मावळ भागातल्या एका खेड्यात आमची थोडी शेतजमीन आहे. नवऱ्याने मोठ्या आवडीने घेतली, तेव्हा अगदी माळरान होतं. त्याने दर आठवड्यात तिथे चकरा मारून, गावकऱ्यांशी मैत्री करून, कष्टाने-प्रेमाने त्या जागेला हिरवं केलं. एकट्यानेच. घरच्या आणि व्यवसायाच्या व्यापात वर्षावर्षात मी तिथे फिरकत नसे. तसाही माझा पिंड पूर्णपणे शहरी आहे. काय भाजी- फळे हवी असतील, ती भाजी बाजारातून पाव-अर्धा किलो आणावी आणि खावी एवढीच माझी झेप आहे. त्यामुळे ह्या लेखातही काही तांत्रिक चुका असल्या, तर पोटात घाला.
नवऱ्याला मात्र हे उपद्व्याप मनापासून आवडायचे. नोकरी सांभाळून गहू-तांदूळ-ऊस-ज्वारीची प्रकारची शेती तर जमण्यासारखी नव्हती. म्हणून मग त्याने तिथे फळझाडे लावायची ठरवली. कोकणातून आंब्यांची, काजूची, फणसाची रोपं आणली आणि रुजवली. सुरवातीला तिथे पाण्याचा प्रश्न होता, वीज नव्हती. हळूहळू ह्या सगळ्या सोयी झाल्या आणि शेत बहरत गेलं. फळझाडांच्या जोडीला अधूनमधून थोडीफार भाजीची लागवडही सुरू केली. दर शनिवारी शेतावरून येणाऱ्या ताज्या भाज्यांप्रमाणे आमच्या आठवड्याचा भाज्यांचं वेळापत्रक बेतलं जाऊ लागलं. ह्या भाज्या- फळांचं प्रमाण घरी खाऊन कोणाकोणाला नमुना देण्याइतपतच असायचं. बाजारात नेऊन विकता येईल, इतकं काही उत्पादन नव्हतं.
गोष्टीत म्हणतात ना, तशीच वर्षामागून वर्ष गेली. लावलेल्या आंब्यांच्या रोपांपैकी काही जगून चांगली मोठी झाली आणि फळं देऊ लागली. सुरवातीला १५०-२०० आंबे आले, तरी आम्ही आनंदाने खायचो, खाऊ घालायचो आणि 'यंदा घरचा भरपूर आंबा खायला मिळाला' अशा गप्पा वर्षभर सांगत राहायचो. हळूहळू आंब्यांचं प्रमाण वाढायला लागलं. आंब्यांची संख्या आपल्या आपल्यात खाणे ह्याच्या पलीकडे जायला लागली. स्वानंदासाठी सुरू झालेल्या उपक्रमाकडे गंभीरपणे बघायला पाहिजे, असं वाटायला लागलं.
एका वर्षी एका ओळखीच्या फळविक्रेत्याला विकायला दिले. पण त्याच्याकडून पैसे मिळवायला बरेच कष्ट करावे लागले, मागे लागून वसुली करावी लागली. मे महिन्यातल्या आंब्यांचे तुटपुंजे पैसे दिवाळीत हातात पडले. त्याच्या पुढच्या वर्षी मार्केट यार्डच्या व्यापाऱ्याला विकले. ह्या वेळी वसुलीसाठी मागे न लागता पैसे मिळाले खरे. पण अतिशय कमी भाव मिळाला. म्हणजे टेम्पोचं भाडं, मार्केट यार्डची लेव्ही वगैरे विचारात घेतली, तर चणे-फुटाणेच. कुठलीही वस्तू आपण विकत घ्यायला गेलो तर आणि विकायला गेलो तर किमतीत मोठा फरक असतो, हे माहितीही होतं आणि मान्यही. पण तरीही हा फरक डाचत होता.
ह्या वर्षी तर खूप म्हणजे खूपच आंबे आले. खूप म्हणजे जवळपास साडेचार हजार आंबे आले! चार डझनच्या तीन-चार पेट्या आणून खायची वर्षानुवर्षांची सवय. इतकी सगळी आंब्यांची पोती घरी पोचली, तेव्हा ते आंबे बघून अक्षरशः उरावर दडपण आलं. आपल्या शेतावरचे छान तजेलदार, मोठे मोठे आंबे. बघून एकीकडे एकदम भारी फिलिंग येत होतं आणि दुसरीकडे आंब्यांची व्यवस्था नीटपणे लावू नाही शकलो तर, अशी भीतीही वाटत होती.
त्यांचं नक्की काय करावं, ह्यावर कुटुंबात खल सुरू झाला. आमच्या घरात हे एक काम आम्ही सगळेजण अत्यंत उत्साहाने करतो. प्रत्येक सदस्य आपलं मत ठामपणे आणि स्पष्टपणे मांडतो. संयमित चर्चांना ऊत आला
तेव्हा माझी भाची सुट्टीत राहायला आली होती. तिचं मत ' आत्या, आपणच खाऊ सगळे. काही नको विकायला’
'अगं, रोज दहा खाल्लेस, तरी महिन्यात तीनशेच खाशील. उरलेले? '
'आत्या, मी रोज शंभरपण खाऊ शकते'
आता चिरंजीव रिंगणात उतरले.
' शंभर आंबे खाल्लेस, तर 'तिकडेच' मुक्काम करायला लागेल.
चिरंजीव त्यांची स्पष्ट मते मांडायला पुढेमागे बघत नाहीत. त्यामुळे त्यांनी मुळावरच घाव घातला. ‘आई, तू ह्या भानगडीत पडायलाच नको होतं. जाऊ द्यायचे होतेस शेतावरच वाया. तुझ्यामागे आधीच कमी कामं आहेत का? ‘
'आत्या, अजून एक आयडिया. आपण टपरी टाकूया का? मी 'आंबे घ्या आंबे' असं ओरडीन. तू विकायचं काम कर'
चिरंजीवांना ‘आपल्या मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, शेजारी ह्यांच्याकडून पैसे कसे घ्यायचे? ’ असा संकोचही वाटत होता. ते बरोबरही होतं. पण नमुना म्हणून दिलेले आंबे आवडले म्हणून कोणी परत मागायला येत नाही. विकत घ्यायचे असले, तर ते विनासंकोच हवे तेवढे घेऊ शकतील, हा मुद्दा त्याला पटला.
घरातील ज्येष्ठ नागरिक आंबे खराब व्हायला लागले तर? ह्या काळजीत होते. शिवाय सहकारनगरच्या प्रत्येक बंगल्यात आंब्याची झाडं आहेत. आपल्याकडे विकत घ्यायला कोण येणार, अशी योग्य शंकाही त्या आघाडीला होती.
अजून एक कल्पना होती की आंब्याच्या रसाचं कॅनिंग करून बाटलीबंद करून घ्यायचा आणि त्या बाटल्या निवांतपणे विकता येतील. आंबे खराब होण्याची जी काळजी होती, ती राहिली नसती. मी कॅनिंग सेंटरमध्ये जाऊन चौकशी करून आले. पण कॅनिंग करायचं तर आपल्या खिशातून पैसे घालायचे आणि पुन्हा विकण्यासाठी धावपळ करावी लागेल, म्हणून आंबे विकले गेले नाहीत आणि खराब व्हायला लागले, तरच हा पर्याय वापरायचा असं ठरलं.
ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण घरूनच आंबे विकावे का? असा विचार मनात जोर धरू लागला. तसेही मार्केट यार्डचे व्यापारी फुटकळ पैसे देतात. मग आपण 'शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांकडे' अशी विक्री करून तर बघूया, असं वाटत होतं. आतापर्यंत व्यापारी आपल्याला फसवून कमी पैसे देतात, ही बोच दरवर्षी लागत होती, ते तरी टळेल. फार काय, नुकसान होईल. पण चूकच करायची, तर निदान नवीन चूक केल्याचं समाधान मिळेल, असा विचार केला. आंबे विक्री हा काही आपला नेहमीचा व्यवसाय नाही. त्यात पैसे मिळाले तर चांगलंच पण कमी मिळाले, तरी चूल पेटणार आहे, हा विश्र्वास होता.
बाजारातील आंब्यांचे भाव वर्तमानपत्रात येतात. त्यातल्या कमीतकमी भावाच्या अर्ध्या भावात म्हणजे पन्नास रुपये डझन अशा भावाने आंबे विकायचे ठरवले. आज बाजारात केळी किंवा अंडी सुद्धा इतक्या कमी भावात मिळत नाहीत. पण जास्त भाव मिळायची हाव धरली आणि आंबे सडून वाया गेले, असं नको व्हायला, ही भीती होती.
जाहिरातीचा मजकूर A4 कागदावर छापून त्याला लॅमीनेट करून आणलं. उन्हाळ्याच्या दिवसांत बरेच लोक आंब्यांचा व्यापार करतात. आपला भर होत, तो कमी दराने आंबे विकण्यावर. त्यामुळे चाणाक्षपणे जाहिरातीत आंब्यांचा स्वस्त दर ठळकपणे लिहिला. मोबाईल नंबर इतका जाहीरपणे लिहायला नको वाटलं, म्हणून घरच्या फोनचा नंबर दिला. त्या जाहिराती सहज दिसेल, अशा जागी लटकवल्या. आमच्या घराजवळ एक अत्यंत लोकप्रिय अशी भाजीची टपरी आहे. भाजी विकणारे मामा तेव्हा नेमके गावाला गेलेले होते. परिस्थितीचा फायदा घेऊन लगेच मी तिथे एक जाहिरात लटकवली. रोजची वहिवाट असल्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची नजर आपोआपच त्या टपरीकडे जाते. बाकीच्या जाहिरातींपेक्षा ह्या जाहिरातीला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला!
शनिवारी आंबे घरी आले. रविवारी नुसत्या चर्चा आणि आंबे विकले जातील का? कसे? ह्या प्रश्नांवर खल झाला. रविवारी रात्री ‘आत्या, एक डझन जरी आंबे विकले गेले, तरी मला फोन कर' असं सतरा वेळा बजावून भाची घरी गेली.
********************************************************************************************************
सोमवारी सकाळी आठवतील त्या सगळ्या देवांची नावं घेऊन मी सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर मेसेज पाठवला. ‘पन्नास रुपये डझन’ भाव वाचल्यावर बहुतेक सगळ्यांचे ‘अग, तू भाव बरोबर लिहिला आहेस ना? ’ अशी उत्तरं आली! कोणाला खरंच वाटत नव्हतं. ‘टायपो नाहीये. खरंच पन्नास रुपयांत विकतोय, असं कळवून टाकलं.
सगळी तयारी झाली आणि आम्ही अस्वस्थपणे लोकांची वाट बघायला लागलो.
आमचे एक सख्खे शेजारी दोन डझन आंबे घेऊन आमची बोहोनी करून गेले, आणि आमच्या आम्र-विक्रीचा नारळ फुटला. हळूहळू आंबे घ्यायला लोकं येऊ लागली. आम्ही आंबे प्रकरणात किती ‘ढ’ आहोत, हे कळायला लागलं. शेतावरच्या माणसाने आंबे उतरवून पोत्यात भरून पाठवून दिले. पण आंब्यांचं वर्गीकरण केलं नव्हतं. तसं करायला सांगायला हवं, हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे लहान-मोठे-हापूस-केशर-तोतापुरी सगळ्यांचं महासंमेलन प्रत्येक पोत्यात तयार झालं होतं. आंबे घ्यायला आलेल्यांनी ‘कुठले आंबे आहेत? हापूस की केशर? ’ असं विचारलं की उत्तर देताना माझी त-त-प-प होत होती. खरं म्हणजे हापूस आणि केशर आंब्यांचे आकार स्पष्टपणे वेगळे असतात. पण इतके आंबे बघून आमची नजर फिरत होती. त्या आंब्यांमधला अगदी ठळक फरकही कळत नव्हता. शेवटी जे तोंडाला येईल ते उत्तर देऊन आम्ही वेळ मारून न्यायला लागलो.
आंबे छानच होते. दोन दिवसांपूर्वी झाडावरून उतरवलेले ताजे, तजेलदार दिसणारे मोठेमोठे आंबे. कोणालाही बघताक्षणी आवडतील असेच होते. जे लोकं आंबे घ्यायला आले, तेच आमची जाहिरात करायला लागले. भाव अगदी कमी असल्याने पांढरपेशा लोकांबरोबरच कामवाल्या मावशी, वॉचमन, ड्रायव्हर मंडळीही येऊ लागली. ह्या मंडळींचं नेटवर्क फार जोरदार असतं. स्वस्तात मस्त आंबे मिळत आहेत, ही बातमी सहकारनगरामध्ये पसरायला लागली.
पहिल्या दिवशी जी विक्री झाली, त्यावर आम्ही खूश होतो. मागच्या वर्षी मार्केट यार्डच्या व्यापाऱ्यांकडून जेवढे पैसे मिळाले, त्यापेक्षा एक रुपया जरी जास्त मिळाला, तरी खूप झालं. आपल्याला अनुभव तरी मिळेल, अशा चर्चा झाल्या. घरगुती घेणारे घेऊन-घेऊन किती आंबे घेणार? त्यापेक्षा फळ दुकानदारांना विकले, तर भराभर आंबे संपतील, ह्या अपेक्षेने जवळपासच्या भाजीवाल्यांकडे नमुन्याला आंबे दिले आणि विकत घ्यायला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण करून आले.
त्यापैकी उन्हाळ्यात हॉल भाड्याने घेऊन रीतसर आंबेविक्री करणारे एकजण आंबे घ्यायला आले. पूर्ण पुण्यात फिरलं तरी पन्नास रुपये डझन भावाने आंबे मिळाले नसते. पण ह्या काकांनी ‘मला चाळीस रुपयांनी मिळतात. तुमच्याकडचं फळ चांगलं आहे, म्हणून मी पंचेचाळीसने घेईन’ अशीच सुरवात केली. पण आम्ही कोणालाच भाव कमी करून द्यायचा नाही, असं पक्कं ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्यांनाही भाव कमी करून द्यायला नकार दिला. त्यांनी कुरकूर करत दहा-बारा डझन आंबे घेतले.
ह्या प्रसंगाचं मनोरंजक उपकथानक आहे. हे व्यापारी आले, तेव्हा माझे बाबा घरी नव्हते. त्यामुळे बाबांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या हॉलवर जाऊन आंब्याचा भाव विचारला. आमच्याकडून नेलेले आंबे ते सहापट जास्त भावाने विकत होते!! अर्थात आम्ही मागितलेला भाव त्यांनी आम्हाला दिला होता. त्यामुळे त्यांनी किती भावाने आंबे विकायचे, हा त्यांचा प्रश्न होता. पण आम्हाला चर्चा करायला खमंग विषय मिळाला, एवढं मात्र नक्की.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून आंबे घ्यायला येणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागली.
सहकारनगरामधली सकाळी फिरायला जाऊन परतणारी मंडळी, भाजीच्या टपरीजवळचा बोर्ड वाचून येत होती. उजाडल्यापासून दारावरची बेल वाजत होती. दार उघडून आम्ही आलेल्या माणसांचं स्वागत करणे आणि ‘ किती हवेत आंबे? पिशवी आणलीत का? हो, आमच्या शेतावरचेच आहेत. तळेगावजवळ आहे शेत’, इत्यादी वाक्य कितीवेळा म्हणणे, हे काम किती वेळा केलं असेल, ह्याची गणतीच राहिली नाही!
आमचं घर दुमजली आहे. शेतावरून आलेली पोती वरच्या मजल्यावर ठेवली होती. एक-दोन पोती खाली आणून सतरंजीवर ओतून ठेवायचो. आंबे संपत आले, की पुढचं पोतं खाली आणायचो. तीन दिवस आमची इतकी पळापळ झाली, की बस्स. दिवसभर मी आणि मुलगा वरची पोती खाली आणत होतो. आई येणाऱ्यांशी बोलत होती आणि आंबे मोजून देत होती. बाबांना गल्ल्यावर पैसे घ्यायला. लोकांची इतकी झुंबड उडली होती की आम्हाला जेवा-खायची फुरसत मिळाली नाही. मावशी सकाळी पोळ्या करून गेल्या पण मला आणि आईला भाजी करायला जमलं नाही. शेवटी आम्ही चटणी-लोणचं घेऊन जेवण भागवलं.
शेतावरून पोती आली तेव्हा खोली भरून गेली होती. आंबे खरं तर पोत्यात भरून ठेवू नयेत, पसरून ठेवावे. पण खोलीत जागाच नव्हती. आता मात्र जागा झाली. घरच्यासाठी जे आंबे ठेवायचे होते, ते निवांत पसरून ठेवता आले. आधी आम्ही आलेल्या मंडळींचा आंबे घ्यायचा उत्साह वाढावा, म्हणून वर ठेवलेली पोती दाखवायचो. आंबे संपत आल्याने आता आम्ही आलेल्यांना वरच्या मजल्यावर नेणं अजिबात थांबवून टाकलं. विक्रीचा वेग इतका वाढला होता, की कटाक्षाने आंबे बाजूला ठेवले नसते, तर आम्हालाच बाजारातून आंबे आणायची वेळ आली असती!!
आंब्याची उष्णता बरीच असते. आंबा हातात घेतला, तरी कोमट उबदार लागतो. सुरवातीला बरीच पोती वरच्या मजल्यावरच्या ज्या खोलीत होती, तिथे गेलं की गरम हवेचा झोत अंगावर येत होता. माझा मुलगा ‘आई, भराभर आंबे संपले नाहीत, तर स्लॅब उडेल वरचा. ’ असं गमतीने म्हणायचा. आता मात्र खोली रिकामी आणि गार झाली. ते पाच-सहा दिवस घरातली प्रत्येक खोलीत कुठले ना कुठले आंबे होते. हॉलमध्ये विकायचे आंबे. स्वयंपाकघरात रस काढण्यासाठी तयार झालेले आंबे. आंबे घेणारे लोकं पाठोपाठ आले, की फार धावपळ होते, म्हणून एका बेडरूममध्ये जास्तीची पोती आणून ठेवली होती आणि घरी खायचे किंवा नातेवाइकांना द्यायचे आंबे दुसऱ्या बेडरूममध्ये बाजूला ठेवले होते….
गुरुवारी संध्याकाळी मला मैत्रिणीकडे जायचं होतं. तोपर्यंत आंबे संपत आले होते. पोती आणून, आंबे ओतून, आलेल्यांशी बोलून त्यांच्या शंकांना उत्तरं देऊन स्टॅमिना संपला होता. उरलेले आंबे ज्याला आपण ‘गेला बाजार’ म्हणू, अशा प्रकारचे होते. अगदी लहान, थोडा मार खाल्लेले असे. ते कोणी विकत घेईल, असं वाटत नव्हतं. मी दुखरी कंबर, खांदे घेऊन मैत्रिणीकडे गेले. गप्पा मारून, रिलॅक्स होऊन परत घरी आले, तर काय आश्यर्य! तेही आंबे विकले गेले होते.. आता काही काम नाही, ह्या खात्रीने मी गेले खरी, पण आईला पुन्हा दुकान चालू ठेवावं लागलंच.
सोमवारी सकाळी विक्रीला सुरवात केली आणि गुरुवारी दुपारपर्यंत चार हजार आंबे संपले सुद्धा…
लहान, शिकाऊ, घरगुती व्यापार केला तरी त्याचा जमाखर्च तर मांडायला हवाच.
हा सगळा व्यापार आतबट्ट्याचा व्यवहार होणार आहे, हे आधीपासूनच माहिती होतं. पन्नास रुपये डझन भावाने आंबे विकले तर नफा होणं अशक्य होतं. पण म्हणून हा सगळा प्रकार वेडेपणाचा झाला, असं काही मी म्हणणार नाही. व्यापाऱ्यांकडून मिळतील तेवढे पैसे खिशात घालून बाजूला होण्यापेक्षा आपल्या हाताने विक्री करण्याचं समाधान खूप जास्त होतं. व्यापाऱ्यांना आंबे विकून जेवढे पैसे मिळाले होते, त्याच्या दुप्पट पैसे ह्या मार्गाने मिळाले. तरीही रुपयांच्या हिशेबात नफा झाला नाही. शेतजमिनीची किंमत सोडून देऊया. पण नुसता झाडांच्या निगराणीचा खर्च, मदतनिसांचे पगार, वीज-पाण्याचा खर्च लक्षात घेतला तरी मिळालेल्या पैशाची आणि एकूण खर्चाची तोंडमिळवणी होणार नाही.
मग ह्या सगळ्यातून श्रीशिल्लक काय राहिली?
पुढच्या वर्षी प्रकाराप्रमाणे आणि आकाराप्रमाणे वर्गीकरण शेतावर करून मगच ते पोत्यात भरायचे हा महत्त्वाचा धडा मिळाला. म्हणजे आंब्यांचा दर ठरवताना त्याप्रमाणे ठरवता येईल. पन्नास रुपयांसारख्या कमी दरात विक्री केली, तर आपल्या शेतावरचे आंबे आपण कुठल्याही मध्यस्थाशिवाय विकू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला. खरेदी करायला आलेल्यांचे मोबाईल नंबर मी टिपून ठेवले आहेत. शेतावर येणारी बाकीची फळं, भाजी घरी आणली की संपर्क साधण्यासाठी सगळ्यांनी मला बजावून ठेवलं आहे.
ह्या नफा-तोट्याच्या गणिताच्या पलीकडे खूप साऱ्या सदिच्छा पदरात पडल्या. ‘दोन लेकी माहेरी आल्या आहेत. त्यांना, नातवंडांना भरपूर आंबे खाऊ घालता आले बघा वहिनी’ असं सांगणाऱ्या मावशींच्या चेहऱ्यावरचं समाधान आजही मन प्रसन्न करतं. स्वस्त आणि चांगले आंबे मिळत आहेत म्हणून कोणी लांबच्या नातेवाइकांना उरापोटी उचलून नेऊन दिले तर कोणी जवळच्या लोकांच्या मुखी पडावे म्हणून घर दाखवायला कितीतरी चकरा मारल्या.
काही गमतीही झाल्या. आपण केळ्याच्या भावात आंबे विकतो आहे, त्यामुळे कोणी ‘भाव कमी करा’ असं म्हणणार नाही, असं वाटलं होतं. पण तो समज खोटा ठरला. ‘एकदम चार डझन घेते, जरा कमी करा की वाहिनी’ अशी मागणी झाली. त्यांना मी ‘आख्ख्या पुण्यात कुठेही ह्या भावाने आंबे मिळाले, तर आणा. मी हे सगळे आंबे तुम्हाला फुकट देईन’ असं सांगायचे. तसंच ‘मी काल आले होते, तेव्हा लहान आंबे होते. आज छान मोठेमोठे आहेत. बदलून द्याल का कालचे? ’ ह्यालाही नम्र आणि ठाम नकार दिला. आंबे खरेदी करायला आलेल्यांपैकी बरेच ‘आमच्या *** गावाला आंब्याच्या बागा आहेत. पण जायला जमेना म्हणून घ्यायला आलो’ असं बजावून सांगायचे.
आमची शेतजमीन आहे, तिथल्या आंब्याची आम्ही यशस्वी विक्री केली, हे खरंच. पण तरी हा सगळा काहीसा हौसेचा मामला होता, हे देखील खरंच. कमी आंबे आले असते किंवा आलेच नसते तर बाजारातून आंबे विकत आणण्यापलीकडे आम्हाला फरक पडला नसता. उत्पन्नाचे दुसरे भरवशाचे स्रोत असल्याने आमचं घर ह्या विक्रीच्या पैशांवर अवलंबून नव्हतं. पण शेतकऱ्यांचं काय? त्यांना ही अशी विक्री करायला परवडेल का? त्यांनी कष्ट करून बाजारापर्यंत आणलेलं उत्पादन पडेल भावात विकलं गेल्यावर त्यांची चूल कशी पेटत असेल?
शेतकरी आणि त्यांचे प्रश्न जटिल आहेत. अनेक समाजधुरीणांनी त्यासाठी कष्ट केले. पण परिस्थिती होती त्यापेक्षा वाईटच होते आहे. शेतमालाला बाजारपेठ आणि योग्य तो भाव मिळणे, हा त्यातील एक ज्वलंत प्रश्न. त्याउलट शहरी लोकांना नेहमीच चढा भाव द्यावा लागतो. पण ताजा, उत्तम प्रतीचा शेतमाल शहरात सहज खात्रीने उपलब्ध होत नाही. आमच्या आसपासच्या लोकांनी उत्साहाने आंबे खरेदी करून ही उत्पादक-ग्राहक साखळी तयार करण्यासाठी मोठं प्रोत्साहन दिलं आहे. खिशात पैसे नक्की किती पडले? ह्या पेक्षाही ह्या उपक्रमाने एक मराठी शेतकरी छोटासा, चिमुकला व्यापारी झाला, हे अगदी नेमकं, नक्की आणि निश्चित!!