गुरुवारी रात्री सगळे एकतर झोपणारच नाहीत वा कमी झोपले असतील हे गृहित धरुन तसही शुक्रवारी संध्याकाळी बोस्फोरस बोट टुअर करणे आणि इस्तंबुलचा फील घेणे एवढाच प्लॅन होता. त्यामुळे आई बाबांची फक्त बोट टुअर मिस होणार होती. ती त्यांना नंतर करता येणारच होती.
आम्ही ठरल्याप्रमाणे वेळेवर इस्तंबुलला पोचलो, आणि ठरवलेली टॅक्सी पकडुन हॉटेलवर आलो. इस्तंबुलचं हे एअरपोर्ट नविन आहे. इस्तंबुलचा जो भाग युरोपात येतो त्याभागावर वसलेलं आहे. मागच्या ऑक्टोबरमधे त्याचं उद्घाटन झालं आणि या एप्रिलपासुन बराचश्या फ्लाईट्सची वाहतुक इस्तंबुल एअरपोर्टवरुन सुरु झाली. अर्थात इस्तंबुलच्या आशियातील भागात अजुन एक एअरपोर्ट आहेच पण त्यावरुन बहुतेक देशांतर्गत वा जवळच्या फ्लाईट्सच उडतात.
आई जेव्हा माझ्याकडे आली होती आणि इस्तंबुल वरुन पाहुन इथे कधीतरी यायच असं ठरवलं होते, ते जुनं एअरपोर्ट (आतातुर्क एअरपोर्ट)होतं. त्यामुळे तेव्हा आईला वरुन बोस्फोरस समुद्रधुनी, त्यावरचा पुल हे सगळं दिसलं होतं आणि ती इस्तंबुलच्या प्रेमात पडली होती. पण या नविन एअरपोर्टला येताना तिला वरुन ते काहीच दिसलं नाही त्यामुळे ती जरा नाराजच झाली.
यावेळी इस्तंबुलमधे वेळ कमी असल्याने आम्ही हॉटेल ' सुलतानअहेमत' या भागात बुक केलं होतं. आय्या सोफिया, तोपकापी पॅलेस, ब्लू मॉस्क, सिस्टर्न बॅसेलिका (संकन पॅलेस) ह्या सगळ्या वास्तु याच भागात आहेत. त्यामुळे आम्हाला दुसर्या दिवशी आया सोफियाला केवळ ५-१० मिनिटात चालत जाता येणार होतं.
इस्तंबुल एअरपोर्टवरुन हॉटेलवर पोचायला साधारण पाउण तास लागला. मला बाकीच्या रस्त्यांबद्दल माहित नाही पण एअरपोर्ट आणि शहराला जोडणारा रस्ता हा फारच छान आहे. हा रस्ता जर्मनीच्या ऑटोबानच्या धर्तीवर बांधलेला वाटतो. म्हणजे अनलिमिटेड वेगात जाता येत नाही (पण वेगमर्यादा कोणी पाळताना दिसत नव्हतं. भन्नाट वेगात सगळ्या गाड्या पळत होत्या) पण रस्ता, रस्त्यांवरच्या खुणा, पाट्या या अगदी जर्मनीची आठवण करुन देणार्या आहेत.
साधारण अडीचला आम्ही हॉटेलला पोचलो. भैरवी आणि अक्षय दोन तासापुर्वी आलेच होते. आम्ही हॉटेलमधे पोचलो तेव्हा ते जेवायला बाहेर गेले होते असं खाली रिसेप्शनला चौकशी केल्यावर कळलं. या हॉटेलमधे आम्हाला तीन खोल्या या अगदी समोरासमोर दिल्या होत्या आणि आसपास दुसर्या खोल्याही नव्हत्या. हे म्हणजे अगदी घरच्यासारखं झालं.
आम्ही खोलीत जाउन फ्रेश होतोय तेवढ्यात भैरवी, अक्षय आलेच. मग माझी आणि भैरवीची भरत भेट झाली. ते दोघं खाउन आले होते म्हणुन आम्ही दोघांनी आधी खाउन घ्यावं तोपर्यंत ते झोपतील असं ठरलं.
आमची पाच ते साडे सहा बोट टुर होती, पावणे पाचला गलाटा पुलाजवळ या असं सांगितलं होतं. हॉटेलपासुन साधारण तीनएक किलोमिटर जायच होतं. मग आपण चालतच जाउ, तेव्हढचं इस्तंबुल बघण होइल असं सगळ्यांच मत पडलं. चालत जायच तर साधारण चारला निघु म्हणजे रमत गमत, रस्ता शोधत जायला पावणे पाच वाजतील असा हिशोब करुन चार ला भेटु असं ठरवुन आम्ही दोघं खायला हॉटेल बाहेर पडलो.
आमच हॉटेल ज्या ठिकाणी होतं तिथे आजुबाजुला फक्त आणि फक्त रेस्टॉरंटसचं दिसत होती. गंमत म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंटचा एक कर्मचारी रस्त्यावर येउन रेस्टॉरंटची जहिरात करत होता.
आम्ही आपले शेजारच्याच रेस्टॉरंटमधे जाउन बसलो. हवा छान असल्याने बाहेरच बसलो होतो पण बघतो तर सगळीकडे मांजरीच मांजरी. इस्तंबुल खरं तर टर्की हा मांजरांचा देश आहे असं म्हणायला पाहिजे. जिकडे तिकडे मांजरी दिसतात. कधी शेजारी मांजर येउन बसेल वा पायातुन पसार होइल कळणारही नाही म्हणुन खर तरं जेवताना माझं लक्ष जेवणाकडे कमी आणि मांजरांकडेच जास्त होतं.
तिथे बसल्या बसल्या मॅगीचे लेख डोक्यात पिंगा घालायला लागले होते. त्यामुळे आधी टर्की स्पेशल आयरन घेतलं. दोन सुरेख तांब्याच्या भांड्यात आयरन आलं. हे आयरन आपल्या ताकासारखं अगदी मधुर ताक होतं. मी कायम मीठ घातलेलं आयरन प्यायलामुळे हे ताक प्यायला मजा आली.
मग मस्त मेझ्झे प्लॅटर मागवलं. त्यात दोन डोलमा, हमस, मुहमेरा, बाबागनुश आणि राजम्याची उसळसदृश पदार्थ असं सगळ ब्रेड बरोबर आलं.
मग वेगवेगळ्या भाज्यांचे परतलेले काप दह्याच्या डीपबरोबर आले. आणि शेवटी अस्स्ल तुर्की कपातुन तुर्की चहा आला.
खरं तर इतक खाल्यावर जाम झोप आली होती. पण ऑलरेडी पावणे चार झाल्याने आता झोपणं शक्यच नव्हतं. मग लगेच कपडे बदलुन तयार झालो आणि बरोबर चारला भैरवीच्या खोलीचं दार वाजवलं. तर ही मंडळी अजुन साखरझोपेतच होती. मग मी लगेच आपण आज जाणं कॅन्सल करुयात का? उद्या सगळे आईबाबांबरोबर जाउ असं म्हणुन मला झोपता येतयं का ही चाचपणी केली. पण तोपर्यंत ते तसे झोपेतुन बाहेर आल्याने आत्ताच जाउयात हा निर्णय झाला.
भैरवी अक्षय सव्वा चारपर्यंत तयार झालेच. आता चालत जाणं काही खरं नव्हतं. मग ट्रॅमने जाणं हा खरं तर अगदी योग्य मार्ग होता पण आम्हाला झोप आल्याने आणि ते दोघ अजुन झोपेतच असल्याने हा मार्ग सुचला नाही. शेवटी पटकन टॅक्सी करु आणे गलाटा पुलावर पोचुयात असं ठरवलं. एक टॅक्सी बघितली तर ड्रायव्हरने मीटर टाकणार नाही आणि ८५ लिरा लागतीलं असं सांगितलं. इस्तंबुलमधे पोचुन दोनच तास झाल्याने (आणि झोपेत असल्याने) आम्हाला तो खरच सांगतोय का गंडवतोय याचा काहीच अंदाज आला नाही. आम्ही पावणेपाचला पोचायच्या प्रेशर खाली लगेच हो म्हणुन टाकलं. नंतर कळलं त्याने आम्हाला जामच गंडवलं होतं. बरं ८५ लिरा घेउन ड्रायव्हरने नीट जागी पोचवावं की नाही? पण नाही, ह्याने आम्हाला अर्धा पाउण किलोमिटर आधीच सोडलं वर हे काय इथेच आहे गलाटा ब्रिज, पाच मिनिटात पोचाल असं सांगुन तो पसारही झाला.
त्याने आम्हाला सोडलं तिथे अनेक बोटी उभ्या होत्या पण आमचं ज्या कंपनीतर्फे बुकिंग होतं ते सापडेना. तिकिटावर गलाटा ब्रिजजवळ असं लिहिलं होतं पण ब्रिजच्या नक्की कुठल्या बाजुला हे माहित करुन घ्यायचे कष्ट आम्ही आधी घेतले नव्हते. शेवटी पाउणएक किलोमिटर चालल्यावर ब्रिजच्या पलिकडच्या बाजुस बोट टुअरकंपनीच ऑफिस दिसलं.
खरं सांगु तर एका दृष्टीने ड्रायव्हरने आधी सोडलं ते बरचं झालं. शुक्रवार संध्याकाळ असल्याने सगळी जनता ब्रिजच्या परिसरात लोटली होती. प्रचंड हॅपनिंग वातावरणं होतं.
मक्याची कणसं, चेस्ट्नटस भाजुन विकणार्या गाड्या उभ्या होत्या. लोकं आपल्या कुटुंबाबरोबर कणसं खात, चहा पित, गप्पा मारत बसली होती. अनेक जण बोट राईडसची तिकिट काढण्यात गंतली होती. बरेच् विक्रेते लोकांना काही बाही विकत फिरत होते.
हे सगळ बघत बघत आमच्या टुअर कंपनीच्या ऑफिसजवळ पोचलो. त्यांच्याकडुन ऑडिओ गाईड घेतलं, फ्री मिळालेले ज्युस घेतले आणि बोटीत बसलो. आमचा प्लॅन होता की पाच ते साडे सहा अशी बोट राईड करु म्हणजे अर्धावेळ उजेडातलं इस्तंबुल बघता येइल आणि मग सुर्यास्तानंतर अंधारतलं बघता येइल. साधारण पावणेसहाला सुर्यास्त होणार होता. आम्ही बोटीजवळ पोचलो तेव्हा आई बाबा इस्तंबुलमधे पोचल्याचा आणि टॅक्सीत बसल्याचा मेसेज आला होता. त्यांची बोट राईड थोडक्याने चुकणार होती.
इस्तंबुल हे आशिया आणि युरोप या दोन्ही खंडात विभागलं गेलयं. ही बोस्फोरसची समुद्रधुनी दोन्ही खंडांना वेगळं करते. मरमरार समुद्र आणि काळ्या समुद्राला जोडणार्या या समुद्र्धुनीने इस्तंबुलला दोन भागात विभागलं आहे. जिथे ही समुद्र्धुनी सुरु होते वा मरमरार समुद्राला मिळते, तिथुन समुद्राचा एक पट्टा जमिनीत आत गेला आहे. या पट्ट्याला गोल्डन हॉर्न म्हणतात आणि याच गोल्डन हॉर्नवर हा गलाटा पुल बांधला आहे. साधारण सोळाव्या शतकाच्या सुरवातीला तेव्हाच्या सुलतानाने लिओनार्डो द विंचीला गोल्डन हॉर्नवर पुल बांधण्यासाठी पुलाचं डिझाइन करुन द्यायची गळ घातली होती. त्याप्रमाणे लिओनार्डोने पुलाचं डिझाइन करुनही पाठवलं होतं. पण ते सुलतानाला आवडलं नाही. नंतर सुलतानने मायकल अँजेलोलाही पुलाचं डिझाइन करुन देण्याबद्दल विचारलं पण मायकल अँजेलोने हे काम करण्यास नकार दिला.
मग १९ व्या शतकात या गोल्डन हॉर्नवर पुल बांधले गेलेच पण सध्याचा फेमस गलाटा पुल हा १९९४ मधे बांधला गेला आहे.
सव्वा पाच वाजले तरी बोट हलली नव्हती. सगळा कारभार एकदम आरामाचा होता. मग आम्ही अशिच गंमत बघत, गप्पा मारत बसलो. साडेपाचच्या सुमारास एकदाची बोट हलली. बोट बॉस्फरसच्या समुद्र्धुनीत प्रवेश करेपर्यंत सुर्यास्त होउन गेला होता. केशरी सोनेरी आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं.
जशी जशी बोट पुढे जायला लागली तसं तसं युरोपच्या साईडला डोलमाची पॅलेस, ऑर्टाकॉय मशिद, सिर्गान पॅलेस दिसु लागले. बोस्फोरस पुलापर्यंत बोट येईपर्यंत अंधार झालाच होता. अंधारात लाल, निळ्या, जांभळ्या दिव्यांनी हा पुल झगमगुन उठला होता. आता आलो आहोत तर तुर्कीश कॉफी झाली पाहिजे म्हणुन मग तुर्कीश कॉफी घेतली. ती कडु कॉफी मी सोडुन कोणाला फारशी आवडली नाही.
आता आम्ही आमच्या गप्पात जरा गुंतलो त्यामुळे बाहेर दिसणाया बाजुला दिसणार्या इमारतींकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. एका पॉईंटला बोट परत वळली. आता आम्ही आशिया खंडाची बाजु बघत होतो. या बाजुला अनेक भव्य घरं दिसत होती. ती म्हणे जुन्या सरदरांची आहेत. आता त्यांची मालकी दुसर्या कोणाकडे असेल पण त्या घरांची नावं अजुनही जुन्या सरदारांवरुनच आहेत. त्यांची किंमत साधारण २०० मिलियन युरोपर्यंत आहे हे कळलं.
आता राईड संपायला आली होती. आम्हाला एक दिपगृह दिसलं. सांगितलेल्या एका दंतकथेप्रमाणे अनेक वर्षंपुर्वी एका राजाला मुल्बाळं होत नव्हतं. बरेच प्रयत्न करुन त्याला शेवटी एक गोड मुलगी झाली. राजज्योतिषांनी तिच भविष्य बघुन सांगितलं की हिच्या जीवाला सपामुळे धोका आहे. म्हणुन मग राजाने तिला या दीपगृहात सुरक्षित ठेवलं. याच दीपगृहात ती मोठी झाली. एकदा तिला फळं खायची इच्छा झाल्यावर तिच्यासाठी टोपलीभर फळं आणवली गेली. त्याच टोपलीत बसुन एक सापही आला होता. राजज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे ह्या सापाने तिला दंश केला आणि त्यातच तिला मृत्यु आला. ही गोष्ट ऐकल्यावर मला लगेच परिक्षित राजाची गोष्ट आठवली आणि गंमत वाटली.
राईड संपल्यावर आता टॅक्सीने जायच नाही हे ठरवलचं होतं. मघाशी येताना ट्रॅम स्टेशन दिसलं होतं. तिथे जाउन बघितलं तर सुलतानअहेमतला दर दोन मिनिटाने गाड्या होत्या. मग लगेच इस्तंबुल कार्ड घेउन त्यात २० लिरा भरले आणि अवघ्या १० लिरात आणि १० मिनिटात आम्ही चौघही सुलतानअहेमत स्टेशनवर आलो.
ट्रॅम स्टेशनवरुन हॉटेलला परत जाताना एक हलवायचं दुकान दिसलं. पहिलाच दिवस अस्ल्याने त्याची अपुर्वाई होतीच. मग मॅगीची आठवण येउन दुकानाचा आणि तिथल्या मिठायांच्या दरपत्रकाचा एक फोटो काढला.
पुढे आया सोफिआ आणि ब्लु मॉस्क दिसले. रात्रीच्या अंधारत सोडलेल्या लाईटसमुळे आया सोफियाची केशरी वास्तु उजळुन निघाली होती.
मग तिथे थोडं रेंगाळुन, फोटो काढुन हॉटेलवर परत गेलो. आम्ही गेलो तर आई बाबा फ्रेश होउन, एक चक्कर मारुन खाली झोपाळ्यावर गप्पा मारत बसलेच होते. त्यांनी आम्ही नव्हतो तेव्हा चक्कर मारतना जवळपासची चांगली रेस्टॉरंटस शोधुन ठेवली होती. त्यातली दोन रेस्टॉरंट्स एकमेकांना अगदी चिटकुनच होती. आम्ही तिथे गेल्यावर दोन्ही रेस्टॉरंटच्या लोकांनी आमच्याकडे या १०% कमी करतो, आमच्याकडे या २०% कमी करतो असं सांगत आम्हाला त्यांच्याकडे खेचायचा प्रयत्न केला. मग फायनली एकाने एक हमस आणि एक मुहमेरा फ्री, जेवणानंतर तुर्की चहा कॉम्प्लिमेंटरी आणि टोटल बिलावर दहा टक्के सुट असं सांगितल्याने आम्ही त्याच्याकडे गेलो. मला खर तर दुसर्या रेस्टॉरंटमधे जायचं होतं. दुसर्या रेस्टॉरंटच्या माणसाचा चेहरा बघुन मला जरा वाईटच वाटलं. मग आम्ही तुझ्याकडे उद्या येतो असं त्याला सांगुन त्याच्यापासुन सुटका करुन घेतली.
छान भरपेट जेवण झाल्यावर रुमवर येउन थोडावेळ गप्पाटप्पा केल्या पण सगळ्यांचेच डोळे अगदी मिटायला लागले म्हणुन आपापल्या खोलीत येउन झोपलो. उद्याचा दिवस फार महत्वाचा होता. ऑलमोस्ट सगळच इस्तंबुल उद्याच्या एका दिवसात बघायचं होतं. कसं जमणार होतं काय माहित?