नवीन मालकांना घर सोपवण्याआधी ते थोडंसं आवरून पुसून देण्याची जबाबदारी त्रिशा मीनाक्षी ने घेतली होती. आदल्याच दिवशी त्यांनी सुमंतांकडेच आधी कामासाठी असणाऱ्या बाईला आजचा वेळ देऊन ठेवला होता. सोसायटीत असं एक दिवस एखाद्याच कामासाठी तयार होणारी बाई मिळणे कठीण होते, त्यामुळे ही जुनी बाई हमखास येईल म्हणून हिला मीनाक्षीने सांगून ठेवले होते आणि त्यामुळे तिचा नंबरही घेऊन ठेवावा असे तिला वाटले नव्हते. तिची वाट पाहात त्या दोघींनी तिथेच हॉल मध्ये जमिनीवर बसकण मारली.
" किती भकास झालं हे घर एकाएकी" मीनाक्षी चहूबाजुंना पाहात म्हणाली.
"हम्म, आता आपल्याला हे असं पाहण्याची सवय करून घ्यावी लागेल" त्रिशाला त्या अनोळखी मुलाचा आधीच वैताग आला होता.
"नवी फॅमिली कशी असेल! अर्थात सुमंतांइतकी छान असण्याची अपेक्षा नाहीचेय" मीनाक्षी अजूनही सगळीकडे पहात होती.
"फॅमिली नाही, फॅमिलीतला एक मुलगा येतोय एकटा रहायला"
"हो ? " मीनाक्षी ओरडलीच , रिकाम्या घरात आवाज घुमल्याने त्रिशाच्या कानठळ्या बसल्या.
"ए अगं हळू, एकदम चार मिन्या ओरडल्यासारख्या वाटल्या. त्रिशा कानांवर हात ठेवत म्हणाली. "सॉरी मी पूर्णच विसरले तुला सांगायचं. काका म्हणाले होते असं"
मीनाक्षीने एक मोठा उसासा टाकत गुडघ्यात तोंड घातलं.
"आय नो. जाउदे. ही बाई आली कशी नाही अजून?
" हो ना. नेमका तिचा नंबर पण नव्हता घेतला काल."
" नंबर घ्यायला हवा होतास् तू मीने , सगळी कामं अर्धवट कर तू"
"अगं मला काय माहीत ही अशी दगा देईल म्हणून, जुनी बाई होती ती यांची."
"हो पण नंबर असू द्यावा, म्हणजे स्टेटस कळायला सोपं पडतं. ह्या बायकांना त्यांची रेग्युलर कामं असतात, आपलं छोटं मोठं काम लक्षात रहात नाही यांच्या. आणि राहिलं तरी त्यातून पाय काढायचं बघत असतात त्या"
"आता लेक्चर नको हा प्लिज, अजून थोडी वाट बघुयात" मीनाक्षी फुरंगटून म्हणाली.
मीनाक्षीने मोबाईल काढला आणि फेसबुक चाळण्यात गुंग झाली. त्रिशा पाय पसरून दोन्ही हातांवर रेलून छता कडे, भिंतींकडे पहात बसली. अर्धा तास निघून गेला तरी बाईचा पत्ता नव्हता. घर तर असंच नव्या मालकाच्या ताब्यात देता येणार नाही, आता पुन्हा बाई बघा, तिची वाट बघा! एवढा सगळा विचार करून शेवटी त्रिशाने ठरवून टाकलं.
"मीनू, चल उठ. आपणच करून घेऊयात आता इथली स्वच्छता, अजून वेळ घालवायला नको. " त्रिशा उठत मागच्या बाजूने जीन्स झटकत म्हणाली.
"ओके" मीनाक्षी फेसबुक स्क्रोल करता करता म्हणून गेली. दोन तीन सेकंदांनी तिला करंट बसला "काय? आपण?!"
"हो, काही पर्यायच नाहीये आता, आता कोणी मिळणार ही नाही"
"यार त्रिशा, सकाळपासून कामच करतोयत आपण, आता मला बुडही हलवायची इच्छा नाहीये" मीनाक्षी जवळजवळ रडत म्हणाली
"हो माहितीये, पण आता उद्यापासून आपलं ऑफिस असेल,
वर दोघींनी आजच सुटी घेतल्यामुळे उद्या पुन्हा घेणं शक्य नाही. हे घर असंच तर नाहीना सोपवू शकत आपण."
"घर आता काकांचं राहिलं नाहीएना मग कशाला आपण त्रास करून घ्यायचा, नवा मालक बघेल..."
मीनाक्षी चं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्रिशा घरातून बाहेर पडली आणि तडक त्यांच्या घरात गेली. त्यांच्या घरातले झाडू, सुपली, मॉप, बादली इत्यादी साहित्य आणले. हा एक सेट सुमंत मुद्दाम इथेच ठेऊन गेले होते त्यामुळे दोघींना आपापली हत्यारं मिळणार होती. त्रिशाने दोघींचे छोटे स्कार्फ ही बरोबर घेतले. येताना त्यांच्या 305 फ्लॅटच्या लाकडी दाराला कुलूप लावले आणि बाहेरच्या सेफ्टी डोअर ची कडी लावून घेतली. जमिनीवर फतकल मारून बसलेल्या मीनक्षीला तिने धरून उठवले. मीनाक्षी रडत, बाईच्या नावाने खडे फोडत कशीबशी तयार झाली. दोघी स्कार्फ ची त्रिकोणी घडी करून कपाळावर स्कार्फ बांधून , राहिलेल्या कोनाने केस झाकून सज्ज झाल्या. घराच्या अर्ध्या अर्ध्या वाटण्या केल्या. घर तसं स्वच्छ होतं फ़क्त एकेक हात मारला की काम होणार होतं. झाडू उचलून दोघी आपापल्या रणभूमीवर सज्ज झाल्या.
साधारण अर्ध्या तासानंतर दाराची बेल वाजली.
हम्म! ही बाई आता आली दिसतेय असं म्हणत त्रिशा पुन्हा हातातल्या मॉप ने किचन पुसू लागली. नुकत्याच पुसलेल्या फरशीवरून चालणं तिच्या जीवावर आलं म्हणून तिने आवाजाकडे दुर्लक्ष केलं. बेल पुन्हा वाजली, यावेळी दोनदा.
"मी पाहते त्रिशा थांब" मीनाक्षी आतून आवाज देत म्हणाली
"नाही, तू तिकडेच थांब, किचन ची फरशी ओली आहे. मी बघते" त्रिशा मॉप भिंतीशी उभा करून दोन्ही हात हवेत थोडेसे पसरून तोल सांभाळत पायांच्या पंज्यांवर हळूहळू चालत दाराकडे निघाली.
" बाईला चांगलं खडसाव, दगाबाज कुठली" आतून मीनाक्षी ओरडली.
त्रिशाने लावून घेतलेल्या सेफ्टी डोअरच्या फुलांच्या जाळीतून पाहीले तर एक ग्रे फॉर्मल शर्ट कमरेवर हात ठेवून पाठमोरा उभा होता.
" एस्क्यूज मी?" त्रिशाने आतूनच विचारले.
आवाज येताक्षणी त्याने पटकन मागे वळून पाहिले.
" मिस त्रिशा उपाध्ये याच फ्लॅट मध्ये राहतात ना? " त्याने त्रिशा च्या फ्लॅटकडे अंगठ्याने इशारा करत विचारले. "आणि हा फ्लॅट सुमंतांचा, बरोबर?"
"हो आणि हो. आपण? "
" मी नकुल. आशिष समदरिया चा मित्र. मिस उपाध्येना भेटायचं होतं पण घराला लॉक दिसतंय त्यांच्या"
" ओह" त्रिशाने सेफ्टी डोअर उघडले. "मीच त्रिशा" त्रिशा डोक्यावरचा रुमाल काढत म्हणाली." मिस्टर समदरिया किल्ली पिक करण्यासाठी उद्या संध्याकाळी येणार आहेत असं काका म्हणजे सुमंत काका मला सांगून गेले होते"
नकुलने तीच त्रिशा आहे असं कळल्यानंतर हलक्याशा भुवया उडवत कळल्यावर तिचा तो अवतार डोक्यापासून पायापर्यंत पाहून घेतला. खांद्यापर्यंत स्टेप कट केसांची ची हाय पोनी, प्लेन ग्रीन टीशर्ट,जीन्स गुडघ्यापर्यंत दुमडलेली, उकड्याचे दिवस असल्याने आणि काम केल्याने चेहरा काहीसा घामेजलेला.
" आशिष ला आज कामानिमित्त अचानक मुंबईला जावं लागलं म्हणून त्याने मला किल्ली घेऊन ठेवायला सांगितलं आहे, परवाच शिफ्टिंग होईल मेबी"
त्रिशाच्या कपाळावर आठ्या पडल्या. वास्तविक तिने आशिष समदरिया हा प्राणी प्रत्यक्ष कसा दिसतो हेही पाहीले नव्हते. काकांचं कुटुंब तोवर बँगलोर ला शिफ्ट झालं असेल आणि किल्ली त्याला त्रिशा मीनाक्षी कडूनच घ्यावी लागेल हा विचार करून किल्ली देताना नेमका माणूस कोण आहे हे माहीत असलं पाहीजे म्हणून काकांनी आशिष च्या ई-मेल अकाउंट वर असलेला त्याचा फोटो त्रिशा ला दाखवून ठेवला होता. काका आशिष आणि त्याच्या कुटुंबियांनाला भेटलेले होते आणि हे सगळे फोनवरून एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये होतेच. आशिष किल्ली घ्यायला येणार हेही त्यांना माहीत होते, त्यामुळे त्रिशाला फक्त फोटो दाखवून ते निर्धास्त होते. त्रिशाने आशिष चा चेहरा निदान फोटोत तरी पाहीला होता पण
हा आता अजून एक अनोळखी मुलगा आशिष चा मित्र आहे असं सांगून किल्ली मागत होता. त्रिशाला च्या सेफ आणि जबाबदार स्वभावाला त्याच्या फक्त म्हणण्यावरून त्याला किल्ली देऊन टाकणे पटेना. थोडासा विचार करून ती म्हणाली.
" माफ करा, मी किल्ली फक्त मिस्टर समदरियांकडे देऊ शकते." त्रिशा शक्य तितक्या नम्रपणे म्हणाली.
" मी समजू शकतो, पण आज किल्ली मिळणे गरजेचे आहे, त्यामुळे माझ्याकडे दिली तर हरकत नाही, आशिष आणि मी रुममेट्स आहोत" नकुल म्हणाला
" अकच्युली नाही. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला पाहिलेलं ही नाहीये, शिवाय काका मला असं काही म्हणाले नव्हते. खरंतर मी मिस्टर समदरीयांना देखील पाहिलेलं नाहीये पण किमान त्यांचा फोटो पाहिलेला आहे. इतकी मोठी गोष्ट मी काहीच जाणून न घेता तुमच्याकडे सोपवू शकत नाही, सॉरी" त्रिशा ठामपणे म्हणाली.
"ठीक आहे , मी आशिष ला कॉल करतो, तो स्वतःच सांगेल तुम्हाला"
त्रिशा ने मान हलवत एक मोठा उसासा टाकला.
नकुलने ब्लॅक फॉर्मल पॅन्ट च्या खिशातून चटकन मोबाईल काढला. स्क्रीन वर अंगठा फिरवणार तोच हाताचा तळवा उंचावत त्रिशा म्हणाली
"हे पहा, त्यांच्या केवळ एका कॉल वर ही मी विश्वास ठेवू शकत नाही. पलीकडून कोण बोलतंय हे मी कस ठरवू शकेन?" साफसफाई करणं त्रिशाला कितीही आवडत असलं तरी ह्या अनपेक्षितपणे अंगावर पडलेल्या कामामुळे ती काहीशी वैतागली होती, त्यात पुन्हा ह्या मुलाशी वाद घालावा लागत होता.
दारातून येणारे आवाज ऐकून मीनाक्षी हात झटकत, हाश हुश्श करत बाहेर आली
"काय चाललंय त्रिशा ? हे कोण? " नकुल कडे बघत मीनाक्षी म्हणाली.
" आज सोमवार आहे, मी आमच्या टी टाईम मधून पळून इथे आलो आहे आणि तुमचा विश्वास संपादन करून घ्यायचा म्हणजे आयुष्य लागेल असं दिसतंय आता. " नकुल त्रिशाकडे बघत हसत म्हणाला. याला परिस्थितीच गांभीर्यच नाहीये पाहून त्रिशा चिडली.
" तुमच्यासाठी हा चेष्टेचा विषय असू शकतो पण किल्ली बरोबर माणसाकडे देण्याची जबाबदारी काकांनी माझ्यावर टाकली आहे, सो प्लिज, तुम्ही खुद्द समदरियांना इथे यायला सांगा" त्रिशाचा स्वर आता काहीसा कठोर झाला होता.
"तो मुंबई ला गेलाय, विसरलात?" नकुल खिशात हात घालून निवांत उभा रहात म्हणाला.
"मी त्रिशाशी सहमत आहे" मीनाक्षी आता आखाड्यात उतरली होती.
" पण मला आज किल्ली घेऊन जाणं गरजेचं आहे. माझा वेळ वाया चाललाय, तुम्हाला ही तुमचे काम आहेत असं दिसतंय." नकुल एका हाताचा तळवा उपडा करून त्या दोघींकडे कडे रोखत खाली वर झुलवत म्हणाला. "ओह, ठीक आहे , तुम्हाला प्रूफ च हवंय ना. एक मिनिट"
मघाशी खिशात सरकवलेला फोन नकुलने पुन्हा बाहेर काढला.
स्क्रीनवर काही सेकंद बोटे फिरवली, स्क्रीन त्रिशा कडे केली आणि दुसऱ्या हाताचं बोट स्क्रीनवर ठेवत म्हणाला.
"हे बघा, हा आशिष, याला तुम्ही पाहिलंय, म्हणजे फोटोतच आणि त्याच्या डाव्या बाजूला मी. नीट पहा. " असं म्हणत नकुलने फोन तुलना करण्यासाठी तसाच आधी स्वतःच्या चेहऱ्याजवळ नेला मग त्रिशाकडे दिला. तो चार पाच मुलांचा ट्रेक ट्रिप चा फोटो वाटत होता. नकुलने त्याला झूम केले होते. आशिष च्या डाव्या बाजूला एक मुलगा सोडून नकुल उभा होता. त्यात त्याचा आतासारखा वरतून खाली येताना केसांची घनता कमी कमी होत गेलेला क्रू कटच होता, पण सध्याचं काळभोर गवत थोडंसं वाढलेलं दिसत होतं. डोळे फक्त उन्हातच कॉफी कलरचे दिसतील असे काळेच वाटणारे होते. चेहरा उभा, अंडाकृती पण नाजूक होता , चेहऱ्याच्या उभट पणाला शोभून दिसणारे सरळ लांब ग्रीसीयन नाक एवढं धारदार की कितीही गाल वाढले तरी ते कायम वरच दिसेल. अंगाला चिकटलेला, 'पॅरिस' अशी इंग्लिश मधून प्रिंट असलेला काळा राउंड नेक टी शर्ट, शेवाळी बरमुडा आणि चेहऱ्यावर आता मिनीटभरापूर्वी होतं तसंच गोंडस हसु, फक्त जरासं मोठं होतं. ओठ पातळ आणि मुलांमध्ये क्वचित दिसतात असे लाल गुलाबी होते. मोठं हसल्यामुळे पातळ ओठांना अजूनच लपवणारी वरची थोड्याशा उभट, एक सारख्या पांढऱ्याशुभ्र मोत्यांची ओळ संपुर्ण दिसत होती. खालच्या तशाच ओळीचीही हिंट कळून येत होती. डेंटिस्ट च्या क्लिनिक च्या भिंतीवर असतं तसं ते हसू होतं.
आता मीनाक्षीचे समाधान झालेले दिसले.
"त्रिशा हा ही बरोबरच माणूस आहे असं दिसतंय" त्रिशाच्या खांद्यावरून फोन मध्ये डोकावत असलेली मीनाक्षी हळूच त्रिशाला म्हणाली. त्रिशाला या व्यक्तीच्या वृत्तीवर संशय तसा नव्हताच, पण सहजासहजी अनोळखी माणसाकडे तिला किल्ली द्यावीशी वाटत नव्हती, जोपर्यंत योग्य माणसापर्यंत ती जाणार नाही तोवर तिलाच घोर लागून राहील. अजून ती मोकळ्या मनाने हो म्हणणाच्या पायरीपर्यंत आलेली नव्हती.
"नाही मीनाक्षी" त्रिशा नकुलकडे मोबाईल देत म्हणाली. "मला एकदा काकांना फोन करून हे सगळं सांगावं लागेल. मी आलेच." असं म्हणत त्रिशा आत निघून गेली. क्रू कट ने मीनाक्षी कडे पाहात "कठीण आहे" अशा अर्थाने दोन्ही हातांचे तळवे पसरले.
तीनेक मिनिटांनी त्रिशा बाहेर आली. बाहेर येते तोच तिला मीनक्षी आणि नकुल हसून एकमेकांना टाळी देताना दिसले. त्यांचे तिच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांकडे लक्ष जाताच दंगा चालू असलेल्या वर्गात शिक्षक यावेत तसे ते दोघे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले.
एकंदरीत आशिष समदरिया आणि अजय च्या कम्युनिकेशन मधला हा गोंधळ होता. आशिष ला त्याने आज त्रिशा मीनाक्षी या वेळी घरी सापडतील असं सांगितलं होतं पण आशिष ने गडबडीत किल्ली घेण्यासाठी कोण येणार आहे हे अजय सांगितलेलं नव्हतं.
"झालं सगळं क्लिअर? की आता आशिष चा आणि माझा शाळेचा दाखला हवाय" नकुल शक्य तितका चेहरा सरळ ठेवत म्हणाला. मीनक्षीच्या तोंडातून मात्र फिस्कन हसू बाहेर पडले. नकुल ने गोंडस हसून तिला सपोर्ट केला.
मीनाक्षीकडे रागाने बघून पुन्हा नकुल कडे बघत त्रिशा म्हणाली,
"अजून 10 एक मिनिटे वाट पहावी लागेल"
" ओह, केस सोल्व्ह करायला कन्सल्टंट हवाय का? पण बेकर स्ट्रीट वरून दहा मिनिटांत इथे पोहोचेल का तो? " मीनाक्षी ला डोळा मारून मोत्यांची पखरण करत नकुल म्हणाला.
त्रिशाने त्याच्यावर डोळे रोखले.
" काका स्वतः तुम्ही दोघे असलेला फोटो आशिष कडून घेऊन मला पाठवणार आहेत "
आता नकुलने आ च केला. मीनाक्षी हसू लपवून लाल झाली.
" बरोबर आहे, जबाबदारी जबाबदार लोकांनाच कळते. साहाजिकच इथे कोणी नाहीचेय तसं" त्रिशा शांत आणि गंभीर आवाजात म्हणाली.
"सॉरी त्रिशा, पण मी खरोखर तुझ्याशी सहमत आहे. तू अशी आहेस् म्हणून मला कसलीही काळजी नसते" मीनाक्षी त्रिशाच्या खांद्याभोवती हात गुंढाळत म्हणाली. नकुल अजूनही मी मात्र अजिबातच सॉरी नाहीये च्या अर्थाने हसत होता.
तेवढयात त्रिशाचा फोन वाजला. तिने कोड टाकून पटकन फोन उघडला. व्हाट्सऍप वर नेमका नकुलने दाखवलेलाच फोटो काकांनी पाठवला होता. काकांना रिप्लाय म्हणून एक अंगठा पाठवून त्रिशा ने वर पाहीले. काहीच न बोलता फक्त फोटो उघडलेली स्क्रीन नकुल समोर केली. नकुलने एकदम तो त्रिशाच्या हातातून घेतला, नाटकी पणाने पुन्हा स्वतःचा फोन काढून त्यात तोच फोटो काढून , दोन्ही फोन शेजारी शेजारी ठेऊन चष्मा घालायला विसरलेल्या माणसासारखे डोळे करून ते फोटो तपासले. त्रिशाने डोळे फिरवलेले डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहून तो पुन्हा नकुल स्पेशल हसला. त्याच्या सततच्या त्या हसण्याचा आणि चेष्टा करण्याचा त्रिशाला आता राग येऊ लागला होता. आत जाऊन किल्ली ती घेऊन आली आणि नकुलच्या हातावर आदळली.
" पाच मिनिटं , आम्ही आमचं सामान बाहेर आणतो"
मीनाक्षी त्रिशा ने कुलुपासकट पटापट त्यांची सगळी हत्यारं बाहेर आणली. नकुलने दाराला कुलूप अडकवलं.
" थँक्स अ लॉट" असं म्हणत नकुल निघाला आणि परत मागे वळत त्रिशाकडे बघत म्हणाला
" बाय द वे, तुमची साफसफाई अर्धवट राहिलेली असेल तर आम्ही शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा आलात तरी हरकत नाही"
मीनाक्षीला पुन्हा हसू फुटले, त्रिशा कुठलीच प्रतिक्रीया न देता सरळ तिच्या घराच्या दारापाशी जाऊन 'आम्ही' शब्दावर विचार करत कुलूप उघडू लागली. मीनाक्षीला बाय करून नकुल लिफ्ट न वापरता धडाधड पायऱ्या उतरत निघून गेला.
क्रमशः