तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. थोडा बाबा गनुष च्या मार्गाने जाणारा पण यात तीळाचा वापर होत नाही. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.
मूळ पदार्थाचे नाव Yoğurtlu Patlican Salatasi.
साहित्य:
२ मध्यम आकाराची भरताची वांगी
६-७ लसूण पाकळ्या बारीक चिरून
थोडासा लिंबाचा रस
अर्धी वाटी घट्ट दही (ग्रीक योगर्ट असेल तर उत्तम. घरचे घट्ट दही सुद्धा चालेल. फक्त पाणी अजिबात नको)
चवीपुरते मीठ
ऑलिव्ह ऑइल
सजावटी साठी कोथिंबीर/पार्सले
कृती:
वांगी गॅसवर खरपूस भाजून घ्या. गॅसचा पर्याय नसेल तर ओव्हन मध्ये भाजू शकता. नंतर वांग्याचे साल काढून गर मॅश करा. यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, दही, मीठ, बारीक चिरलेला लसूण (अर्धाच घ्या कारण उरलेला अर्धा फोडणीसाठी हवा आहे) हे सगळे एकत्र करा.
थोडे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उरलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी करा. ती या मिश्रणावर ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.
वाळवलेली पुदिन्याची पाने , कांद्याची पात इत्यादी घालून देखील यात व्हेरीएशन करता येईल. फोडणीची स्टेप पर्यायी आहे, नुसतंच ऑलिव्ह ऑईल आणि चिली फ्लेक्स वरून घालू शकतोच.