घर (कथा)

किल्लीने दार उघडून सुगंधा घरात आली. आज बाजारहाट करून, बाकी कामं आटपून घरी यायला उशीरच झाला होता तसा. पाण्याचा ग्लास घेऊन हाश-हुश करत ती सोफ्यावर टेकली. समाधानाने तिने एकदा घरावर चौफेर नजर फिरवली. एक आनंद तिच्या मनात झिरपत गेला. माझे घर, आमचे घर! आमच्या स्वप्नातले हे घर!
१० एक मिनीटं घराकडे मनसोक्त नजर फिरवल्यावर ती उठून मागीलदारी गेली. मागचं अंगण, झाडं, तिथे असलेला झोपाळा - सगळं बघून तिच्या मनातून एक आनंदाची लहर उमटून गेली. हे घर म्हणजे तिच्या सुखाची परमावधी होती.
खालचा मजला न्हाहाळून झाल्यावर ती वरती गेली. मास्टर बेडरूममध्ये चक्कर मारून ती बाजूच्या स्पेशल बेडरूममध्ये गेली, बाळाची खोली! खोली कशी सजवायची, काय-काय घ्यायचं, कसं-कुठे ठेवायचं मनातल्या मनात ठरवत ती खोलीत फिरत राहिली
आणि मग एकदम भानावर येऊन ती स्वतःशीच पुटपुटली... चला कामाला लागायला हवं. काय अवतार करून ठेवलाय माझ्या या इतक्या सुंदर घराचा.लागोलाग तिने स्वयंपाक घर आवरायला घेतले. पडलेली भांडी घासून टाकून तिने ओटा, टेबल सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि मग झाडू घेऊन सगळं घर झाडून काढलं. एवढं सगळं झाल्यावर ती थकून गेली. लवकरच कोणीतरी कामवाली बघावी लागेल. हे काही रोज-रोज जमणार्‍यातलं काम नाही. थकवणारं आहे पण हे घर साफ करताना मिळणारा आनंद, ते साफ झाल्यावर दिसणारं त्याचं रूप सुखावून टाकणारं, थकवा पळवून लावणारं आहे हे देखील खरं. मिळेल कोणी कामवाली तेव्हा मिळेल, तोपर्यंत आपल्याला घर स्वच्छ ठेवायला हवेच, तिने मनाशी विचार केला. तसंही आज काल चांगली कामवाली मिळते कुठे? आपल्याला हवं तसं स्वच्छ- नीटनेटकं काम करणारी?
एक कप कॉफी करून घेत सुगंधा परत एकदा सोफ्यावर टेकली. बाजूच्या टीपॉय वर कॉफीचा मग ठेऊन शांतपणे ती परत सुखाने घराकडे नजर फिरवत बसून राहिली, अध्ये-मध्ये कॉफीचे घुटके घेत! दुपार टळून गेली होती. एकाएकी भानावर येत तिच्या लक्षात आलं, आता निघावं लागेल. सुयश यायची वेळ होईलच आता! घाईघाईने पर्स उचलून ती बाहेर पडली. किल्ली परत एकदा किल्ली बॉक्स मध्ये ठेवायला ती विसरली नाही.

*************************************************************************************
"ह्या शांताबाईंचं हल्ली काय चालंलय काही कळत नाही. एक वस्तू हल्ली नीट जागेवर ठेवत नाहीत. आत्तापर्यंत कामात त्यांचे कधीच उणं सापड्लं नव्हतं." स्नेहा उरलेलं जेवण फ्रीजमध्ये टाकताना निलेशशी बोलत होती.
“जाऊ देत गं. एखादं वेळी कधी अधिक- उणं झालं तर काय... त्याचा कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? तू म्हणत होतीस ना, त्यांच्या, गावाकडच्या म्हातार्‍या आईच्या तब्येतीची काळजी लागून राहिली आहे त्यांना अलिकडे. आई आजारी असते म्हणत होत्या ना? त्यामूळे थोडं पुढे-मागे होत असेल कामात. चल सोड बरंं तो विषय...ये छान गुलाबी थंडी पडली आहे, बाहेर झोपाळ्यावर बसू चल थोडा वेळ" निलेश म्हणाला.
" हो आईला बरं नाही, तिला भेटायला जायचंय असं म्हणत होत्या खरं", म्हणत स्नेहा बाहेर अंगणाकडे वळली.
शांताबाई त्यांच्याकडे गेली ५-६ वर्षं कामाला येत होत्या. स्नेहाच्या आईकडे अनेक वर्षं येणार्‍या शांताबाई स्नेहाचं लग्न झालं आणि ती आणि निलेश इथे लांबवर रहायला आले तसे स्नेहाच्या आईच्या सांगण्याखातर एवढ्या लांब स्नेहाकडेही कामाला यायला लागल्या. स्न्हेहाचे आई वडिल रिटायरमेंटनंतर त्यांच्या गावाकडी घरी रहायला गेले तरी शांताबाई स्नेहाकडे येतच राहिल्या. खरं तर त्यांच्या या इतक्या लांबवर असलेल्या त्यांच्या घरी यायला त्यांना दोन-दोन बसेस बदलून यावं लागायचं. पण स्नेहाकरीता त्या इतका लांबचा प्रवास करून यायच्या. तशी त्यांनी मग या बाजूलाच २-४ अजून कामं घेतली होती. फक्त शनिवार-रविवारी मात्र फार बसेस या बाजूला यायच्या नाहीत. दिवसाला दोनदाच यायच्या त्यामुळे शनिवार-रविवारी मात्र जमणार नाही हे त्यांनी मागेच सांगितलं होतं आणि ते स्नेहालाही चालणारं होतं. इतर पाच दिवसांत त्या घर आवरून, झाड-लोट करून जातच होत्या. दोन दिवस न आल्यानी त्यांचं तेवढं अडायचं नाही.
इतक्या वर्षांची ओळख आणि अगदी प्रामाणिकपणे काम करणार्‍या, उगीच सुट्ट्या न घेणार्‍या शांताबाईं मुळे स्नेहाला निर्धास्त वाटायचं. ते दोघं दुपारी ऑफिसमध्ये असताना शांताबाई येऊन काम करून जायच्या. त्यामुळे स्नेहाला ती देखील काळजी नव्हती. नाहीतर यांच्या वेळात येणारं कोण इथे मिळणार? आणि स्वतः घरात नसताना आपलं घर दुसर्‍याच्या हाती देता यावं इतकी विश्वासू बाई कुठून मिळणार होती स्नेहाला!

*******************************************************************************

"सुगंधा, दुपारी होतीस तरी कुठे दुपारी आज? फोन केला तर घेतला नाहीस." रात्री जेवताना सुयशने विचारले.
"अरे, जरा घर आवरत होते. काय तो पसारा, मला बघवत नाही", सुगंधा उत्तरली. आता यावर अधिक काही बोललं तर गाडी आपल्या अजागळपणाकडे वळेल याची सुयशला खात्री होती. त्यामुळे हं असं म्हणत त्याने पुढे बोलायला सुरूवात केली.
ऑफिसमधल्या गोष्टी, मग तिला गोळ्या नीट घेतल्या का याची चौकशी, ती करताना तिला त्रास तर होणार नाही पण खातरजमा तर करून घ्यायची त्याची धडपड - पण तिचं धड लक्ष कुठे होतं! पण हे हल्ली नेहेमीचंच झालं होतं. घरी बसल्यापासून सुगंधा बाळ या विषयामध्ये जास्तच बुडून गेली होती. आधी बाळाचं दडपण आणि आता घराचं. मिळू देत बुवा लवकर मनाजोगतं घर. एक चिंता तर दूर होईल. दुसरी परिस्थिती आपल्या हातात नाही तशीही.
सुगंधा आणि सुयश! दोघांमध्ये तिसर्‍याला आणण्याच्या दोघांच्या अथक प्रयत्नांना दोन वर्ष झाली तरी यश हुलकावणी देत होतं. यामुळे दोघंही उदास-निराश होते. दोनदा चांगली बातमी हाती लागली नाही तर लगेच होत्याचं नव्हतं होऊन गेलेलं याने तर सुगंधा आणखीनच खचून गेली होती. दोघांमध्ये काही दोष नाही, काही वेळेला असं होतं. आणि दबाव, ताण, मानसिक औदासिन्य यामुळे आणखी ही गोष्ट आणखी कठीण होऊन बसते. असे डॉक्टरांनी सांगितले होते. दोघांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून, नोकर्‍यांमधून कुठेतरी महिना-दोन महिने जाता आलं तर पहा असंही डॉक्टरने सुचवून बघितलं होतं. आणि एकंदरीत विचार करून सुगंधाने खरोखरंच ऑफिसमधून सहा महिन्यांची सबॅटिकल मिळवली होती. रोजची धावपळ आणि ताण-तणाव तरी नकोत.
पण घरी बसल्यापासून सुगंधाला नविनच चाळा लागलेला - बाळाची रूम सजवणे! दिवसा सुयश ऑफिसकरीता बाहेर पडला की मॉल मध्ये जाणे, दुकानांमध्ये बेबी सेक्शन मध्ये जाऊन निरनिराळ्या वस्तू - अगदी क्रिबपासून ते स्ट्रोलर पर्यंत बघत बसणे, बाळाकरीता कपडे घेणे ह्यात तिला विलक्षण आनंद मिळू लागला होता. अर्थात सुयश घरी यायच्या आधी घरी पोहोचून बसण्याने तसा फार काही सुयशला पत्ता लागला नव्हता तरी संध्याकाळी सुयशशी बोलताना तिचं -बाळाकरीता हे करणार - ते करणार, बाळाच्या खोलीची तिने चालवलेली सजावट, खोलीत नविन आणून लावलेली कार्टून्स-चित्रं हे सारं त्याला अस्वस्थ करत होतं. बाळाचा अजून पत्ता नाही आणि सुगंधाचं जणू आता काही महिन्यांत बाळ येणारच असं चालवलेलं वागणं त्याला चिंतेत टाकत होतं. डॉक्टरांशी याविषयावर बोललं पाहिजे हे त्याने ठरवलं.

****************************************************************************************

"निलेश, काय नविन अपडेटस घराचे?", गेला होतास का आज साईटवर?", जेवून उठताना स्नेहाने विचारले.
"हो, अजून दोन महिने तर नक्की. इलेक्ट्रिकल काम व्हायचंय सगळं, फरश्या, रंग आणि अजून छोट्या- मोठ्या गोष्टी आहेतच."
"कधी एकदा घर पूर्ण होतंय आणि कधी आपण जातोय असं झालंय मला. ह्या घरापेक्षा कितीतरी छोटं असलं नविन घर तरी ऑफिसच्या जवळ म्हणजे बराच वेळ वाचेल जाण्या- येण्यातला. हे घर मात्र वेळच्या वेळी नीट विकलं गेलं म्हणजे झालं.", किचन आवरता आवरता स्न्हेहा उद्गारली.
"छे बुवा! बघ बरं. एक भांडं जागेवर सापडेल तर शप्पथ. सकाळी ऑफिसला जायच्या घाईत पण तोच गोंधळ. सगळे कपडे जागा सोडून कुठेतरी ठेवलेले. शांताबाईंचं काही कळेना झालंय", एकाएकी स्नेहा कावून म्हणाली,"तो बघ तू कॉफी मग तिथे कॉफी टेबलवरच टाकून गेलायस सकाळी तो पण उचलला नाहीये."
" अरे हो, त्यांच्या आईंचं कसं आहे ते विचारायला फोन करायचा राहूनच जातोय माझा. उद्या नक्की करते", एकाएकी आठवण झाल्याने ती जरा नरमाईच्या सूरात म्हणाली.

***********************************************************************************

अचानक सुयशने ठरवले की बस्स, ही जागाच बदलायची. तसंही घर घ्यायला हवं, भाड्याच्या घरात किती काळ रहाणार असं दोघांच्या मनात होतंच. छान नविन, मोठ्या घरात गेल्यावर सुगंधा पण थोडी खूष होईल. जरा बदल, बाळ या विषयापासून थोडी फारकत होईल. तसंही गावाबाहेर, शांततेत आपला एक टुमदार बंगला असावा असं स्वप्न सुगंधा आणि सुयश मनाशी बाळगून होते. सुयशने विचार केला, स्वतःच्या हक्काचं घर आता या निमित्ताने घेऊ.
मनात आल्यावर बाकीचे सगळे तपशील बघा, आपलं बजेट, किती लोन मिळेल त्याची बँकेकडून पूर्व मान्यता घ्या, मग हे असं मनासारखं घर कुठे घ्यावं, सोयीचं, ऑफिस- बाजार बर्‍यापैकी अंतरावर असेल पण तरीही आपल्याला हवं अश्या शांत, निसर्गरम्य परिसरात असेल अश्या सगळ्या अटींत बसणारं, आखुड्शिंगी-बहुगुणी घर शोधणं म्हणजे सोप्पं काम नव्हतं. पण चांगला एजंट मिळाल्याने काम थोडं सुकर झालं होतं.
एजंटच्या मदतीने तीन-चार घरं पाहून झाली पण मनासारखं, स्वप्नातलं घर अजून सापडलं नव्हतं त्यांना. आणि एक दिवस एजंट त्यांना घेऊन गेला ते घर बघताक्षणी दोघं हरखून गेली. अगदी त्यांच्या मनातल्यासारखं घर. सुगंधा तर हरखूनच गेली. पुढे - पाठे असलेलं सुंदर अंगण, झाडी, मागच्या दारी झोपाळा. व्वा! बघताक्षणी सुगंधाच्या मनाने ग्वाही दिली की ह्या घरात आपली मनोकामना नक्की पूर्ण होणार. बाळाचं स्वागत करायचं ते या घरात हे तिने मनोमन ठरवून टाकलं.
"सुयश, हेच घर हवं आपल्याला. हेच ते माझ्या मनातलं/ स्वप्नातलं घर!" असं म्हणत ती वर-खाली, मागील दारी, पुढील दारी हरखून फिरत राहिली.
"या घराचे मालक-मालकिण , त्यांना हे असं गावाबाहेर रहाणं नको आहे. शहरात मुख्यवर्ती भागात त्यांनी हाय-राईझ मध्ये फ्लॅट बुक केलाय. अजून दोनेक महिन्यांनी त्यांना त्याचं पझेशन मिळणार आहे. तोपर्यंत हे त्यांना विकायचं आहे. थोडा वेळ हाताशी असल्याने त्यांना घाई नाहीये. चांगली किंमत मिळणार असेल तर ते थोडं थांबायला तयार आहेत." एजंट एकीकडे माहिती देत होता.
"फक्त हे घर मार्केटमध्ये येऊन ४ दिवस नाही झालेत तर १०-१२ जणं हे घर बघून गेले आहेत. आणि निदान ३-४ पार्टीजना तरी घरात खूप स्वारस्य आहे, असं कळलं आहे. त्यामुळे, साहेब, तुम्हाला आवडलं असेल तर किंमतीत आणखी थोडं वर जायची तयारी ठेवा.", तो पुढे म्हणाला.
खरं तर घर आधीच त्यांनी ठरवलेल्या बजेटच्या बाहेरच होते. पण सुगंधाकडे बघून सुयशने ठरवले की जमवायचं काहीही करून थोडं जास्ती असलं तरी. लोन जास्त घेऊ, शिवाय आई-बाबा पण म्हणाले होतेच की थोडी मदत करतील. त्यांनाही विचारता येईल, त्याने विचार केला.
पुढल्या आठवड्याभरात त्याने जास्तीचे लोन मिळवणे वगैरे कामं पार पाडून त्यांनी घरावर थोडी चढीच ऑफर दिली.आता पुढे आठ- दहा दिवस वाट पहाणे आले.
पण घर बघितल्यापासून सुगंधाकडे मात्र बोलायला दुसरा विषयच नव्हता. घर आणि घर. बस्स!

*********************************************************************************

"आज तर आता हद्द झाली शांताबाईंची. आज बुधवार, त्यांना चांगलंच माहिती आहे मला बुधवारी माझे फॉर्मल्स नीट, कडक इस्त्री करून हँगर वर लावून ठेवलेले लागतात, बोर्ड मिटींगकरीता. कित्येक महिने प्रत्येक आठवड्यात न चुकता करतायंत हे शांताबाई. आता काल कश्या विसरल्या देव जाणे! तू सकाळी लवकर निघून गेलास... माझी किती गडबड झाली माहिती आहे? शांताबाईंनी फॉर्मल्स तयार ठेवले नव्हते तर...कसेबसे बरे कपडे मिळवले, इस्त्री करायला वेळच नव्हता... ऊबर बुक करायला फोन केला तर ह्या भागात तुला माहितीच आहे ऊबरला यायला किती वेळ लागतो ते... नशिबानेच जेमतेम पोहोचले मिटींगला. दुपारी शांताबाईंना फोन केला मी तर फोनच लागेना. Out of range मेसेज येत होता. ", स्नेहाचा त्रागा चालू होता निलेशकडे. आज नेमकी त्याची सकाळी लवकर मिटींग असल्याने तो गाडी घेऊन गेला आणि स्नेहा ऊबरने जाणार असं ठरलं होतं...पण आता शांताबाईंनी तिचा फॉर्मल नीट इस्त्री करून ठेवला नाही याची चीड-चीड आपल्यावर निघणार, हे वास्तव त्याला कळून चुकलं होतं. त्यामुळे घाईघाईने गाडी शांताबाईंवर न्यावी हे शहाणपण त्याला सुचले.
"हो! शांताबाईंच्या पायी तुझा गोंधळ झाला खरा...पण बरं तरी पोहोचलीस वेळेवर. आता शहरात मध्यवर्ती रहायला गेलो की हे ऊबरचे गोंधळ आणि लागणारा वेळ सगळेच प्रॉब्लेम्स निस्तरतील बघ...थोडाच काळ धीर धर आता!", त्याने समजावले.
"हं खरं आहे तुझं म्हणणं. बरं, बायिंग पार्टीचे काय अपडेटस?"
"अगं एवढ्या इंटरेस्टेड पार्टीजमधून चांगली भरवश्याची पार्टी निवडली आहे आपण. त्यामुळे लोन वगैरे नक्की सँक्शन होणार. काही अडचण येणार नाही. हा थोडा वेळ लागेल कारण हल्ली लोन्सची प्रोसेस जरा धीमीच चालते. पण एक-दीड महिन्यात होईल बघ सगळं"

************************************************************************************

"अगं आज पण तुला फोन करत होतो, ऑफिसमधून निघण्याच्या आधी. रात्री मस्त त्या नविन इटालिअन रेस्टॉरंटला जायचं का, विचारायला फोन करत होतो. तयार रहा मी आलो की लगेच निघू, म्हणणार होतो. पण तू फोनच घेतला नाहीस. तू हल्ली गेले काही दिवस माझे फोनच घेत नाहीस",सुयश तक्रारीच्या सूरात म्हणाला.
" हं! ऐक ना, मी किनै, आपल्या घरी पुढील दारी मस्त पारिजातक लावणार आहे. मस्त रोज सकाळी त्या फुलांचा पडलेला सडा मला उचलायचाय. मागील दारी मी मधुमालती आणि बोगनविलीयाच्या वेली चढवणार आहे. कोणी माळीबुवा मिळाले तर बरं. बाळाला सांभाळून, ऑफिस-घर सगळं सांभाळून एवढी बाग नीट राखणं आपल्याला कसं जमणार? आणि मी सामान काय-काय कुठे लावायचं ते पण ठरवून टाकलंय. बाळाची खोली पण ठरवली मी." सुयशच्या बोलण्याकडे लक्षच नसल्यासारखंआपल्यात तंद्रीत सुगंधा सुयशला सांगत राहिली.
"सुयश, मला कळतंय आपल्या बजेटच्या बाहेर जाईल घर. पण लाँग टर्म विचार करता हेच घर योग्य आहे. लोन मिळेल रे जास्तीचं, आपल्या दोघांच्या नोकर्‍यांच्या जोरावर”, मध्येच भानावर येऊन व्यावहारिक विचार करत सुगंधा म्हणाली, “पण बाळाला खेळायला किती मस्त जागा आहे आजूबाजूला. झोपाळ्यावर बसून मी त्याला जेऊ घालेन - काऊ-चिऊच्या गोष्टी सांगत आणि काऊ-चिऊ दाखवत!", सुगंधा परत एकदा स्वप्नात हरवून गेली.
"घराचं नाव पण कसं मस्त आहे ना, 'मांगल्य-सदन'! सगळं कसं मंगल होणार बघ आपलं तिथे.", तिच्या मनाने हे ठरवून टाकलेलं.
सुयश घरी आला की सुगंधाकडे हल्ली बोलायला दुसरा विषय नसायचा.
"अगं हो जरा दमानं तर घे. अजून आपली ऑफर ते स्वीकारतात की नाही हे ही माहिती नाही. ", सुयश उद्गारला. “अजून ३-४ पार्टीज आहेत ऑफर्स दिलेल्या माहिती आहे ना? आणि नाही हे घर मिळालं तर मिळेल दुसरं.आज ना उद्या!”, सुगंधाला समजवण्याच्या निमित्ताने सुयश स्वतःला पण समजावत होता. पण खरं तर ऑफिसमधून सुट्टी घेतल्यापासून 'बाळ हवं' हा एकच ध्यास घेतलेली सुगंधा खरं तर दुसरा काहीतरी विचार करते आहे, आनंदात आहे, हे बघून सुयशला बरं वाटत होतं.

*********************************************************************************

"निलेश, निलेश...", ऑफिसमध्ये आलेल्या फोनवर घाबरलेल्या स्नेहाचा आवाज ऐकून निलेशही धसकला. "काय गं, काय झालं तरी काय, त्याने घाबरून विचारले.
"अरे निलेश, शांताबाई गावाला गेल्यात", स्नेहा भेदरलेल्या स्वरात उत्तरली.
“ओह! म्हणजे त्यांच्या आईचं काहीतरी बरं-वाईट झालेलं दिसतंय. निलेशच्या मनात आलं. खरंतर मनातून त्याला हायसंच वाटलेलं. स्नेहाने त्याला अगदीच घाबरून ठेवलेलं. काय काय विचार त्याच्या मनात येऊन गेले. त्यामानाने शांताबाईंची आई गेली असेल तर त्याला कमीच धक्का होता. त्यामुळे एकीकडे हायसं वाटत तर एकीकडे स्वतःच्या विचारांची लाज वाटत त्याने विचारले,"त्यांच्या आईची काही बातमी आहे का?"
"अरे आईला बरं नाही म्हणूनच गेल्यात.पण त्या गावाला गेल्याला आठ दिवस होऊन गेलेत."
"अगं आजारीच आहेत ना, होतील बर्‍या. आता शांताबाई गेल्यात तर होईल सगळं ठीक." तितकी वाईट बातमी नाही ऐकून त्याचा उरला सुरला ताणही नाहीसा झाला.
"निलेश, अरे शांताबाईंशी बोलावे, त्यांची आई कशी आहे हे विचारावे म्हणून त्यांना फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या की त्या गावाला आहेत. ८ दिवसांपूर्वीच त्या गावाला गेल्या त्यांच्या आईची तब्येत एकाएकी खालावली म्हणून बघायला. मला फोनवर मेसेज ठेवलेला म्हणाल्या. मी बघितला नाही की काय, काही कळेना. पण...पण...मग गेले आठ दिवस रोज आपल्या घरातली आवरा-आवरी, झाडू- भांडी कोण करतंय?”, स्नेहाचा आवाज पारच खाली गेला होता.
स्नेहा काय म्हणते आहे, त्याचा काय अर्थ आहे हे समजायला त्याला जरा वेळच लागला. आणि तिला काय म्हणायचेय ते समजल्यावर त्यालाही काही समजेना झाले!

*************************************************************************************

"अगं सुगंधा होतीस तरी कुठे आज दुपारी पण?", सुयशने घरी आल्या-आल्या सुगंधाला विचारलं, " आज पण दुपारी ३-४ वेळा फोन केला होता पण तू फोनच घेतला नाहीस. "गेले काही दिवस बघतोय, मी ऑफिसमधून दिवसा कधीही फोन केला की तू उचलत नाहीस. काळजी वाटते, फोन घेत जा ना माझे!"
"अरे जरा आवरा- आवर करत होते आपल्या घराची", सुगंधाने उत्तर दिले, "काय झालं इतकं एवढे वेळा फोन करायला?"
प्र्श्नार्थक नजरेने तिच्याकडे पहात तो म्हणाला,"अगं आपल्या एजंटचा फोन आलेला. एक चांगलं घर मार्केटवर आलं आहे. तर आज बघायला जायचं का विचारायला फोन आलेला त्याचा. घर चांगलं आहे अगदी आपल्याला आधी आवडलेल्या त्या घराइतकं प्रशस्त नसलं तरी आपल्या बर्‍याच अटी पूर्ण होतील असं म्हणतोय तो. फक्त या लोकांना विकण्याची जरा घाई आहे. घर विकून चंबू-गबाळं बांधून त्यांना परदेशात जायचंय रहायला. त्यामुळे आपण घाई केली तर मिळण्याची शक्यत आहे तो म्हणत होता. म्हणून मी विचार करत होतो की संध्याकाळी तुला माझ्या ऑफिसमध्ये यायला सांगावं आणि तिथून दोघांनी परस्पर घर बघायला जावं. म्हणून तुला इतका घाई-घाईने फोन करत होतो."
"काही नको, आपल्याला एवढं छान घर मिळालंय आता तुला अजून वेगळं काय घर हवंय?", सुगंधा सहजपणे म्हणाली.
चक्रावून सुयश पहातच राहिला.
"किती एंजॉय करते मी आपलं नविन घर आवरणं. शी! ते आत्ताचे मालक काय अवतार करून ठेवतात घराचा. आपण रहायला गेलं की मला आपलं घर पसरलेलं, घाण झालेलं मुळीच नको आहे हं. हा आता बाळाचा पसारा, त्याची खेळणी हे सगळं निराळं हा...ते चालेल...", सुगंधा परत स्वतःतच रममाण होत बडबडत होती.
"काय बडबडत्येस तू सुगंधा हे? कुठल्या घराचा, कोण अवतार करून ठेवतं? कुठलं घर आवरून ठेवल्याच्या गोष्टी सांगत्येस तू?", सुयशने चक्रावून विचारले.
"अरे, 'मांगल्य-सदन'. अजून कुठलं आपलं घर? आपलंच घर आपणच आवरून ठेवलं नाही तर कसं चालेल? उद्या रहायला जाऊ तेव्हा करणारच ना आपण...मग आत्ताच केलं तर काय बिघडलं?" सुगंधा अजूनही तंद्रीतच बोलत होती.
"सुगंधा, सुगंधा! अगं काय बरळत्येस? त्या घरावर आपण ऑफर दिलेली पण आठवडाभरापूर्वीच आपल्याला कळलंय ना की आपली ऑफर न स्विकारता त्यांनी दुसरी ऑफर घेतली आहे. ते घर आपलं नाहीये. आपल्याला ते मिळालं नाहीये. आपण तिथे रहायला जाणार नाही आहोत आणि तुला हे माहिती आहे. मग हे काय बोलत्येस? तू 'मांगल्य-सदन' मध्ये जातेस? त्या घरात आवरा-आवरी करतेस? कधी? दुपारी? मी ऑफिसमध्ये असताना? अगं काय बोलतेस काय तू हे? तरीच मी हल्ली दुपारी फोन करतो तेव्हा तू घेत नाहीस. विचारलं की धड सांगत नाहीस.", सुयशला काय बोलावं हे कळेना झालेलं. सुगंधा म्हणते ते खरं असेल तर बाळ सोडून हे त्या घराचं घेतलेलं नविन ऑब्सेशन, असं दिवसा-ढवळ्या दुसर्‍यांच्या घरात शिरणं - सारं फारच घाबरवून टाकणारं होतं. "अगं खरंच का त्या घरात जातेस तू? पण शिरतेस तरी कशी त्या घरात? घरात कोणी असतं की नाही? अगं चोर म्हणून पकडून तुला पोलिसात देतील ना....काय करतेस तरी काय हे?", सुयशने काही न सुचून एकापुढे एक प्र्श्नांची सरबत्तीच लावली.

"अरे, त्यात काय.. आपलंच तर घर आहे. उद्या आपण रहायला जाणार ते मी आधीच जाते, त्यात काय! एजंटने नाही का घराच्या एका बाजूला असलेल्या की-बॉक्स मधून किल्ली काढलेली, मी तेव्हा कोड नीट बघून ठेवलेला.! घरात कोणी असलं-नसलं तरी काय? आपलंच तर घर आहे ना ते आता! फक्त आपलं! अरे हो, आपल्या घरचा झोका कुरकुरत होता काल. ऑयलिंग केलय. आता बघू कसा न कुरकुरता उंच जातो झोका ते!”

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle