रस्ता म्हणाला,
“तुला माहितीये?
नाज़ुक वळणं घेत, गाळीव माती लेऊन
गुणगुणत जात होतो मी
या टेकडी पासनं त्या टेकडी पर्यन्त
ती बाजुची कमिन्स कंपनी आहे ना
ती किर्लोस्करांची होती तेंव्हा
तुला एका पत्र्याच्या ड्रम मधे उभं केलं होतं
गायी गुरं भटके प्राणी फिरायचे ना तेंव्हा इथं
असे ओळीत पिवळे ड्रम होते
थांबा, पहा , जा लिहीलेले
पोरं यायची पहाटे स्मृतिवनाच्या टेकडी वर
धावत या वळणाशी आली की
थांबा , पहा, जा चा खेळ करत खिदळायची
मग बराच काळ गेला असाच विरत
मी काळा डांबर पांघरला
किर्लोस्कर आणि कमिन्सही वेगळे झाले
तरी पोरं येत होती जात होती
कधी पहाटे कधी संध्याकाळी
कधी रमत गमत कधी धावत
कधी सायकल हाकत
मग कसं काय ते माहीत नाही
पोरं दिसेना झाली, गाड्या धावू लागल्या
कमिन्स काचेची चकचक चमकवायला लागली
मी डांबर उखडून उरावर करडं सिमेंट पांघरलं
ते पत्र्याचे ड्रम गंजले
थांबा-पहा-जा अक्षरं मातीने गिळली
पोरं अशी पण स्मृतिवन विसरलीच होती
मी उदास झालो, उन्हं पीत तळतळलो
आकाश फाटलच कधी तरी,
पाणी पिता येईना मला
मिडास झाला माझा
तू धीर देत उभा आहेस माझ्या पाशी
पण भिती वाटते
माझ्या स्पर्शाने तू सिमेंटचा झालास तर?
ही काहिली कशी शांत व्हावी?”
झाडाने सगळं ऐकून घेतलं
रोजच्या सारखंच न कंटाळता
मायेने हात फिरवत पानगळही केली
सिमेंटने झिडकारली माया झुळकी सरशी
हे ही नेहमीचच
झाड बोडक्या फांद्या सावरत स्थीर राहीलं
उन्हाला जमेल तसं झेलत
आपल्या श्रांत जोडीदारावर
झिरझीर सावली पसरवत
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle