त्रिशाला नोकरी लागली त्याच महिन्यात तिचे बाबा गेले. तोपर्यंत स्टॅटिस्टिक्स मध्ये पीजी ते कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड ह्या गोष्टी झटपट आणि स्वप्नवत झाल्या होत्या. पहिल्या पगारात आई बाबांसाठी काहीतरी करायचं यावर रोज रात्री गादीवर पडलं की ती विचार करत असे. त्यातली आईबाबांसाठी नॉर्थ ईस्ट इंडिया टूर च्या पॅकेज ची कल्पना तिला मनापासून आवडली. बाबा अजून रिटायर्ड नव्हते त्यामुळे त्यांच्या हातात थेट तिकीटं देऊन उपयोग नव्हता. तसेच 'कशाला यात पैसे घालवलेस ते तुम्हा दोघींना सोडून आम्हाला एकट्याने जावं वाटणार नाही' यासाठी एक दिवस द्यावा लागणार होता. उंच टेकडी वर गेल्यानंतर चारी बाजुंनी शुभ्र, कापसासारख्या मऊ ढगांनी घेरले जावे तशी ती या सगळ्या प्लॅन्स आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरत होती. पण गोष्टी स्वप्नवत घडण्याचा तिचा कोटा संपला असावा. जॉईन होऊन उणेपूरे तीन आठवडे ही झाले नव्हते तोच तिलाच सुट्टीसाठी विनंती करावी लागली होती.
एका सकाळी ऑफिसमध्ये तिच्या डेस्कवर बसून सिनियर कडून काम समजावून घेत असतानाच तिला आईचा फोन आला. तिने दोनवेळा कट केला. तिसऱ्यांदा तिच्या सिनियर ने च तिला घ्यायला लावला. फोन उचलल्यावर ती आईवर वैतागली. तिच्या डोक्यात त्यावेळी तिच्या कामाबद्दल असंख्य प्रश्न होते, इनसेक्युरिटी होती, भीती होती. सकाळी घरातून निघतानाच व्यवस्थित बोलणं होऊनही ती आता सारखी का डिस्टर्ब करतेय, म्हणजे काळजी तरी किती करावी, काहीतरी मर्यादा? मी काय लहान आहे का आता असा स्वतःशीच त्रागा करत तिने फोन उचलला. दबक्या आवाजात तणतण करत मग तिने आईला बोलण्याची संधी दिली आणि तिचं बोलणं झाल्यानंतर ती पूर्ण ब्लॅंक झाली, आपण आत्ता काहीतर ऐकलंय हे तिच्या डोक्यात शिरलं खरं, पण ते मेंदूत प्रोसेस च होईना. ती तशीच डेस्कवर येऊन बसली. तिचा सिनियर तिथेच होता.
"करूयात कँटीन्यू?"
"आं? सॉरी, हो"
सिनियर बोलत राहीला, तेही तिच्या डोक्यावरून गेलं. दोन तीन मिनीटांनी त्याचं बोलणं तोडत म्हणाली.
"माझे बाबा गेले"
"काय?"
"हो आईने त्याचसाठी फोन केला होता"
"आत्ता आईचा फोन होता तुझ्या? बाबा?" त्रिशाचं वागणं पाहून सिनियर पण गोंधळला.
"...."
" तू जा, सरांना भेट, सुट्टी घेऊन ताबडतोब निघ"
सिनियरनेही सावरायला काही क्षण घेतले.
" काय?" धड वरचा ही नाही आणि खालचा नाही असा तिचा स्वर होता.
"चल माझ्याबरोबर, उठ"
सिनियर ने तिला धरून उठवले. सरांना आधी इंटर्नल मेसेंजर पिंग केल्याशिवाय भेटण्याची पद्धत नव्हती, पण आता तेवढ्या फॉर्मालिटी ला वेळ नव्हता. सिनियर तिला घेऊन केबिन जवळ गेला आणि दारावर नॉक केले. त्यानंतर सरांशी ती काय बोलली, तिथून यांत्रिक हालचाली करून रिक्षाने बस स्टँडवर कशी आली, फलटण च्या स्टँडवर कधी उतरली आणि पुन्हा रिक्षा करून घरी कधी आली हे तिला स्वतःलाच समजले नाही. दारात दिसणारे बऱ्याच चपलांचे जोड पाहात आणि बोलण्याचे दबके आवाज ऐकत ती घरात आली . घरी येऊन आईचा आणि बहिणीचा चेहरा पाहीला आणि मगच संपूर्ण भानावर आली. बाबांवर अंत्यसंस्कार होईपर्यंत तिच्या डोळ्यांतून एक अश्रू बाहेर पडला नाही.
ऑफिसमधून तिला 10 दिवसांची सुट्टी मिळाली होती. चार पाच दिवसानी भेटायला येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ कमी झाली तेव्हा त्या तिघींना घर खायला उठलं. तिघींनाही आपण आता पोरके झाल्याची तीव्र जाणीव होऊ लागली. डोक्यावर एकवेळ छत नसेल तर चालून जाईल,पण बाबांची उणीव कशानेच भरून निघणारी नव्हती. पुढचे काही दिवस त्यांच्या बोलण्यातून चुकून काही वेळा बाबा अजून आपल्यातच असल्यासारखा त्यांचा उल्लेख येत होता. ते एक दोन न रडल्याचे दिवस त्रिशाने नंतर रात्री एकट्यातच भरून काढले. त्या रात्रीच त्रिशा मोठी झाली. पण सातव्या महिन्यातलं मूल जसं काहीतरी उणीव घेऊन जन्माला येतं, त्रिशाचं मोठं होणं तसं होतं.बाबा नाहीत हे नको असलेलं वास्तव एकीकडे होतंच पण बाबांनंतर घराला सावरण्याची, सांभाळण्याची जबाबदारी आता आपलीच आहे , घरातली कर्ती कमावणारी व्यक्ती आपणच आहोत या जाणिवेने तिला बदलून टाकले. त्यानंतर तिने दोघींजवळ बाबांचा विषय काढला नाही, त्यांची आठवण आली तर कधीही त्यांच्याजवळ मन मोकळे केले नाही. आपल्याला भावनिक झालेलं पाहून दोघींचा धीर खचू नये, हा विचार त्या मागे होता. आपण स्वतः स्थिर आहोत असे दाखवत ती आईचं आणि विशेषकरून तिच्या पेक्षा चार वर्षांनी लहान बहिणीचं सांत्वन करत राहिली. बाहेर जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याजवळ ही तो विषय ती टाळू लागली. सिंपथी ही गोष्ट आधीपासूनच तिची नावडती होतीच, तिच्या दृष्टीने ती एक निरर्थक गोष्ट होती. जमलं तर माणसाने समोरच्यासाठी काहीतरी प्रॅक्टिकली करून दाखवावं, फुकट सिंपंथी देऊन उगीचच स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ घालवू नये या मताची ती होती. आता अशा परिस्थितीत तर बाहेरच्यांच्या सिंपथी मुळे धीर येण्याऐवजी आपण अजूनच दुबळे होत जातो आणि अशा दुबळेपणाचा नंतर लोक फायदा उठवतात या विचाराने तिच्या मनात पक्के घर केले होते. त्रिशा स्वभावाने खंबीर होती, पण तो खंबीरपणा आणि जबाबदारपणा सध्यातरी फक्त करियर मधल्या चॅलेंजेस पेलणे, नवनवीन गोष्टी शिकत राहणे, आईबाबांना मदत होईल त्या दृष्टीने सेव्हिंग्ज, बहिणीला तिच्या करियर मध्ये मार्गदर्शन, आपण केलेल्या चुकांबाबत तिला आधीच सूचना देऊन ठेवणे या गोष्टींपुरताच मर्यादित होता. अचानक एवढा अवघड पेपर समोर येऊन पडेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. हे सगळे भावनिक ओझे वागवून ती मनातून दडपून गेली. तिचे करिअर, घरच्यांकडे कुटुंब प्रमुख असल्यासारखे लक्ष देणं- कधीकधी आवश्यकतेपेक्षा जास्तच, तिने उत्तम सांभाळले. वास्तविक आई ने लगेचच मुलींसाठी स्वतःला सावरले होते, शलाकानेही परिस्थितीशी जुळवून घेतलेहोते, त्रिशाला वाटत होतं तेवढ्या त्या दुबळ्या नव्हत्या, त्यांची आर्थिक स्थिती ही तितकी वाईट नव्हती. तरीही त्रिशा शंभर टक्के या दडपणातून बाहेर आलीच नाही. नेहमीप्रमाणे महिन्यातून एकदा घरी ती आली की तिला बाबांची तीव्र आठवण होत असे. मूव्ह ऑन होणे तिला अजूनही जमत नव्हते. तिच्या त्या अस्वस्थतेच्या काळात तिला उगीचच घराचा कुठलातरी भाग आवरायला काढणे, कपाटातले डबे काढून घासत बसने, कपड्यांचं कपाट थोडंसं विस्कटलं की लगेच तो कप्पाच रिकामा करून पुन्हा घड्या घालून व्यवस्थित लावणे अशा सवयी लागल्या. हा ocd अर्थातच नव्हता, ताण कमी करण्यासाठी, मन दुसरीकडे वळवण्यासाठी तिला आपोआपच मिळालेला मार्ग होता. अशा सगळ्या परिस्थितीत सुमंत कुटुंब तिच्यासाठी ओएसीस बनून राहणे साहजिकच होते.
क्रमशः