा स्वतः कांदाभजी करणार होते. मी मस्त सोफ्यावर माझी आवडती शाल गुंडाळून बसले होते पुस्तक वाचत. आणि बेल वाजली. कोण आलं म्हणून मी दार उघडलं तर दारात निनाद. मी आनंदाने उडीच मारायची राहिले होते.
“तू? अाली का मैत्रिणीची आठवण? लडकी मिल गयी तो यार को भूल गये?” मी उगाच त्याला छेडलं.
“ए चल... पुरे हां नाटक. काका काकू मी आलोय” दारातूनच वर्दी देत निनाद आत आला.
“काय मग? काल कुठं होतात म्हणायचं पाव्हणं?” मी त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हते.
“अरे वा! भजीचा वास येतोय. क्या बात है? काकू मला पण भजी...” असं म्हणत तो आत स्वयंपाकघरात गेला. बाहेर आला तब्बल १० मिनिटांनी.
“ए बास हां आता. गप सांगणारेस का” मी पण वैतागले.
“अगं होहो! किती चिडशील” म्हणत त्याने कालचा सगळा वृत्तांत त्याच्या शैलीत पुन्हा सांगितला.
मी खूप खुश होते कारण निनाद खुश होता. शर्वरी आणि निनाद... क्या बात है! आम्ही दोघांनी मस्त कांदा भजींवर ताव मारला आणि निनाद पुन्हा ऑफिसला निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला आले. लॉगिन केल्या केल्या पहिली मीटिंग रिक्वेस्ट अाली. अनिरुद्धने मीटिंग सेट केली होती. मी मीटिंग रूममध्ये गेले तर तो आधीच तिथे होता. त्याच्या समोर जाताना मला उगाच अवघडल्यासारखं झालं होतं.
“हाय. गुड मॉर्निंग” मी म्हटलं.
“गुड मॉर्निंग मीरा. हाऊ आर यू? आॅल वेल?”
“आय आम फाईन. थॅंक्यू.” देवा! कालची सिक लिव्ह होती.
“मीरा वी गॉट द अकाउंट! आपण काम केलेल्या प्रोजेक्टच्या ऑनसाईट टीमचा मेल आलाय. काॅंग्रॅज्युलेशन्स टू यू अँड वेल डन फॉर युअर हार्ड वर्क. वी डिड इट!” तो खूप खुश होता.
त्याने त्याच्याच लॅपटॉपवर मेल मला दाखवला. त्यात ऑनसाईट टीमने आमच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. त्यांनी लिहिलं होत दिस इज द बेस्ट टीम वी एव्हर हॅड!
द बेस्ट टीम!
आम्ही दोघे!
मला कसं वाटत होतं ते सांगायला शब्द नव्हते. मी माझ्या कामात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि हे त्याचे रिझल्टस होते. आय वाॅज सो हॅपी!
थोड्या वेळाने भागवत सरांचा मेल आला. टू मध्ये आम्ही दोघे होतो आणि सीसी मध्ये आमची पूर्ण प्रॅक्टिस. त्यांनी आमच्या दोघांच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. त्यांच्या मेलमधलं एक वाक्य माझ्या लक्षात राहिलं.
इट लुक्स लाईक अनिरुद्ध हॅव सक्सीडेड इन प्रीपेअरिंग हिज ओन सक्सेसर!
ते मला अनिरुद्धची सक्सेसर म्हणत होते.
निनाद आणि शर्वरी दुपारी कॅफेटेरिया मध्ये भेटले तेंव्हा दोघांनी त्यांना सांगितल्यावर एकच कल्ला केला. दिवस खूप मस्त गेला होता. त्या नंतरचा एक आठवडा अक्षरश: काहीच काम नव्हतं. मी सरळ कंपनी लायब्ररीत जाऊन बसायचे वाचत. कुठलाच प्रोजेक्ट नसणं खरंतर कंटाळवाणं वाटत होतं. मला जणू कामाची सवय झाली होती. निनाद म्हणालाही, त्या टीम मध्ये जाऊन त्या माणसांसारखीच व्हायला लागलीयेस.
अनिरुद्ध गेला आठवडा कुठे तरी गायब झाला होता. त्याने आऊट ऑफ ऑफिस ठेवला होता, आॅन लिव्ह म्हणून. पण का लिव्ह? तीही इतके दिवस? रवीला विचारावं का? मी एकदोनदा रवीच्या डेस्कपर्यंत जाता जाता स्वतःला थांबवलं. रवी त्याच्या अनुपस्थितीत प्रॅक्टिसचा कॉन्टॅक्ट पॉईंट होता. एक नवीन प्रोजेक्ट सुरु झाला होता आणि रवीने मेल केला होता कि मी तो लीड करेन आणि टीममध्ये अजून २ जण मला असिस्ट करतील. मी सातवे अास्मानपर होते. माझा प्रोजेक्ट. इथे मी लीड असणार होते. रवी आणि शेखर माझ्याबरोबर काम करणार होते. काम सुरु झालं आणि पुन्हा वर बघायलाही बरेच दिवस फुरसत मिळणार नाही असं दिसायला लागलं. मला रोजचा स्टेटस काॅल अटेंड करावा लागणार होता ऑफिस सुटल्यावर. कारण अर्थात बिईंग लीड, या टीमचा कॉन्टॅक्ट पाॅईंट मी असणार होते. काम बघता बघता एका आठवड्यातच पळायला लागलं. दिवसातला आमचा बराच वेळ मीटिंग रूममध्ये जायचा, कारण बरंच काम होतं जे डिस्कस न करता होऊ शकलं नसतं. शेखर घरी गेला तरी मी आणि रवी काम करत राहायचो. तब्बल १५ दिवसांनी अनिरुद्ध ऑफिसला आला. म्हणजे तो आलाय असं मला कळलं. त्यानंतरही २-३ दिवस तो मला भेटलाच नव्हता. त्या दिवशी स्टेटस कॉल झाल्यावर मी आणि रवी डेस्कवर परत आलो, सामान घेऊन घरी जायला, तर समोर तो.
“हाय अनिरुद्ध, अरे कुठायस तू?” रवीने पुढे जाऊन त्याला विचारलं.
“अरे... हाय... बाबा.. यु नो इट राईट? त्यांच्याबरोबरच गेलो होतो सुट्टीला” अनिरुद्ध म्हणाला.
म्हणजे हा त्याच्या बाबांबरोबर सुट्टीला गेला होता. ओह्ह.. पण त्यात मला सांगण्यासारखं काहीच नाही ना? जाऊदे! मी त्याने मला सांगावं अशी अपेक्षा का करतेय पण? मी नुसतीच स्माईल देऊन डेस्क आवरायला लागले.
“काय रे इतके बिझी झालेत सगळे हल्ली. मी ऑफिसला येऊन ३ दिवस झाले पण माणसं दिसायला मागत नाहीत” मी किंचित रागवूनच वर पाहिलं. तो बोलत रवीबरोबर असला तरी पहात माझ्याकडे होता.
दिसायला मागत नाहीत म्हणे. ह्याला वेळ आहे का समोरच्याशी बोलायला? नव्हे साधं सांगायला कि १५ दिवस येणार नाहीये! माझा राग दिसला असावा त्याला डोळ्यात.
मी सरळ बॅग उचलली आणि रवीला बाय म्हणून निघाले. निघताना त्याच्याकडे पाहिलं तर तो मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. मी लिफ्टपाशी आल्यावर माझा मोबाईल वाजला. अनिरुद्धचाच मेसेज होता.
“इस सादगी पे कौन ना मर जाये ऐ खुदा
लडते हैं और हाथमें तलवार भी नहीं...”
क्रमश: