परवा अचानक लाराकडून प्रॉन्स सूपाची फर्माईश आली. प्रॉन्स सूप, क्लियर हवं, त्यात त्या हिरव्या चंद्रासारख्या दिसणार्या चकत्या हव्या, लाल रंगाचं हवं आणि आंबट तिखट हवं. अधिक चौकशीअंती त्या हिचंदिच म्हणजे कापलेली कांदेपात असा निष्कर्ष निघाला. मग बाजारातून काही गोष्टी आणल्या, आदल्या दिवशीच नीता कोळणीनं प्रॉन्स आणून दिल्या होत्याच. काल केलं बाई सूप आणि एकदम यँव बनलं.
घटक :
थोड्या गाजराच्या ज्युलियन्स, लाराला लीक हवी होती पण ती मिळाली नाही त्याऐवजी बॉक चॉय घेतलं, कांदेपातीचा फक्त पातीचा भाग, गवतीचहा, बेसिल, एक टोमॅटो, लिंबू, सिसमी ऑईल, सीराचा सॉस, राईस नुडल्स (हव्या तर) आणि अर्थात कोलंब्या.
कृती:
गाजराच्या बारीक उभ्या सळ्या (ज्युलिअन्स) करून घेतल्या. कांद्याची पात (फक्त हिरवा भाग) गोलच कातरून घेतली. बॉक चॉय बारीक कापून, बेसिलची पानं हातानंच तुकडे करून, टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेतले. गरम पाण्यात राईस नुडल्स बुडवून ठेवल्या. त्यातच गवतीचहाच्या पाती टाकून ठेवल्या.
कढईत थोडं सिसमी तेल घालून सर्व भाज्या आणि कोलंबी जरा दोन मिनिटं परतली. मग त्यात राईस नुडल, गवती चहाच्या पाती आणि ते सर्व पाणी घालून उकळायला ठेवलं. हे पाणी सर्व वापरलं कारण यात गवतीचहाचा अर्क आणि चव उतरते. त्यात मीठ, सिराचा, अजून थोडं सिसमी ऑईल आणी थोडं तिखट (हवं तर ) घालून छानपैकी कोलंब्या शिजेपर्यंत उकळलं. गवतीचहाच्या पाती काढून टाकल्या, लिंबू पिळलं आणि बाऊलभर सूप लाराला दिलं. भाज्या आणि विशेषतः राईस नुडल्स असल्यानं अगदी क्लियर नव्हतं.
फोटो काल काढायला विसरले. टाकते नंतर. अजून थोडं उरलंय त्याचा काढेन.