स्पॅनिश वारी - २
कामिनो द सांतियागो बद्दल सुचवल त्या क्षणी , त्या चमकलेल्या डोळ्यांपैकी एकीनी , म्हणजे मी , नक्की ठरवल होतं , जायच!!
उत्सुकता दाखवलेली , उत्साही मेंबरही कन्व्हर्ट झाली ! :) अन आमच्या चौघींचा एक नवा वॉट्स अॅप ग्रुप करून , पुढच्या चर्चा सुरू झाल्या.
तर काय असतं ग हे ! च उत्तर जायच्या आधीच!
स्पेन च्या गॅलिशिया प्रांतात सांतियागो नावाच टुमदार गाव आहे. खुंता द गलीशिया ( राज्यसरकार) ची राजधानी आहे हे गाव ! स्पेन चा इतिहास भुगोल पाहिला तर गलिशिया , कातालुनिया , व्हॅलेन्शिया , अंडालोशिया , बास्क आदी ऑटोनॉमस राज्यांचा समुह आहे . पॉप्युलर टुरिस्ट नकाशावर गॅलिशिया , यादित फार खाली आहे खरतर . पण 'अपोस्टल सेंट जेम्स द ग्रेट ' च्या कॅथेड्रल ला जायची वाट - कामिनो , हे जगभरातल्या लोकाना सांतियागोला घेउन येते. या सेंट जेम्स ची समाधी सांतियागोच्या कॅथेड्रल मधे आहे .
मध्ययुगापासून ,जेरुसेलेम , रोम च्या पापक्षालनार्थ तिर्थयात्रां प्रमाणेच, ह्या कामिनोची ही दखल घेउन, स्वर्गात पापाचा घडा जरा हलका होतो म्हणे . संत म्हटल की आख्यायिका आल्या , चमत्कार आले! भक्त आले! तसेच्ज ह्या संत जेम्स बाबाच्या पण आहेत. लिहिते त्या सावकाश .
काही शतके , कॅथॉलीक अन इतरही भक्त आपापल्या घरून पायी , ह्या संताला भेटायला निघायचे . सोळाव्या शतकातला प्लेग , मग प्रोटेस्टंट चळवळ , नंतर इतर राजकिय धुमश्चक्रीत , ह्याच महात्म्य काहीस कमी झाल . १९७० च्या दशकात फक्त काही शे लोक वर्षभरात भेट द्यायचे अशी नोंद आहे.
१९८७ मधे , युरोपियन युनियन ने ह्या रूटला ,पहिला युरोपियन कल्चरल रुट म्हणून जाहिर केल . युरोपला सांधणारा , इतिहास ,संस्कृती , आठवणींचा पूल ! पुढे युनेस्कोने ही ह्याला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा दिला . अन फक्त कॅथॉलिकच नाही तर जगभरातले इतरही वारकरी ह्या वाटेनी चालायला लागले.
प्रामुख्यानी चालला जाणारा रूट म्हणाजे कामिनो फ्रान्सेस. ७९० किमी ची वाट , फ्रान्स च्या सेंट जॉन पिएर दे पोर्ट ( ह्याचा उच्चार विविध भाषीक लोक वेग्वेगळा करतात , मी असा करते ) पासून सुरू होतो अन सांतियागो ला संपतो. हा सगळ्यात मोठा रूट आहे.
एन्ग्लिस वे ,हा इंग्लंड अन आयर्लंड ला किनार्यावरून चालत अन मग बोटीनी फेरोल नावाच्या स्पॅनिश बंदरावर येतो अन तिथून परत पायी सांतियागोला !
नॉर्दन वे - हा एक गॅलिशिया च्या उत्तरेच्या डोंगराळ सागरकिनार्यावरून आहे , प्रेक्षणिय पण तितकाच अवघड !
प्रिमितिव्हो - मध्ययुगातला प्रचलीत मार्ग
असे बरेच रस्ते म्हणजेच कामिनो सांतियागोच्या दिशेनी आखलेले आहेत .
ह्या चालणार्याना पेरेग्रिनो अर्थात पिलग्रिम्स म्हणतात , वारकरी ! बोर्गो हा त्यांच प्रतिक! वाट्भर हा बोर्गा ह्या ना त्या स्वरूपात भेटत रहातो. पेरेग्रिनो ना रहायला मुनिसिपल अल्बेर्गे ( सरकारी /चर्च च्या धर्मशाळा ) अगदी ५ युरो एका रात्रीचे या दरात उपलब्ध असतात. इथे आधीपासून बुकिंग करता येत नाही . जो पहिल्यांदा पोचेल त्याला बेड! वेळेत नाही पोचलात तर पुढच्या गावी जायच नाहीतर , प्राय्व्हेट अल्बेर्गे देखिल असतात .जरा महाग म्हणजे १०-१५ युरो !! किंवा सराइत वारकरी आपली स्लिपिंग बॅग उलगडून शेतातच/ चर्च च्या आवारात पथारी पसरतात. पेरेग्रिनो मिल राशन्स असतात . खाणे पिणे रहाणे , ह्याचा खर्च दिवसाला २० युरोपेक्षा जास्त नाही.
कोणती वाट चालायची? किती चालायची ? एकाच खेपेत का तुकड्या तुकड्यात? सरकारी धर्मशाळा का खासगी ? एकांड्या शिलेदारासारखी का ग्रुप करून ? मुळात का चालायची !??
To each, his Camino!
-क्रमशः