हैद्राबादची घटना ताजी असताना, काल व्हाट्सअप्पवर एक विडिओ आला. 112 India अँपची माहिती त्यात होती. काल शोधाशोध करत असताना मुंबई पोलिसांचे प्रतिसाद नावाचे अँप दिसले होते पण तिथे रजिस्ट्रेशन होत नव्हते. इथे बघूया काय अनुभव येतोय म्हणत अँप लगेच डाउनलोड केले. नाव, जन्मतारीख, फोन नंबर मागितल्यावर फोनवर ओटीपी आला. अँपने नेहमीसारखी माझे कॉन्टॅक्ट वाचण्याची, लोकेशन पाहण्याची, फोन वापरण्याची परवानगी मागितली. सहसा अँपला ही माहिती देणे मी टाळते व अँप काढून टाकते. पण ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे अप्पला अशक्य असल्याने परवानगी दिली. पुढच्या स्क्रीनवर अँप माझे लोकेशन दाखवू लागले. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागली.
टेस्ट करायचे म्हणून मी पोलीस हे बटन दाबले. माझ्या फोनवरून 112 नंबरला मिसकॉल गेला. त्यानंतर अँपवर लगेच I am safe हे बटन दिसायला लागले. मी सेफच होते म्हणून ते बटन लगेच प्रेस केले. आता प्रकरण संपले असेल असे वाटले. पण नाही. क्षणार्धात माझा फोन वाजायला लागला. मुंबईतील लँडलाईनवरून मला फोन आला. 'मॅडम, तुम्ही 112 वरून पोलीस मदत मागितली. तुम्हाला मदत हवीय का?' आश्चर्याचा सुखद धक्का तर बसलेलाच, पण त्यातून सावरून मी आभार मानून फोन बंद केला.
112 INDIA अँप बद्दल गुगळुन बघितले तेव्हा कळले की भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमेरजन्सीमध्ये वापरण्यासाठी खुला केलेला आहे. आजपावेतो 20 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्येही येतील.
पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अँप विकसित केलेले आहे. अँपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत मिळू शकते. फेब्रुवारीत मदत मिळण्याची वेळ 10 ते 12 मिनिटे इतकी होती. ती सहा महिन्यात ६ ते ८ मिनिटे इतकी कमी करण्याची योजना होती जी आतापावेतो अमलात आणली गेली असेल.
आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत ते 112 थेट डायल करून मदत मागू शकतात. The Emergency Response Support System (ERSS) च्या वेबसाईटवर थेट लॉगिन करूनही मदत मागता येते. प्रत्येक राज्याचे इमेरजन्सी रिस्पॉन्स सेंटर त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक फोन, इमेल व अँपमार्फत आलेल्या पॅनिक कॉलचा पाठपुरावा करते.
ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.
कुठलीही वाईट घटना घडली की आपल्याला खूप वाटते की आपण काही मदत करू शकलो असतो. ही चिडचिड व हतबलता सोशल मीडियावर व्यक्त होते. जर ह्या अँपवर आपण स्वयंसेवक म्हणून रजिस्टर केले तर आपल्या चिडचिडीला दिशा मिळेल, कुणा बिचाऱ्या व्यक्तीला मदत मिळेल.
इतके चांगले अँप असूनही सरकारी पातळीवरून त्याचा प्रचार केलेला दिसत नाही. हैद्राबादच्या घटनेत तिथल्या एका मंत्र्याने 'बहिणीला फोन करण्याऐवजी १०० नंबरवर फोन करायला हवा होता' अशी प्रतिक्रिया दिल्यावर त्याच्यावर टीकेची झोड उठली. पण कदाचित मदत मिळू शकली असती, प्रसंग टाळता आला असता. असो. घडून गेल्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.
अशी मदत मिळण्याची संधी उपलब्ध असेल तर आपण ती घ्यावी. यात नुसती पोलीस मदतच नाही तर आग व आरोग्यही समाविष्ट आहे. कित्येकदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले बाळे लाम्ब दूरदेशी असतात. अशा वेळी हे अँप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे.
अँपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आपण सगळ्यांनी हे नक्की करावे असे मला वाटते.
वेबसाईट : https://ners.in/
ट्रॅकिंगचे काम कसे चालते याची माहिती देणारा विडिओ: