साधारण 14 15 वर्षांपूर्वी आतासारखे स्वतंत्र म्युजिक चॅनल्स नसायचे. सोनी वगैरे सारख्या रेग्युलर चॅनेल वर चार्टबस्टर्स, म्युजिक मंत्रा सारख्या दिवसातून 3- 4 वेळा लागणाऱ्या 15- 30 मिनिटांच्या कार्यक्रमात गाणी, पॉप अलबम्स, सिनेमांची काही सेकंदांची झलक ,ज्याला आता टिझर म्हणतात, दाखवली जात असे. नवीन सिनेमे येत नाहीत तोवर रोज त्याच त्या गाण्याची इटरेशन्स चालायची. मला केवळ गाण्यांसाठी या कार्यक्रमाचे भयंकर वेड होते. यांचे ठराविक वेळापत्रक लक्षात ठेवून जमेल त्या वेळेला तीच ती गाणी पाहण्यासाठी मी टपून असायचे. 2004 साली वीर जारा च्या " मै यहा हु यहा' गाण्याची झलक त्यावर येऊ लागली. ती दाखवण्याची पद्धत अशी होती की आधी 3- 4 सेकंदांसाठी त्याच चालीतली मदमोहन यांच्या आवाजातली 'अब किसको कहू अपना हमदम" असे शब्द असलेली जुनी रेकॉर्ड वाजवली जात आणि लगेच उदित नारायण च्या नव्या कोऱ्या आवाजात, नव्या म्युजिक अरेंजमेंट मध्ये ड्रम्सचे दोन बिट्स वाजून "जानम देखलो मिट गयी दुरिया" मध्ये ते गाणं स्मूथली ट्रान्झिट होत असे. मी त्या गोष्टीला प्रचंड addict झाले होते. मै यहा आवडू लागल्याचं हे सगळ्यात मोठं कारण होतं. किंबहुना, या अलबम मधलं हेच गाणं माझं सगळ्यात आवडतं आहे. आज फेसबुक वर कुठंतरी संगीतकार मदमोहन यांचा जन्मदिवस आहे असं वाचलं तेव्हा या सगळ्याची आठवण झाली आणि लगेच यु ट्यूबवर जाऊन ते जुनं रेकॉर्डिंग ऐकलं. वीर जारा च्या गाण्यांच्या सगळ्या चाली त्यांच्या आहेत, तेव्हापासून 25-30 वर्षांपूर्वी बनवून ठेवलेल्या आणि यात री क्रिएट केलेल्या. त्यावर काही समीक्षकांनी केलेली "या चाली जुन्या आहेत, त्या बनवण्याचा मूड तेव्हा वेगळा, आताच्या सिनेमाचा मूड वेगळा, त्यामुळे चाली सुंदर असून विसंगत वाटतात" टीका ही आठवते. पण नववीत कोण कशाला समीक्षणाची पर्वा करतोय!
असो, तर मी आजवर मदमोहन यांची खूपच थोडी गाणी ऐकलेली आहेत , कोणी सुचवलेली किंवा कधी कोणी लावलेली असतानाच बहुदा. ती विस्मरणात पण गेलीयेत.गाणी लक्षात आहेत पण ती यांचीच आहेत हे माहीत नाही असेही घडू शकते. कधीतरी मूड झाला तर ऐकेन, तेव्हा आठवतील. पण त्यांच्याबद्दल स्वतः कमावलेली, पुढेही पक्की लक्षात राहील अशी ही एकमेव आठवण!
खाली "अब किसको कहू अपना हमदम" ची लिंक देतेय. दुर्दैवाने गाण्याचा फक्त मुखडा आहे. कडव्यांची चाल यांचीच आहे की नवी तयार केली गेली याबाबत मात्र खात्री नाही.