पहिला मुलगा झाला तेव्हाच तिच्या लक्षात आलं होतं तिच्या जाणीवा चारचौघींसारख्या नाहीत.
सतत पिरपिर करणारं ते मूल तिला अगदी नको नको झालं होतं. नवऱ्याच्या सरकारी नोकरीमुळे राहायला मिळालेलं ते भकास क्वार्टर. तिथे सकाळपासून दुपारपर्यंत सतत घुमणारं बाळाचं रडू. कधी कधी वाटायचं त्या जीवाला उचलावं आणि फेकून द्यावं वरच्या मजल्यावरून. असा विचार आला की तिला स्वतःचीच भीती वाटायची. नवरा जेवायला घरी यायचा तेव्हा कशीतरी ती भाजी पोळी करायची शक्ती आणायची. पण नवरा घराकडे बघून वैतागायचा.
"काय करतेस तू दिवसभर? बाळ झोपलेलं असताना थोडं घर नीट ठेवता येत नाही का?"
तिला त्रास नको म्हणून एक बाई लावली दिवसभराची.
एकदा बाळ आतमध्ये रडून लाल झालं तरी ती एकटक खिडकीबाहेर बघत होती. बाईनं मग बाळाला उचलून बाहेर आणून दिलं. त्याच्या रडण्याने तिची तंद्री तुटली आणि का कोण जाणे तिनी टेबलावरचा फ्लॉवर पॉट उचलून जमिनीवर आपटला. बाळाला बाईकडून हिसकावून घेत मग त्या काचांमधूनच ती चालत त्याला पाजायला घेऊन गेली. एकदा बदलीतलं पाणी किती कढत आहे हे न बघताच बाळाच्या अंगावर ओतलं. बाई तिथेच मदतीला उभी होती. बाळाचा तो कळवळून आलेला टाहो ऐकताच बाईचा तोल गेला.
"तुमचं लक्ष कुटं असतं ताई? बाळाचे किती हाल चालवलेत! एवढा सोन्यासारखा मुलगा झालाय. मला तीन पोरी हायेत. पन त्यांस्नीबी मी कदी असं वागवलं न्हाई."
त्यादिवशी संध्याकाळी बाईचा पगार देऊन तिला हाकलली. बाईपाठोपाठच ती बाळाला घेऊन सोनाराकडे गेली. सासूने बाळाच्या गळ्यात घातलेली साखळी विकून आली. मे महिन्याची संध्याकाळ होती. रस्त्याच्या दुतर्फा केशरी गुलमोहराच्या वावटळी होत्या. सोनाराकडून परत येता येता कुल्फीवाल्याकडे थांबली आणि बाळाला पदराखाली घालून दोन कुल्फ्या खाल्ल्या तिनं. पण नजर सतत भिरभिरत होती. क्वार्टरमधल्या कुणी बघायला नको. आपण असे एकटे बाहेर खायला जातो आहे हे कळले तर उगाच चर्चा होईल. नवरा यायच्या आत ती घरी आली आणि मुलाच्या गळ्यातली साखळी बाईने चोरल्याची खबर त्याला दिली. नवऱ्याने रात्रभर घराचा कोपरा अन कोपरा धुंडाळला. जणू काही त्याला खात्री होती की चोरी बाईने केली नाहीये. ती स्वस्थपणे पडून होती. बाळाला भूक लागली की उठायची. त्याचे लंगोट बदलायची. पण दुःख, राग, चिंता यांचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता.
काही दिवसांनी तिचा भाऊ आणि वहिनी बाळाला भेटायला आले. तिला मदत म्हणून वहिनीनं स्वयंपाकघराचा ताबा घेतला. एकदा काहीतरी शोधाशोध करताना एक डबा उघडला तशी अनेक पाखरं त्यातून बाहेर आली. दचकून वहिनीच्या हातातून डबा निसटला आणि जोरात आवाज झाला. तशी ताडकन ती स्वयंपाकघरात आली.
"वन्स, तुम्हाला होत नाहीये घरचं काम. मी उद्या हे सगळे डबे घासून देते तुम्हाला", वहिनी प्रेमानं म्हणाली.
"तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस. खरंतर माझ्या सासूबाईंनी हा झाला तेव्हाच सांगितलं होतं, वहिनीला मदतीला आणू नकोस म्हणून. तुमच्या लग्नाला सात वर्षं झाली तरी अजून पाळणा नाही. मला काही वाटत नाही पण आमच्या सासरचे मला जपून राहायला सांगतात", वहिनीच्या डोळ्याला डोळा देत ती साफ खोटं बोलली.
वहिनीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नंतर बराच वेळ भाऊ आणि वहिनी गच्चीवर गेले. भावानं संध्याकाळी, एखादी बाई लाव असे सांगितले तेव्हा नवऱ्याला बाहेरची बाई घरात आलेली चालत नाही असं तिनं सांगितलं. त्यांच्यापाशी विषय काढू नकोस कारण मी तुला सांगितलं असं वाटेल अशी सूचना दिली.
भाऊ वहिनी लगेचच आपल्या गावी निघून गेले.
मुलगा चालायला लागला. पण अजूनही आईने जवळ घ्यावे म्हणून त्याला फार प्रयत्न करावे लागत. दिवसभर ती बसून राहायची. मुलाला खूप भूक लागली की डाळ तांदूळ कुकरमध्ये लावायची. वाढताना कधी मीठ आहे की नाही हे पाहायचा उत्साहदेखील तिला नसायचा. एकदा बाळाची आत्या तिच्या तीन मुलांना घेऊन राहायला आली. जवळच शंकराचं एक प्रसिद्ध मंदिर होतं. ते पाहायला जायचा सगळ्यांनी बेत केला. मंदिरात लाईनमध्ये निदान चार तास लागले असते. पण अचानक तिची पाळी आली त्यादिवशी. म्हणून तिचा मुलगा आणि त्याची भावंडं मिळून आत्या आणि तिच्या नवऱ्याबरोबर मंदिरात गेले. ते जाताच ती बाजारात गेली. शहराच्या अगदी जुन्या भागातल्या एका खानावळीत. गरम गरम पुऱ्या, तिखट रस्सा, रबडी असं भरगच्च ताट तिनं संपवलं. तरी अजून बराच वेळ होता म्हणून विठ्ठलमंदिरात भजन ऐकायला गेली. भाजनातल्या टाळ आणि मृदंगाच्या तालात तिची वेगळीच तंद्री लागली. जेव्हा भानावर आली तेव्हा बराच उशीर झाला होता.
"कुठे गेली होतीस?" नवऱ्याने येताच विचारलं, "आम्ही किती काळजीत होतो! मुलांनाही भूक लागली होती. शेवटी वाट पाहून ताईनं स्वयंपाक करायला घेतलाय"
"दूध लागलं असतं म्हणून आणायला गेले होते. जवळच्या सगळ्या दुकानातलं संपलं होतं", ती दुधाची पिशवी दाखवत म्हणाली.
एकाला एक हवं म्हणून दुसरा मुलगा झाला तिला. पहिल्यावेळी विचित्र वागणूक मिळाली म्हणून यावेळी सासू आलीच नाही. तिला आई-वडील नव्हते.
तिची अक्का आली मग काही दिवस. मोठ्या मुलाशी अक्का छान गप्पा मारायची. त्याला लाडू करून द्यायची. तिच्या मुलांबरोबर तो छान रमायचा. अक्का चमचमीत भाज्या करायची, गरम गरम पोळ्या थेट तव्यातून ताटात वाढायची. तिच्या सासरच्या गुऱ्हाळातली काकवी घेऊन आली होती. मुलं गरम पोळी आणि तूप काकवी खायची. तिचा नवरादेखील खूष होता. घराच्या कोपऱ्यावर येताच घरातल्या हसण्याखिदळण्याचा आवाज त्याच्या कानावर पडायचा. त्यात तिचा सहभाग नसला तरी आपल्या घरातून कुणीतरी आनंदी असल्याचे पुरावे येतायत याचे त्याला कौतुक वाटायचे. नवऱ्याकडून जेवणाची रोज तारीफ होऊ लागली. आणि रात्री त्याच्या भोवती सगळी मुलं गोष्ट ऐकायला गोळा होऊ लागली. ती तिथेच बाळाला घेऊन बसायची. नवरा सिंहासारखी डरकाळी फोडताना डोळ्याच्या कोपरायतून तिच्याकडे बघायचा. पण त्याच्या त्या अभिनयाचे थोडेही कौतुक तिच्या डोळ्यात दिसायचे नाही.
दोन-तीन दिवसातच नवरा घरी आला तेव्हा अक्काचे गोरे गोरे नाक लालबुंद झाले होते. रात्रीच्या गाडीने ती नागपूरला निघाली होती.
"मी काही इथे तुमचे पैसे वाया घालवायला आले नाही हो भावजी", असं म्हणून तिनं टेबलावर हजार रुपयांची नोट ठेवली.
"गेल्यावर घरचे गहू तांदूळसुद्धा पाठवून देईन. माझ्या सासरी कशाची कमी नाही"
रात्री नवऱ्यानं तिला खोदून खोदून विचारलं, "काय म्हणालीस तू नक्की अक्काला? मी तुला खर्चाबद्दल काहीच बोललो नव्हतो!"
कितीतरी वेळ ती निर्विकारपणे धाकट्याला पाजत होती. पण नवऱ्याची बडबड असह्य झाली तशी ती चढ्या आवाजात म्हणाली,
"मला ती आणि तिची मुलं इथं नको होती. मला त्यांचा त्रास होतो"
आणि मुलाला पाळण्यात घालून झोपी गेली.
घरात अन्नाचा कणही नव्हता. आणि मोठा भुकेनी व्याकुळ झाला होता.
नवऱ्याने स्वयंपाकघरातला दिवा लावला आणि बटाटे चिरायला घेतले.