आता तुम्ही म्हणाल मला वेड लागलंय, पण मी खरंच प्रेमात पडलेय. तुर्की आवडती माणसं (उफ्फ!), तिथली घरोघरी, रस्तोरस्ती फिरणारी अती माणसाळलेली, गुबगुबीत कुत्रे-मांजरं, आजूबाजूचे फेसाळते निळे पाणी आणि खारा वारा, इस्तंबूलमधली बडबडी, चमकधमक गर्दी ते अंताल्यामधली दूरवर पसरलेली डोंगरापर्यंत मऊ शांतता.
इस्तंबूल
अंताल्या
त्यांची पारंपरिक फोक सॉंग्स ते आर्त लव्ह सॉंग्स ते मॉडर्न ब्लूज आणि रॉक, रंगीबेरंगी घरं, अँटिक इमारती आणि गल्लोगल्ली सापडणारे लहानसे प्रेमळ कॅफे, सिटीस्केप्स ते लँडस्केप्स सगळंच प्रेमात पडणारं! इतक्या सगळ्या तुर्की मालिका बघताना अजून एक गोष्ट पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत प्रेमात पाडत होती ती म्हणजे टेबलभर नाजूकसाजूक क्यूटश्या पांढऱ्या सिरॅमिक डिशेस मध्ये मांडलेला रंगीबेरंगी ब्रेकफास्ट!
मग काय गूगल आपल्या हाताशी म्हणत नेहमीसारखी शरलॉकगिरी सुरू केली. जरी स्वतःला स्वयंपाकाचा कंटाळा असला तरी माहिती जमवायला काय हरकत आहे, हो ना? तर टर्किश लोकांची आद्य आवड म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत त्या फुलदाणीसारख्या दिसणाऱ्या (या शेपला माझा एक मित्र सुंदरीची कंबर म्हणतो) काचेच्या कपातून तपकिरी, सोनेरी 'चाय' पीत राहणे.
तुम्ही कुठेही असा घरी, ऑफिसमध्ये किंवा शॉपिंग करा सगळीकडे लोक दर थोड्या थोड्या वेळाने 'चाय' पिणार आणि बाकीच्यांनाही ऑफर करणार. त्यांना ऑफिशियली कितीही चाय ब्रेक अलाउड आहेत, काय लक्की माणसं ना! कुणाच्याही घरी 'सबाह सबाह' गेल्यावर 'गुनायदन' (good morning) आणि 'होश गॅलदीनीस' (your arrival is lovely) म्हणून स्वागत होईल आणि लगेच चाय/काssहवे विचारून डायरेक्ट काहवाल्तं (breakfast) चे आमंत्रण दिले जाईल.
हा चहा करायची पद्धतही खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. एक मोठी किटली आणि तिच्यावर ठेवायची दुसरी लहान किटली असते. मोठया किटलीत चार कप पाणी आणि लहान किटलीत सात आठ चमचे चहा पावडर आणि एक कप पाणी ओतून झाकण लावून मोठ्या किटलीवर लहान किटली बसवायची मग हे प्रकरण गॅसवर ठेवून पाच मिनिटं उकळायचं. उकळून चहा पावडर खाली बसली की खालच्या किटलीतलं निम्मं पाणी वरच्या किटलीत ओतायचं आणि खालची किटली पुन्हा होती तेवढी भरायची. परत हे सगळं दहा मिनिटं उकळलं की तुर्की चहा तयार! चहा सर्व्ह करायची एक छान पद्धत आहे. एका छोट्याश्या सिरॅमिक ताटलीत (तुर्की भाषेत 'तातलं' म्हणजे गोड किंवा क्यूट हं!) काचेचा कप ठेऊन त्यात दोन्ही किटल्यांमधला चहा आणि पाणी आपल्या आवडीच्या प्रमाणात एकत्र ओतायचं आणि ताटलीत शेजारी एक छोटा टीस्पून साखर घेण्यासाठी ठेवायचा. एका वेगळ्या बोलमध्ये शुगर क्यूब्स असतात. या सगळ्या ताटल्या ठेवायला एक मोठा ट्रे हवाच. (टर्किश टी सेट म्हणून हा सगळा सेट विकत मिळतो)
जरी माणसं दोन तीनच असली तरी चहा मात्र सात आठ कप करावाच लागतो कारण अजून हवा का? विचारल्यावर कुठलाच ट्रू ब्लू तुर्क कधीच नाही म्हणत नाही. प्रत्येकी दोन तीन चहा तरी होणारच होणार!
चहाबरोबर खायला चीज आणि पार्सलीचं सारण भरलेले मऊ मऊ पोगाका बन्स (एकदा केल्यावर आठवडाभर टिकतात) आणि दह्याचा बंट केक असतो.
पोगाका बन्स
ह्या दोन्ही वर्षानुवर्षे चालत आलेल्या रेसिपीज घरोघरी मुला मुलींना शिकवल्या जातात. हो, बरेचसे तुर्की पुरुष स्वयंपाकात एक्सपर्ट असतात. अजून एक टिकमार्क!
ब्रेड आणि चीज ह्या ब्रेकफास्टमधल्या अजून दोन मुख्य गोष्टी. बेगलसारखा दिसणारे 'सिमित' नावाचे मोठे गोलाकार भरपूर तीळ चिकटवलेले ब्रेड असतात तसेच मऊ, वेगगवेळ्या बिया, भाज्या किंवा मांस घातलेले पिझ्झासारखे चौकोनी 'पिडे' ब्रेड असतात. ब्रेडचे तुकडे करून तो चीज किंवा जॅममध्ये बुडवून खाल्ला जातो.
सीमित
तुर्की पिडे
'बेयाझ पेनीर' म्हणजे फेटा चीजचे तुकडे, मेंढीच्या दुधापासून बनवलेलं 'कसेरी' नावाचे हार्ड चीज, 'लोर' नावाचे ताज्या सॉफ्ट गोट चीजचे मोठे क्यूब्ज हे सगळे वेगवेगळ्या डिशमध्ये ठेवतात.
ब्रेड म्हटलं की बरोबर जॅम आणि स्प्रेड्स आलेच. घरोघरी तुर्की आज्या सीझनल फळांचे जॅम बनवून ठेवतात. यातले क्लासिक ऑप्शन्स म्हणजे आंबट चेरी, जर्दाळू आणि अंजिराचे जॅम. एक बर्गमॉट नावाचे कडवट संत्रे वापरून केलेला जबरदस्त सुंदर सिट्रसी सुगंध असलेला जॅम बऱ्याच जणांच्या आवडीचा असतो. पिडेबरोबर खारट तिखट आवडत असेल तर शक्यतो ब्लॅक ऑलिव्ह स्प्रेड खाल्ला जातो. जर गोडाची आवड असेल तर पिडेवर थोडी ताहिनी पेस्ट स्प्रेड करून त्यावर काकवी किंवा 'पेकमेझ' म्हणजे प्रिझर्व केलेला द्राक्षाचा किंवा बाकी फळांचा आटवलेला घट्टसर रस (साधारण आपल्या सुधारस किंवा मेपल सिरपसारखा) ओतून खाल्ला जातो. साधारण ११व्या शतकापासून साखरेच्या शोधापूर्वी आणि मध कमी उपलब्ध असल्यामुळे तुर्की लोक पेकमेझ बनवतात आणि खातात. अनातोलिया भागातली द्राक्षे आणि त्यापासून बनवलेला रिच पेकमेझ प्रसिद्ध आहे.
ताहिनी आणि पेकमेझ
तुर्कीयेच्या कुठल्याही सुपरमार्केटमध्ये गेल्यावर टांगलेले सॉसेजेस दिसतील पण ते सॉसेसेज नसून 'जेविझली सुजूक' म्हणजे अक्रोड दोऱ्यात ओवून पेकमेझमध्ये बुडवून सुकवलेले लांबट शाकाहारी सॉसेज (उदा. आपल्याकडची सुकेळी) असतात. हे सॉसेजेससुद्धा ब्रेकफास्टमध्ये सर्व्ह करतात.
जेविझली सुजूक (निरनिराळ्या फ्लेवर्समध्ये)
अंडी हा ब्रेकफास्टमधलाअजून एक मुख्य भाग. 'सुजूक' नावाचे सुकवलेले मसालेदार, तिखट बीफ सॉसेज अंड्यात बुडवून तळून खाल्ले जातात. घरात खायला काहीच शिल्लक नसेल तरी सुजूक आणि अंडी मिळतीलच असा काहीसा तुर्की वाक्प्रचारसुद्धा आहे. हे तळून उरलेल्या मसालेदार तेलात पिडे बुडवून खातात. मांस खायचे नसेल तर 'मेनेमेन' म्हणून एक अंड्याचा प्रकार असतो. मेनेमेन म्हणजे अंड्यात रंगीत भोपळी मिरच्या, टोमॅटो आणि पातीचा कांदा घालून केलेली भुर्जी जिच्यावर भरपूर ओरेगॅनोची पखरण केलेली असते. (बिझिम हिकायेमध्ये बरीस हे उत्तम बनवतो ) अगदीच आळशी लोकांकडे नुसती उकडलेली अंडी आणि मीठ असते.
मेनेमेन
एक मोठा बोल भरून काकडी आणि टोमॅटोचे किंवा सीझनल फळांचे काप ही ब्रेकफास्टमधली अजून एक अटळ गोष्ट. खालच्या फोटोत पानात गुंडाळलेला अळूवडी सारखा प्रकार दिसतो आहे तो आहे 'डोलमा'. द्राक्षाच्या पानांमध्ये भरून वाफवलेल्या भाज्या किंवा मांस. डोलमा पारंपरिक पदार्थ असून तो मुख्य जेवणात घेतात. शक्यतो घरातल्या आज्या आणि काकवांची डोलमा बनवण्याची आपापली सिक्रेट रेसिपी असते. आपण आजीच्या हातची पुरणपोळी मागतो तसे तुर्की आजीच्या हातचा डोलमा खातात. (उदा. आश्क लफ्तान अनलामाझमधला मुरात :winking: )
खालील फोटोतः
डोलमा, काकडी, टोमॅटो, सेलरी स्टिक्स, ऑलिव्ह्ज, सुकवलेले अंजीर, प्लम्स, जर्दाळू, उकडलेली अंडी वगैरे.
लहान मुलांसाठी दूध आणि जरा मॉडर्न लोक ऑरेंज ज्यूस किंवा कॉफी पितात. पण पारंपरिक तुर्की काहवाल्तीमध्ये फक्त तुर्की चायलाच महत्त्व आहे. असं भरभरून सजवलेलं टेबल जर रोज ब्रेकफास्टला पुढ्यात असेल तर काय मज्जानू लाईफ!