हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.
शुक्रवार पेठेत राहात असताना आमच्या प्रमोदबनमधे एक मराठी होती. समोरच्या पारेकर टेलरच्या दुकानात एक वेगळी मराठी होती. त्याहून वेगळी समोरच्या वस्तीतली होती. रात्री येडा अप्पा (वेडा नव्हे. येडाच) दारू पिऊन यायचा आणि रस्त्यावर मधोमध बसून अभंग म्हणत दुनियेला शिव्या द्यायचा. त्याच्या शिव्या पण वारकरी ढंगाच्या होत्या.
जरा तपेलीभर पाऊस पडला की भक्क असा आवाज येऊन दिवे जात. प्रमोदबनमधे राहणारी काही मंडळी आपापल्या गॅलर्यांमधे रस्त्यावरून येणारे जाणारे लोक बघत. घरामधे मेणबत्त्या, गॅसच्या बत्त्या वगैरे. समोर डावीकडे कामवाल्यांची वस्ती. तिथली सगळी पोरंटोरं वस्तीच्या बाहेर येऊन पारेकर टेलरच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर. पारेकरचं दुकान वस्तीत नाही. वस्तीला लागून असलेल्या दुमजली चाळीत. चाळीत ज्यांची घरे रस्त्याकडे तोंड करून तेही सर्व आपापल्या गॅलर्यांमधे. तिन्ही ठिकाणच्या समवयस्क जनतेमधे रस्त्याच्या आरपार गप्पा चालत. विशेषत: कॉलेजातल्या दादा ताई जनतेत. त्या गप्पाटप्पांचे प्रमोदबनमधल्या बालिकेस कोण कौतुक.
नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.
शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :