हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.
शुक्रवार पेठेत राहात असताना आमच्या प्रमोदबनमधे एक मराठी होती. समोरच्या पारेकर टेलरच्या दुकानात एक वेगळी मराठी होती. त्याहून वेगळी समोरच्या वस्तीतली होती. रात्री येडा अप्पा (वेडा नव्हे. येडाच) दारू पिऊन यायचा आणि रस्त्यावर मधोमध बसून अभंग म्हणत दुनियेला शिव्या द्यायचा. त्याच्या शिव्या पण वारकरी ढंगाच्या होत्या.
समोरच्या वस्तीत पुण्याच्या ग्रामीण भागाचा हेल होता. हाय, नाय वगैरे असायचं पण मला आठवतंय त्याप्रमाणे आमची कांताबाई, तिची पुष्पा कधीही साडी "घालायच्या" नाहीत. नेसायच्याच. त्यांच्या ग्रामीण मराठीतही होती दोन वेगळी क्रियापदं.
जवळच्या नातेवाइकांच्यात वेगवेगळी मराठी. आईचे वडील; बापू मूळचे कोकणातले, दादरला वाढलेले नंतर आयुष्य सदाशिव पेठेत राह्यलेले. जेवायला वेळ लागला, बाकीचे उठून गेले की ते म्हणायचे "मागासलीस तू!" मला अजून हसायला यायचे आणि मग जेवायला अजून वेळ लागायचा. त्यांच्याशी बोलताना उलथने की काविलथा हा घोळ असायचाच. वाक्याच्या शेवटी हो लावायची खास त्यांची पद्धत. म्हणजे "अमुक कर हो!" वगैरे. मावशी आणि क्वचित आईही हे
हो-अंत प्रकारचे बोलत असत.
सुधाआजी; माझ्या वडिलांची आई ती वाक्याचा शेवट हो ने करत नसे. तिच्या आधीच्या काही पिढ्या बहुतेक पुण्यातल्याच. बोलणे थोडे घाईघाईचे असे. पण ते खास सुधाआजी फिचर पण म्हणता येईल. तिचे तीन्ही मुलगे म्हणजे बाबा आणि माझे दोन काका आज एकत्र असतील तर तीन वेगळ्या रिदमचे, तीन वेगळ्या प्रकाराचे मराठी ऐकू येईल.
हे झालं घरातलं. थोडी शिंगे फुटल्यावर पुणेभर उंडारणे सुरू झाले. पुलापलिकडच्या कॉलेजात जाऊ लागले. एरंडवण्यातल्या लोकांचे नाजूक साजूक मराठी ऐकून जरा दडपणच वाटले. म्हणजे "शिंगे फुटल्यावर उंडारणे" असे जे पेठेत म्हणत तसे म्हणणे हे पुलापलिकडे "सो मिडलक्लास"(माया साराभाईसारखे) म्हणून बघितले जात असावे. तन्मय-चिन्मय मराठी या नाजूक एरंडवणे मराठीचीच पुढची पिढी.
पेठेतून पुलापलिकडे जायचे वेगवेगळे मार्ग. एका मार्गात दत्तवाडी पानमळा वगैरे लागतो. "तर ना एड्या काय सांगू तिथली मराठी राव! आपल्या टपोरीपणाशी एकदम जवळची ना एड्या!"
शिंगे फुटून स्थिरस्थावर होता होता कसबा पेठ, बोहरी आळी, गंज, भवानी, रविवार वगैरे पेठा फिरणेही सुरू झाले होते. तिथला ठसका वेगळा. चार वाक्ये बोलल्यावर लग्गेच कळणार बेणं कसब्यातून आलंय ते. मंडई आणि आसपासच्या रविवार, शुक्रवार, बुधवार वगैरेंमधे पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागाचा संपर्क भरपूर त्यामुळे तिथली भाषाहि असायचीच त्यात. किंवा निदान तो ढंग तरी.
बुधवार, रविवार, गंज, भवानी वगैरे व्यापारी पेठांमधे असंख्य गुजराथी वा मारवाडी वा बोहरी व्यापारी आहेत. बरेचसे पेशव्यांच्या काळापासून आहेत त्यामुळे ते सगळे मराठीच बोलतात. तेही जुन्या मराठी सिनेमातल्या पगडी घातलेल्या, मारवाडी सावकारासारखे बोलत नाहीत. ते त्या भागाच्या खास लहेजाचेच मराठी बोलतात.
क्याम्पातले मराठी.. हो क्याम्पात गेल्यावर आपण हिंदी मोडमधे नाही गेलो तर पूर्वी दुकानदार मराठी बोलायचे. तर वंडरलॅण्डमधला कापड दुकानदार सरदार आहे त्याच्या दुकानातले सगळे सरदार मराठी बोलू शकायचे. थोडं मिक्स होतं पण होतं.
अजूनही एरंडवणी मराठी आणि पेठी मराठीमधे फरक आहे. अजूनही वरती सांगितलेले मराठीचे वेगवेगळे रंग पुण्यात आहेत. एवढेच नव्हेत तर आणखीही असतील. पुण्याबद्दल आकस काढून टाकून, उजमेखून ऐकले तर ऐकूही येतील.
बघा काय जमतंय ते. नाहीच तर पुणेरी म्हणत पिंका मारणं सोप्पंच आहे.
- नी