गर्द किट्ट काळोख पांघरुन बसलेय मी
उदास मनाने तुझ्याकडे पाठ फिरवून
तू नाहीच येणारेस अजिजीने विनवत
अबोल्यांशी तुझी नसतेच कधी फारकत
डोळे गुडूप अंधारास सरावतायेत तोवरच
पाठीला तुझ्या अस्तित्वाची उष्ण उब येते
मन धाव घेतं तुझ्या धगधगत्या तेजाकडे
डोळे नव्याने घालतात मनाला साकडे
तू नुसतीच माझ्या उलघालीची मजा पाहतोस
तह करायला चंद्रा आडून चांदणं पाठवतोस
या तुझ्या नसण्या-असण्याच्या, अंधार-प्रकाशाच्या विभ्रमात
मन हेलकावतं नि मी स्वतःशीच गिरकी घेते आनंदात
पुन्हा तू दिसतोस, स्वच्छ हसतोस, क्लेश निवतात
डोळे तुला पिऊ बघतात, पुन्हा तेजाने दिपून जातात
नात्याचे सत्य, जाणिवा प्रखर होऊ लागतात
उजेडाचं विखारी तेज मावेना होतं डोळ्यात
हुळहुळत्या मनास ओढ लागते शांत अंधाराची
गारठली पाठ उब शोधते तुझ्याच आधाराची
विभ्रम शोधत पुन्हा एक गिरकी, पुन्हा मनाचा हेलकावा
असाच पाठीशी अस, माझ्या मध्यरात्रीच्या सूर्या!