लवाश
अर्मेनियन पोळी / ब्रेड
रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या पोळी किंवा ब्रेड बाबत आपण भारतीय अतिशय नशिबवान आहोत असं मला आता वाटायला लागलं .
आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये दोन वेळेला ताज्या पोळ्या केल्या जातात .
एवढंच पुरेसं नाही की काय म्हणून या पोळ्या करण्यासाठी आपल्याला अगदी माफक मोबदला देऊन मदतनीस उपलब्ध होऊ शकतात .
अर्मेनियन लवाश ( ब्रेड ) रुमाली रोटीसारखा दिसतो . तो अशा बेक-यांमध्ये बनवला जातो . बेकरी सरसकट सगळीकडे असेलच असं नाही . मग इतर सामानासोबत लवाश सुपरमार्केटमधून आणून. ठेवायचा तो दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यापर्यंत पुरतो .
लवाश बनवना-या अर्मेनियन सुंद-या
नाश्त्याला इथेही ब्रेड, अंडी , लोकल चिज , बटर , जॅम असच खातात . इथेही पनीरला पनीरच म्हटलं जातं . मात्र आपल्यासारखं भाजी करून न खाता पनीर नुसतं खाल्लं जातं .
सुजुक
सुजुक आणि काही सुकवलेली फळं
आता लवाश म्हणजे पोळी हे डोक्यात बसलं. पण गेहार्ड ला मॉनेस्टी बघायला गेलो असताना तिथे बाहेरच्या स्टॉल्सवर विकायला ठेवलेल्या अनेक वस्तु काय आहेत हे कळायला मार्ग नव्हता . लाल , सोनेरी , डार्क ब्राऊन रंगाच्या माळेसारखं काही तरी दिसत होतं . मला वाटलं सॉसेजेस असावेत ( घोर अज्ञान ) त्या सोबत सोन्याचा भावअसलेल्या शुद्ध असं सांगितलं जाणाऱ्या aमधाच्या बाटल्या. त्या शेजारी रंगीत सुरळ्या रचून ठेवल्या होत्या .
कुतूहल म्हणून एका स्टॉलला थांबले भाषेशिवाय संभाषण सुरु झालं . सॉसेज सारख्या दिसणाऱ्या मालेतला एकेक मणी मला चव बघ म्हणून हातावर ठेवला जात होता . असे साधारण पाच तरी मणी माझ्या पोटात गेले होते अगदी पुसटशी गोड चव आणि पोटभरलेपणाची जाणीव होत होती .
आक्रोड + प्लम , आक्रोड+ डाळिंब , काळी द्राक्ष + आक्रोड . आक्रोड + मध अशा कॉम्बिनेशन मध्ये या मोठ्या माळा म्हणजे इथला एनर्जी बार होता. त्याच नाव म्हणजे सुजुक . आपल्याकडे लोणावळ्याला मिळणारी हरतऱ्हेची चिक्की आठवली मला .
पुन्हा लवाश
अर्मेनियामध्ये फळांची शेती खूप केली जाते .त्यात डाळिंब , द्राक्ष , सफरचंद , नीरनिराळ्या बेरीज भरपूर. या फळांचे घरोघरी जॅम तर बनवले आणि विकले जातातच पण त्या फळांची वाईनही घरा घरात बनवून विकली जाते .
फळांचा अजून एक पदार्थ म्हणजे लवाश , हो आपली फणसपोळी , आंबापोळी , पेरूपोळी यांची डाळिंब पोळी , प्लम पोळी, बेरीजची पोळी .
पाकसंस्कृतीमधली अशी साम्य बघून मजा वाटली .
प्लम लवाश , अॅप्पललवाश निर्निराळ्या बेरिजचा लवाश
सुजुक आणि निरनिराळे लवाश
#Armenia #Lavash #food