उगवलेल्या प्रत्येक दिवशी मी गोळा करते...
हाती लागतील तेवढे सारे गडद फिके रंग
इथून तिथून जमा केलेले काही आकार-उकार
आणि डोळ्यांत ओतायला थोडे भाव थोडी झिंग
पण रोज उठून मीच बनवलेलं माझंच शिल्प वेगळं दिसतं
संध्याकाळपर्यंत अनोळखी वाटू लागतं
त्यात मला माझं रूप काही केल्या आढळत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
मीच माझं सगळं असणं कागदावर लिहून काढते
शब्दा शब्दांत न मावणारं रिकाम्या जागांत पेरून ठेवते
लिहिलेल्याचे सारे ओघळ पानभर विद्रूप होतात
कवितेखालची माझी सही केविलवाणी पुसून जातात
माझीच भाषा नंतर मला वाचता येईनाशी होते
अगम्यातच व्यक्त होणं माझं काही टळत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
माझा माझा आवाज कधी समुद्राची गाज होतो
माझीच डोके उठविल असा कधी ढोल-पखवाज होतो
कधी कधी मी मला अजिबात ऐकूच येत नाही
कधी कधी मला मी ऐकूनच घेत नाही...
मला न कळता मी अशी शांत शांत होत जाते
मला माझ्या आवाजाची ओळख काही पटत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
चिड आली की चिडता यावं, सय आली की रडता यावं
मला त्याच्या छाताडाशी वाट्टेल तेंव्हा भिडता यावं
माझी एक सही असावी जी कधीच बदलू नये
जगण्याची एक लय असावी जी सहसा बिघडू नये
असं काही हवं असतं हेही बहूदा विसरून जाते
मी कसं असायला हवं हेही मला स्मरत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!