आजपासून प्रवासाचा मोठा टप्पा चालू होणार होता. हॉटेलमध्ये नाश्ता करून निघालो. सगळं सामान परत गाडीत भरून जायचं होतं पण आता गाडी आपल्याच हातात आहेत म्हटल्यावर सामान कसं ही त्यात भरून निघायचं असं सोपं काम झालं होतं. पहिलं ठिकाण होतं - Þingvellir National Park.
Reykjavik च्या जवळची तीन प्रमुख आकर्षणं म्हणजे - Þingvellir National Park, the Geysir Geothermal Area, and Gullfoss waterfall. Reykjavik हून ही तिनही ठिकाणं बघून परत Reykjavik ला यायचं, अशी टूर होऊ शकते ज्याला मिळून गोल्डन सर्कल असं नाव आहे. अगदी दोन दिवसांची धावती भेट असेल तरी हे गोल्डन सर्कल सगळ्यांच्या लिस्ट मध्ये असतंच. आईसलँड मध्ये सार्वजनिक वाहतूकीची वेगळी काही सोय नाही. बर्याच टूर कंपनीच्या बसेस आहेत, त्यांच्या सोबत फिरू शकता किंवा मग आपली गाडी रेंट करणे हा पर्याय. आम्ही Reykjavik हून निघून मुक्काम वेगळ्या ठिकाणी करणार होतो. ही तीन ठिकाणं दोन दिवसात करायची असा बेत होता.
रस्त्याला लागलो आणि आईसलँडची वैशिष्ट्ये जाणवायला लागली. आजवर कधीही न पाहिलेल्या Landscapes दिसत होत्या. इथल्या प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असूनही रस्त्यावर अगदीच कमी गाड्या होत्या. थोड्या वेळाने एका बाजूला Þingvallavatn हा लेक दिसायला लागला. नितळ स्वच्छ पाणी आणि त्यातलं डोंगरांचं प्रतिबिंब, शांतता, पक्षांचे आवाज हे सगळं बघून ट्रिप सार्थकी लागणार याची हळूहळू खात्री पटायला लागली.
गाडी पार्क करून पुढे निघालो. इथल्या पार्किंगची सिस्टीम वेगळी होती, गाडीच्या नंबर प्लेट्स कॅमेर्याने ऑटोमॅटीक स्कॅन केल्या गेल्या आणि मग तो नंबर तिथल्या मशीन वर टाकून तिकीट काढायचं होतं. पण आत येताना कुठेच गेट नव्हतं त्यामुळे हे नक्की करायचं कसं हे समजायला जरा वेळ गेला. तिकीट काढलं आणि थोडं खाऊन निघालो. ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. इथेच युरोशियन आणि नॉर्थ अमेरिकन या दोन टेक्टॉनिक प्लेट्स विभागल्या जातात. आतला पूर्ण भाग फिरायला साधारण २-४ तास लागतात. याचाच उच्चार Thingvellir असाही होतो त्यामुळे नेटवर माहिती शोधताना पण दोन्ही संदर्भ दिसतात.
इथे फार पूर्वीची आईसलँडची पार्लमेंट होती, ते ruins जतन केले जावेत म्हणून हा आईसलँडचा पहिला नॅशनल पार्क अस्तित्वात आला.
आईसलँडला अनेक लोक कॅम्पिंग करतात. या पार्क जवळच बर्याच कॅम्पिंग्च्या जागा आहेत. पुढे चालताना ठिकठिकाणी झरे दिसत होते. काही लहान मोठे धबधबे पण दिसत होते. सगळीकडे अगदी शुभ्र पाणी दिसत होतं. पण मुलांना घेऊन जाताना बरीच काळजी घ्यावी लागते कारण नीट फेन्सिंग केलेलं असेलच असं नाही, आणि काही जागा धोकादायक आहेत. हे सगळं बघत रमत गमत, सृजनच्या गतीने आम्ही चालत होतो. तो मधूनच इतका जोरात पळायचा की आम्हाला त्याच्या मागे पळून धाप लागायची आणि मधूनच मग एखादं फुल, धबधबा, पाणी, पक्षी हे बघण्यात इतका रमायचा, मग त्याचे त्यावरचे प्रश्न, बडबड यातच आम्ही पण रमायचो. असंच चालताना अचानक मला डोळ्यात कचरा गेला असं वाटलं, तेवढ्यात लक्षात आलं की माझी डोळ्यातली लेन्स हलली असावी. मी चेक करेपर्यंत तर ती वार्याने उडून खाली पडली आणि मातीमोल झाली. हे सगळं व्हायला फारतर एखादा मिनीट लागला. माझी प्रचंड चिडचिड व्हायला लागली. इतक्या वर्षात कधीही असं झालेलं नाही, शिवाय मी जास्तीच्या लेन्सेस सोबत घेतल्या नव्हत्या. चश्मा होताच सोबत पण हा ट्रिपचा तिसराच दिवस आणि पुढचे सगळे फोटो चश्म्यावर येतील हा विचारही मला तेव्हा त्रासदायक होता. आत्ता ईथेच का? याला काही उत्तर नव्हतं. मग ट्रिप संपल्यानंतर 'मी माझ्या हृदयाचा एक तुकडा ईथे ठेवला आहे' ऐवजी 'मी माझी एक काँटेक्ट लेन्स आईसलँडमध्ये सोडून आले आहे' असं मला म्हणता येईल असं म्हणून मी तात्पुरतं समाधान करून घेतलं. या गडबडीत इथल्या काही जागांचे फोटो काढायचे राहून गेले.
आधल्या दिवशी थंडी वाटत होती, निघताना सगळे जॅकेट्स घेऊन निघालो, थोड्याच वेळात ऊन वाढलं आणि ते ओझं उगाच बाळगायचा कंटाळा आला. पण मुळात इथे इतकं गरम होऊ होईल अशी अजिबातच कल्पना नव्हती. आता ऊन्हाचे चांगलेच चटके बसत होते. मग आलो या Oxifoss जागी. आईसलँड मध्ये ठिकठिकाणी धबधबे आहेत. त्यातला हा आमच्या ट्रिपमधला पहिला मोठा असा धबधबा.
इथल्या जवळच्या परिसरात गेम ऑफ थ्रोन्स चं बरंच शुटिंग झालं आहे.
इथे बराच वेळ निवांत बसलो. पांढरं शुभ्र पाणी आणि ते दगडांवर आदळतानाचा आवाज अनुभवत असताना माझी लेन्स पडली याबद्दलचा सगळंच दु:ख विसरायला या निसर्गाने भाग पाडलं. आता सृजनला इथे स्विमिंगच करायचं होतं. या पाण्यात स्विमिंग करायला जागा नाही, किती दगड आहेत, शिवाय इथे कुणीच स्विमिंग करत नाही, चालत नाही अशी अनेक खरी कारणं होती, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अजून त्याला स्विमिंग येतही नाही, पण त्याला पटवून घ्यायचं नव्हतं. मग एका दगडावरून पाण्यात पाय सोडून बसल्यावर त्याचं त्यातल्या त्यात समाधान झालं. तसंही त्या तळपत्या उन्हात ते गारेगार पाणी फार छान वाटत होतं. गर्दी कमी असल्यामुळे इथेही आम्ही प्रमाणापेक्षा जास्त वेळ बसून मग परत निघालो. आता तर ऊन असह्य व्हायला लागलं होतं. आम्ही पुढच्या दहा दिवसांसाठी घेतलेले थंडीचे सगळे कपडे उगाच आणलेत की काय असं वाटायला लागलं. सृजनही भरपूर चालून दमला होता. परत गाडीपाशी येऊन तिथल्या दुकानातून थोडंफार खायला घेतलं. खाण्याचे मर्यादित पर्याय होते, शाकाहारी लोकांसाठीच असं नाही, एकूणच कमी उपलब्धता असते हे दिसत होतं. पण फळं, सँडविचेस, आईसक्रीम हे अगदीच पुरेसं होतं. मग निघालो आमच्या मुक्कामाच्या जागी - laugarvatn च्या जवळच असलेलं एक होस्टेल. प्रचंड थकलेलो असल्यामुळे थोडा आराम केला. दुकानं लवकर बंद होतात म्हणून एका ग्रोसरी शॉप मधून थोडंफार सामान घेऊन आलो. इथे कॉमन किचन होतं, त्यामुळे तूप मेतकूट भात खाऊन सृजनचे आणि सोबत आणलेली भेळेची पाकिटं फोडून मस्त कांदा, टोमॅटो घालून आमचेही पोटोबा शांत झाले. मग निघालो Geysir Geothermal Area बघायला.
या ठिकाणी गरम पाण्याचे अनेक झरे इथे आहेत. त्यापैकी काही अगदी लहान तर काही अतिप्रचंड मोठे आहेत. मुख्य नाव असलेला Geysir हा आता शांत झाला आहे, पण Strokkur नावाचा एक झरा किंवा उद्रेक खरंतर, जिथून दर काही मिनीटांनी उकळतं पाणी वर हवेत उसळतं तो बघता येतो. मुख्य ठिकाणाच्या आधीपासूनच रस्त्यावर लाल-पांढर्या रंगाची वेगळी माती, वाहणारं पाणी आणि काही ठिकाणी जमिनीतून येणार्या वाफा दिसायला लागतात. सल्फर चा रंग सगळीकडे पसरलेला दिसतो. आम्ही रात्री गेल्यामुळे सगळी दुकानं बंद झाली होती, ढळढळीत उजेड होताच पण रात्री गेल्यामुळे एरवीची गर्दी अजूनच कमी होती. ईथल्या प्रवेशासाठी पैसे लागत नाही ही आईसलॅंडच्या महागाईत दिलासा देणारी बाब होती. आत जाताक्षणी एक पाटी दिसली त्यावर धोक्याच्या सूचना दिल्या होत्या, सगळ्यात महत्वाचं होतं की या पाण्याचं तापमान जवळपास १०० डीग्रीच्या आसपास आहे, आणि सगळ्यात जवळची वैद्यकीय सुविधा ही ६२ किलोमीटरवर आहे. बाजूलाच लहान सहान जागेतून वाफा बाहेर पडताना दिसत होत्या, वाहणारं पाणी पण गरम असेल याचा अंदाज येत होता.
काही ठिकाणी अशा सतत उकळ्या फुटताना दिसत होत्या.
इथले व्हिडीओ अपलोड करायला मला जमले नाही. तात्पुरती ही माझ्या ब्लॉगची लिंक - इथे बघता येतील. जर नंतर अपलोड करता आले तर मग ही लिंक उडवेन.
पुढे आलो, एका ठिकाणी गर्दी दिसली त्यामुळे हाच तो Strokkur असा अंदाज आला. आणि पाचच मिनीटात त्या दुरून वरवर शांत वाटणार्या पाण्यातून अतिप्रचंड प्रमाणात उकळत्या पाण्याचा उद्रेक झाला आणि २ मिनीटात परत शांतही झालं. याबद्दल जे काही वाचलं होतं, ते वाचून नेमकी कल्पना आली नव्हती. आता याची देही याची डोळा ते बघणे हा वेगळा अनुभव होता. मग त्यातल्या त्यात जवळून जिथून हा बघता येईल अशा ठिकाणी गेलो. आता त्या पाण्याच्या हालचाली, आधी शांत, मग हळूहळू थोड्या उकळ्या फुटून अचानक ते पाणी वर फेकलं जातं ते बघत बसावंसं वाटत होतं. भूगर्भात काय आणि कशा घडामोडी चालू असतात असा प्रश्न पडला. ईथूनच दूरवर बर्फही दिसत होता, एका बाजूला इंद्रधनुष्यही दिसत होतं आणि इथे हे इतकं गरम उकळतं पाणीही होतं. निसर्गाचे अद्भुत चमत्कार असं लिहीताना ते अगदीच साधंसरळ, तेचतेच वाक्य वाटलं तरी अशा ठिकाणी त्याची जाणीव सतत होत राहते. दर ७-८ मिनीटांनी हा उद्रेक होत होता.
त्यांनी ती सूचना लिहिली नसती तरी समोर उकळतं पाणी बघून नॉर्मल कुणाचीही हिम्मत होणार नाहीच हात लावण्याची, पण इतकं स्पष्ट लिहिल्यामुळे अतिधाडसी लोक किंवा आगाऊपणा म्हणूनही कुणी हिम्मत करणार नाही.
इथली परिस्थिती बघता सृजनची सेफटी लीश बांधली होती, हातकडीच म्हणूयात ज्याचं एक टोक माझ्या हाताला आणि एक त्याच्या हाताला होतं. आम्हीही हे पहिल्यांदाच वापरत होतो, पण आजूबाजूच्या प्रत्येकाच्या नजरेत कुतूहल, प्रश्न, असं कसं मुलाला बांधून ठेवतात, बरं आहे बांधून ठेवता येतं, चांगला पर्याय आहे हा, काय काय नवीन गोष्टी येत राहतात बाजारात असे अनेक हावभाव आम्ही टिपू शकत होतो. काही जण बोलून दाखवत होते, काही जणांचा चेहराच सांगत होता. इतकं गरम पाणी आजूबाजूला असूनही ईथे फेन्सिंग लहान मुलांच्या दृष्टीने अगदीच नाममात्र आहे. हे खूप गरम पाणी आहे हे आम्ही सृजनला सांगत होतोच, तरी ते बांधून ठेवल्यामुळे आम्हाला सेफ वाटत होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं होतं. तरीही त्याला धबधब्यात दगड फेकले तसेच ईथे पण फेकायचे अशी इछा होतीच, पण ती थोपवण्यात आम्ही यशस्वी झालो.
बराच वेळ हे लहान.मोठे उकळत्या पाण्याचे झरे बघत बसलो. मग आधीचा उद्रेक मोठा की हा, आता होणार, मग होणार म्हणत त्या पाण्याच्या वेगवेगळ्या अवस्था बघून अंदाज बांधणे, कॅमेर्यात हे कैद करणे, नजरेच्या टप्प्यातले नवीन झरे शोधून बघणे या सगळ्यात बराच वेळ गेला. आता परत निघूयात म्हणून पार्किंग कडे निघालो तेव्हा ४-५ भारतीय लोकांचा एक ग्रुप दिसला. तेही निघतच होते. आम्ही सृजनला गाडीत बसवून निघालो तेव्हा पाहिलं तर या लोकांनी बीअरच्या बाटल्या तिथेच बाहेर टाकून दिल्या होत्या आणि ते गेले होते. प्रत्येक ट्रिप मध्ये असा एखादा अनुभव येतोच याचं वाईट वाटलं.
Þingvellir National Park आवडलंच, पण Geysir Geothermal Area आणि Strokkur हा त्यापेक्षाही अतिशय विस्मयकारक आणि अफाट अनुभव होता. गोल्डन सर्कल मधली दोन ठिकाणं झाली होती. यातलं शेवटचं ठिकाण म्हणजे Gullfoss waterfall. तिथे जायचं आणि मग आईसलँडच्या रिंग रोडवर पुढे दौरा न्यायचा असा बेत होता.
क्रमशः