चौकोरीला आरक्षित काॅटेज उतारावर होतं. तिथून हिमायलाचा व्ह्यू मिळणार नसल्याचं तिथला अनुभव घेऊन आलेल्या भाच्याने सांगितलं होतं. बदलून एक्झिक्युटीव रूम मिळेल का ? फोनवर चौकशी केली असता अधिकारी म्हणाला की, "म्याडमजी, चान्स की बात है! उस दिन खाली होगा तो मिल जायेगा लेकिन पैसा वापस नही मिलेगा ना ही खानेमें एडजष्ट होगा." ऑफ सिजन असल्याने दुसऱ्या मजल्यावरची मोक्याची रूम मिळाल्याने आनंदच झाला पण वाईट ह्याचं वाटत होतं की अक्कलखातं वयाबरोबर वाढतच जात होतं कमी होण्याच्या ऐवजी! साधंसंच जेवून निद्राधीन झालो.

सकाळी साडेचारला चांगलंच उजाडलं होतं पण धुक्यामुळे हिमालयाचं दर्शन होण्याची शक्यता धुसर होती. आपल्यासाठी तिकडचा प्रत्येक डोंगर म्हणजे हिमालय पण इथल्या लोकांसाठी बर्फाच्छादित डोंगर म्हणजे हिमालय! बरोबरच ना! जिथे हिम तो हिमालय! दोन दिवसांच्या भटकंतीनंतर आज विश्रांतीचा दिवस! बाल्कनीत बसून आरामात चहा पिऊन डीअर पार्कला निघावं म्हटलं तर वरूणराजा धो धो बरसू लागला. आज फक्त कस्तुरीमृग पार्कला जायचं होतं. उघडीप होईपर्यंत मस्त गरमागरम पुडीसब्जी, आलुप्राठा दलियाखीर नाश्ता केला, नेटवर बागडून घेतलं. पावसाने विश्रांती घेतल्याक्षणी निघालो. ट्रेक छोटासा, दीड किमीचा! ओकच्या वनराईतून ट्रेक करत वर गेलो. नक्की कुठे आहे पार्क ते कळेचना. आमची समजूत होती की हरणाचा कळप दिसेल पण तसं काही दृश्य दिसले नाही. गुगलबाबाला विचारले तर त्यानेही पिंजऱ्यातले दोन मृग दाखवले.


तेवढ्यात एक मध्यमवयीन गृहस्थ घराला कुलूप लावून निघत होते. तेच इथले मुख्य डाॅ व अधिकारी! त्यांच्याकडून कळलेली माहिती अशी: मुख्यत: हा पार्क नसून रिसर्च सेंटर आहे. सहा नर व सहा मादी असे एकूण बारा मृग आहेत. त्यापैकी फक्त 'ऑगस्ट' दिसला बाकी आत जंगलात होते. फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने काढले नाही. कस्तुरी फक्त नराच्या नाभीत असते. साधारण सप्टेंबर महिन्यात ती काढता येते. 'कस्तुरी' दिसते कशी काहीच कल्पना नाही, हे डाॅ.ना सांगताच त्यांनीही प्रत्यक्षात दाखवण्याऐवजी त्यांच्याजवळच्या अल्बममधून फोटो दाखवले. रशिया व चीनमध्ये पण कस्तुरीमृग आढळतात पण जगभरात दिवसेंदिवस त्यांची संख्या घटतेय, ही चिंतेची बाब आहे. पार्क फार काही बघण्यासारखा नाही पण ट्रेक मस्त आहे.
खाली उतरत नाही तो जेवणाची वेळ झालीच होती. लोकल रानभाजी 'उगल', दालभात, रोटी असं साधंसं मसाला विरहीत सात्विक उदरभरणं!


दुपार धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या संगतीत लोळत, टीव्ही व नेटवर बागडत निवांत घालवली. आल्हाददायक वातावरणात एक मस्त सायंवाॅक घेतला. वाटेत एक बंगाली फॅमिली भेटली. जरा चिंतित होती पावसामुळे फिरायला मिळेल की नाही? वै. वै. आम्ही आपल्या चिंता, काळज्या निसर्गदेवतेवर सोपवून देऊन निर्धास्त होतो. दोन दिवस हादडून जिभेचे चोचले पुरवले खरे पण पोटावर मात्र अत्याचार केला होता. रात्री पोटोबालाही खिचडी खाऊन आराम दिला.
आजचा पल्ला जरा लांबचा व अवघड घाट वळणाचा. KVMN चा स्टॅंडर्ड बुफे नाश्ता असला तरी साधा पण चविष्ट पुडीसब्जी /छोले, आलुप्राठा, आम्लेट भरपेट खाऊन गाडीत बसलो नाही तो विनोदजीचं पालुपद ......आरामसे जायेंगे.....प्रक्रिती.....निसर्गदेवतेनेही आमची हाक मनापासून ऐकली होती,याची प्रचिती वेळोवेळी येत होती. निरभ्र आकाश, दोन्ही बाजूला गर्द हिरवाई आणि संगतीला सुरक्षित जागा पाहून नदीच्याकडेला गाडी थांबवली. स्वच्छ, नितळ थंडगार पाण्यात पाय सोडून कितीतरी वेळ बसलो उठायची इच्छाच होत नव्हती. साईट सिईंगचे कुठलेच पाॅईंट ठरवले नव्हते किंवा अट्टाहासही नव्हता की हे हे पहायचंच. प्रवास एन्जाॅय करायचा होता गंतव्य स्थान गाठण्यापेक्षा! हम अपने मर्जी के मालिक! नदी किनाऱ्या किनाऱ्यानी चालू लागलो. मजा येत होती. एक दीड किमी चालत गेलो. असं रमत रमत निसर्गाच्या सान्निध्यात आम्हाला चालायला आवडत हे विनोदला कळलं होतं. नंतर नंतर तो चांगला सुरक्षित रस्ता असला की आम्हाला उतरवून द्यायचा आणि म्हणायचा आगेसे आपको उठा लूंगा :) म्हणजे पिक करुंगा.
रामगंगा नदी!

बिर्थी फाॅलची साद ऐकू येत होती. हा पूर्ण रस्ता लॅंडस्लाईडचा! तसंच हा भाग अपघात प्रवण असल्याने मानवी चुकांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे बरेच अपघात होतात. २००९ मधल्या पुरात एक अख्खं गाव वाहून गेलं होतं. थोड्या थोड्या अंतरावर मृत व्यक्तिंच्या स्मृतीशीला बनवलेल्या आहेत.

ग्लेशियर्स वितळल्यामुळे हा बिर्थी फाॅल तयार झालाय. दुरवरून वळणावळणावर तो तुम्हाला खुणावत राहतो. धबधब्यापर्यंत जायला दगडी वाट आहे साधारण सात-आठशे मीटरची. पायथ्याशी जेवणाची आॅर्डर देऊन वर गेलो. नुकतेच नायगरा पाहून आल्याने साहजिकच दोहोंची तुलना होऊ लागली. नायगरा पुढे हा धबधबा अगदीच बच्चा! विकांतामुळे पर्यटकांची गर्दी होती. अंगावर तुषार झेलत मुलांची मस्ती पहात बसायला मजा येत होती. बुटांची, लाईफ जॅकेट्स, सेफ्टी मेजर्स वै भानगड नाही! भगवान भरोसे! निर्भय होऊन जगा! जायची निश्चीत तारीख, वेळ, ठिकाण ठरलेलं आहे. सध्या तिकडे चर्चेत दोन घटना होत्या एक ते शाही लग्न व दुसरी नंदादेवीची घटना! ब्रिटिश, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन व भारतीय गाईड असे आठजण नंदादेवी पीकवर गेले. गेले ते वरच गेले. चार जण बेसकॅम्पवर होते ते वाचले. सगळे निष्णात ट्रेकर्स! असो!
दानु मॅगी पाईंटवर जेवण तयार होते. कढी, राजमा, आलूगोभी साधंसंच पण चविष्ट जेवण भाभी वाढत तर होती पण तिचे मन थाऱ्यावर नव्हते. नवरा सकाळपासून डाॅकडे गेला होता आणि दीड वाजला तरी परतला नव्हता त्यात विकांतामुळे गिऱ्हाईकांची गर्दी. आम्हालाही काळजी वाटू लागली पण काही करू शकत नव्हतो तिला दिलासा देत गाडीत बसलो.

निमुळता अरूंद नागमोडी वळणाचा भूस्सखलन प्रवण रस्ता! आता कालामुनी टाॅप खूणावू लागला होता. एका अवघड उंच वळणावर हाॅर्न वाजवत निघत होतो .....आमची गाडी अगदी हळू.... समोरून बाईकवर दोन स्वार भरधाव येत होते.... ...श्वास रोखला गेला.... डोळे विस्फारल्या गेले......देवा! ब्रेक लागतो का नाही ह्यांचा....आमच्या गाडीवर येऊन आदळता आदळता वाचले..... वेळेवर ब्रेक नसता लागला तर बाॅनेटवरच येऊन पडले असते ........ दोन्ही स्वारांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं....... कुठेही उजवीकडे, डावीकडे आपटले असते तरी नक्कीच 'वर' पोचले असते. काळजाचा ठोकाच चूकला. विनोदही घाबरून गेला होता. समोरच कालापानी टाॅप होतं. तिथल्या देवळात जाऊन देवाचे आभार मानले, थोड्या वेळ स्वस्थ बसलो, मन शांत झाल्यावर टपरीवर चहा पिऊन मार्गस्थ झालो.
थामरीकुंड ट्रेकच्या रस्त्यावर एक कॅम्प दिसला. चौकशी करता कळलं की एक फॅमिली गेटटूगेदर होतं. दोघा पुरूषांपैकी एकजण ट्रेक गाईड होता आणि दुसरा, मि. आर्य चाकणला नोकरी करून आलेला होता. तो आमच्याशी तोडक्या मोडक्या मराठीत संवाद साधायचा प्रयत्न करत होता. त्यांनी नुकतंच होमस्टे सुरू केलंय. पुढच्या वेळी त्यांच्याचकडे उतरण्याचं आग्रही आमंत्रण दिलं. मस्त गप्पा रंगल्या. त्यामुळे बरीच व्हरायटी जेवलो असलो तरी मंडवा की रोटी, डुबका वै जेवलो नव्हतो तसं आर्यसाहेबांना बोलून दाखवल्याबरोबर लगेच त्यांनी उद्याच्या जेवणाचं आमंत्रण देऊन तर टाकलंच पण आत्ताही गरमागरम भात व मीट खायचा आग्रह केला. लेकीने त्यांच्या प्रेमळ आग्रहाला मान दिला. फोन नंबरचं आदानप्रदान करत आर्य फॅमिलीचा निरोप घेतला व मुन्सियारी TRH ला आलो.

