मागे मायबोली वरील गणेशोत्सवातील पाककॄती स्पर्धेत मी ही पा . कॄ. दिली होती. सध्या आंब्याचा सिझनही आहे म्हणून आज इथे आणतेय मैत्रिणींकरता.
साहित्य
१. दूध - ३ पेले
२.ओल्या खोबर्याचा किस/चव - २ पेले
३. आमरस - अर्धा पेला
४. साजूक तूप - २ ते ३ मोठे चमचे
५. साखर - २ ते ३ मोठे चमचे
६. केशर काड्या - ६ ते ७
७. पिस्ते (साधे, खारवलेले नाहीत) ७ ते ८
८. व्हाईट व्हिनेगर - दोन चहाचे चमचे
९. वेलची पावडर - एक ते दोन चिमूटभर
क्रमवार कॄती
१.सर्वप्रथम पनीर करुन घ्यावे. त्यासाठी तीन पैकी दोन पेले दूध एका पातेल्यात घेऊन ते उकळावे. दुधाला उकळी आल्यावर त्यावरील साय बाजूला काढून दुधात थोडे थोडे व्हाईट व्हिनेगर, दूध ढवळत मिसळावे. साधारण दोन चहाचे चमचे व्हिनेगर घालतांच दूध फाटते. ते गाळून पनीर गाळणीवर निथळत ठेवावे. एकदा हे पनीर पाण्याखाली धुवून घ्यावे.
बाजारात मिळते ते पनीरही वापरु शकता.
दोने पेले दूध वापरुन अर्धा पेला पनीर बनते. ते आता बाजुला ठेवावे.
२. साहित्यातील उरलेले एक पेला दूध एका जाड बुडाच्या पातेल्याला साजुक तुपाचा हात लावून त्यात आटवत ठेवावे. एक उकळी येऊन गेल्यानंतर दुधात कालथा घालून ते दूध अधे मधे ढवळत रहावे म्हणजे तळाला लागणार नाही. दूध आटून निम्मे झाले की गॅस बंद करावा. थंड झाल्यावर हे आटीव दूध त्यावर धरलेल्या सायीसकट एकदा मिक्सरवर फिरवून घ्यावे म्हणजे दाट आणि निघोट होते.
३. कढईत १ ते २ मोठे चमचे साजुक तूप घालून त्यात खोबर्याचा किस घालावा आणि मंद आचेवर परतत रहावे. एक - दोन मिनिटे खोबरे परतून झाल्यावर त्यात पनीर कुस्करुन घालावे आणि पुन्हा परतावे. या मिश्रणाला पाणी सुटेल ते आटवावे. मग त्यात निम्मे आटीव दुध घालून पुन्हा चांगले परतावे. मिश्रण मिळून त्याचा गोळा बनू लागला की थांबुन या मिश्रणाचे दोन समान भाग करावेत.एक भाग दुसर्या कढईत काढुन घ्यावा.
४. आता पहिल्या कढईतील मिश्रणात अर्धा पेला आमरस घालून ते मिश्रण परत मंद गॅसवर परतत रहावे. मिश्रण गोळा होऊ लागले व कडेला चिकटू लागले की चिमुटभर वेलची पूड घालून गॅस बंद करावा. साखर घालायची गरज नाही. पण जास्त गोड हवे असल्यास आमरसाबरोबरच साखर चवीनुसार घालू शकता.
५. कॄती क्र. ४ व ५ या लिखाणाच्या सोयीसाठी एकामागोमाग एक लिहील्या आहेत. मात्र त्या एका वेळी दोन वेगळ्या कढईत करायच्या आहेत. क्र. ३ मध्ये बाजूला काढलेले अर्धे मिश्रण दुसर्या कढईत मंद आचेवर ठेवून त्यात उरलेले आटीव दुध घालून परतावे. या मिश्रणात २ मोठे चमचे साखर घालून पुन्हा परतावे. मिश्रण गोळा होऊ लागले की चिमुटभर वेलची पूड घालून गॅस बंद करावा.
६. दोन्ही कढईतील मिश्रण तयार आहे. एका ताटाला साजूक तुपाचा हात लावून त्यावर आधी पांढरे मिश्रण ओतून वाटीने थापावे. त्यावर आमरसाच्यामिश्रणाचा थर ओतून तोही थापून घ्यावा. सुरीने वड्या पाडाव्यात. वरुन केशर काड्या आणि पिस्त्याचे काप लावून सजवावे.
७. थंड झाले की वड्या कापून घ्याव्यात.
मँगो - मलई डबलडेकर फज तयार आहे. पिवळा आणि पांढरा असे दोन वेगळे थर फोटोत दिसून येतील. फज हा खुटखुटीत वड्यांसारखा नसून, मऊ, रवाळ असा पोत असतो. जिभेवर ठेवल्यावर विरघळतो.
यात बरीच व्हेरिएशन्स करु शकता. पनीर विकतचे आणले तर करण्यास अधिक सोपा प्रकार शिवाय रॉयल वाटतो. वड्यांसारखं खुटखुटीत टेक्श्चर नसल्यामुळे जास्त घाटावं लागत नाही.आता आंब्याचा सिझन संपायच्या आत लवकर करुन बघा आणि फोटो दाखवा इथे.