एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात.
तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही.
तो ग्लानी तुटू देत नाही.
आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो.
लिखित शब्द, चित्रित कथा
कशातही अडकू देत नाही.
'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?'
ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो.
मी कशातच अडकू शकत नाही.
मी कशातच थांबू शकत नाही.
मी थांबून काहीच करू शकत नाही.
मी गुंगीतच असते.
डोळ्यासमोर चालू असतात
माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या,
अविरत दळले जाणारे विनोद,
याच्या त्याच्या नावाची अवतरणे,
गुंगी तुटत नाही.
माझ्या आत काही झिरपत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने
उन्मळून, कोसळून पडू देत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या आनंदाने
भरभरून फुलू देत नाही.
झण्ण विस्तारत चाललाय.
हा प्रखर प्रकाश, हे मेलेले वारे
झण्णला पोसतायत.
भविष्य, भविष्याचे बेत वगैरे अफवा झाल्या आहेत.
नजिकचा भूतकाळ झण्णच्या अस्तित्वाचे दाखले आहेत.
फक्त झण्ण असणारे.
माझा गाभा, माझे शरीर, मी व्यापलेली जागा
सगळं झण्ण होणार!
मी नाहीच उरणार.