आज्जी आजोबांची डायरी: भाग ९

पहिल्याच दिवशी पहिल्याच ३ आज्जी-आजोबांचे कम्प्लिटली ३ वेगळे अनुभव आलेले असल्याने मी मिक्स्ड मूडमध्ये होते. कोणत्याही आज्जी-आजोबांची नावं रिव्हील करणं प्रोटोकॉलमध्ये बसणारं नसल्याने आणि त्यांना टोपणनाव देऊन ते लक्षात ठेवणं अवघड असल्याने मी त्यांना आता नंबर्स देते, म्हणजे पुढच्या संदर्भांसाठी ते आपल्याला बरं पडेल.

तर सगळ्यात पहिल्यांदा भेटलेल्या आज्जींना आज्जी नं 1, दुसऱ्या आज्जींना आज्जी नं.2 आणि आजोबांना आजोबा नं. 1 असे म्हणूया..

ह्या ३ आज्जी आजोबांची मी मनात प्रत्येकी एक कॅटेगरी बनवून टाकली आणि त्यानुसार माझी स्ट्रॅटेजी ठरवली.

आज्जी नं.1 प्रकारच्या आज्जी-आजोबांना ठरवून भेटायचं, ते म्युच्युअल आनंदासाठी.. मायेची ऊब आणि प्रेमासाठी..

आज्जी नं. 2 प्रकारच्या आज्जी-आजोबांना न विसरता भेटायचं, ते त्यांना प्रेम आणि सकारात्मकता देण्यासाठी, पण ते देतांना त्यांच्यातली नकारात्मकता आणि उदासी आपल्यावर चढू द्यायची नाही. आपल्या दैनंदिन जीवनावर तिचा परिणाम होऊ द्यायचा नाही.

आजोबा नं. 3 प्रकारच्या आज्जी-आजोबांना अधूनमधून, जमेल तेंव्हा भेटायचं, ते आयुष्यात आनंद कसा शोधायाचा, वाळवंटात नंदनवन कसं फुलवायचं आणि स्वतःचा सकारात्मक ऑरा कसा निर्माण करायचा, ह्या प्रकारचं टॉनिक मलाच मिळावं, यासाठी.. म्हणजे काही कारणाने मनात उदासी, मरगळ निर्माण झाली असेल, तर ती क्षणात दूर होईल..

अशा कॅटेगरीज सुरुवातीलाच बनवणं माझ्यासाठी फार आवश्यक होतं, म्हणजे माझ्या रोजच्या कामाला एक दिशा आणि अर्थही निर्माण होईल.. नाहीतरी आयुष्य म्हणजे काय? आपण देऊ तसाच अर्थ त्याला लाभत असतो ना? आनंद, दुःख, फ्रस्ट्रेशन्स तर असतातच कायम सोबत.. आपण नेमका फोकस कशावर करतो, यावर आपलं जीवन अवलंबून असतं आणि मग ज्यावर फोकस जास्त, तीच गोष्ट आपल्याला भिंगातून बघितल्यासारखी मोठी किंवा छोटी दिसते, नाही का?

असो, तर काल लिहिल्याप्रमाणे पहिल्या दिवशी ज्या निवडक आज्जी आजोबांना मी भेटले, त्यात एक अरब आज्जीही होत्या. बॉसने आधीच कल्पना दिलेली होती की या आज्जींना काही जर्मन बोलता येत नाही, थोडं फार समजतं, पण एकूणच बोलता येण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांना काहीसा शारीरिक आणि मानसिक आजार आहे, त्यामुळे त्या हरवल्या-हरवल्यासारख्या असतात..

अरब आज्जींच्या रूमच्या दारावर नॉक केलं, आतून क्षीण "या" ऐकू आलं.. जर्मनमध्ये "ja" असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र मराठीतल्या या सारखा नसून इंग्रजीतल्या "yeah" सारखा आहे आणि या संदर्भात तुम्ही आत येऊ शकता, असा आहे. म्हणजे मराठीतल्या "या" सारखाच योगायोगाने झाला ना! सहज जाता जाता भाषेची गंमत.. कशा भाषा एकमेकांना जोडलेल्या आहेत, याची अनेक उदाहरणं आणि साम्यस्थळं नेहमी दिसत असतात, त्यातलं हे एक.. सहज शेअर करावंसं वाटलं..

या आज्जी रूमच्या कॉर्नरला सोफ्याच्या सिंगल चेअरवर बसलेल्या होत्या. त्यांचा वेषही अरबी होता. डोक्यावर रुमाल आणि वन-पीस गाऊन सदृश ड्रेस.. रंगाने माझ्यासारख्या.. मी भेटायला गेल्यावर आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर त्यांनी ताबडतोब त्यांच्याकडे असलेल्या टॅब्लेटवरून whatsapp कॉल केला कोणालातरी आणि अरबीत बोलायला लागल्या. त्यानंतर काही सेकंदांनी त्यांनी त्यांची टॅब्लेट माझ्या हातात देऊन मला बोलायला लावलं. समोरून त्यांचा मुलगा बोलत होता, " माझ्या आईला तुमच्याशी काहीच बोलत येत नाहीये, पण संवाद साधण्याची इच्छा मात्र आहे, म्हणून तिने मला कॉल केला",असं म्हणाला. मी माझी ओळख करून दिल्यावर त्याने मी त्यांच्या आईला भेटायला आल्याबद्दल माझे आभार मानले आणि "मी पुढच्या आठवड्यात आईकडे येणार आहे, तेंव्हा आपण भेटूया", म्हणाला. मी ही "हो, भेटूया", असे सांगून फोन बंद केला. आता करोनामुळे तो येऊ शकला नसल्याने आमची भेट पेंडिंग आहे.

******************************************
डियर ऑल, इथपर्यंत आज सकाळी आणि दुपारी लंचब्रेकमध्ये मी लिहीलं.. जनरली मी संध्याकाळी काम संपल्यावर ट्रॅममध्ये बसून लिहित असते आणि घरी पोहोचले की सगळ्यात आधी ते शेअर करून मग कामाला लागत असते. हे माझं आठवड्याभरापासूनचं रूटीन आहे. पण आज कुणास ठाऊक, सकाळीच लिहिण्याची इच्छा झाली.

आज आमची विकली मिटिंग होती. त्यात मला कळलं की आज्जी नं 1 ची तब्येत बरी नाही. त्यांचं बीपी एकदम लो झालंय आणि त्या झोपूनच आहेत. मिटिंग संपल्यावर लगेच मी त्या आज्जींना भेटायला गेले. नेहमी त्या पेपर वाचत बसलेल्या असतात किंवा लॅपटॉपवर आपल्या मुलाला इमेल करत असतात. आज बेडवर झोपून होत्या. मी त्यांना भेटायला गेल्यावर नेहमीप्रमाणे मला म्हणाल्या, "छान झालं तुम्ही आलात. मी म्हणाले, "मला कळलं, तुम्हाला बरं नाही, म्हणून लगेच भेटायला आले." त्या बेडवर पडूनच जाम ब्रेड बटर खात होत्या. "माझ्या तोंडाला चवच नाही.", म्हणाल्या. त्यांनी तो ब्रेड बाजूच्या टेबलवर ठेवून दिला आणि थरथरत्या हाताने ग्लास उचलून पाणी प्यायल्या.

गेले चार दिवस गुड फ्रायडे आणि आणि काल इस्टर मंडे असल्याने मी त्यांना गुरुवारीच भेटलेले होते, त्यांना इस्टरच्या शुभेच्छा देऊन घरी गेले, ते आजच भेटले होते. त्यांनी मला इस्टरची सुट्टी कशी गेली, हे विचारलं. मी ही सगळी लॉंग विकेंडची गंमत जंमत त्यांना सांगितली. त्या खूप गोड हसल्या.

मी त्यांना सांगितलं, "गेले आठवडाभर मी इकडच्या अनुभवांवर डायरी लिहिते आहे आणि तुम्ही माझ्या आज्जी नं 1 आहात. तुम्हाला मी आजच हे नाव दिलंय. खरं नाव लिहायची परवानगी नाहीये, म्हणून लिहू शकत नाही मी" मला मधेच तोडून त्या म्हणाल्या, माझं नाव लिहू शकता तुम्ही.."

मी हसले आणि बोलणं सुरुच ठेवलं, "मला जॉईन होऊन बरोबर एक महिना झाला आणि तुम्ही माझ्या पहिल्या आज्जी होतात, हे तर तुम्हाला आठवतच असेल ना?" त्यांनीही होकारार्थी मान हलवली.

मी त्यांना सांगितलं, "तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही मला माझ्या आज्जीसारख्या आहात आणि तुम्हाला खरं सांगू का, दिसतासुद्धा तुम्ही तिच्याच सारख्या.. दोन दिवसांनी माझ्या आज्जीला जाऊन बरोबर 5 वर्षे होतील.. तुमच्यात मला तीच दिसते कायम.. मला तिची फार आठवण येते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. तुम्हाला असं बेडवर पडलेलं पहायची मला सवय नाही.."

त्या पुन्हा गोड हसल्या आणि मला नेहमीप्रमाणे म्हणाल्या, "तुमच्यात एक चमक आहे सुंदर" आणि आज अजून एक गोष्ट म्हणाल्या, "तुमचे पांढरेशुभ्र दात तुमच्या डार्क स्किनवर किती सुंदर शोभून दिसतात, तुमचे काळेभोर डोळे आणि काळे केस.. तुम्ही एखाद्या सुंदर बाहुलीसारख्या दिसता.."

मी आज्जींना म्हणाले, "तुमच्या हया कॉम्प्लिमेंट्स मला अख्ख्या दिवसासाठी पॉझिटिव्ह एनर्जी देतात.. तुम्ही लवकर बऱ्या व्हा." करोनामुळे जवळ जाऊन हात हातात घेऊ शकत नसल्याने मी त्यांच्या पांघरुणातल्या पायांवरून हात फिरवला. नेहमीप्रमाणे त्या मला 'आलेस गुटे" म्हणाल्या आणि मी त्यांचा निरोप घेतला, उद्या भेटायच्या बोलीवर..

मग बाकीच्या आज्जी आजोबांना भेटायला गेले आणि लंच ब्रेक झाल्यावर बॉसला फोन केला.. नेहमी त्यांचं ऑफिसचं दार उघडं असतं, आज बंद होतं, नेहमी आम्ही एकत्र जेवत असतो, म्हणून बोलवायला कॉल केला, तर त्या म्हणाल्या, "तू जेव, आम्ही(त्या आणि अजून दुसरी कलीग) नंतर येतो." आज पहिल्यांदाच एकटी जेवत होते. म्हणून जेवता जेवता थोडा डायरीचा भाग लिहून काढला.

माझं जेवण झाल्यावर मी उठले, तर तिकडे बॉस आलेल्या. "तुझं जेवण झालेलं असलं, तरी जरावेळ बसशील का आज आमच्याबरोबर?" असं मला म्हणाल्या. मला वाटलं, सहजच बसायला बोलवत आहेत. म्हणून मीही बसले. तर त्यांनी मला न्यूज दिली. आज्जी नं 1 गेल्या..... मी जेंव्हा त्यांना जेवायला बोलवण्यासाठी कॉल करत होते, त्यावेळी नुकतंच हे घडलेलं होतं.. हे घडण्याच्या बरोबर पाऊण तास आधी मी आज्जींना भेटलेले होते, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं अवघडच होतं..

माझं आज्जींसोबतचं कनेक्शन माझ्या बॉसना माहिती असल्याने त्यांनी मला आधी जेवू दिलं आणि मग ही न्यूज दिली. मला भरपूर रडू दिलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला. मला आज्जींना शेवटचं बघायचं आहे का, विचारलं. मी हो म्हणाले. केअर युनिटच्या 4-5 जणींच्या टीम सोबत मला त्यांच्या रूममध्ये पाठवलं. आज्जी एका पायात सॉक्स घातलेल्या आणि दुसऱ्या पायात घालायचा आहे, अशा स्थितीत उघडे डोळे आणि तोंड अशा स्थितीत बसलेल्या होत्या. जणूकाही माझ्याकडे बघत होत्या.

"त्यांच्या कपाळावरून मी हात फिरवू का?" विचारलं, केअर युनिटने परवानगी दिल्यावर मी ते केलं.. माझ्या आज्जीला मी शेवटची भेटू शकले नाही, तिला हात लावू शकले नाही.. माझी ही इच्छा आज पूर्ण झाली...

माझा जॉब सोपा नाही, हे माहिती होतंच, पण इतका अवघड आहे, माहिती नव्हतं, ते आज प्रकर्षाने जाणवलं आणि मी इमोशनली असं इतकं कनेक्ट होणं बरोबर नाही, माहितीये मला.. पण पहिली वेळ आहे. होईल सवय हळूहळू..

आयुष्य हे एक रंगमंच आणि त्यातील आपण सगळ्या कठपुतळ्या, हे 'आनंद' सिनेमातलं राजेश खन्नाच्या तोंडचं वाक्य आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.. आता आजचा दिवस काम करणं शक्य नाही. म्हणून आता घरी निघालेय. हे प्रेशर सहन होत नसल्याने, लिहून वाट करून दिली.

सर्वांना सॉरी आणि थँक्यू सुद्धा.. आपली सुखं आणि दुःख आता एकच झाली आहेत, नाही का?
टेक केअर ऑल!!

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
१४.०४.२०२०

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle