भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शकतो याचं नेहमीच कोडं पडायचं तिला. सगळेच त्याच्या प्रेमात. अर्थात गाऱ्हाणे सांगणारेही असंख्य. पण गाऱ्हाणेही त्यालाच सांगतात याचा अर्थ तो ते समजून घेऊन सोडवू शकतो म्हणूनच. त्याला भेटायला यायचं म्हणून एका तालात पावलं टाकणारे, त्याच्या नामाचा जयघोष करणारे वारीतले हजारो जीव बघितले कि उर दडपून जायचा एखाद्याचा. पण तो तो आहे. आपल्या अगणित लेकरांना पाठीशी घालणारा, त्यांच्या असंख्य चुका पदरात घेणारा आणि तरीही त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा. द्वारकाधीश श्रीकृष्ण.
आणि ती? ती कोण मग? ती त्याची सहधर्मचारिणी. त्याची पत्नी. अर्धांगिनी. रूक्मिणी. त्याचं जगड्व्याळ रूपही स्वतःच्या मायेने सांभाळून घेणारी. जग त्याला माउली म्हणतं पण ती त्याच्या लेकराची आई. क्वचित प्रसंगी त्याचाही तान्ह्या बाळासारखा हट्ट पुरवणारी, रुसवा काढणारी. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं. पण असं त्याच्याकडे बघून भागणार नाही, हा एव्हढा पसारा मांडलाय तो कोण बघेल म्हणून ती उठली. सकाळची नित्यकर्मं आवरून कामाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा कक्षात आली. तोपर्यंत तोही आवरून आलाच.
तिच्याकडे पाहून छानसं हसला. आज त्याचा वाढदिवस. आत्ताच औक्षण करायला हवं. पुन्हा एकदा दिवसभर त्याचे भक्त, त्याची लेकरं जमली कि तो तिचा कुठला राहायला? तसाही तो त्यांच्यात रमला कि पुन्हा तिला कुठला सापडायला? पीतांबर, भरजरी गुलाबी शेला आणि मुकुटावर खोचलेलं ते रंगभरलं मोरपीस. तिने एकाच नजरेत सगळं न्याहाळून घेतलं आणि हातातली दुधाची कासंडी त्याच्यासमोर धरली. तो हसला, उमजल्यासारखा.
“काय मग? जमलं आहे ना सगळं?” त्याने उगाच तिला चिडवायच्या हेतूने म्हटलं.
“हो तर! अगदी छान! आणि काय पण विचारणं?! कुणी ऐकलं तर वाटेल जसे काही बायकोच्या अगदी आज्ञेत आहेत!” ती लटक्या रागाने म्हणाली.
त्याने कासंडी तोंडाला लावली. दुधाच्या प्रत्येक घोटाबरोबर वरखाली होणारा त्याचा कंठमणी निरखत बसली ती. आज पहिल्यांदा असं होत होतं असं नाही. आजपर्यंत असंख्यवेळा तिने त्याला असं भान हरपून पाहिलं असेल. तो होताच तसा. भुरळ पडणारा, जादूगार. कासंडी रिकामी करून त्याने ती खाली ठेवली. त्याच्याकडे पाहताना तिची तंद्री लागलेली पाहून तो मनात सुखावला होता. हलकेच शेल्याच्या टोकाने त्याने आपल्या ओठावरचा दुधाचा चुकार थेंब टिपला आणि म्हणाला,
“पोट भरलं असेल तर निघूयात का?” त्या प्रश्नातली खोच कळून ती लाजली. काय हे असं डोळे मोठे करून ती काही बोलणार इतक्यातच त्याचे दरबारी आल्याचा संदेश घेऊन कोणीतरी आलं. तो लागलीच उठून येतो म्हणून निघून गेला.
अर्रर्रर्र.. औक्षण राहिलंच! आता काही त्याला मागं बोलावणं शक्य नव्हतं.
तीही निघाली. स्वयंपाकघरात आली. आज काय काय बनवायचं त्याची तयारी गेला महिनाभर चालली होती. सामानाची पोती येऊन पडत होती. त्याला भेटायला हजारो लोक येणार त्यांच्या जेवणाखाण्याचं सगळं जातीने बघत होती ती. बरेच जण राहते आले होते. काल संध्याकाळीच हजर झाले होते, त्यांच्या रहायची, ल्यायची व्यवस्था तिने चोख ठेवली होती.
सोबत काम करणाऱ्यांना भराभर सूचना देत तिने स्वयंपाकाला सुरुवात केली. पोती रिकामी होत होती आणि कढया, पातेली भारत होती. सगळं आवरेपर्यंत दुपार होत आली. कपाळावरचे घर्मबिंदू पदराने पुसत तिने एकदा प्रत्येक पदार्थ मनाजोगता झालाय ना याची खात्री करून घेतली. पदार्थ शिजताना त्याच्या वासावरून ती त्यात काय कमीजास्त आहे हे अचूक ओळखायची. तिच्या या कौशल्याची त्यालाही कमाल वाटायची. वासातला अगदी किंचितसा फरकही तिला ओळखता यायचा.
स्वयंपाकघरातून निघून ती तिच्या मैत्रिणींना भेटायला गेली. मैत्रिणी म्हणजे या सगळ्या तिच्या सवतीच. त्यांना तिने नुसतं तोंडदेखलं मैत्रीण मानलं नव्हतं तर वेळोवेळी त्यांची बहीण, आधारकर्ती आणि आईही झाली होती ती. त्याला इतक्या जणींबरोबर वाटून घेणं सोप्पं नव्हतंच. ते तिने कसं पचवलं ते तीच जाणे. वर सर्वात मोठी म्हणून समजूतदारपणाची सगळी खाती तिच्याकडेच असायची. असं म्हणतात बायका एकत्र आल्या कि भांडणं होणारच. तशी ती व्हायचीही. पण प्रत्येक वेळी ती ते भांडण लीलया मिटवायची. त्याने एकदा तिला हसत म्हटलं होतं, या सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचंय तुला. जमेल?
तिने जणू ते आव्हान म्हणून घेतलं. त्या सगळ्याजणींना तिने नुसतं एकत्रच नाही तर आनंदात एकत्र ठेवलं होतं आजपर्यंत.
आज तिची भामाबाई रुसून बसली होती. नाव सत्यभामा असलं तरी हिच्यासाठी ती भामाबाईच! तशीच हाक मारायची ती भामेला. तसं पाहिलं तर भामा प्रचंड सुंदर. अगदी सगळं आखीवरेखीव काम. तिच्यापुढे हि अगदीच साधी. पण भामेकडे एक गोष्ट नव्हती जी तिच्याकडे होती. हिचे बोलके, स्नेहार्द डोळे. कोणालाही आपलेसे करून घेणारे. न बोलता मनातलं ओळखणारे. तिने भामेला विचारलं, “भामाबाई, काय झालं? इकडे ये, दृष्ट नको गं लागायला. किती सुरेख सजलीयेस.”
भामा एक क्षण हसली हे ऐकून पण पुढच्याच क्षणी आपल्या हातातल्या कंकणांकडे बघत कुरकुरली,
“ताई, किती जुनी झालीत हि कंकणं! कसेतरीच दिसतायत माझे हात. इतका समारंभ होणार आणि मी अशी येऊ होय? त्यापेक्षा मी येतच नाही कशी.”
गाल फुगवलेल्या भामेला बघून तिला हसूच आलं. एका दासीला पाठवून तिने स्वतःची दागिन्यांची पेटी मागवली. त्यातली स्वतःची कंकणे तिच्यासमोर धरत म्हणाली.
“तू न येऊन कसं चालेल भामाबाई? अगं त्या उत्सवाचं सगळं देखणेपणच जाईल कि. हे घे. ही कंकणं घाल.”
भामेची कळी खुलली.
पुढे मुलाबाळांचं सगळं आवरलंय का नाही हे पाहून त्यांच्या खाऊची व्यवस्था बघून पुन्हा ती कक्षात परतेपर्यंत उन्हं चांगलीच तापली होती. सकाळची वस्त्रं बदलून तिने छान हिरवागर्द भरजरी शालू नेसला. सगळे दागिने घातले. कपाळावर साजिरं कुंकू रेखलं. सगळा शृंगार झाल्यावर मग ती पेटी उघडली. ईवलुशी. त्यात टपोऱ्या पाणीदार मोत्यांची नथ होती. त्याने तिला दिलेली. ती जेंव्हा त्याच्यासोबत इकडे आली, तेंव्हाच तिचं माहेर तुटलं. कधीकधी माहेरची सय दाटून आल्यावर ती हि नथ घालायची. त्याने खास तिच्यासाठी बनवून घेतली होती ती नथ. जशी तिच्या माहेरच्या भागात घालतात तशी. आणि एका अलवार क्षणी तिच्या हातात दिली होती. त्या नथीला खूप जपायची ती. तिने नथ घातली, आरशात एकदा स्वतःचं रूप न्याहाळलं आणि पुन्हा बाहेर निघाली.
माणसांनी द्वारका फुलून गेली होती. जो तो त्याच्या दर्शनासाठी आसुसलेला. त्याला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी कुठून कुठून दूर प्रांतातून लोक आले होते. त्याचा दरबार अगदी भरून गेला होता. तीळ ठेवायलाही जागा नव्हती. तो सकाळपासून सर्वाना भेटत होता. माणसं, बायाबापड्या, लेकरं सगळ्यांची आवर्जून विचारपूस करत होता. गरजवंताला पैपैसा, धान्य वाटायचं चाललं होतं. त्याने त्याची धान्याची कोठारे उघडून दिली होती.
जेवणाची वेळ झाली तशा मोठ्याल्या पंगती बसल्या. वाढप्यांची धावपळ सुरु झाली. सगळे तृप्त मनाने जेवत होते, ते बघून तो सुखावत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं असेल म्हणून ती स्वयंपाकघरात आनंदात होती. शेवटची पंगत उठल्यावरही स्वतःच्या जेवणाची तिला शुद्ध नव्हतीच. तिच्या मैत्रिणींना तिने जेवायला वाढलं, आग्रहाने खाऊ घातलं. पोरंसोरंही जेवून हुंदडत बसली होती. आज आपापल्या गावी परत जाणाऱ्यांचे देण्याघेण्याचं जातीने पाहिलं तिने. स्त्रियांना वस्त्रं, लेकरांना खेळणी सगळं देऊन झालं. दूर जाणाऱ्यांसाठी शिधा बांधून द्यायला सांगितलं. दिवस कलायला आल्यावर पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन सगळी झाकपाक, आवारावरी नीट झालीये ना ते बघितलं.
सगळं मनाजोगतं पार पडल्यावर शेवटी सूर्यनारायण अस्ताला जाताना ती परत आपल्या कक्षात अली. दिवसभराच्या कामाचा थकवा आता थोडासा चेहऱ्यावर उमटायला लागला होता. अजून तो परत आला नव्हता मात्र. बसला असेल त्याच्या सवंगड्यांच्या घोळक्यात. मग त्याला वेळेचं भान कुठलं राहायला?
सकाळी औक्षण राहिलं होतं ते ती विसरली नव्हती. तूप घालून निरांजनं लावून त्याची वाट बघत राहिली ती.
बराच वेळ निघून गेला. तो अजून कसा येत नाही या विचाराने तिला काळजी वाटायला लागली पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला समजावलं, त्याच्या वेळेवर हक्क सांगणारे हजारो आहेत. असेल... येतच असेल..
ती गवाक्षाबाहेरच्या अंधारात टिमटिमणारे दिवे बघत बसली.
आणि अचानक तो सुगंध आला. त्याचा. त्याचा एक अंगभूत सुगंध होता, जो तिला अचूक ओळखता यायचा. तिच्या चेहऱ्यावर हसू खुललं.
“आलात?” तिने मागे बघण्याआधीच विचारलं.
तो हसला, म्हणाला, “मी आलोय हे नेहमीच न बघता कसं काय कळतं तुला?”
तिने त्याला हाताला धरून मंचकावर बसवलं. त्याचं औक्षण केलं. दिवसभरात आत्ता त्याला समोर पाहत होती ती.
दिव्यांच्या ज्योतींबरोबर तिच्या डोळयांनींही ओवाळलं त्याला. त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत त्याच्या विशाल भाळावर गंध रेखलं.
ओवाळून झाल्यावर त्याला नमस्कार करण्यासाठी ती खाली वाकणार इतक्यात त्याने उठून तिला तसं करण्यापासून थांबवलं.
तिचा हात धरून तिलाच पुन्हा मंचकावर बसवत म्हणाला,
“बैस इथे अशी”
एका सेवकाला बोलावून त्याने त्याच्याकडून काहीतरी घेतलं.
पुन्हा तिच्याजवळ येत म्हणाला,
“किती करतेस गं! माझ्यासाठी, माझ्या संसारासाठी, माझ्या लेकरांसाठीही. मी स्वार्थी आहे. सगळं माझं माझं म्हणत राहतो. आणि तू? तू न बोलता कष्टत राहतेस. प्रत्येकवेळी उभी असतेस माझ्यासोबत, खांद्याला खांदा लावून. सगळ्यांचं हवंनको सगळं बघतेस. किती करतेस...”
“असं का बोलताहात?... आपण काही वेगळे आहोत का” तिचा आवाज कापरा झाला होता.
त्याचेही डोळे भरून आले.
“हेच. हेच ते. आपण वेगळे नाही आहोत म्हणून मी प्रत्येक गोष्टीत तुला गृहीतच धरत गेलोय आजपर्यंत. अगदी आजही. मला भेटायला आलेले ते हजारो सुह्रद, त्यांच्या ओठावर माझं नाव होतं पण आज त्यांचा दिवस सुखाचा झाला त्यामागे तू होतीस. सगळं जातीने बघणारी, निभावून नेणारी... माझी कारभारीण.”
ती त्याच्याकडे पाहतच राहिली. कोण म्हणतं श्रम केल्यावर फक्त आरामाने बरं वाटतं, तो जे बोलत होता त्याने तिचे सगळे श्रम मिटले होते.
त्याने उठून एक वाडगा हातात घेतला आणि न बोलता तिच्या पायाशी येऊन बसला. तिने उठायचा प्रयत्न करताच तिला त्याने पुन्हा हाताला धरून खाली बसवलं.
हातातल्या वाडग्यातलं थोडंसं तेल घेऊन त्याने तिच्या पायाच्या तळव्यांना हलक्या हाताने चोळायला सुरूवात केली.
दिवसभर त्या पायांना विश्रांती ती कसली माहिती नव्हती. पायात जिरणाऱ्या त्या कोमट तेलाच्या स्पर्शाबरोबर तिचं मन सुखावत होतं.
सगळं तेल संपेतो तिच्या डोळ्यांवर सुखाची ग्लानी यायला लागली होती. ते ओळखून तो म्हणाला,
“मला ठाऊक आहे, कामात जेवायचंही भान राहिलं नसेल तुला. स्वयंपाकघरात गेलो तर सगळं संपत आलेलं. जे काही शिल्लक होतं, त्याचाच काला करून आणलाय. बघ तुला आवडतो का?” म्हणून त्याने एक चांदीचं ताट हातात घेऊन त्यातला एक घास तिला भरवला. आणि तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या शालूच्या गर्द हिरव्या रंगावर घरंगळलं.
आत्ता तो तिन्ही जगाचा स्वामी नव्हता, ना त्याच्या भक्तांचा देव! तो तिचा होता फक्त. आणि ती...ती... त्याची कारभारीण!