चैत्रगौर
अंब्याच्या अंबारीवर झुलत
मोगरा सुगंध झेलत आली
लाडाची लाडली गौराई माहेरा आली ...
शांत शिशिरात किती वाट पहावी
फुटेल फुटेल चैत्र पालवी
कोकिळस्वर घुमता पहाटेस जाग आली
गौराई माहेरा आली ...
सोनसळी शेत शिवार गावी
एक एक ओंबी गाई ओवी
जात्यावरची आईची ओवी लाजली
गौराई माहेरा आली ...
सोसवेना उष्मा , झुल्यावर झुलवावी
डांगरमळ्यातील फळं- खिरणी द्यावी
विविध सुबक आरास पाहुनी कळी खुलली
गौराई माहेरा आली ...
हळदीकुंकवा सुवासिनींना आमंत्रणं धाडावी
भिजल्या हरभर्यांनी ओटी भरावी
आंबेडाळ,पन्हे,फराळानं तृप्त ही झाली
गौराई माहेरा आली ...
कोडकौतुके नेसवा साडीचोळी हिरवी
अक्षयतृतीयेस बोळवण करावी
सासुर्यासी जातांना डोळे पाणावली
गौराई माहेरा आली .......
विजया केळकर ________