सकाळ झाली, आई बाबा उठले, बॅग्ज भरल्या, मला तयार केलं आणि म्हणाले "चला परत नवीन ठिकाणी, या घराला बाय बाय करा, थँक्यू म्हणा आणि गाडीत बसून पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हणून पुढे चला." की आम्ही निघालो. रोज नवीन काहीतरी दिसतं म्हणतात, मला सांगत असतात आपण हे बघू, ते बघू, हे खेळू, ते खेळू, तरी अजून बर्फ दिसलाच नाहीये मला...... असं काहीसं सृजनच्या मनात या प्रवासाविषयी आता येत असेल का? अशा कल्पना करतच आम्ही चेक आउट केलं. आईसलँड मध्ये येऊन पाच दिवस होऊन गेले होते, राहण्याच्या जागा बदलत होत्या आणि आज तर प्रवास पण लांबचा होता.
हेला (Hella) ते Höfn असा आईसलॅंड च्या दक्षिण किनार्यावरचा आजचा प्रवास. आमच्या ट्रिप मधलं हे शेवटचं ठिकाण. तिथे ३ दिवस राहून पुन्हा परतीचा रस्ता घ्यायचा होता.
साडे चार तास - गुगलने वेळ दाखवली. पण मधली फोटोग्राफी, खाण्याचे ब्रेक हे आम्ही त्यात अॅड केले तर अक्खा दिवस प्रवासात जाणार असं दिसत होतं. शिवाय आता लोकवस्ती विरळ होत जाणार म्हणजे पुढच्या मुक्कामाला पोचेपर्यंतची खाण्याची सोय आणि नंतरही तिथे जवळपास उपलब्धता अगदीच मर्यादित असेल तर जातानाच पुढच्या दोन दिवसांची सोय करून ठेवावी लागेल म्हणून आधी सुपरमार्केट मध्ये थांबलो, पोटोबा भरले आणि निघालो. आईसलँड मध्ये हायवेवर ९० किमी प्रतीतास ही कमाल मर्यादा आहे. आम्हाला जर्मनीत किमान १२० ने चालवायची सवय असल्यामुळे मधूनच फार हळू चाललो आहोत आपण असं वाटायचं, शिवाय तिथला हायवे म्हणजेच मुख्य रिंग रोड, हा देखील अगदीच लहान आहे. दोन्ही बाजूनी एक वाहन जाऊ शकेल एवढीच जागा, ना मध्ये डिव्हायडर ना फार मोठ्या पाट्या. पण त्यामुळेच आजूबाजूचं सगळं छान बघता येतं. तर या रस्त्यावरून पुढे प्रवास चालू झाला. सुरूवातीचा एक तासाचा रस्ता मागच्या ३ दिवसात ओळखीचा झाला होता. तीच सगळी ठिकाणं दुरून बघत, काल आपण इथे हे पाहिलं, परवा हे केलं, हा अजून एक धबधबा बघायचा राहिला पण आता उशीर होईल म्हणून नको अशा चर्चा घडत, काही ठिकाणी फोटोंसाठी थांबत जात होतो. आईसलँड मधले घोडे हेही त्यांचं वैशिष्ट्य. जर्मनी आणि युरोपातही आईसलँडिक पोनीज या विशेश मानल्या जातात. स्विस मध्ये जशा सतत गायी दिसतात तसे इकडे घोडे, मेंढ्या दिसतात. त्यामुळे फोटो घेता येतील अशी जागा दिसली तर थांबणं क्रमप्राप्त होतं. अतिशय देखणे, उमदे असे हे घोडे. किती ते वेगळे रंग, त्यांचे ते सुंदर केस, उंचीला तसे कमीच, पण काय तो रुबाब.
Vik (विक) हून पुढे निघालो आणि पुन्हा वेगळे लँडस्केप्स दिसायला लागले. रहदारी अगदीच कमी झाली, मागे पुढे क्वचितच एखादी गाडी दिसायची, शिवाय ऊनही नव्हतं, अगदीच ढगाळ हवामान झालं होतं. दर थोड्या वेळानी लहान नद्या, ओढे हे रोजच दिसत होते. पर्वतांच्या कडेकपारीतून वाहणारे अगणित धबधबे, मधूनच दिसणाऱ्या घळी, त्यातल्या हिरव्या रंगाच्या अनेक छटा आणि मग हे सगळं बघतानाच रंगरूप बदलून गेलेल्या ज्वालामुखी अनुभवलेल्या जागा, त्यावर उगवलेलं मॉस जे नजरेला सुखावह नसलं तरी तेवढंच लक्ष वेधून घेणारं आणि त्याच उजाड जमिनीवर मधूनच दिसणारी फुलं असं प्रचंड व्हेरिएशन दिसत होतं.
Hof जवळ ब्रेक घेऊ म्हणून थांबलो. पेट्रोल भरलं, खायला काहीतरी घेऊ म्हणून दोनच पर्याय दिसले, एक सूप होतं आणि एक ओनियन रींग्ज. या सहा रिंगची किंमत होती ६ युरो. शिवाय सूप घेतलं तर त्यासोबतचे ब्रेड संपलेत म्हणे. नशीबाने सोबत खाऊ होताच, पुढच्या तीन दिवसांची परिस्थिती डोळ्यासमोर आली. The most expensive food you ever had याचं निर्विवाद उत्तर हेच.
वन वे ब्रिजेस आईसलँड मध्ये दिसतील असं वाचलं होतं. ते आता दिसायला सुरुवात झाली. पूर्ण प्रवासात अनेक लहान सहान नद्या आपल्या मार्गात दिसत राहतात. त्यावर बऱ्याच ठिकाणी असे पूल आहेत. पलीकडून येणारी गाडी दिसली तर आपण थांबायचं किंवा आपण पुढे असू तर तिकडचा माणूस थांबेल अशा अलिखित नियमावर हे चालतात.
मध्ये हा एक रस्त्यालगत वाहणार्या झर्याचाच हा एक धब्धबा दिसला, इथे पुन्हा पाणी भरून घेतलं.
आता अजूनच विराण पण तरीही तेवढाच नयनरम्य प्रवास चालू झाला. सलग काही किलोमीटर हिरवेगार डोंगर, ल्युपिनच्या जांभळ्या फुलांचे भरगच्चं फिल्ड्स आणि मधूनच कितीतरी किलोमीटर फक्त ज्वालामुखीच्या खुणा असणारी मातीची ढेकळं, त्यावरचं ते अत्यंत उदास रंगाचं मॉस. पक्षी, प्राणी किंवा माणूस यांचं अस्तित्व इथे असूच शकत नाही असं वाटायला लावणारा हा सगळा भाग, मग हे संपून परत थोडी फुलं, हिरवाई, दोन-चार घरांचं गाव आणि मग नंतर पुन्हा मैलोन्मैल ही उध्वस्त जमीन. तरीही तिथेच वाहणारे अनेक झरे, छोट्याशा तळ्यापाशी उडताना दिसणारा एखादा पक्षी, विविधरंगी घेरदार झगा घातल्यासारखे डोंगर आणि या सगळ्यांपुढे इथून प्रवास करणारे आपण. हे निसर्गावर आपण केलेलं आक्रमण म्हणावं की इतक्या कठीण परिस्थितीत पाय रोवून उभी असलेली इथल्या लोकांचं कौतुक करावं? असे अनेक प्रश्न मनात येऊन गेले. थोड्या वेळाने हिमनद्या दिसायला सुरुवात झाली. एका बाजूने पूर्ण समुद्र होता, बराच वेळ इतकं धुकं होतं की केवळ नेव्हिगेशन मध्ये समुद्र दिसतोय म्हणजे तो आहे एवढंच, प्रत्यक्षात काहीच कळत नव्हतं.
या सगळ्यात आता पुढे अजून किती वेळ आणि आपण केव्हा पोचणार असं वाटायला लागलं. सृजन गाढ झोपला होता म्हणून ती काळजी नव्हती. कुठलीही हिमनदी दिसली की इथेच आपले ग्लेशियर व्ह्यू केबिन्स असतील असं आम्हाला वाटायचं पण प्रत्यक्षात नेव्हिगेशन अजून लांब दाखवत होता. ही ट्रिप प्लॅन करताना सुरुवातीला पूर्ण रिंग रोडची ट्रिप करायची इथपासून आम्ही सुरुवात केली आणि मग शेवटी फक्त साऊथ कोस्ट यावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयाचा या प्रवासात अतिशय आनंद झाला. कारण इथून पुढच्या प्रवासात हे आजच्यासारखं अजून जास्त तीव्रतेनी जाणवलं असतं, स्थानिकांची लोकवस्ती अजूनच कमी होत जाते आणि पर्यटकही कमी होतात. खरंतर या इतक्या निर्जन जागीसुद्धा सगळीकडे उत्तम इंटरनेट सेवा आहे त्यामुळे म्हटलं तर जगाशी कनेक्टेड होतो आम्ही, चित्रपटात पाहिलेल्या, चित्रात पाहिलेल्या अशा सुंदर जागा होत्या, ही सगळी रूपं भारावून टाकणारी होती, सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबातच भीती नव्हती आणि तरीही इथे एक वेगळेपण होतं ज्याचा मानसिक थकवा आला होता.
शेवटी एका ठिकाणी जरा गर्दी दिसली, टुरिस्ट बसेस, गाड्या दिसल्या आणि इथल्या डायमंड बीचची एक झलक दिसली.
अर्धा तास राहिला असेल तेव्हा पुन्हा धुकं कमी झालं, थोडी लोकवस्ती दिसायला लागली आणि शेवटी एकदाचे पोचलो. हे केबिन्स पाहिले आणि या प्रवासाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
प्रवासाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी राहायला मिळतं. त्या घरातली रचना, तिथली भांडी, शोभेच्या वस्तू हे सगळं बघणं हाही माझ्या एक आवडीचा भाग असतो. आजवरच्या अनेक सहलीतले पहिले दहा लोकेशन्स आठवून पाहिले, तर त्यात ही केबिन्स अग्रक्रमी आली.
सामान टाकलं आणि लगेच बाहेर पडलो. थंडी चांगलीच जाणवत होती,समोरच ग्लेशियर दिसत होतं, घोडे, बदकं, मेंढ्या, कोंबड्या दिसत होत्या. सृजनला खेळायला ट्रॅम्पोलिन दिसलं त्यामुळे इतक्या वेळ प्रवासात आखडलेले पाय त्याने मोकळे केले. तेवढ्यात थोडं ऊन आलं म्हणून मग इथेच या गवतात सगळे लोळत पडलो, आजूबाजूच्या सगळ्या केबिन मधले लोकही बाहेरच होते. सूर्य आणि ढगांचा पाठशिवणीचा खेळ बरोब्बर या ग्लेशियरच्या वर चालू होता, रात्रीचे अकरा वाजून गेले होते, थंडी वाढली होती पण हे इतकं सुंदर सोडून आत जाण्याची कुणाचीच इच्छा होत नव्हती.
शेवटी सूर्याने माघार घेतली आणि आम्हाला पण प्रवासाचा थकवा पुन्हा जाणवला त्यामुळे फायनली झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशीच्या एका टूर ची तिकीटं आधीच काढून ठेवली होती, त्याशिवाय डायमंड बीच ला जायचं डोक्यात होतं, महाकाय बर्फ आणि हिमनग याबद्दलचा अनुभव पुढच्या भागात.
क्रमशः