ला बेला विता - २

भाग १

तिची पाठ वळताक्षणीच तो आपलं जास्तच निरीक्षण करतोय असं तिला जाणवलं म्हणून तिने चालता चालता सहज मागे वळून पाहिले. आता त्याचा गॉगल टेबलवर होता आणि त्याचे हिरवट घारे डोळे तिच्यावर रोखलेले होते आणि चेहऱ्यावर वेगळेच काहीतरी भाव होते जे प्रयत्न करूनही तिला उमगत नव्हते. त्याची नजर तर शांत, थंड होती पण त्या एखाद्या  हिरवट शेवाळलेल्या डोहासारख्या शांत डोळ्यांमागे प्रचंड खळबळ दडलेली आहे असं तिला वाटू लागलं. ती पटकन मान फिरवून रिसेप्शनमधल्या तिच्या खुर्चीवर जाऊन बसली.

तो जेवतानाही सारखा आपल्याकडेच लक्ष ठेऊन आहे हे तिला जाणवत होतं. त्याच्या विचारांपासून दूर जाण्यासाठी तिने सकाळपासूनच्या घटना मनात आठवायला सुरुवात केली. सकाळी आल्या आल्या तिला नुपूरा भेटली होती. टेबलवर डोकं टेकून बसलेली, हताश दिसणारी नुपूरा. बेलाने पटकन जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला बोलतं केलं.

"काही विशेष नाही ग, चम्स!" नुपूरा तोंड वाकडं करत म्हणाली. ओह... आता बेलालाही वाईट वाटलं. नुपुरा आणि तिचा नवरा अभिषेक गेली तीन वर्ष बाळासाठी ट्राय करत होते पण नेहमी तिच्या वाट्याला हताशाच येत होती. एके काळी एकमेकांच्या प्रेमात डुंबणारे हे कपल आता त्यांच्यातलं प्रेम कुठेतरी हरवून बसलं होतं. दोघेही मान्य करत नव्हते पण बाळाच्या नादात ते एकमेकांना वेळ द्यायलाच विसरत होते. अभिषेकने त्याच्या आयटी फर्मच्या कामात स्वतःला हळूहळू चोवीस तास बुडवून घेतलं होतं. नुपूराच्या सोबतीला दिवसभर बेला असल्यामुळे तिला तिच्याशी तरी मोकळेपणाने बोलता येत होतं. नुपूरा मान्य करत नसली तरी बेलाला त्यांचं नातं तुटताना पाहवत नव्हतं. तरीही नुपूरचं दर महिन्याला आशेवर रहाणं आणि शेवटी मना शरीराने तुटून जाणं तिला सारखं दिसत होतं. आजही ती इतकी डिप्रेस्ड दिसत होती की तिच्याकडून काम करून घेणं बेलाला क्रूरपणा वाटला. म्हणून लगेच उबर बोलावून तिने नुपूराला घरी जाऊन आराम करायला सांगितले होते.

त्यानंतर सेमिनार मधल्या गर्दीची किरकिर आणि नंतर उगवलेला हा! तिचे डोळे हळूच त्याच्यावर जाऊन स्थिरावले. त्याचे सिल्की डार्क ब्राऊन सरळ केस आणि स्टबल, त्यातून दिसणारी लोण्याचा गोळा सहज कापेल अशी करकरीत जॉ लाईन, हनुवटीवरचा खड्डा, पातळ जिवणी.. ओह गॉड. त्याचे डोळे सोडून बाकी गोष्टी तिने पहिल्यांदाच नोटीस केल्या. नक्की हा करत काय असेल, सेल्स वाला असावा तर त्याचे कपडे खूपच साधे आहेत, जॅकेट तसं वापरलेलं दिसतंय, जीन्स आणि टी तर काय सुट्टीवर असलेला कुणीही घालेल. पण 'ला बेला' मध्ये लंच करतो आहे म्हणजे इन्कम तरी चांगला असणार...

"ओळखलं नाहीस ना त्याला?" रिसेप्शन काउंटरला टेकून तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत संजीव म्हणाला.

"कोण?" ती मोठ्या मेहनतीने संजीवकडे लक्ष वळवत म्हणाली.

"दिवाण." तरीही तिला क्लिक न झाल्याचं पाहून तो पुढे म्हणाला. "असीम दिवाण."

असीम दिवाण.. तिच्या डोक्यात गोंधळ माजला. नाव ओळखीचं आहे पण आठवत का नाहीये... आणि अचानक तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. बारावी कॉमर्स बी डिव्हिजनचा वर्ग, अठरा वर्षांची बेला, ज्युनियर कॉलेजची क्वीन बी आणि तो! लगेच तिचा चेहरा उतरला, शिट! कशाला आठवलं..

"हम्म, असीम दिवाण..." ती श्वास सोडत त्याच्याकडे पहात स्वतःशीच म्हणाली.

"तोच तो. त्याला कशी काय विसरलीस तू?" संजीव म्हणाला.

आतापर्यंत खरंच विसरलीच होती ती. कदाचित नकोशी आठवण आपण खोडून खोडून नाहीशी करतो तसंच काहीसं. पण कितीही खोडलं तरी तरी तो ओबडधोबड चरा तसाच राहतो खाली. त्याचा तो मखमली आवाज आणि बुडून जावेसे वाटायला लावणारे दुःखी घारे डोळे तिच्या मनात खोलवर कुठेतरी काट्यासारखे रुतून बसले होते.

"इथेच राहायचा ना तो?" संजीवने पुन्हा विचारले.

तिला आठवत होती हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या आधीची तिची कॉमर्सची दोन वर्षे. तिचा भाऊ ऑलरेडी वडिलांना हॉटेल बिझनेसमध्ये जॉईन झाला होता त्यामुळे फायनान्स सांभाळायला घरात एक सीए असावा अशी त्यांची इच्छा होती. पण बारावीतच बेलाला कळून चुकलं की लेजर एन्ट्री चुकवून डोळ्यातून पाणी काढण्यापेक्षा कांदा चिरताना डोळ्यातून आलेलं पाणी आवडतंय आपल्याला. त्यामुळे बारावीनंतर हट्टाने तिने हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतली.

पण अकरावी-बारावीतली बेला इनामदार? ओह शी वॉज वाईल्ड! आता तिला तेव्हाच्या वागण्याबद्दल अगदी लाजिरवाणे वाटत असले तरी तेव्हा तिचा आत्मविश्वास अगदी ओसंडून वहात होता. तिच्या वयाच्या बाकी मुलींपेक्षा ती खूप अट्रॅक्टिव्ह होती. तिचा क्युट चेहरा, उंची, कर्व्ही फिगर आणि स्मार्ट ड्रेसिंग सेन्समुळे वर्गातली, बाहेरची बरीचशी मुलं तिच्यावर फिदा होती आणि त्यांच्याशी फ्लर्ट करून आपण त्यांच्याकडून सगळी कामं करून घेऊ शकतो हे तिला कधीच कळलं होतं. याचमुळे वर्गातल्या बऱ्याचश्या मुलीही तिच्यावर जेलस होत्या. जवळपास सगळी मेल पॉप्युलेशन तिच्या मागे होती फक्त एक सोडून - असीम दिवाण!

अर्धी सेमिस्टर संपता संपता असीम त्यांच्या वर्गात आला. तो सायन्सला होता आणि एक वर्ष गॅप घेऊन आता कॉमर्सला आला वगैरे चर्चा तिच्या कानावर होत्या. पण मोठी न्युज म्हणजे मराठी, हिंदी नाटक, चित्रपट, टीव्हीवरचे प्रसिद्ध ऍक्टर विक्रम दिवाण यांचा तो मुलगा होता. एक दशक प्रचंड प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा माणूस हल्ली जरा साईड ऍक्टरच्या रोल्समध्ये आला होता तरीही त्यांचं खूप नाव होतं. असीम आल्यापासून त्याच्याशी जवळीक दाखवण्याची मुलींच्यात जणू स्पर्धाच सुरू होती. मग त्यात तीही मागे कशी राहील. संधी मिळेल तिथे ती त्याच्याशी बोलण्याचा, फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होती. पण असीम त्या सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळाच होता. नेहमी एकटा बास्केटबॉल खेळत असायचा नाहीतर लायब्ररीत काही वाचत बसलेला असायचा. नक्की तो बाकी क्राऊडपेक्षा स्वतःला ग्रेट समजत असणार.  "छोड यार, वो तुम्हे घास नही डालनेवाला" म्हणून मोनाने तिला मारलेला टॉन्ट काही ती विसरू शकत नव्हती. डिसेंबरमध्ये त्यांची सेंडऑफ पार्टी होती त्यात हा माझा बॉयफ्रेंड म्हणून तिला मिरवायचंच होतं. म्हणून ती प्रयत्न करायला गेली आणि ती घटना झाली ज्यामुळे ती प्रयत्न करून हे सगळं विसरून गेली होती...

शिट! त्याच्याही हे सगळं लक्षात असेल का? आत्ता मला बघून तरी सगळं आठवलंच असेल. मला कसा काय विसरू शकतो हा, मला? तिचे विचार सैरभैर झाले होते. "तो तर बारावीनंतर शिकायला दिल्ली NLUमध्ये होता ना? सुप्रीम कोर्ट लॉयर वगैरे झाला असेल आता. वडिलांना भेटायला आला असेल इथे." भूतकाळातून बाहेर पडायला म्हणून तिने काढायचा म्हणून विषय काढला.

"गॉड! केवढी नाईव्ह आहेस तू.." संजीव मान हलवत म्हणाला. "त्याच्याबद्दल केवढं गॉसिप झालं होतं गावभर, तुला माहितीच नाही का? त्याच्या वडिलांनी त्याला तेव्हाच घराबाहेर काढलं होतं. आणि अर्थात ही बातमी दाबून टाकली होती."

"काहीही, अरे तो NLU मध्ये जाण्यासाठी इथून गेला ना.."

संजीवने इकडे तिकडे पहात जवळ कुणाला ऐकू जाणार नसल्याची खात्री केली आणि तिच्या कानाजवळ जात हळूच बोलायला लागला,
"हो पण तेवढंच नाहीये ते. त्याला घराबाहेर का हाकललं होतं ते माहितीये का, त्याला त्याच्या सावत्र आईबरोबर रेड हँडेड नको त्या अवस्थेत पकडलं होतं त्याच्या वडिलांनी. ती अवंतिका नाही का, स्मॉल टाइम हिरोईन. दिवाणांपेक्षा पंधरा वीस वर्षांनी लहान होती ती!"

"क्काय??" ऑलमोस्ट ओरडता ओरडता तिने तोंडावर हात ठेवला. तिच्या पोटात ढवळून आलं.
काय माणूस आहे हा! तिच्याबरोबर जे झालं त्याबद्दल राग होताच पण हे ऐकून हा असा वेगळा काही प्रकार असेल किंवा तो हे असं काही करू शकेल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. एवढं करून पुन्हा त्याच गावात यायची हिंमत करतो हा, शी! तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं तर तो हातात एस्प्रेसोचा कप धरून, शेजारच्या टेबलावरच्या मुलीकडे झुकून तिच्याशी हसत काहीतरी बोलत होता.

तिने संजीवकडे बघून मान हलवली.
"मग तू एवढं काय बोलत होतास त्याच्याशी?"

"सेम टेबलवर बसलोय तर काहीतरी बोलायला हवं ना, असंच टाईमपास काही बोललो. एनिवे, मी निघतो आता. बिल पे केलंय. ऑलीला सांग, तिरामीसू भन्नाट होतं नेहमीप्रमाणेच." तो लॅपटॉप सॅक पाठीवर चढवत म्हणाला.

"थँक्स, सांगते ऑलीला. खूष होईल. चल सी या" म्हणत तिने हात हलवला.

संजीव दाराबाहेर जाताच ती एक मोठा निश्वास टाकून धपकन खुर्चीत बसली. आज दिवसभराचे श्रम आणि वाईट बातम्यांमुळे ती मना-शरीराने अतिशय थकून गेली होती. लंच संपवून बरीच गर्दी कमी झाली होती. आता घरी जाऊन आधी गरम शावर आणि काहीतरी कंफर्ट फूड खाऊन निदान दहा तासांची झोप तिला हवीच होती. आजची संध्याकाळ नुपूर एकटी मॅनेज करू शकेल.

हेड शेफ ऑलविनला ग्रोसरीबद्दल सांगायला ती किचनच्या दिशेने निघाली होती पण न राहवून शेवटी तिने त्याच्याकडे पाहिलेच तर, ओह शिट! तो लंच संपवून तिच्या दिशेनेच येत होता. ती पटकन वळून पलीकडेच असलेल्या वॉशरूममध्ये शिरली. तिला त्याला अजिबात फेस करायचे नव्हते. ना इथे, ना कुठेच. बराच वेळ धडधडत्या छातीने टॉयलेट सीटवर बसून राहिल्यावर शेवटी ती उठून, हात धुवून बाहेर आली तेव्हा तो कुठेच दिसत नव्हता.

चेहऱ्यावर सुटकेचं हसू वागवत ती किचनकडे निघाली तोच सनाने तिला थांबवलं.

"मॅम, ये टेबल फिफ्टीन पर जो सर बैठे थे उन्होने आपके लिए दिया है" म्हणत तिने एक लहानसे मस्टर्ड यलो एन्व्हलप बेलाच्या हातात दिले.

वर निळ्या शाईने 'मूर्ख, छपरी आणि अतिशहाण्या माणसाकडून' असे सुंदर  हस्ताक्षरात लिहिले होते.  शिट्! ती किती मोठ्या आवाजात बोलली होती ते आता तिच्या लक्षात आले. आणि तो तीला विसरला नाही हेही...

भाग ३

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle