सवयीप्रमाणे जिना चढत त्रिशा तिसऱ्या मजल्यावर आली. समोरच्या फ्लॅटचं दार उघडं होतं. शिफ्टिंग चालू असल्याच्या खुणा दिसत होत्या. दोन दिवस सुमंतांच्या बंद घराची तिने सवय करून घेतली होती, पण ते दार आज उघडं दिसलं आणि ती एकदम नॉस्टॅल्जिक झाली. त्यांनी आणि त्रिशा मीनाक्षीने एकत्र साजरे केलेले सण, वाढदिवस, सुटीच्या दिवशी पाहिलेले मुव्हीज, अंगतपंगत, न्यू इअर च्या रात्री उशिरापर्यंत पाहिलेले कार्यक्रम हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं. त्या घराकडे तोंड करून शून्यात बघत ती उभी राहीली. अखेर पुन्हा वर्तमानात येत एकेक पाय वर घेत तिने सँडल चे बंद काढले, चपलांच्या कपाटात सरकवले. पर्समधून घराची किल्ली काढली आणि कुलूप उघडणार तोच मागून "हाय" असा आवाज आला.
तिने मागे पाहीले. क्षणभर निरीक्षण करून आशिष समदरियाला तिने ओळखले. त्याच्या फॉर्मल पांढऱ्या शर्ट च्या बाह्या बटन्स काढून कोपरापर्यंत खाली-वर दुमडलेल्या होत्या. ऑफिस संपवून थेट शिफ्टिंग च्या कामाला लागला असावा असा एकंदरीत अवतार होता.
"हाय" त्रिशा ठेवणीतलं हसली
" त्रिशा की मीनाक्षी?"
"त्रिशा. आशिष? "
"बरोबर" आशिषने हात पुढे केला.
"ओह, एक मिनिट" म्हणत त्रिशाने किल्ली पुन्हा पर्समध्ये टाकली. तोवर गोंधळत आशिष ने हात मागे घेतला होता. त्रिशाने पर्सला अडकवलेली सॅनिटायझर ची बाटली हातावर पालथी केली, हात पटापट एकमेकांवर चोळले आणि हात पुढे केला. आशिषने हसून हात मिळवला
"ऑफिस?"
"हो, तिकडूनच येतेय"
" बाय द वे, त्या दिवशी किल्लीवरून खूपच गोंधळ झाला. नकुलने सांगितलं सगळं. सॉरी, गडबडीत मीच अर्धवट माहिती दिली होती, पुढे एवढं सगळं होऊ शकेल असं लक्षातच आलं नाही"
त्या दिवशीचा तो सगळा त्रासदायक प्रकार त्रिशाला आठवला.
"दॅटस् फाईन, किल्ली योग्य माणसाकडे देऊन जबाबदारी एकदाची पूर्ण करून टाकणे एवढंच माझं एम होतं, त्यामुळे ते सगळं जरा जास्त ताणलं गेलं"
मनातून तिने केलं ते शंभर टक्के बरोबरच होतं याबद्दल तिला अजिबात शंका नव्हती.
"नाही, तुझं बरोबर होतं. अशा कामांमध्ये खबरदारी घेणं अजिबात चुकीचं नाही, कदाचित तुझ्या जागी मी असतो तर असाच वागलो असतो."
हे जरा तुझ्या अनोयिंग मित्रालाही समजाव!
बाकी त्याचं बोलणं ऐकून त्रिशाला स्वतःच कौतुक वाटलं, एखाद्या छोट्याला बे चा पाढा न चुकता म्हणून दाखवल्यावर वाटतं तसं! आशिष नक्कीच त्याच्या रुममेट् पेक्षा सेन्सिबल व्यक्ती आहे असं मत बनवायला तिची काहीच हरकत नव्हती.
"शिफ्टिंग झालं दिसतंय सगळं" त्रिशाने विचारलं
"आमचं सामानच किती होतं असं, त्यामुळेच विक डे मध्ये शिफ्ट करू शकलो."
पुन्हा आमचं. म्हणजे तो नकुलही इथे राहणार हे खरंच आहे तर! याचा अर्थ आता कुठल्याही क्षणी बाहेर येऊन तो नक्कीच दर्शन देईल असं तिला वाटलं आणि ते तिला अजिबात नको होतं. मान उंचावून आशिष च्या मागे बघत ती खात्री करू लागली.
ती मागे बघतेय म्हणून आशिष ने ही मागे वळून पाहिलं. त्याने काही विचारण्याच्या आत त्रिशा ने न निघालेला विषय बदलला.
"इथे खालीच, सोसायटीच्या बाहेर गरजेची सगळी दुकाने आहेत. अर्थात तुम्ही पाहिलीच असतील ती"
"येस"
पुढे काय बोलावं ते दोघांनाही न कळल्यामुळे त्रिशा शेवटचं काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
"ठीक आहे मग, तुला काही गरज पडली तर सांग. म्हणजे काही विसरलं, संपलं असेल .. " आशिष तिला बरा वाटला म्हणून तिला फॉर्मली का होईना असं म्हणावं वाटलं, अजूनही काका काकूंच्या घरात दुसऱ्याचा वावर तिला पचतच नव्हता.
"हो, नक्की..थँक्स'
"ओके..बाय"
"बाय"
त्रिशा घरात आली आणि लगेच तिचा फोन खणखणला.
"बोल मीनु"
"आलीस तू घरी? ऐक, मला आज जरा उशीर होईल, बर्थडे पार्टी आहे कलीग ची, जेवूनच येईन"
"ओके, काळजी घे आणि जास्त उशीर करू नको"
"येस मॅम"
"रेस्टॉरंट तिथून जवळच आहे ना? आणि घरी कशी येणार आहेस?"
"डोन्ट वरी, मी एकटीच येईन आणि व्यवस्थित येईन ठिके?"
"बरं, निघालीस की मेसेज कर"
" डन, बाय"
"बाय"
एरव्ही कधीतरी घर असं फक्त स्वतःच्या मालकीचं असलेलं तिला आवडत असे पण आज मीनू ने येऊन कंटाळा येईपर्यंत जगभराच्या गॉसिप्स आपल्याला सांगत बसाव्यात असं तिला वाटत होतं. नेमका आजच तिला उशीर व्हायचा होता. तिने किल्ली दाराजवळ असलेल्या टेबलवरच्या बाउल मध्ये टाकली. बेडरूम मधल्या कपाटात तिची बॅगपर्स ठेऊन दिली. स्वच्छ धुतलेला, कापलेल्या संत्र्याची प्रिंट असलेला तिचा नेहमीचा आकाशी टी शर्ट आणि गोळ्यांच्या डिझाइन चा पजामा काढला. टी शर्ट पजामामध्ये गोल छोटा चेहरा, गोबरे गाल, काहीशी चबी आणि अवरेज उंची असलेली त्रिशा नववी दहावीतली शाळकरी मुलगी वाटत असे. बाथरूम मध्ये जाऊन ती हातपाय धुवून फ्रेश झाली, स्वतःसाठी चहा करून घेतला आणि टीव्हीसमोर जाऊन चॅनेल सर्फ करता करता बाहेरून येणाऱ्या मुलांच्या बोलण्याचा, हसण्याचा, सामान इकडे तिकडे सरकवण्याचा, प्लास्टिक च्या पिशव्यांच्या आवाजांचा कानोसा घेत बसली. जेवणाची वेळ झाली तशी तिने सकाळचं काय शिल्लक राहिलंय ते पाहीलं. एक पोळी शिल्लक होती. तिने कुकरला मुगाची खिचडी लावली. 15-20 मिनीटांनी ताटात पोळी, आईने दिलेला साखरांबा, उडदाचा भाजलेला पापड आणि खिचडी असं सगळं एकत्र घेऊन हॉल मधल्या मऊ खुर्चीत मांडी घालून बसली. टीपॉय टेबलच्या खालच्या लाकडी फळीवर ठेवलेले 'हॉंटिंग ऑफ द हिल हाउस' काढून खुर्चीच्या हातावर ठेवून कंटिन्यू केले. जेवण, भांडी घासणे झाल्यावर त्रिशा रोजच्या सारखं शतपावलीसाठी बाहेर पडली.
क्रमशः