द ओथकीपर - सर जेमी लॅनिस्टर

गेम ऑफ थ्रोन्समधल्या माझ्या आवडत्या व्यक्तिरेखेबद्दल खूप दिवसांपासून लिहिणार होते ते फायनली काल फेसबुकवर लिहिलं. इथल्या बऱ्याच जणी त्या ग्रुपवर नाहीत म्हणून इथेही लिहिते आहे.

The Oathkeeper

अख्ख्या वेस्टरोसमध्ये सगळ्यात श्रीमंत, सोनेरी घराणं म्हणजे लॅनिस्टर. कास्टरली रॉकवर बांधलेला त्यांचा मजबूत किल्ला. किल्ल्याच्या खिडक्यांमधून दिसणारा समुद्रात बुडणारा सोनेरी सूर्य आणि लांबपर्यंत पसरलेलं लॅनिस्टर्सची सत्ता असलेलं लॅनिस्पोर्ट शहर. ह्या डोंगराखालीच असलेल्या सोन्याच्या खाणी जिच्यामुळे यांची श्रीमंती कधीच कमी होत नाही. अश्या कास्टर्ली रॉकचे राजा-राणी टायविन आणि जोएना लॅनिस्टर. दोघांच्याही धमन्यांत अंडाल्सचं लॅनिस्टर रक्त वहात असल्यामुळे सोनेरी केसांचा, देखणा, उंच जोडा. टायविनने आयुष्यात कुणावर निरतिशय प्रेम केलं असेल तर ते जोएनावर.

कास्टरली रॉकवर जन्मली दोन जुळी बाळं, मोठी सरसी आणि उजव्या हाताने तिच्या पावलाला धरून या जगात आला जेमी. घरात लयलूट असलेल्या सोन्यासारखेच सोनसळी केस आणि रूप, तालेवार कुटुंब, टायविनसारखा कुटील पण प्रचंड बुद्धिमान बाप आणि सुंदर, मायाळू आई असल्यावर काय लाडच लाड. त्यातून हा घराण्याचा वारस, पहिला मुलगा म्हणून तर त्याचं फारच कोडकौतुक. सरसी-जेमी चार वर्षांचे झाले तोच टिरियनचा जन्म झाला. त्याला जन्म देतानाच आई गेली. अश्या राक्षसी दिसणाऱ्या मुलासाठी आपल्या लाडक्या पत्नीला गमावल्याच्या दुःखात टायविन सुन्न झाला. टिरियनला त्याने कधीच आपला मानला नाही. त्याच्यामुळे आपल्या घराण्याची अब्रू जाते, लोक हसतात या गोष्टींनी तो कायम तळमळत होता. हे पाहून सरसीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून टिरियनला जास्तीत जास्त दुःख देत होती.

या सगळ्या वाईट प्रसंगात त्याचा एकच बाऊन्सिंग बोर्ड होता तो म्हणजे जेमी. फक्त जेमीच्या नजरेत ते एक लहान बाळ होतं आणि त्याला जमेल तितकं हसवायचा, आनंद द्यायचा प्रयत्न तो करत होता. वय वाढत गेलं तशी हळूहळू मजा कमी होत गेली आणि सुरू झालं जेमीचं कडक ट्रेनिंग, खानदानाचा वारस जो तयार करायचा होता! तेव्हाच असं लक्षात आलं की जेमीला शिकवलेलं काहीच लिहिता येत नाही कारण ते शब्द त्याच्या मेंदूला उमजतच नाहीत. टायविनच्या जगात एक मुलगा बुटका आणि एक डिसलेक्सीक असणं म्हणजे घोर अपराध होता. तेव्हाच एका विशेषणाची भर पडली, 'जेमी - द स्टुपीडेस्ट लॅनिस्टर'. जेमीचं युध्दकलेचं शिक्षण चांगलं चाललं असतानाही टायविनने त्याला रोज चार पाच पुस्तकं घोकायला लावली. अजिबात आवडत नसूनही बापाच्या धाकामुळे जेमी परिश्रम घेत राहिला आणि हळूहळू का होईना लिहा वाचायला शिकला.

टिरियनसाठी जेमी नेहमीच त्याचा मोठा भाऊ, जगातला एकुलता एक मित्र आणि रक्षणकर्ता होता. एकटा जेमी टिरियनला कधीही बुटका, बिचारा म्हणून न वागवता त्याच्या बरोबरीचा समजतो. त्यामुळे टिरियनच्या मनात भावासाठी एक खास जागा होती. जेमीमध्ये कायम एक तेवणारा दिवा होता ज्याला किंग्सगार्ड म्हणून काम करताना रोज राजाकडून जनतेवर होणारे अन्याय बघून हळूहळू काजळी धरू लागली. पण जेव्हा जेव्हा तो टिरियनच्या संपर्कात येतो तेव्हा तेव्हा तो पुन्हा उजळतो. टिरियन आणि सरसी एकमेकांना कितीही पाण्यात बघत असले तरी केवळ आपण एकमेकांचे काही वाईट केले तर जेमीला वाईट वाटेल आणि तो आपल्यापासून दुरावेल या एकाच भीतीने एकमेकांना इजा करत नाहीत.

जेमी आणि टिरियन दोघांचाही एकमेकांवर प्रचंड विश्वास होता. लहानपणापासून ते दोघेच एकमेकांचे घट्ट मित्र होते कारण दोघेही तितकेच एकटे आणि दोघांनाही एकमेकांची दुःखे समजलेली होती. टिरियन बुटका म्हणून जगाने अव्हेरलेला तर जेमी किंगस्लेयर म्हणून त्याने केलेल्या कृत्यासाठी रोज हिणवला जाणारा.. प्रत्येक कठीण काळात दोघे एकमेकांच्या पाठीशी होते. दोघे जगात दोन टोकांवर असले तरीही कायम त्यांच्या प्रत्येक कृतीवर दुसऱ्याची प्रतिक्रिया काय असेल याचा मनोमन विचार करतात आणि मगच ती कृती करतात. एकीकडे दोघांमध्ये खास लॅनिस्टरी गुण म्हणजे समोरच्या माणसाचा मुळापासून बरोबर अंदाज घेणे, झोंबणारे वर्मी लागेल असे बोलणे, कुणाचीही किंवा कसलीही भीडभाड न ठेवता आपला मुद्दा स्पष्ट सांगणे हे अगदी सारखे होते तर एकमेकांमध्ये नसलेल्या गोष्टींसाठी ते एकमेकांना पूरक, एकमेकांचे alter ego होते. टिरियनकडे असलेले वाक्पटूत्व, हुशारी आणि वाचनामुळे बुद्धीला चढलेली धार तर तिकडे जेमीचे उंच, पिळदार शरीर, लढाऊ वृत्ती आणि चांगलेच अवगत असलेले युद्धतंत्र!

सरसी आणि त्याच्यात जन्मापासूनच जवळीक आणि एकमेकांवर सर्वात जास्त प्रेम होतं. अर्थात सरसीने बापाचा कुटीलपणा पुरेपूर उचलल्यामुळे ती शारीरिक जवळीक कायम ठेवून आपल्याला हवे ते फायदे मिळवत गेली. जेमी फक्त तिच्या प्रेमात गुंतून कायम तिचं हित पहात गेला. The things I do for love.. अगदी मरेपर्यंत! तिच्या प्रेमात, ती कितीही वाईट वागली तरी तिला पाठींबा देत तिच्याशी एकनिष्ठ राहिला, त्याला त्याच्या स्वतःवर विश्वास ठेवायला भाग पाडणारी सापडेपर्यंत... ब्लॅक, व्हाईट, ग्रे या भानगडी त्याच्या डोक्याबाहेरच्या होत्या त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं हित. जेमी नऊ वर्षाचा असताना टायविनची हँड ऑफ द किंग म्हणून नेमणूक झाली. तो जेमीला सरसीपासून तोडून किंग्जलँडिंगला घेऊन गेला, पुढे किंग एरिस II टार्गेरियनच्या सेवेत जवळपास वीस वर्षे काम करण्यासाठी.

आयुष्यातली पहिली लढाई तो पंधराव्या वर्षी सर बॅरिस्टन सेलमींचा squire म्हणून लढला आणि सर आर्थर डेन सारख्या अजेय योध्याने त्याला नाईटहुडचा सन्मान दिला. योद्धा म्हणून नक्कीच तो अख्ख्या वेस्टरोसमध्ये प्रसिद्ध होता. हे आनंदाचे काही क्षण त्याच्या वाट्याला येतात तोच तिकडे टायविनने मॅड किंगला सरसी आणि ऱ्हेगारच्या लग्नाविषयी सुचवले. मॅड किंग टायविन आपल्याशी गद्दारी करेल या संशयाने आधीच वेडापिसा, त्यात हे ऐकल्यावर त्याने वेगळीच चाल खेळली. जेमीला त्याच्या किंग्जगार्डसमध्ये स्थान देऊ केले. हे पद जरी भूषणावह असले तरी ती शपथ घेणाऱ्याने आजन्म ब्रह्मचारी रहावे लागते. सरसीने आपली स्वार्थी बुद्धी वापरून डाव टाकला. जर जेमी किंग्सगार्ड मध्ये असेल तर ऱ्हेगारशी लग्न झाल्यावरसुद्धा तो तिच्या जवळ असेल आणि बाकी कोणीही स्त्री त्याच्या शपथेमुळे त्याच्या आयुष्यात येऊ शकणार नाही. तिच्या सल्ल्याने त्याने मॅड किंगचा प्रस्ताव स्वीकारला आणि मॅड किंगने सरसीच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला.

जेमीने शपथ घेताच तो लॅनिस्टर घराण्याचा वारस राहिला नाही, आपोआप वारस म्हणून उरला बुटका, नावडता टिरियन! मॅड किंगने आपल्याला हातोहात उल्लू बनवून खिजवले या रागात टायविनने पदाचा राजीनामा देऊन सरसीसह परत कास्टरली रॉक गाठला. पुन्हा एकदा जेमीच्या नशिबात एकटेपणा लिहिलेला होता. निराशेत सिंहासनाशी त्याचं कर्तव्य पार पाडताना त्याला समोर दिसत होता मॅड किंगने मांडलेला संशय आणि अत्याचारांचा खेळ. वेडेपणाने त्याच्या नजरेसमोर उभ्याउभ्या जाळून टाकलेले स्टार्क पिता-पुत्र आणि नंतरचा वाईल्ड फायरने पूर्ण शहर जाळून लाखो अजाण माणसांच्या कत्तलीचा आदेश, हे ऐकून त्याने मन अजूनच घट्ट करून ज्याला वाचवण्याची शपथ घेतली होती त्या राजालाच पाठीत तलवार खुपसून संपवले. किंग्सगार्ड म्हणून जी शुभ्र वस्त्रे त्याने धारण केली होती त्यावरच रक्ताचे शिंतोडे उडाले. त्याची प्रतिमा कायमची डागाळली गेली.

या घडामोडींमध्येच रॉबर्टचे रिबेलीयन संपून त्याला नवा राजा म्हणून स्वीकारले गेले. सरसीचे त्याच्याशी लग्न लावून टायविनने आपली संतती राजगादीवर बघायची इच्छा पूर्ण केली तशीच सरसीने राणी बनायची. हा सगळा जल्लोष घडताना ज्याने त्या अत्याचारी राजाला संपवले त्या जेमीला सगळे हिणवतच होते. त्याची योद्धा म्हणून सगळी शान, सगळा माज त्या एका फटक्यात संपून गेला. शपथ मोडली म्हणून ओथब्रेकर, राजाला मारले म्हणून किंगस्लेयर अशी एकेक जंत्रीच जमा झाली. पण त्या क्षणा पासून तो स्वतःच्या आयुष्याकडे जरा वेगळ्या कोनातून बघत होता. रॉबर्टने जरी त्याला माफी देऊन आपल्या किंग्सगार्डमध्ये सामील केला तरी त्याला हिणवण्याची, अपमानीत करण्याची, कमीपणा आणण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. सरसीबरोबर राहून जरी त्याला तीन मुलं झाली तरी ना तो त्यांना बापाची माया लावू शकत होता ना त्याचं नाव. आयुष्यातला कुठलाही आनंद उपभोगायची किंमत त्याने कायम दुःखाच्या मोहरा मोजूनच फेडली. काही झालं तरी ती मुलं बराथीयन होती आणि तशीच राहतील यावर सरसी घारीची नजर ठेऊन होती. जेमी भले पुनः पुन्हा लोकांना पटवत राहिला की त्याने हे काम जनतेच्या भल्यासाठी केलं पण नेहमी त्याच्या वाट्याला कुचेष्टाच आली. जेमीने ठरवूनच टाकलं होतं की लोकांनी ठरवलंच आहे ना, तर आहेच तो वाईट माणूस, आहेच तो धोकेबाज, वचन मोडणारा, बेईमान. इतर कशातही लक्ष न देता तो फक्त सरसीच्या मुठीत तिच्या विचारानीशी आयुष्य रेटत होता.

इकडे सरसीच्या धोकेबाजीने रॉबर्टचा मृत्यू झाला आणि राजा झालेल्या जॉफ्रिच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आली. टिरियनच्या प्रेमापोटी समोरासमोर किंवा आडूनआडून तो त्याला प्रत्येक संकटातून सोडवतच होता. रॉबच्या आक्रमणाचा धोका पत्करून तो रिव्हररनमध्ये टलींविरुद्ध लढून जिंकतोही पण पुन्हा एकदा व्हिस्परिंग वूडच्या लढाईत नशीब हुलकावणी देतं आणि तो रॉबच्या सैन्याच्या हाती लागतो. आधीच नवऱ्याचा मृत्यू आणि मुलांच्या दुराव्यामुळे झपाटलेली कॅटलिन स्टार्क त्याचा वाटेल तसा अपमान करते तरीही तो एक शायनिंग नाईटच असतो. रॉबने मनाई करूनही जेमीला लपवून किंग्सलँडिंगला पाठवून त्या बदल्यात सांसाला सोडवण्याचा घाट कॅट घालते. अश्या वेळी रॉबच्या सैन्याबाहेरची पण कॅटशी एकनिष्ठ व्यक्ती म्हणजे लेडी ब्रिएन ऑफ टार्थ. तिच्यावरच जेमीला सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी दिली गेली. या एका प्रवासाने जेमीचं पुढचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं.

ब्रिएन ही नाण्याची दुसरी बाजू होती. तिच्या रूपावरून जेमीने तिला कितीही टोमणे मारले, अपमान केला तरी वाटेवरचे निरनिराळे प्रसंग पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दल आदर वाढतच गेला. लहानपणापासून सरसीच्या विषारी पकडीत राहिल्यामुळे बाकी कोणत्याही स्त्रीबरोबर इतक्या जवळ एकत्र तो कधी राहिलाच नव्हता. तोपर्यंत त्याला आजूबाजूच्या सगळ्या खानदानी बायका फक्त घरगुती, स्वतःचं सौंदर्य आणि मोठेपणा मिरवणाऱ्या अश्याच दिसल्या होत्या. पण ब्रिएनचं रसायनच काही वेगळं होतं. तिचा खरेपणा, तिची निष्ठा, तिचा स्वत:वरचा विश्वास आणि ती तलवार चालवत गाजवत असलेले पराक्रम! लोकांनी जेमीला जी जी विशेषणे लावली होती त्यांच्या अगदी उलट ब्रिएन होती. पहिल्यांदाच जेमीला आपल्या बरोबरीची अशी कोणीतरी स्त्री भेटली होती. तिच्याशी भांडण्यात, उत्तरं देण्यात त्याला मजा येत होती. ती रेनलीच्या प्रेमात असण्यावरून जेमी तिला टोचून बोलतो पण चिडवता चिडवता त्याला आपलाही सरसीबरोबरचा भूतकाळ आठवतो. तेव्हा तो म्हणतो, I don't blame him. And I don't blame you, either. We don't get to choose who we love. तरीही तिच्यापासून पळून जायचं तो विसरला नव्हता, त्या प्रयत्नातच त्याने हातात तलवार मिळताच लढायला सुरू केलं आणि ते दोघेही आयतेच बोल्टनच्या सैनिकांना सापडले.

इथून सुरू झालं हालअपेष्टाचं सत्र. आयुष्यात कधीही न झालेले अपमान इथे झाले. सोनेरी राजपुत्र असलेल्या जेमीला कस्पटासमान वागणूक मिळाली. ब्रिएनला पुढे होणाऱ्या बलात्कार आणि मानहानीपासून वाचवण्यासाठी त्याने सैनिकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले, तेव्हा पहिल्यांदा ब्रिएनला जेमी स्वच्छ दिसला. त्यावेळी बोल्टन्स हे रॉब सपोर्टर्स असल्यामुळे मोठ्या बक्षिसाच्या आशेने त्यांनी सरळ जेमीचा उजवा हात, त्याचा sword handच तोडून टाकला. तोच हात ज्याने सरसीला धरून तो या जगात आला होता, तलवारबाजी करून टूर्नि जिंकत मान मिळवत होता, ज्या हाताने किंगस्लेयर बनला होता, ज्या हाताने ब्रानला खिडकीतून खाली ढकललं होतं, तोच तुटलेला हात आता गळ्यात बांधून त्याला हॅरेनहालला बोल्टनकडे नेण्यात येत होतं. असहनिय शारीरिक वेदनेपलिकडे जाऊन तो मनाने पार खचून गेला होता. आता एक योद्धा म्हणून त्याच्या जिण्याला काही अर्थच उरला नव्हता. एका लढवैय्याला आपला sword hand गेल्यावर काय दुःख होईल ते त्याच्याबरोबरच ब्रिएनही अनुभवत होती. आपापल्या आयुष्यातल्या लोएस्ट पॉईंटला, भविष्य अंधारात असताना फक्त त्या दोघांचीच एकमेकांना सोबत होती. बोल्टनकडे पोचल्यावर स्वच्छ व्हायला दोघांनाही बाथ हाऊसमध्ये पाठवले गेले. तोपर्यंत त्याच्या हाताची जखम चिघळून त्या प्रचंड वेदनेने तो जवळपास मरणाच्या दारात पोचलेला होता. अश्यावेळी मनात साठलेली सगळी दुःख, सगळी निराशा त्याला कोणाशी तरी उघडपणे बोलायची होती. त्यासाठी तो ब्रिएनच्या बाथमध्ये बसून तिच्याशी ते सगळं बोलून मोकळा होतो. पाण्याने अंगावरच्या चिखलाचा कण न कण धुवून निघताना त्याचे साचलेले मनही हळूहळू मोकळे, स्वच्छ होत जाते. ब्रिएनच्या मनातही त्याच्याबद्दल त्याचं पद, प्रतिष्ठा वगैरे outward glory सोडून एक माणूस म्हणून कणव वाढत चालली होती. बोलता बोलता अशक्तपणामुळे त्याची शुद्ध हरपताना ब्रिएन त्याला सावरते तेव्हा तिने किंगस्लेयर म्हणून हाक मारल्यावर त्याचे उद्गार आहेत, Jaime! My name's Jaime. सगळ्या सोनेरी बिरुदांचे पोपडे खरवडून आत उरलेला फक्त एक उघडा माणूस. तिथे एक व्यक्ती म्हणून त्याचा जवळपास पुनर्जन्म झाला.

नंतर बोल्टन त्याला सुखरूप घरी पोचवत असताना तो एकटा ब्रिएनला सोडून निघूनही जातो पण तिच्या भविष्याबद्दल ऐकल्यावर तसाच परत फिरतो. फक्त ब्रिएनला वाचवण्यासाठी. इथेच त्याच्यावरचा सरसीचा पगडा नाहीसा व्हायला सुरुवात होते. ब्रिएनला अस्वलाशी झुंजवून मजा बघणाऱ्या घोळक्याला पाहून तो कसलाही विचार न करता, नि:शस्त्र असताना, आपल्या थोट्या हातानिशी स्वतःला झोकून देतो आणि खूप प्रयत्न करून तिला वाचवतो. आतापर्यंत त्याने गाजवलेले पराक्रम हे फक्त त्याच्या, सरसीच्या आणि लॅनिस्टर घराण्याच्या स्वार्थासाठी होते पण पूर्णपणे निःस्वार्थी होऊन कोणासाठी तरी स्वतःचा प्राण पणाला लावणे हा फक्त ब्रिएनच्या संगतीचा परिणाम होता.

तिला बरोबर घेऊन किंग्सलँडिंगला पोहोचेपर्यंत त्यांच्यात एक खरं, विश्वासाचं नातं तयार झालं होतं. जेमी हळूहळू स्वतःमध्ये लपलेल्या चांगल्या भावना त्याच्याही नकळत धुंडाळत होता. ब्रिएनबद्दल त्याला नक्की काय वाटतं हे अजूनही स्पष्ट कळले नसले तरी ब्रिएनच्या साध्या सरळ मनात जेमीबद्दल सहानुभूती आणि एक नाजूक कोपरा नक्कीच तयार झाला होता.

किंग्सलँडिंगमध्ये त्या दोघांचा एकंदर वावर बघून सरसीने तिला तुझं त्याच्यावर प्रेम आहे का हे विचारलंच. सरसीच्या जळक्या, कुटील बुद्धीचा आधीच विचार करून जेमीने त्याच्यासाठी करवून घेतलेली अर्ध्या आईसची तलवार आणि चिलखत आणि राजपत्र देऊन ब्रिएनला तिची स्टार्क मुलींना वाचवण्याची शपथ पूर्ण करायला सरसीच्या नजरेपासून दूर गुपचूप पाठवून दिलं. त्याचवेळी ब्रिएनला रेड कीपमध्ये व्हाईट बुक चाळता चाळता जेमीच्या नावाचं पान बहुतेकसं कोरं दिसतं तेव्हा जेमी तिला सांगतो की त्यातले पराक्रम हे आतापर्यंतच्या लॉर्ड कमांडर्सनी लिहिलेले आहेत आणि त्याचं पान भरायला अजून जागा आणि वेळ शिल्लक आहे. आतापर्यंत त्याला जवळून ओळखायला लागलेल्या ब्रिएनने तलवारीला नाव दिलं 'ओथकीपर' आणि त्याने उच्चारलेले शब्द जे तलवार आणि त्याला स्वतःला या नव्याने जन्मलेल्या जेमीलाही लागू होते, ते म्हणजे, "its yours आणि पुढच्या भेटीवेळी म्हटलेले, "it will always be yours." त्याने पहिल्यांदाच आपल्या मनाशी घेतलेली तिला सुरक्षित किंग्सलँडिंगला पोहचवण्याची शपथ पूर्ण केली होती!

मार्टिन आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे पाहिलं तर जेमी-ब्रिएन रिलेशनशिपमध्ये त्यांनी ब्युटी अँड द बीस्ट थीम वापरलीय पण उलटीपालटी करून. शारीरिकदृष्ट्या पाहिलं तर जेमी ब्युटी आहे आणि ब्रिएन बीस्ट. पण तसं तर ब्रिएनला सुरुवातीला ज्या नावाने चिडवलं जातं ते आहे 'ब्रीएन द ब्युटी' आणि जेमी सुरुवातीला त्याच्या वागण्याने बीस्ट नाहीतर काय होता!

ब्रीएन निघून गेल्यानंतर जॉफ्रीचा मृत्यू झाला होता, ते दुःख आणि पुन्हा सरसीमध्ये गुंतत चाललेला जेमी यामुळे पुन्हा तो कुठेतरी हरवत चालला होता. नंतर मायर्सेलाला वाचवण्यासाठी डॉर्नला जाताना समुद्रात मध्यावर दिसलेलं बेट 'टार्थ' आहे हे समजल्यावर जेमीला ब्रिएनने सांगितलेलं तिचं क्रूर थट्टेने भरलेलं बालपण आठवतं आणि आता तिने त्या गोष्टीवर केलेली मातही. 'लेडी' ब्रिएनची जागा, त्याने खोटं बोलून ज्या सफायर आयलंडची लालूच दाखवल्यामुळे हात गमावला ते टार्थ बघून खूप काळाने त्याला ब्रिएनची, त्यांनी एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण होते आणि फार निरागस प्रेमाने तो त्या जागेकडे पहातो.

मायर्सेलाला परत घेऊन येताना ती त्याला पहिल्यांदा आपले वडील म्हणून मान्य करते आणि त्याचवेळी इलारियाने दिलेल्या विषाचा परिणाम होऊन त्याच्या मिठीतच ती शेवटचा श्वास सोडते. लॉर्ड कमांडर ऑफ किग्सगार्ड आणि वडील म्हणून तो प्रिन्सेस म्हणजेच स्वतःच्या मुलीलाच वाचवण्यात अपयशी ठरतो आणि पुन्हा त्याने सरसीला दिलेले आपल्या मुलांचे रक्षण करण्याचे वचन पाळले जात नाही. त्यामुळे आलेल्या गिल्टमुळे तो सरसीच्या अजून जवळ अजून जास्त प्रभावाखाली राहतो. पण जेव्हा जेव्हा तो मानसिक आंदोलनात सापडतो तेव्हा तेव्हा झालेली ब्रिएनची भेट ही त्याला एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आशेचा किरण दाखवते. ते जसे आईसचे दोन तुकडे होते तसेच त्याच्या यिनसाठी ती परफेक्ट यांग आहे.

ज्या गोष्टीसाठी त्याने मॅड किंगची हत्या केली त्याच वाईल्ड फायरचा सरसीने केलेला उपयोग आणि नंतरची टॉमेनची आत्महत्या बघून त्याला यातना तर झाल्याच पण सरसी सिंहासनाच्या आशेने किती निर्दयी होऊ शकते याची जास्त जाणीवसुद्धा झाली. तिन्ही मुलांच्या मृत्यूनंतर जेमी आणि सरसीच्या नात्यात आलेला कोरडेपणा सरसी आपण पुन्हा प्रेग्नन्ट असल्याचे सांगून घालवू पहाते तेव्हा दोन क्षण आनंदाने चमकलेला त्याचा चेहरा लगेच बदलतो कारण त्याचवेळी सरसी युद्धात सामील न होता टिरियनला फसवल्याचे उघड करते. जिवंत माणूस आणि व्हाईट वॉकर्सच्या लढाईत माणसं शिल्लक राहायलाच हवीत हे अटळ सत्य उमगून तो किंग्स लँडिंग, सरसी, न जन्मलेलं त्याचं मूल या सगळ्या त्याला थोपवणाऱ्या बेड्या तोडत घोड्याला टाच मारून त्याच्या थोट्या हातानीशी लढायला निघतो तेव्हाच माझ्या लेखी तो जिंकलेला असतो! हळूच तरंगत त्याच्या हातावर येऊन पडलेला तो स्नोफ्लेकरुपी विंटरही लवकरच त्याला भेटायला येणार असतो.

विंटरफेल ही त्याची अत्यंत नावडती जागा होती, कदाचित त्याने ब्रॅनला ढकलून दिल्याचं गिल्ट त्याला पुन्हा त्या जागी जाण्यापासून थोपवत होतं. तरीही like a true fighter तो तिथे पोहोचला आणि त्याला मारायला टपलेल्या सगळ्यांवर मात करत तो जीव खाऊन लढला. ब्रिएनच्या बरोबरीने, एकत्र, आईसचे दोन तुकडे विंटरफेलच्या बाजूने, विंटरफेलसाठी लढत होते. ब्रिएन आणि त्याच्यात जे नाजूक विश्वासाचं, प्रेमाचं नातं होतं त्याला मूर्त स्वरूप आलं खरं पण तो त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विरोधात जाऊन आयुष्यभर ब्रिएनबरोबर राहूच शकत नाही. तो ज्या लढाईसाठी विंटरफेलला आला होता ती तर जिंकली. जेमीसाठी सफरच सर्वकाही आहे, मंझील काहीच नाही. सरसीची त्याला कितीही चीड आली तरी ती त्याच्या रक्तात भिनली होती. ब्रिएनवर त्याचं कितीही प्रेम असलं तरी तो स्वतःला तिच्या प्रेमाच्या लायक समजत नाही आणि ती सुरक्षित रहावी या विचाराने पुन्हा एकदा तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही असे तिला दाखवून देतो.

शेवटी तो उठून निघतोच त्याची शेवटची शपथ पूर्ण करायला, ती म्हणजे अंतापर्यंत सरसीची साथ! सरसी त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे, जरी त्याला नको वाटली तरीही! आता ब्रिएनने कितीही समजावले तरी तो थांबणार नसतो कारण डनेरीसच्या तडाख्यातून सरसी काही वाचत नाही ही जाणिव आणि आतापर्यंत तो जे काही वागला त्याचे प्रायश्चित्त त्याला सरसीबरोबर जगून नाहीतर मरूनच घ्यावे लागणार होते. त्याप्रमाणे तो किंग्सलँडिंगला परत जातो.

जेमीने वेळोवेळी, प्रसंगी टायविन आणि सरसीच्या विरोधात जाऊन टिरियनला मदत केली आहे आणि टिरियन नेहमी आपल्या मागे जेमी ठाम उभा आहे या एका गोष्टीने निर्धास्त असतो. वेडं धाडस करून जेमी जेव्हा समोर ड्रॅगन असतानाही जीवाची पर्वा न करता डनेरीसला संपवण्यासाठी घोडा दौडवतो तेव्हा त्याच्या स्वतःपेक्षाही त्याच्या जीवाची पर्वा आणि भीती टिरियनला होती. तसाच जेमी स्वतःच्या मनाचे ऐकून 'माणसांची' साथ द्यायला विंटरफेलला येतो तेव्हा सगळ्यात खूषही टिरियनच झाला होता. शेवटी कैद करून ठेवलेल्या जेमीला स्वतःचा जीव धोक्यात घालून कधीही न आवडलेल्या सरसीला वाचवायला पाठवतो तो टिरियनच, फक्त जेमीवरच्या प्रेमामुळे! ही आपली शेवटची भेट ठरू शकते हे दोघांनाही माहिती होतं त्यामुळे ती शेवटची मिठी आणि एकमेकांच्या डोळ्यात दिसलेले आजवरचे प्रेम आणि माया त्यांच्याबरोबर आपल्यालाही वितळून टाकते.

शक्य होईल ते प्रयत्न करून सरसीला शोधून वाचवताना सगळं जग आजूबाजूला कोसळत असताना ते दोघंच एकमेकांसाठी असतात. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला सरसीच्याच मिठीत मृत्यू येतो. The things we do for love...

Long live the oathkeeper ser Jaime Lannister आणि Nikolaj Coster-Waldau for the amazing portrayal of the character.

PAS1211_jaimelannister_bf.jpg

हे तीन व्हिडीओ मला फार आवडलेत. त्यातले शंभरेक व्ह्यूज माझेच असतील Love :dhakdhak:
निकलायचे फक्त डोळे आणि चेहरा बघत रहावा, काय कमाल एक्स्प्रेशन्स! अक्षरशः जगलाय तो हा रोल Lovestruck
जेमी-ब्रिएन 'बॅड लायर'
अ मॅन ऑफ ऑनर
सर जेमी लॅनिस्टर

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle