तरुण तुर्कांच्या देशात १: https://www.maitrin.com/node/3918
तरुण तुर्कांच्या देशात २: https://www.maitrin.com/node/3922
तरुण तुर्कांच्या देशात ३: https://www.maitrin.com/node/3936
तरुण तुर्कांच्या देशात ४: https://www.maitrin.com/node/3944
आज हॉट एअर बलुन राईडसाठी सगळेच फार एक्सायटेड होते. मला आणि आईला उंचीची थोडी भिती वाटत असल्याने आम्हाला नाही म्हणलं तरी थोडं दडपण आलं होतं पण तरीही हा लाईफ टाईम एक्पिरिअन्स आहे, तो चुकवु नका असं बर्याच लोकंकडुन ऐकलं होतं.
सगळ्यात जास्त एक्साईटमेंट मनजीतला होती, त्यामुळे आज पठ्ठ्या भल्या पहाटे पाचलाच उठुन, मी उठेपर्यंत आंघोळही करुन तयार झाला. मी मात्र नुसते दात घासुन, आवरुन तयार झाले. बरोबर ६ ला आम्ही दोघ दीडशे पायर्या चढुन आई बाबांच्या रुममधे आलो. खर तर मला आत्ता गरम चहा प्यायला आवडला असता, पण इतक्या लवकर तो मिळाला नसताच, त्यामुळे बाबांनी आणलेला गिरनारचा कहावा प्यायला. भैरवी आणि अक्षय अजुन उगवले नव्हते त्यामुळे बाबांच ब्लड प्रेशर वाढतच होतं. आम्हाला न्यायला बलुन राईडवाल्यांची गाडी आली आणि भैरवी अक्षयही आलेच.
आम्ही गाडीत शिरलो तर अजुन एक भारतीय कपल ऑलरेडी गाडीत होते. त्यांना हाय हॅलो म्हणुन बसलो. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरबरोबर त्याचा छोटा मुलगाही आला होता. साधारण आठ-दहा वर्षाचा असावा. एकदम गोड आणि चुणचुणीत पोरगा होता, माझ्या आईला तर त्याच्याबद्दल फारच कौतुक आणि प्रेम वाटायला लागलं होतं. साधारण दहाएक मिनिटात आम्ही बलुन राईडच्या जागेवर पोचलो. ड्रायव्हरने आम्हाला गाडीतच बसायला सांगितलं. पाच मिनिटानंतर त्याने आम्हाला उतरवुन एकीकडे बोट दाखवुन सांगितलं की तो बलुन तुमचा आहे. सगळीकडे अजुन बराच अंधार होता, त्यामुळे मला तर आधी धड कळलचं नाही की नक्की कोणता आमचा बलुन आहे. पुढच्या लोकांच्या मागे मागे आम्ही आमच्या बलुनजवळ गेलो. आता सगळीकडे बलुनमधे गॅस भरण्याचं काम सुरु होतं. त्याच्या प्रकाशात अनेक बलुन्स दिसत होते.
हळुहळु एक एक बलुनमधे हवा भरण्याचं काम संपलं आणि एक एक बलुन उडायला लागले. आमच्याही बलुनमधे गॅस भरुन झाला होता. आम्हाला आता बलुन खाच्या बास्केटमधे यायला सांगितलं. बलुनखाली जी बास्केट होती त्याचे चार भाग केले होते. प्रत्येक भागात पाच लोकं असे एकुण वीस लोकं एकावेळी एका बलुनची राईड करु शकतात. चार भाग करण्यासाठी उभं राहिल्यावर साधारण कंबरेपर्यंतच्या उंचीची पार्टिशन्स होती. बास्केटच्या बरोबर मधे बलुनचा पायलट (ह्याला नक्की काय म्हणतात माहित नाही, पायलट हा बरोबर शब्द नसावा बहुतेक, पण दुसरा योग्य शब्द सुचला नाही) उभा होता. तो बलुनमधील हवा कमी जास्त करुन बलुनला चालवायचं काम करणार होता.
प्रत्येक भागात पाच लोकं असल्याने आमच्यापैकी कोणालातरी एकाला दुसर्या भागात जावं लागणारं होतं. मनजीत आमच्यात सगळ्यात शेवटी चढल्याने त्याला शेजारच्या भागात जावं लागलं. आम्ही आत शिरल्यावर बघतो तर आमच्या बलुनमधे वीसपैकी अठरा भारतीय होते. एकच कपल वेगळ्या देशातुन आलं होतं. आमच्याबरोबर गाडीत जे कपल होतं ते दोघं मनजीतच्याच भागात होते.सगळे स्थानापन्न झाल्यावर बलुन हळुहळु वर जायला लागला. आता तसं फटफटायला लागलच होतं. आमच्या आधी उडालेले बलुन्स बर्यापैकी उंचीवर पोचले होते, तर खाली अजुन काही बलुन उडायच्या तयारीत होते.
हळुहळे सगळीकडे बलुन्स दिसायला लागले. आता आम्ही ऑफ सिजनला गेलो म्हणुन थोडे कमी आहेत, नाहितर एकावेळी तीनशेतरी बलुन्स उडतात असं आमच्या पायलटने सांगितलं.
आता सुर्योदय व्हायला लागला होता, ते दृश्य मी कधीच विसरणार नाही. सुदैवाने त्या दिवशी अगदी निरभ्र आकाश होतं. जसा जसा सुर्य वर येत होता, तसे तसे आकशात आणि डोंगरांवर विविध रंग दिसत होते. त्या पार्श्वभुमीवर बलुन आले की फारच सुंदर दिसत होतं.
आता खाली कप्पाडोकिआ दिसत होतं.
पायलट गॅस कमी जास्त करुन बलुनला स्टिअर करत होता. अर्थात यात वार्याचाही सगळ्यात महत्वाचा वाटा आहे. ज्या दिशेला वारा वाहतो, त्या दिशेला बलुन जातो, वारा अनुकुल नसेल तर बलुन फार उंचीवर नेता येत नाही. आम्ही सुरवात केली तेव्हा बहुतेक वारा फार अनुकुल नसावा कारण बलुन फार उंचीवर उडत नव्हते. आमच्या बलुनमधे जे एकमेव अभारतीय कपल होतं त्यांना बलुन वर जायलाच हवा होता, त्यामुळे ते पायलटला सारखं अजुन वर ने असं सांगत होते. पहिल्या दोन-तीन वेळा पायलटने नम्रपणे आता वारा बलुन वर न्यायला ठीक नाहिये हे सांगितलं, पण तरीही हे लोकं हेका सोडेचना. मग मात्र पायलट चिडला.
मनजीतने आत्तापर्यंत शेजारच्या कपलशी बोलायला सुरवात केलीच होती. ते दोघं मुळचे दिल्ली साईडचे पण नोकरीनिमित्त गेल्या चार पाच वर्षांपासुन पुण्यात स्थायिक झालेले होते. त्यामुळे त्यांना मराठी बोलाता येत नसली तरी कळत होतीच. हे ऐकल्यावर आम्ही एकमेकात जरा विचार करुन बोलायला सुरवात केली.
कप्पाडोकिआचा भाग तसा फार मोठा नाहिये त्यामुळे बलुन राईडही फार वेळाची नसते. एक सव्वा तासात छान राईड होते. आमच्या राईडची वेळ संपत आली तसं आम्हाला आमच्या पायलटने खाली ओणवं बसायला सांगितलं. आमचा बलुन लँड झाल्यावर परत कसरत करत आम्ही बाहेर आलो. मला आणि आईला आधी उंचीच्या भितीमुळे थोड दडपण आलं होतं पण मला वाटत ही राईड आम्ही दोघींनीच सगळ्यात जास्त एंजॉय केली असावी. बलुन वर जाताना, खाली येताना काही फारसं जाणवत नाही. इनफॅक्ट वर असतनाही खाली बघितलं तेव्हाही भिती वाटली नाही. खाली आल्यावर सगळ्यांना अल्कोहल्विरहीत वाईन दिली. परत गाडीकडे जाताना बरोबरच्या मुलीशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांचा टर्की फिरण्याचा प्लॅनही बराचसा आमच्यासार्खाच होता. आम्ही उद्या डायरेक्ट कुसाडासीला जाणार होतो तर ते परवा येणार होते. मग त्यांना कुसाडासीला जमलं तर भेटु म्हणल आणि निरोप घेतला.
पावणे आठपर्यंत आम्ही हॉटेलला परतही आलो. नउ वाजता आमची कप्पडोकिआ गावाची टुर होती. मला खर तर आधी आंघोळ करायची होती. पण सगळ्यांना भुका लागल्या होत्या. मला एकटीला नंतर ब्रेकफास्ट करायला बोअर झालं असतं म्हणुन मग मी त्यांच्या बरोबर ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. मी कितीही म्हणलं तरी मला ब्रेकफास्टला वेळ लागतोच. त्यामुळे निवांतपणे तब्बेतीत खाउन बघितलं तर पावणे नौ झाले होते. सगळ्यांच म्हणणं पडल की आता आंघोळीला सुट्टी मारावी आणि संध्याकाळी आंघोळ करावी. पण मला तसां बरं वाटेना. म्हणुन मी पटकन खाली आंघोळीला गेले.
बाबांच्या भितीने मी विक्रमी वेळात आंघोळ आटोपली. बाथरुमच्या बाहेर येउन बघते तर बाबा फोन करतच होते. गाडी आली असं सांगितल्याने मी फारच पटकन आवारुन पळतच वर गेले. तर बाबांनी मला मी वेळेत वर यावे म्हणुन उगीच गाडी आली असं सांगितलं होतं. :raag: :raag: अजुन गाडी आलीच नव्हती. मी घाई घाईत वर आल्याने गडबडीत माझा मोबाईलही खोलीत विसरुन आले होते. मग शेवटी मनजीत माझा मोबाईल आणायला खाली गेला.
तो वर येइपर्यंत आमची गाईड आलीच. यावेळची आमची गाईड एक पस्तिशीची एकदम गोड आणि उत्साही मुलगे होती. शुक्रान नाव तिच. तिला मोठे चार भाउ, हिच्या आईला मुलगी हवी होती, मग चार भावांवर ही झाल्यावर देवाचे आभार म्हणुन हिच नाव शुक्रान ठेवलं.
यावेळीही आमच्याबरोबर एक दिल्ली साईडचं हनिमुन कपल होतं. तसचं दोन पाकिस्तानमधुन आलेल्या मध्यमवर्गीय बायका होत्या. बहिणी होत्या का मैत्रीणी ते कळल नाही.
जाताना सगळीकडे घराबाहेर लाल भोपळ्याच्या बिया वाळायला ठेवलेल्या दिसत होत्या. शुक्रानने सांगितलं की इथे लाल भोपळ्याच पीकही भरपुर होतं आणि त्याच्या बिया जेवणातही खुप वापरतात. तसच इथे संत्री आणि डाळिंबही बर्याच प्रमाणात पिकतं. त्यामुळे सगळीकडे संत्री आणि डाळिंब्याच्या ज्युसचे ठेले दिसत होते.
सगळ्यात पहिल्यआंदा तिने आम्हाला नेलं जिथुन कप्पाडोकिआचे मशरुमशेप टिपिकल डोंगर व पिजन व्हॅली दिसत होती.
या मशरुमशेप खांब्/डोंगराच्या आकाराच रहस्य असं आहे की हे बेसिकली तीन प्रकारच्या दगडाने बनले आहेत. सगळ्यात खालचा म्हणजे जमिनीखालचा दगड हा सगळ्यात मौ दगड आहे. आंघोळीसाठी जो वापरतात तो. वरचा जो दगड आहे तो चुनखडीचा दगड. हाही मौ दगडच म्हणायचा. तर त्यावरचा जो थर आहे तो कठिण अशा बेसॉल्ट दगडाचा. त्यामुळे होत काय की खाल्यच्या दगडाची झीज ही फार वेगाने आणि जास्त प्रमाणात होते. तर वरच्या दगडाची झीज कमी प्रमाणात होते. यामुळे डोंगरांना टिपिकल मशरुम आकार आला आहे.
तसच पीजन व्हॅलीत लाखोनी कबुतर रहातात, पण बहुतेक ती फक्त त्यांच्या त्यांच्या घरातच रहात असावीत. त्यांचा बाहेर फारसा उपद्रव जाणवला नाही. कबुतरं म्हणल्यावर पहिल्यांदा त्यांचा उपयोग म्हणुन संदेशवाहन डोळ्यासमोर येतं. पण इथे लोकांनी ती ठेवली आहेत कारण त्यांची विष्ठा ही शेतीसाठी फार उपयोगी असते म्हणे. इथले शेतकरी लोकं वर्षातुन एकदा (का दोनदा) पीजन व्हॅलीत जातात आणि ही विष्ठा गोळा करुन आणतात. त्याचा उपयोग मग खत म्हणुन केला जातो.
आम्ही फोटो काढेपर्यंत तिथे असलेल्या एका छोट्या दुकानात आईला अल्लादिनच्या दिव्यासारखा दिवा दिसला. तिला तसा कधीचा विकत घ्यायचा होता, मग तिने घासाघीस करुन तो घेउन टाकला. तेव्हढ्यात माझ्या नजरेला शुक्रान चहा पिताना दिसली. मग मी लगेच माझ्यासाठी आणि आईसाठी चहा मागवला. आमच्या दोघींचा चहा होतोय तेव्हढ्यात मनजीने शुक्रानला आप्ण आज काय काय बघणार हे विचारुन घेतलं. त्याच्या आणि अक्षयच्या डोक्यात आज डी टीव्ही राईड करायच कालपासुन होतचं. मग मग मनजीने शुक्रानला डी टीव्ही बद्दल सांगितल्यावर तीने दिवसभराच्या कार्यक्रमाचा क्रम थोडासा बदलला आणि आम्हा चौघांना तीन वाजता हॉटेलमधे सोडायला परवानगी दिली. तोपर्यंत बाकीच्या पब्लिकचे फोटो काढुन झालेच होते.
मग आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो.
कप्पाडोकिआच अर्थकारण हे पर्यटन सोडल्यास हे दगड व सिरॅमिक वस्तुंवर चालतं. इथे फक्त चुनखडी व बेसॉल्टच नाहीत तर अनेक वेगवेगळे दगड सापडतात. त्यातला एक सेमी प्रेशियस स्टोन म्हणजे सुलतानेत (Sultanite) दगड. हा स्टोनची गंमत म्हणजे हा स्टोन प्रत्येक प्रकाशात वेगवेगळ्या रंगाचा दिसतो. म्हणजे सुर्यप्रकाशात काहीसा गुलाबी तर खोलीत असलेल्या पांढर्या ट्युबलाईटच्या प्रकाशात चॉकलेटी तर पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात हिरवट.
शुक्रान आम्हाला मग तिथल्या ह्या स्टोनपासुन दागिने बनवायच्या फॅक्टरीत घेउन गेली. तिथे गेल्यावर मग खरेदी तर होणारच होती. मग मी एक कानातले अणि आईने एक कानातले घेतले. भैरवीला किती आग्रह केला पण त्या यडीने घेतलच नाही.
यानंतर आम्ही निघालो ते अंडरग्राउंड सिटी बघायला. पुर्वी शत्रुंच्या भितीमुळे इथल्या लोकांनी जमिनीखाली बेसिक रहायची व्यवस्था केली होती. शत्रुचा हल्ला झाला की इथले लोक मग खाली रहायला जायचे. त्यामुळे कप्पाडोकिअच्या जमिनीखाली अशा अंडरग्राउंड गावांचं जाळं आहे. त्यातल्या एका जमिनीखालच्या गावाला भेट द्यायला आम्ही निघालो. इथे खाली आत जायच तर अरुंद रस्त्यांवरुन जावं लागतं. त्यामुळे ज्यांना अरुंद जागांची भिती वाटते वा हार्टचा त्रास आहे त्यांना आत जायला शक्यतो नाही म्हणतात. पण आमच्या गृपमधे कोणला खाली जायला प्रॉब्लेम नव्हता. अर्थात शुक्रानने सांगितलच की कोणाला कधीही त्रास वाटला तर मला सांगा, मी त्यांना वर घेउन जाईन.
शत्रुने हल्ल केल्यावर त्या गावातील सगळी लोकं खाल्यच्या गावात रहायला जायची. त्यामुळे साधारण वीस हजार लोकं दाटीवाटीने का होइना पण राहु शकतील अशी खाली व्यवस्था होती. शत्रू परत गेले की नाही हे कळण्यासाठी खालुन वर एक शिडीची व्यवस्था होती. आंधारात खालच्या लोकांपैकी कोणीतरी वर जाउन शत्रुचा अंदाज घेइ. दुर्दैवाने शत्रुला खालच्या व्यवस्थेचा अंदाज आला आणि त्यांनी खालीही हल्ला केला तर तिथे शत्रुला रोखण्यासाठीही व्यवस्था होत्या. सगळ्यात महत्वाच म्हणजे खाली यायचे रस्ते हे इतके अरुंद होते की खाली येताना शत्रुच्या प्रत्येक सैनिकाला एका लायनीत यावं लागे, एकत्र हल्ला करता येत नसे. त्यामुळे एकेका सैनिकाला मरणं हे खालच्या लोकांसाठी सोपं ठरे. तसचं खाली आतुन बंद होणारे दगडाचे दरवाजे होते. म्हणजे खर तर मोठे दगडच्,ते दगड येणार्या वाटेवर सरकवुन ठेवले की आत यायचा मार्ग बंद होइ.
या सगळ्या अंडरग्राउंड सिटी एकमेकांना जोडलेल्या होत्या. त्यामुळे हल्ला झाला तर महिला आणि लहान मुलांना दुसर्या ठिकाणी पोचवण्यात येत असे.
हे सगळ पाहुन आम्ही वर आलो तोपर्यंत जेवणाची वेळ झालीच होती. मग शुक्रान आम्हाला घेउन एका ठिकाणी गेली. हे टिपिकल रेस्टॉरंट नव्हतं. आपला लग्नाचा हॉल असावा अशाप्रकारचा हॉल होता आणि तिथे बुफे मांडला होता. बुफे असल्याने तिथे आमच्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी त्यामानाने बरेच ऑप्शन्स होते. तसचं गोडखाउ लोकांसाठी अनेक प्रकारचे डेसर्टस होते.
शुक्रानने या ट्रीपची आखणी अशी केली होती की एक बघण्याचं ठिकाण आणि एक शॉपिंगच ठिकाण. त्याप्रमाणे आता ती आमहाला घेउन सिरॅमिक फॅक्टरीत गेली. तिथे मग एका गाईडने आम्हाला पॉटरीची माहिती दिली आणि आमच्यापैकी कोणाला पॉटरीचा प्रयत्न करायचा आहे का हे विचारलं. तो असं विचारेल याची कल्पना शुक्रानने आधी दिलीच होती. भैरवीने मी ट्राय करणारे हे आधीच सांगितलं होतं. पण आयत्यावेळी तिथल्या गाईड्/मॅनेजरने विचारल्यावर आमच्याबरोबर असलेल्या मुलीने हात वर केला. त्यामुळे भैरवीची थोडी चिडचिड झाली.
अर्थातच ही सगळी माहिती, प्रात्यक्षिक हे आम्ही तिथल्या वस्तु विकत घ्याव्यात यासाठीच मार्केटिंग गिमिक होतं. त्यामुळे मग आम्ही त्यांच्या दुकानात गेलो. तिथल्या वस्तु फार सुंदर होत्या यात काही वाद नाही पण त्याच्या किंमती काहीच्या काही होत्या. परवडण्याचा प्र्श्नच नव्हता. त्यामुळे आम्ही मग नुसतच विंडो शॉपिंग करु लागलो. इथे एक गंमतच झाली. आम्ही तिथे वस्तु बघत असताना नवर्याला चुकुन ऑफिसचा फोन आला. त्याच्या कोणत्यातरी कलिगला तो सुट्टीवर आहे हे माहित नव्हतं. त्यामुळे फोन आल्यावर मनजीत जर्मनमधे बोलत बोलत बाहेर गेला.
हे तिथल्या मॅनेजर (का मालक होता माहित नाही) ऐकलं, आणि मग मला उत्सुकतेने हा जर्मनमधे बोलतोय? असं विचारलं. मनजीत परत आल्यावर मग ह्याने त्याची स्टोरीच सांगितली. हा मॅनेजर जर्मनीमधे अनेक वर्ष राहिलेला, जर्मन नागरिकच होता. आता घरच्यांसाठी टर्कीत परत आला होता. आम्ही भेटल्यावर जर्मनमधे बोललयावर त्याला जणु माहेरचा माणुस भेटल्याच फिलिंग आलं. त्याला खर तर आमच्याशी अजुन बोलायच होतं पण आता आमची निघायची वेळ झाली होती, बाकीची लोकं आमच्यासाठी ताटकळली होती.
आता ऑलमोस्ट अडीच वाजले होते, तिथे जवळच असलेला टुरिस्ट स्पॉट बघौन मग आम्हला हॉटेलवर सोडु असं शुक्रानने सांगितलं. जवळच असलेला टुरिस्ट स्पॉट म्हणजे एका उंचीवर असलेल्या जागी दोन बाकडी लावली होती आणि त्यांच्या मागे बदाम होते. मग सगळ्या कपलने आणि एकएकट्यानेही त्या बाकड्यावर बसुन मागे असलेल्या बदामात बसल्यासारखे फोटो काढले.
तिथेच शेजारी अप्रतिम तुर्कीश कॉफी मिळते असं शुक्रानने सांगितल.होतं. ही कॉफी म्हणजे त्यांच्या टिपिकल तांब्याच्या भांड्यात निखार्यावर करुन मातीच्या छोट्या गडुत देत होते. मला त्याचे फोटो काढायचे होते पण तेव्हाच एका बदामाइथली जागा रिकामी झाल्याने नवर्याला बदामतले फोटो काढुन घ्यायचे होते.
इथली कॉफी पिउन आणि फोटो काढुन झाल्यावर मग आम्ही निघालोच. शुक्रानने आम्हाला चौघांना हॉटेलवर सोडलं आणि बाकीच्यांना घेउन बाकीचे पॉइंट्स बघायला गेली. हॉटेलला पोचुन कपडे बदलुन तयार झालो आणि ए टी व्ही राईडच्या ठिकाणी गेलो. मला तसा यात फारसा इंटरेस्ट नव्हता पण मनजीत, अक्षय आणि भैरवी या तिघांनाही ही राईड करायची होती. त्यामुळे मी पिलियन रायडर म्हणुनच गेले होते. भैरवीचं अजुन नुसतं मागे बसायच का गाडी चालवायचीही हे ठरत नव्हतं. त्यामुळे आधी अक्षय चालवणार होता आणि ही अंदाज घेउन नंतर चालवायच का नाही हे ठरवणार होती. आम्ही तिथे पोचेपर्यंत थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे आम्ही पटकन हेल्मेट घालुन नाकावर मास्क लावुन तयार झालो. नाकावर मास्क कशाला ह्या मला पडलेल्या प्रश्नाच उत्तर पाच मिनिटातच मिळणार होतं.
ह्या राईडसाठी दोन गाईड असतात, एक सगळ्यांच्या पुढे रस्ता दाखवत जातो तर दुसरा सगळ्यांच्या मागे कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना हे बघत जातो. सगळ्यात पुढे असणार्याने बर्याच सुचना दिल्या. यात सगळ्यात महत्वाची सुचना ही होती की सगळ्यांनी लायनीतच चालवायचं, कोणीही लाइन तोडायची नाही आणि उगीच स्टंटस मारायचे नाहीत. या सगळ्या सुचना देउन झाल्यावर आम्ही निघालोच. मनजीतला आधी हे चालवण सोपं वाटलं होतं पण पहिल्याच वळणावर त्याची तंतरली. मी मागे सुचना द्यायला बसलीच होते. दोन मिनिटातच आम्ही अत्यंत धुळीतुन एका पायवाटेवरुन जायला निघालो.
नाकावर मास्क का ह्याचं उत्तर आता मिळालं होतं.
मग आम्हाला त्या लोकांनी अजुन एका पॉइंटवर नेलं. आता खर तर सगळे पॉइंट सेमच दिसत होते. कुठुनही पाहिलं तरी तेच ते टिपिकल डोंगर, पिजन व्हॅली दिसत होती. त्यामुळे आता त्याचं फारसं अप्रुप उरलं नव्हतं. पण आता आलोच आहोत तर म्हणुन परत्फोटो काढणं झालच. मग फ्रेश ऑरेंज ज्युस दिसल्यावर मग ज्युस घेतला पण तो फारच आंबट होता.
तिथुन मग अजुन कोणत्यातरी एका पॉइंटला गेलो. आता भैरवीने गाडी चालवायला घेतली होती. आम्ही लायनीत पुढे असल्याने मला हे माहित नव्हतचं, त्या पॉइंटला पोचल्यावर कळलं. आता तिसरा आणि शेवटचा थांबा सनसेट पॉइंटचा होता. सुर्यास्ताची वेळ गाठुन मग सनसेट पॉइंट्ला पोचलो. हळुहळुन सुर्य अस्ताला जायला निघाला होता.
त्यामुळे सनसेट पॉइंटवरचे डोंगर गुलबी दिसायला लागले होते. उद्या सकाळीच अमही निघणार असल्याने उद्या सुर्योदय बघायला मिळणार होता पण इथला हा शेवटचाच सुर्यास्त होता. म्हणुन मग ते दृश्य मनात साठवलं आणि सुर्यास्त झाल्यावर परत निघालो.
आत्तापर्यंत आमच्या कपड्यांवर, अंगावर, केसात किलोभर धुळ साचली होती. जिथुन राईड सुरु केली तिथे पोचल्यावर तिथल्या लोकांनी हवेचा झोत मारुन थोडीशी धुळ झटकुन दिली, तरीही कधी एकदा आंघोळ करतो असं झालं होतं.
हॉटेलला पोचलो तोपर्यंत आई बाबा कधीचे येउन, फ्रेश होउन बसले होते. आम्हीही मग लगेच आंघोळीला पळालो. आंघोळ करुन येइपर्यंत सगळ्यांना भुका लागल्याच होत्या. कालच इंडियन जेवल्याने आज कुठे आणि काय जेवायच हा मोठाच प्रश्न होता. सहा जणांनी रोज ऑर्डर केल्याने सगळ्या शाकाहारी डिशेस दोन तीनदा खाउन झाल्या होत्या. आता परत तेच खायचा बहुतेकांना कंटाळा आला होता. मग शेवटी एक रेस्टॉरंट बरं दिसलं. भैरवीचा त्यावर कालपासुन डोळा होता. ते थोडसं उंचीवर अस्लयाने तिथुन व्ह्यु फारच मस्त दिसत होता. पण त्या लोकांनी आम्हा सहा लोकांना एका टेबलवर जागा मिळणार नाही असां सांगितलं. दोन टेबलवर बसायला लागेल असं कळलं.
आता इस्तंबुल आणि कपाडोकिआचा फरक कळत होता. इस्तंबुलमधे सगळ्या रेस्टॉरंटची लोकं वाटेल तशी टेबलं जोडुन द्यायला, वाटेल तितका डिस्काऊंट द्यायला तयार होती, आणि हे टिपिकल टुरिस्ट गाव असल्याने इथे रेस्टॉरंटच्या लोकांना कोणाचीही काहीही पडली नव्हती.
सहा जणांना एका टेबलवर बसायला मिळणार नाही म्हणल्यावर मग आम्ही नाराजीने दुसर्या रेस्टॉरंटच्या शोधात निघालो. मी प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर असलेलं मेन्यु कार्ड बघुन या रेस्टॉरंटला आपल्याला काही बरं खायला मिळेल का याचा अंदाज घेत होते, यावरुन माझं आणि भैरवीचं एक भांडणपण झालं. या भांडणामुळे आईचा मुड गेला असं आईने नंतर सांगितलं. आयला, मी आणि भैरवी भैरवीच्या जन्मापासुन प्रत्येक मुद्द्यावर भांडत आलोय, मग आईचा आत्ता मुड जायचं काय कारण हे आम्हाला कळेना. आईला बहुतेक बरीच वर्ष आमच्यापासुन वेगळं राहिल्याने आमच्या भांडणाची सवय राहिली नसावी.
शेवटी एका कोणत्यातरी रेस्टॉरंटमधे आम्हाला हवं तसं जेवण मिळालं. जेवणानंतर आम्ही कालची चुक न करता बरोबर मार्गाने हॉटेलात परत आलो. आई बाबा, भैरवी, अक्षय मग दीडशे पायर्या चढुन त्यांच्या त्यांच्या खोलीत गेले. उद्याच्या दिवस परत प्रवासाचा होता. उद्या आम्ही कुसाडासीला जाणार होतो. त्यामुळे उद्या थोडं निवांत उठलं तरी चालणार होतं.