आई गं माझी पीडा,
मी कशी तुला सांगावी?
नजरेत खोल तुज दिसले,
ते निव्वळ असत्य नाही!
मी जन्मजात एकाकी,
हरवले जिथे सापडले...
तो आला अन् मी हसले,
हे केवळ अगत्य नाही!
मी श्वासांनी गुदमरते,
अन् फासांनी चाळवते
हे भाषांतर स्पर्शांचे...
हे अगम्य अनित्य नाही!
गे माझ्या रात्रींनाही
सावली अताशा असते
तो असतो तो आहे तो!
तो नुसता अवध्य नाही!
तो निघून जावा याची
मी वाट पाहते आहे
मी मरून जावे याला,
गे दुसरे निमित्त्य नाही!