आज्जी-आजोबांची डायरी: भाग १
एकूण ८३ आज्जी आजोबांना भेटून झालेले असले तरीही काहीजण अजूनही एकदाही भेटलेले नाहीयेत. आज त्यांना भेटायचे ठरवले होते. मात्र आज एका आजोबांचा वाढदिवस असल्याचे समजल्याने जरी त्यांची पूर्वी एकदा भेट झालेली असली तरी पुन्हा एकदा भेटून त्यांना शुभेच्छा देण्याचे ठरवले. त्यांच्या खोलीत गेले, तर ते एकटेच रूममध्ये जमिनीकडे पाहत बसलेले होते. त्यांना आमच्या बॉसने सकाळी स्वतः भेटून सुंदर फुलांचा गुच्छ दिलेला होता, तो त्यांच्या टेबलवर फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेला दिसत होता. त्या सर्व रहिवाश्यांबाबत हे करत असाव्यात. मी जॉईन झाले, त्या पहिल्याच दिवशी एका आज्जींचा वाढदिवस होता. माझ्या बॉस मला त्यांच्या सोबत त्या आज्जींना शुभेच्छा द्यायला घेऊन गेल्या होत्या.
आजोबांना शुभेच्छा दिल्या, तर ते एकदमच खुलले आणि त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःहुनच त्यांचे वय 85 असल्याचे सांगितले. ते लॉकस्मिथ होते. त्यांचा जन्म बर्लिनचा, हे समजल्यावर आपसूकच बर्लिनच्या भिंतीचा- पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पार्टीशनचा विषय निघाला. त्यांची आई वयाच्या 44 व्या वर्षी वारली आणि वडीलांना दुसरी जोडीदारीण मिळाली, तिच्यासोबत ते पूर्व जर्मनीत निघून गेले, ही अशी अनपेक्षित आठवण त्यांनी सांगितली. हे पार्टीशनच्या आधी की नंतर? त्यावेळी तुमचं वय किती होतं? वगैरे प्रश्न विचारून त्यांचा फ्लो मला तोडावासा वाटला नाही. नंतर नैसर्गिकपणे पुढच्या भेटीत त्यांनीच सांगितलं काही, तर समजेल. ते स्वतः अविवाहित असून त्यांना एक बहीण आणि एक भाऊ असल्याचे समजले. त्यांच्याहून 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या भावाशी त्यांचा काहीच संपर्क नसून 3 वर्षांनी मोठ्या बहिणीशी फोनवर बोलायचे असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आत्ता बोलणार का? विचारल्यावर, नाही, नंतर नंबर शोधून बोलतो, असं म्हणाले. तुमचे इकडे काही मित्र झालेले आहेत का, असे विचारल्यावर जेवण आणि कॉफी ब्रेक्समध्ये ज्यांना भेटतो, ते ओळखीचे काही जण आहेत, मात्र आमची मैत्री वगैरे नसल्याचे त्यांनी सांगितले.
इथे बरेच जण आणि बऱ्याच जणी अशाच एकट्याच असल्याचे जाणवले. गेल्या 3 आठवड्यात एकमेकांच्या रूम्समध्ये जाऊन गप्पा मारत बसलेले आज्जी आजोबा मला फक्त दोनदा दिसले. एका क्रोएशिअन आजोबांना मात्र ते राहतात त्याच मजल्यावरच्या एका इटालियन आज्जींमध्ये आपलं प्रेम सापडलं, असं त्यांनी अभिमानाने सांगितलं. ते आजोबाही साधारण असेच 80 च्या पुढेच वय असलेले आणि आज्जीही नक्कीच 75 च्या पुढच्या असतील, दोघांनाही चालायला त्रास होत असल्याने वॉकरच्या आधाराने चालावे लागतेय. पण दोघांनीही पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमाची गोष्ट मला सांगितली. प्रेमाला वय नसतं, हे या दोघांकडे पाहून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. ह्या आज्जींना फार फार गप्पा मारायच्या असतात. करोनामुळे त्यांच्या मुलां मुलींना त्या भेटू शकत नसल्याने मला पहिल्यांदा भेटल्यावरच त्यांना किती बोलू आणि किती नको असं झालेलं होतं. मी नंतर परत येते, असं प्रॉमिस करून ह्या आज्जींना आणि अजून एका माझी वाट पाहत बसणाऱ्या आज्जींना तेवढी मी जाता येता भेटून ख्याली खुशाली विचारून येत असते. सकीना लिबे सकीना(सकीना डियर सकीना) अशीच हाक मारतात त्या आता मला.. ह्या आज्जींच्या अजूनही काही गंमती आहेत. त्या आणि बाकी काही आज्जी आजोबांचे किस्से पुढच्या भागात सांगते.
~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर