गुलमोहर
रणरणत ऊन, घामामुळे होणारी चिडचिड, भरं दुपारी फार नसला तरी तीन चार किलोमीटरचा करावा लागलेला प्रवास, अगदी नको वाटतं होतं. काम पण तसंच महत्त्वाचं होतं त्यामुळे बाहेर पडण्या शिवाय काही पर्याय नव्हता. कसलं ते ऊन, रस्त्याने जाणारा येणारा चांगलाच होरपळत होता.
माझ्यासारखी सगळ्यांचीच इच्छित स्थळी पोहचण्याची घाई, खरं तर गारव्याच्या ठिकाणी पोहचण्याची घाई. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवजा दुकानात पेपरने हवा घेणारापण् जगातला सर्वात सुखी माणूस भासतं होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची सावली म्हणजे टप्प्या टप्पाणे हातात आलेल सरकारी अनुदान.
जो तो कडक उन्हाळ्याला जणू कोसत चालला होता. या सगळ्या तगमगीत सहज सरळ झाडाच्या सावलीच्या शोधात मान उंचावली आणि निसर्गाने हजारो हातांनी उधळलेला खजाना नजरेस भरला. हो खजानाच तो. लाल गुलाबी रंगांनी सजलेला, नटलेला गुलमोहर. किती ती निसर्गाची उदात्तता. उन्हाचा तडाखा कमी भासावा म्हणुन उन्हाळ्यात बहरणारा गुलमोहर. लाल रंग उष्णतेच प्रतिक, पण अंगाची लाही लाही होत असताना मनाला, डोळ्यांना थंडावा देणारा गुलमोहर. काही ठिकाणी लालचुटुक, तर काही ठिकाणी लालसर गुलाबी रंगांची छटा त्यावर सफेद रंगाच्या रेषांनी केलेल्यां कलाकुसरीने नटलेला गुलमोहर. घराच्या सजावटीचा भाग न होता झाडावरच दिमाखात डौंलनारा गुलमोहर. लाल रंगाच्या विविध छटा दाखवून मन प्रफुल्लित करणारा गुलमोहर. गुलाब,मोगरा, जाई, जुई यांच्या रांगेत न बसता हि कवी मनाला भुरळ पाडणारा गुलमोहर.
जेव्हा जेव्हा कोल्हापूरला जाते तेव्हा आवर्जून मांढरे कलादालनात फेरी मारुन येते. कै. सुर्यकांत मांढरे यांनी फुललेल्या गुलमोहराची विविधता, त्याचे सौंदर्य, क्नव्हासवर अतिशय सुरेख पद्धतीने साकारलेले दिसते. दर वेळी मी जाते आणि दर वेळी चित्रातला गुलमोहर मला नव्याने उमगतो.
खरंतर किती कमनशिबी आहोत आपण. निसर्ग सहस्र हातांनी आपल्याला दानं देत असतो पणं ते पदरात पाडून घेण्याइतकी सवड आपल्या कोणाकडेही राहिली नाही. खरंच दोन क्षण विसावा घ्यावा गुलमोहरा खाली. खुप काही शिकवून जातात हे दोन क्षण. प्रतिकुल परीस्थितीतही आपले आयुष्य फुलवणारा गुलमोहर .