असाही वेंधळेपणा :
झालं असं काल माझ्या नणंद बाईंनी वेंधळेपणाचे किस्से विचारले आणि माझं लक्ष ते आठवण्यात..(एव्हाना तुम्हाला कळलंच असेल हे रामायण कोणामुळे घडलंय!) आणि तिकडे माझ्या प्रयोग शाळेत एक वेगळंच रसायन उकळत होतं! आमच्याकडे माणसं भरपूर म्हणून स्वयंपाकघरात एक बोर्ड ठेवलाय आणि सांगायचे सगळे निरोप, सम्पलेल्या वस्तू तिथे लिहून ठेवतो. त्या बोर्डवर माझ्या जावेने व्यवस्थित सूचना लिहून ठेवली की फ्रिजमधली साय गरम करणे... दुपारी येणाऱ्या आमच्या बाईने टेबलवर ठेवलेली सायीच्या विरजणाची पातेली घेऊन छान उकळवली. पातेली झाकून ठेवून ती गेली आपल्या कामाला.. रायझिंग स्टार झालेल्या मला जेव्हा फेसबुकातून वेळ मिळाला आणि मी पाहिलं तर विरजणाचं चोथा पाणी झालेलं!आता उद्या ताकाची बोंब होणार होतीच...दुधाचा हिशेब चुकणार होता... तरी गार झाल्यावर जावेने ते चोथापाणी ठेवलं फ्रीजमध्ये... आज त्याचं लोणी काढलं आणि उरलेल्या चोथ्याचं काय करणार? बघितलं तर चोथा अजिबात आंबट नव्हता, मग तो वाटीने मोजून घेतला, निम्मी साखर आणि मुलांसाठी आणलेलं हॉरलिक्स सात आठ चमचे मिसळलं. थोडीशी दूध पावडर होती ती पण दिली ढकलून! आता सगळं एकत्र करून मिक्सरला फिरवलं आणि ठेवली कढई गॅसवर... आटत आल्यावर पाच सहा थेंब व्हॅनिला इसेन्स घातला. माझ्या प्रयोग शाळेत दूध पावडर, व्हॅनिला इसेन्स असे शिलेदार असतातच दिमतीला! घरातली बच्चेकंपनी येणाऱ्या चॉकलेट आणि व्हॅनिलाच्या वासाने आजूबाजूला घुटमळू लागली आणि मला माझ्यातल्या सुगरणपणाची खात्रीच पटली. झकास वड्या झाल्या...मुलांची सुट्टी साजरी झाली... वेंधळेपणा करून तो निस्तरल्याबद्दल मीच माझ्या पाठीवर शाबासकी देऊन टाकली!
मिनल सरदेशपांडे
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle