स्पॅनिश वारी -५ चिन्ह खुणा अन संकेत!
मी मुळात श्रद्धाळू वगैरे नाही . अजिबातच नाही. त्यामुळे आजवर संकेत दृष्टांत वगैरे कथा , अख्यायीका मनोरंजन म्हणून वाचल्या होत्या , अन सोडून दिल्या होत्या. पण ह्या कथा अन आख्यायीका , कितीही अतर्क्य अन अचाट असल्या तरी त्यात एक स्पष्ट हेतू असतो . ठरावीक माहिती पोचवायचा. धर्मा प्रसार , सत्ता प्रसार , एखादी नविन कल्पना , चळवळ उभी करणे ह्या सगळ्यात अश्या मिथकांचा , प्रतिकांचा अन अख्यायीकांचा मोठा हात असतो. तत्कालीन समाजाची , अर्थव्यवस्थेची , संस्कृतीची फार मस्त प्रतिबिम्ब पडलेली असतात ह्या गोष्टींमधे .
सांतियागो अन आजूबाजूचा जो गॅलिशिया ( पुर्वीचा इबेरिया )प्रांत आहे त्याचा पेट्रन संत म्हणजे सेंट जेम्स. इथल्या खडकाळ किनारपट्टीवर मासेमारी करणारे जेम्स अन जॉन हे दोघे बंधू , ख्रिस्ताच्या १२ प्रमुख अनुयायांपैकी ( अपोस्टल्स) . तोवर पेगन जीवन पद्धती ( कोणत्याही ठरावीक धर्माचे अनुयायी नसलेले) असलेले गॅलिशियन मोठ्या प्रमाणात ख्रिश्चॅनिटी कडे वळवायच भलमोठ काम , सेंट जेम्स नी केलय अस मानल जात. जेम्स द मूर स्लेयर ( मूर आक्रमणकर्त्यांचा कर्दनकाळ जेम्स ) अशी ही एक ओळख आहे त्याची. तेव्हाच्या रोमन राजा च्या विरोधात जाउन ख्रिस्ता ची शिकवण दिल्याबद्दल ह्याला सुळावर चढवण्यात आल. अपोस्टल्स पैकी हा पहिला शहिद.
हा ख्रिस्ताच्या कार्यकाळात ला आहे म्हणजे केव्हाचा ते पहा ! पण ह्याची शवपेटी घेउन येणारी बोट भरकटली , ती इबेरियन किनार्याला लागली , तिथल्या राणीनी ह्या अनुयायांना हुसकून लावायला सैन्य पाठवल .तर चमत्कार झाला ! सैन्य पुलावरून पडल अन वाहून गेल. हे पाहून राणी सरकार लगेच जेम्स चा झेंडा हाती धरून मदत कर्त्या झाल्या . एक खेचर अन रसद दिली अन ' जा ढुंढ लो समाधी के लिये जगह म्हणून " लवाजमा पाठवून दिला . अनुयायी अन भक्त गणाना काय करावे कोठे जावे काही कळेना मग सर्वानुमते खेचराला फॉलो करायचे ठरले. ते ही बिचारं चाल चाल चालल अन आताच्या सांतियागो ला जाउन बसकण मारली. तिथ्थेच आता च कॅथिड्रल आहे. ( ही झाली आख्यायीका क्रमांक १ )
आता हा प्रवास भौगोलीक तर झालाच तसाच टाइम ट्रॅव्हलही झाला ! पण ते असो .
आता हिच शवपेटीवाली बोट वादळात सापडली , बुडाली ( नक्कीच त्याचा कप्तान सत्यनारायणाचा प्रसाद न खाल्ल्लेला साधूवाणी होता ) ती कालांतरानी ( हे काही शतकं ही असू शकतं ) किनार्याला लागली. शंख शिंपल्यांच आवरण तयार झाल होतं पेटीवर . अन पेटीतला ऐवज सुरक्षित ठेवला होता.हा ऐवज आजही कॅथेड्रल मधे आहे! तर असा शिंपला आला गोष्टीत. आपल्या विठोबाची मकरकुंडले तशी ह्यांची शिंपले माळ ! ( ही दुसरी गोष्ट! )
अश्या गोष्टी अनेक आहेत . पण ह्या सेंट नी एका झेंड्याखाली एक मोठा प्रभाग एकत्र केला , तेव्हा अन नंतरही विविध वेळा मिळालेला राजाश्रय यामुळे हे प्रस्थ मोठ झालं . राजा अल्फोन्सो -२ यानी सांतियागोला समाधी ला पायी चालत भेट दिली अन इथे कॅथिड्रल बांधून टाका ! मोठ्ठ तिर्थक्षेत्र झालच पाहिजे अशी कामिनोची सुरवात जवळ्पास नवव्या शतकात केली. ख्रिस्त पूर्व काळातही पेगन्स , वर्ष अखेरीस पायी चालत फिस्तेरे ( जगाचा शेवट ) नावाच्या किनार्यावर जायचे . इबेरियाचा( आज गॅलिशिया म्हणून ओळखला जातो ) हा पश्चिम किनारा . तिथे जाउन जुने कपडे मावळत्या सुर्याला साक्षी ठेउन जाळून टाकायचे अन नव्या दिवसाची / वर्षाची सुरवात करायची ही प्रथा. विविध ठिकाणाहून इथे येणार्या वाटा प्रचलीत होत्याच. ह्याचच नवीन रुप म्हणजे कामिनो द सांतियागो .
आधुनिक काळातही असाच राजाश्रय मिळाला , युरोपियन युनियन नी कामिनो फ्रान्सिस ला ( प्रामुख्यानी चालली जाणारी वाट ) पहिला कल्चरल रूट म्हणून जाहिर केला . नव्या युगात ही गोष्टी सांगणारे होतेच . पाओलो कोहेलो , अर्नेस्ट हेमिंग्वे नी कामिनो चालण्याच्या अनुभवांवर लिहिलेली पुस्तके , द वे , मिल्किवे सारखे सिनेमे यांनी परत एकदा जान आणली. अन कामिनो च स्वरूप निव्वळ धार्मिक न रहाता , फिलॉसॉफीच्या वाटेनी जाणार झालं . अर्थात अजूनही सेंट जेम्स उर्फ सांतियागो च्या ओढीनी जाणारे , खूप लोक आहेत . त्याच्या पायाशी सगळ्या संकटांची गाठोडी ठेवणारे , पापांची कबुली देय्न प्रायश्चित्त घेणारे, प्रश्नांची उत्तर शोधणारे आहेत . मला वाटत अत्यंत बेसिक गरजा पुर्या करत , महिना दिड महिना निसर्गाच्या सानिध्यात चालत जाताना , अजिबात ओळख नसलेल्या सहवाटसरू बरोबर चालताना , जगण्याच्या आयुष्याच्या गप्पा मारताना ,मनातले डोक्यातले गुंते आपसूक सुटत असणार .
भक्ती म्हटली की दृष्टांत आला! ओक च्या झाडाखाली बसलेल्या गुराख्याला द्रुष्टांत झाला अन सांतियागोत कॅथिड्रल उभ राहील! आता ही फेसबुक वर अनेक कामिनो फोरम्स आहेत! जायच्या तयार्या , टिप्स , संकेत ,द्रूष्टांत !! ताजा द्रूष्टांत- एका अमेरिकेतल्या मध्यवयीन बाबानी लिहिलय. "संसार मुलं नोकरी सगळ्या जबाबदार्या संपल्या अन मी मनाशी नक्की केल की आता कामिनो चालायच! विमानाची तिकिट काढली अन धाकट्या लेकाच्या ग्रॅज्युएशन ला आलो! अन त्याला डिग्री द्यायला आलेला चान्सलोर होता जिमी नेस्बिट , द वे मधे काम केलेला अभिनेता! हा नक्कीच संकेत आहे! सांतियागो इस कॉलिंग मी!!"
एकदा का त्या नजरेनी पहायला लागल की त्या रंगात बरच काही दिसत! मला ही दिसल!
आम्ही सारीयाला ( जिथून चालायला सुरवात केली ) पोचलो तेव्हा बियात्रीस भेटली अन म्हणाली इथल्या चर्च ला जाउन या! गल्लीच्या टोकाला आहे .
लिड काइंड्ली लाइट!
lead kindly light ,amid the encircling gloom , lead thou me on!
the night is dark and i am away from home , lead thou me on.
ही सुंदर कविताच आठवली मला. मी औरंगजेब आहे कविता कळण्याबाबत. पण रस्ताभर विविध कविता आठवल्यात अन अत्यंत सुदर प्रसंग धडलेत त्या कवितांभोवती.
आर्झुअ गावा नंतर चालताना निलगीरीच्या जंगलात दोन वाटा दिसल्या , दोन्ही इतक्या सुंदर ! दोन्ही कडे जावस वाटल अन अजून एक कविता आठवली ! उस्फुर्त पणे ती म्हटली . अन चक्क शेवटची ओळ मागून येणार्या एका पेरेग्रिनो नी बरोबर म्हटली! मला अन त्याना दोघानाही अत्यंत आनंद झाला तो क्षण सुंदर झाला म्हणून अन ब्युएन कमिनो म्हणून आम्ही आपापल्या वाटेला लागलो! अन हिच गम्मत आहे कामिनो ची. इतके लहान लहान क्षण जगतो ना आपण इतरांबरोबर.
ह्या त्या वाटा! आता कविता ओळखा पाहू!!
घाबरू नका , कवितांचा अँटेना सक्रिय झाला कामिनो चालताना , पण त्याला मी कोणताही संकेत मानलेला नाही , अन मी कै कविता करणार नाही . :ड
हे संकेत अन त्याचे अर्थ लावण हे प्रत्येकाच आपापल खाजगी असेलच. पण भाषा निरपेक्ष , निव्वळ चिन्हांतून ,चित्रातून माहिती सांगणे ए अश्या ट्रेल्स वर फार महत्वाच ! अन ते काम गॅलिशियातल्या फादर डॉन इलियास यांच. नवव्या शतकात तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या सांतियागोला , युरोपभरातून भाविक यायचे. व्यापारासाठी प्रचलीत रोमन रूट्स सहसा वापरले जायचे. खरतर ह्या वाटांवरच चर्च , बाजारपेठा , हॉस्पिटल्स ( त्या काळी हॉस्पिटल्स ही रुग्ण बरे करण्यासाठी नाही , तर चर्च ला संलग्न अशी रुग्ण सेवागृहे होती , गावापासून आजाराच अन आजार्यांच आयसोलेशन ) कॉन्व्हेन्ट्स बनली , अन लहान मोठी गाव ही वसली. चौदाव्या शतका पर्यंत युद्ध , दुष्काळ , साथीच्या रोगांमुळे हे जरा कमी ही झाल, परत आधुनिक राजाश्रय मिळेतो. १९५० च्या दर्म्यान , एका पॅरिश च्या फादर नी ह्या सेंट जेम्स च्या वाटांचा अभ्यास केला , स्वतः पायी चालून अभ्यास केला , त्यावर युनिव्हर्सिटी ऑफ सालामांका मधे प्रबंध ही लिहिला. आज ह्याच सद्गृहस्थाच्या वाटा मार्क करण्याच्या भल्या मोञ्ह्या कामामुळे लाखो लोक कुठेही न चुकता सांतियागो ला पोचतात. खुण होती पिवळ्या रंगाचा दिशादर्शक बाण ! इतक साध सोप करून टाकल त्या बाणानी चालण!
ह्याच बरोबर होते मैलाचे दगड. किलोमिटर चे म्हणा खरतर. निळ्या रंगावर पिवळ्या शिपल्याच रेखाचित्र अन खाली चौकोनात सांतियागोपासून किती अंतर उरल त्याचा आकडा! मजल दरमजल करताना लहान होत जाणारी ही संख्या अजून जरा चालू अस वाटायला लावायची!
हा पिवळा बाण ! अगदी कुठेही असायचा.
अन हा मैलाचा दगड!
हा १०० किलोमिटर चा दगड !
चालणारे ह्या वर दगडाची उतरंड करून नवस बोलतात! अन सह्या पण करतात.
काही ठिकाणी दोन वाटा दिसतात! पुर्वापार चालत आलेला रस्ता अन नवा रस्ता! ह्या नव्या रस्त्यांवर सहसा एखाद सुंदर गाव , चर्च , पायवाट , झरा असतो! जरा लांबचा असतो पण सुंदर असत्तो. आम्ही नेहेमी तोच रस्ता निवडला!!
कधी गावांमधे हा खिडकीवर दिसतो
कधी शेतांमधे
निर्मनुष्य वाटेवर पण शेतघरांवर हा बाण साथ देतो!
अन शेवटी शुन्य मैलावर ! तिथे थेट सुर्यानीच दाखव्ली वाट !
हे कामिनोची आठवण म्हणून !!
इतक्या विविध माध्यमातून हे बाण दिसत रहातात! रस्ता दाखवत राहतात. मग काय , शिंपला पाठीवरच्या सॅक ला अडकवून पेरेग्रिनोज कीप वॉकिंग !!