आज्जी आजोबांची डायरी: भाग ३५

मी खालच्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट करत बसलेले असतांनाच मला कॉल आला, एका आज्जींना मिस्टरांच्या फ्युनरलला जायचे नाहीये, त्या खूप रडत आहेत, तू प्लिज त्यांना जाऊन भेटशील का लगेच?

फ्युनरलला जायचे नाहीये? असे कसे होऊ शकते? आज्जींनी आजोबा गेले, हे अजूनही स्वीकारले नाहीये का? असे प्रश्न मनात असतांनाच मन दोन आठवडे मागे भूतकाळात गेले..

माझ्यासोबत अगदी जवळून संपर्क आल्यानंतर काही तासांतच निधन पावलेल्या एकूण तीन व्यक्तींपैकी हे आजोबाही एक. सगळ्यात पहिल्या होत्या, त्या आज्जी नं 1 , ज्यांचा मृत्यू पचवणे मला फार अवघड गेले होते, तो किस्सा मी मागे लिहिला होता. मग क्वारंटाईन फ्लोअरवरच्या आज्जी, ज्यांचा किस्सा मी भाग ३३ मध्ये लिहिलेला आहे, त्या मुळातच बेडरिडन असल्याने अपेक्षित असले, तरी इतक्या लवकर कसे, म्हणून दुःख तर झालेच होते.

आणि आता हे आजोबा.. ह्यांचा किस्सा प्रचंड वेदनादायी होता माझ्यासाठी. दोन आठवड्यापूर्वी मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्यूटी करत असतांना मला कॉल आला. एक आजोबा आज्जी जोडपं एकमेकांसोबत फार भांडत असून आजोबा आज्जींचं फारच डोकं खात असतात आणि आज्जींना त्याचा फार त्रास होतोय. आजच त्यांच्या लेकीसोबत त्या फ्लोअरवरच्या नर्सचं बोलणं झालं आणि तिने सांगितलं की सायकॉलॉजीस्टला ह्यांना दोघांना काउंसेलिंग करायला लावलं, तर बरं होईल. नर्सने ही गोष्ट सर्व्हरवर डॉक्युमेंट केल्याच्या पाचव्या मिनिटाला मला कॉल आला होता की प्लिज तू ह्या जोडप्याला भेट आणि आज्जींना फार त्रास होतोय, तर त्यांना सेपरेट रूममध्ये राहण्याविषयी सुचवून बघ. त्यांना कमी त्रास होईल.

काउंसेलिंग करणे मला पटले, पण त्यांना सेपरेट रूममध्ये राहण्यासाठी सुचवणे, मला अजिबातच पटलेले नव्हते, पण वरून ऑर्डर आल्यावर माझ्याकडे काही इलाज नव्हता, कारण ह्या केसमध्ये मी बोललेले मला डॉक्युमेंट करावे लागणार होते आणि खोटे बोलणे हा ऑप्शन नव्हता. मग मी आधी संपूर्ण परिस्थिती समजून घ्यायला आज्जी आजोबांचे पूर्वीचे डॉक्युमेंटेशन वाचायला सुरुवात केली. त्यात त्या त्या तारखेनुसार एका नर्सने लिहिलेले होते, "आज रूममध्ये गेले असता, आजोबा माझ्यावर चिडले आणि तुसडेपणाने बोलले, तुम्ही काय मेकअप आर्टिस्ट आहात का, इतका वेळ लावला माझ्या रूममध्ये यायला?" मग दुसऱ्या एका दिवशीच्या डॉक्युमेंटेशनमध्ये लिहिलेले होते, की नर्सने आज्जींना आंघोळ घातली, पण आजोबांना ते त्यावेळी उपलब्ध नसल्याने वेळ टळून गेल्याने आंघोळ घातली नाही तर, त्यांनी आज्जींना नर्सने माझी आंघोळ का घातली नाही, म्हणून दिवसभर पिडलं.

हे वाचून झाल्यावरही त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये राहायला सुचवणं माझ्या पचनी पडत नव्हतं. भांडणं कोणात होत नाहीत? एवढ्या तेवढ्या कारणावरून लगेच काय वेगळं राहायला सुचवायचं? असे विचार मनात येत होते. मग मी त्या फ्लोअरवर गेल्यावर आधी तिकडच्या नर्सला भेटून नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर तिने सांगितलं, आजोबा एकदा कशावरून तरी चिडले होते आणि त्यामुळे त्यांना जेवायला जायचे नव्हते, तर त्या दिवशी त्यांनी आज्जींनाही जेवायला जाऊ दिलं नाही. मग मी तिला ह्या सेपरेशनच्या सल्ल्याविषयी सांगितलं आणि विचारलं, तुला काय वाटतं या बाबतीत? तर ती म्हणाली, काही वेळेला त्रासदायक माणूस चोवीस तास डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा थोडा ब्रेक मिळाला, तर आयुष्य सुखकर होतं.

मग मी मला जिचा फोन आला होता त्या व्यक्तीला फोन करून विचारले की जर मी त्यांना सेपरेट रूममध्ये राहायचा सल्ला दिला, तर त्यांना शेजारी शेजारी रुम्समध्ये राहता येईल का, जेणेकरून हवे तेंव्हा एकमेकांना पटकन भेटता येईल. ती म्हणाली, हो, हे आपण नक्कीच करू शकतो. मग माझे जरा समाधान झाले आणि मी आज्जी आजोबांना भेटायला गेले. तेंव्हा दुपारचे ३ वाजलेले होते. ही वेळ दुपारच्या कॉफी आणि केकची असते. त्यामुळे ते त्यांच्या रूममध्ये नव्हते. ते टागेसराऊममध्ये (शब्दशः अर्थ डे रूम पण इथे डायनिंग हॉल) शेजारी शेजारी बसून कॉफी केकचा आस्वाद घेत आनंदात बसलेले होते. मला त्यांच्याशी बोलायला अपराधीच वाटायला लागलं. पण बोलण्याशिवाय पर्याय नव्हता.

मग हाय हॅलो करून मी विषय काढला, तुमच्यात खूप वाद होतात, हे खरे आहे का? आज्जी म्हणाल्या, हो होतात अधूनमधून.. आजोबा काही न ऐकल्यासारखे केक एन्जॉय करत होते. ते बोलण्यात भाग घेत नव्हते. मग मी पटकन बोलून टाकले, तुम्हाला सेपरेट रूममध्ये राहायला आवडेल का शेजारीशेजारी? किमान रात्रीची झोप तरी नीट लागेल व्यत्ययाशिवाय.. आज्जी म्हणाल्या, झोपेचा काही प्रश्न नाही. दिवसाच जरा वैताग असतो, पण ते जाऊदे, आपण त्यावर नंतर बोलूया. मग मी म्हणाले, आपण दोघी वॉकला जायचं का तुमच्या कॉफीनंतर? तुम्हाला मोकळेपणाने बोलता येईल. आज्जी म्हणाल्या, "नको नको, यांना मी एकटं नाही सोडू शकत. ते कुठेही जातील आणि रस्ता चुकतील." मग मी दोघांना बाय करून जाता जाता दोघांचे निरीक्षण करत होते. आजोबा आज्जींना केक छान आहे, तू खा वगैरे सांगत होते. आज्जीही 'हो' म्हणून हसून बोलत होत्या.

आधीच इकडे जोडप्यांची संख्या कमी, त्यामुळे जे आहेत, त्यांना बघितले की मला ते किती भाग्यवान असे वाटत असते. त्यांची 'जोडी सलामत रहे' अशी मनोमन प्रार्थना करून मी डॉक्युमेंटेशन करायला गेले. त्यात मी लिहिले, "आज्जी आजोबांची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज्जी थोड्या बोलल्या, आजोबा मात्र अजिबात बोलले नाहीत. त्यांना वेगळे राहण्याविषयी सल्ला दिला पण ते त्याबाबत विशेष उत्सुक दिसले नाहीत. आज्जी आजोबांमध्ये थोडे वाद होत असले, तरी ते एकमेकांसोबत खूप आनंदात असल्याचे जाणवले." मला पुन्हा हे सेपरेट रुमच्या सजेशनविषयीची विचारणा यायला नको होती, म्हणून मी जरा स्ट्रेस देऊनच ते फार आनंदी असल्याविषयी लिहिले.

मग माझी घरी जायची वेळ झाल्यावर घरी जायला निघाले, तेंव्हा लिफ्टमध्ये पुन्हा हेच आज्जी आजोबा दिसले. त्या दिवशी मस्त ऊन असल्याने संस्थेच्या गार्डनमध्ये बसायला ते दोघं निघालेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले, तर नेहमीप्रमाणे गेल्या गेल्या ईमेल चेक केल्यावर समजले की रात्री नऊच्या सुमारास आजोबांचे निधन झाले! आजोबांचा मृतदेह शवागरात नेण्यात आलेला आहे.

मी प्रचंड शॉकमध्ये गेले. काहीही न झालेला, फ्रेश दिसणारा माणूस असा अचानक कसा जाऊ शकतो? हा प्रश्न मला पडला.
मग मी जाऊन आजोबांचे डॉक्युमेंटेशन वाचले. नऊच्या सुमारास खुर्चीत बसल्या बसल्याच ते वारलेले होते. मग आज्जींचे डॉक्युमेंटेशन वाचले. त्यात वेगवेगळ्या नर्सेसने वेगवेगळ्या वेळी लिहिलेले होते,
"आजोबा गेल्यानंतर रात्री आज्जी खूप रडत होत्या."

"त्यांचे नातेवाईक संस्थेत येऊन त्यांच्यासोबत बराचवेळ थांबले."

"त्या रात्री आज्जींची मुलगी संस्थेत त्यांच्या रूममध्ये त्यांच्यासोबत झोपली."

"दुसऱ्या दिवशी आज्जी बराचवेळ म्हणत होत्या, "ये ना तू परत, मला स्वतःला दाखव ना.."

एकेक गोष्ट वाचून मला फार त्रास होत होता..

माझी ड्यूटी त्यावेळी क्वारंटाईन फ्लोअरवरच असल्याने कोणीतरी कळवल्याशिवाय, खरोखरच गरज असल्याशिवाय इतर फ्लोअर्सवर जाणे टाळायचे, असे सुरवातीलाच कळवले गेलेले असल्याने काही मोजके आज्जी आजोबा वगळता मी इतर फ्लोअर्सवर कोणालाही भेटलेले नव्हते, त्यांची गोष्ट नंतर सांगेन.

नंतर एक दिवस मी आज्जींना जाऊन भेटू का, असे विचारले असता, नको, त्या आता सावरल्या आहेत आणि आजोबांशिवाय अतिशय मजेत आहेत. त्यांची आठवणही काढत नाहीत आणि मोकळेपणाने सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत आहेत, असे मला सांगण्यात आले. एकदा आज्जी गार्डनमध्ये बसलेल्या दिसल्या. चेहऱ्यावरून त्या मजेत वगैरे वाटत नव्हत्या. सावरलेल्या मात्र दिसत होत्या. कशा आहात, विचारले असता, दिवस काढते आहे, म्हणाल्या. मी ही आजोबांचा विषय काढायचे टाळले.

त्यानंतर डायरेक्ट १ जुलैला अनपेक्षितपणे मला कॉल आला, आज्जी आजोबांच्या फ्युनरलला जायला नाही म्हणत आहेत, तू त्यांना जाऊन भेट. पटकन मी आज्जींच्या रूमचा नंबर सर्व्हरवर चेक करून त्यांना भेटायला गेले. आता आज्जी त्यांच्या प्रशस्त डबल रूममधून तुलनेने लहान अशा सिंगल रूममध्ये मूव्ह झालेल्या होत्या. मला बघून त्यांचा बांध फुटला. मला मिठी मारून त्या जोरात रडायला लागल्या. मी त्यांना सावरत म्हणाले, आज्जी, तुम्ही उद्या आजोबांच्या फ्युनरलला जायला नाही म्हणू नका. आजोबा लांबून तुम्हाला बघत असतील, तर त्यांना वाईट वाटेल, तुम्ही आला नाहीत, हे पाहिले तर.. आज्जी म्हणाल्या, मला जायचेच आहे गं, पण ह्या नव्या परिस्थितीत मला जाता येणार नाहीये. मग अजूनच रडायला लागल्या आणि म्हणाल्या, माझी मुलगी मला रोज संध्याकाळी भेटायला येते, तिलाही आता मला भेटता येणार नाही. मी कशी इथे एकटी राहू? हा करोना किती अंत पाहतोय.

मी गोंधळात पडले. मला कळेचना, आज्जींना फ्युनरलला जायचे नाहीये की त्यांना जायला परवानगी नाहीये? काहितरी मिस कम्युनिकेशन झाले असल्याची मला शंका आली. मग मी बाहेर जाऊन कॉल करून परिस्थिती नक्की काय आहे, हे विचारले, तेंव्हा मला समजले की संस्थेत पहिलीच करोना केस सापडली असल्याने बाहेरील कोणालाही संस्थेत येणे आणि आतून कोणालाही बाहेर जाणे यावर बंदी केली गेली आहे आणि हा निरोप आज्जींना कळवण्यात आला असून त्यांच्या मुलीला आज इकडे येता येणार नाही आणि आज्जींना उद्या फ्युनरलला जाता येणार नाहीये.

मग परत आज्जींकडे जाऊन मी सॉरी, मला चुकीचे कळले होते, असे म्हणून त्यांचे सांत्वन करायला लागले. तेवढ्यात त्यांच्या मुलीचा फोन आला. ती फार वैतागलेली होती. आईला फ्युनरलला येता येणार नाही, या गोष्टीचे तिला फार वाईट वाटत होते. तिला आत्ता आईला भेटावेसे वाटत होते, पण इकडे येता येणार नाही, म्हणून त्रास होत होता. मग मी तिला व्हिडीओ कॉल विषयी सुचवले आणि तिचा नंबर सेव्ह करून तिला तिच्या आईसोबत कनेक्ट करून देण्याचा प्रयत्न करू लागले.

तेवढ्यात कॉफी ब्रेक झाला आणि आज्जी डायनिंग रूममध्ये गेल्या. ह्यावेळी एकट्याच.. कनेक्शन जोडले जात नव्हते. आज्जींची एक मैत्रीण- दुसऱ्या रुममधली रहिवासी- माझ्याकडे येऊन म्हणाली, आज्जी विचारत आहेत, तू काय करतेयस? मी त्यांना सांगितले, व्हिडीओ कॉल करतेय त्यांच्या मुलीला.

मग एकदाचा कॉल लागला. आज्जींना फोन दिला तर लेकीकडे समोर बघण्याऐवजी सारखा त्या फोन कानालाच लावत होत्या. मोठ्या मुश्किलीने मी त्यांना समोर बघा, हे सुचवत राहिले. मग एकदाचे त्यांना समजले.

मी स्टाफमधील एका जबाबदार व्यक्तीला आज्जींना अपवादात्मक परिस्थितीत फ्युनरलला जाण्याची परवानगी देऊ शकाल का, विचारले असता, त्या त्यावर बॉससोबत चर्चा सुरू आहे, म्हणाल्या. मग जरावेळाने मला कॉल करून कळवण्यात आले की आज्जींना परवानगी मिळलेली आहे, तुम्ही त्यांच्या मुलीला फोन करून कळवा तसे. त्या त्यांना उद्या घ्यायला येऊ शकतात, पण त्यांना खालीच थांबावे लागेल, आज्जींना खाली तू घेऊन जा.

मग आज्जींच्या मुलीला हे कळवले असता, तिला आनंद झाला. तिने सांगितले, आज्जींच्या रूममध्ये आज्जींसाठी फ्युनरलसाठी एक ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक डॉट्स असलेला कॉफी कलरचा शर्ट आणि शूज दोरी बांधून हँगरला अडकवून ठेवलेले आहेत, ते घालून आज्जींना तयार करून उद्या अकरा वाजता खाली पाठवशील का? मी हो म्हणाले.

दुसऱ्या दिवशी साडेनऊच्या सुमारास आज्जींना भेटायला गेले, तर आज्जी ऑलरेडी तयार होऊन लिफ्टने खाली जायला निघालेल्या होत्या. मी त्यांना म्हणाले, आज्जी, तुम्ही इतक्यात तयार? त्या म्हणाल्या, आत्ता माझी मुलगी येईल घ्यायला. मी विचारले, ती तर अकराला येणार होती ना? त्या म्हणाल्या, नाही, आत्ताच येतेय. मग मी म्हणाले, आज्जी, थांबा, चला तुमच्या रूममध्ये. तिला एकदा विचारुया.

रूममध्ये जाऊन तिला फोन करून विचारले, तर ती म्हणाली, मी अकरालाच येणार आहे. आईला हल्ली वेळेचे भान उरलेले नाही. मग मी ठरवले, आज्जींसोबत अकरापर्यंत बसावे, त्यांना सोबत करावी. आज्जींनी पायात सॉक्स ऐवजी ब्लॅक टाईट्स घातलेले होते आणि ते फाटले. त्या रडायला लागल्या. आता मी काय करू, म्हणायला लागल्या. त्यांना धीर देत मी म्हणाले, तुमच्याकडे ब्लॅक सॉक्स आहेत का? त्या शोधाशोध करायला लागल्या. मी मदत केली. सॉक्स खुर्चीवरच होते. तुम्हाला मी घालून देऊ का, विचारले असता, तू हे काम करशील? असे म्हणून कृतज्ञतेने मला थँक्यू म्हणाल्या. मी सॉक्स आणि शूज नीट घालून दिल्यावर मला आज्जींनी मिठीच मारली. तू माझ्या मुलीसारखीच आहेस गं, किती प्रेमाने माझं करतेस, म्हणाल्या आणि रडायलाच लागल्या पुन्हा.

मग म्हणाल्या, "त्या दिवशी तू आम्हाला दोघांना भेटायला आली होतीस, तेंव्हा मी तुझ्याशी अजिबात नीट वागले नव्हते त्याबद्दल सॉरी बरं का." मी म्हणाले, "आज्जी, तुम्ही माझ्याशी नीट वागल्या नाहीत, असे मला जाणवले सुद्धा नव्हते, उलट मी तुम्हाला वेगळे राहण्याचा सल्ला दिला त्याबद्दल मलाच अपराधी वाटत होते आणि त्याच रात्री आजोबा गेल्याने तर खूपच वाईट वाटले मला.." मग आज्जींचा बांध फुटला. म्हणाल्या, "त्या दिवशी आम्ही बराच वेळ गार्डनमध्ये बसलो होतो. मग परत आलो. डिनर केलं. मी आवराआवरी करत होते, हे वाचन करत होते. मी जरावेळाने म्हणाले, झोपायचं नाही का, तर हुं नाही की चुं नाही. मला वाटलं, खुर्चीतच झोपले की काय, म्हणून हात लावला, तर मान अशी खाली कलंडली. मी ओरडून नर्सला बोलवले. नंतर समजले की हे गेलेले आहेत. असं माझ्या हातावर त्यांचं डोकं ठेवून पडले होते गं ते.."

आज्जींना खूप रडू यायला लागलं मग.. "मी त्यांच्या आधी का गेले नाही, मला हे दुःख सहन होत नाही", म्हणू लागल्या. मी त्यांना सावरण्यासाठी बोलत राहिले, "आज्जी, आजोबा भाग्यवान होते. कुठल्याही आजाराने बेडरीडन न होता गेले, आणि ते गेले, तेंव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होतात हे चांगले झाले कारण शिवाय डिमेन्शिया होता ना, ते तुमच्यामागे एकटे कसे राहिले असते.. हे ऐकून त्या सावरल्यासारख्या दिसल्या. त्या म्हणाल्या, "डिमेन्शिया असा विशेष नव्हता गं त्यांना.. थोडा रस्ता वगैरे चुकायचे, पण बाकी बऱ्याच बाबतीत फार शार्प होते ते. कितीतरी कामं हातोहात करत. बावन्न वर्षांचा संसार आमचा.. कशी जगू मी त्यांच्याशिवाय? तू येत जा ना गं मला नेहमी भेटायला. मला फार एकटे वाटते. आता लेकही नाही येऊ शकणार भेटायला पुढचे काही दिवस, ह्या करोनापायी.. मला तुझा नंबर मोठ्या अक्षरात लिहून दे. मी तुला कॉल करत जाईन. मी त्यांना माझा ऑफिसचा नंबर आणि मी संस्थेत असते, त्या वेळा मोठ्या अक्षरात लिहून दिल्या. आज्जींनी मला त्यांचे लग्नाचे आणि लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीचे फोटोजही दाखवले.

तेवढ्यात त्यांच्या लेकीचा फोन आला. आई ऑलरेडी तयार झालेलीच आहे, तर तिला ताटकळत बसवणे मला नको वाटते आहे. मी दहा वाजताच आईला न्यायला येतेय. मला व्हिडीओ कॉल करशील का? आई नीट तयार झालीये की नाही, मला बघायचं आहे. मग कॉल केल्यावर, "आई, लाईट जॅकेट नको, ते डार्क घाल, फ्युनरलला जात आहोत. असे म्हणून ते जॅकेट कुठे आहे, ते ती मला व्हिडीओ वरून पॉइंट आउट करून दाखवू लागली. ते देऊन आज्जींना मी खाली घेऊन गेले. त्यांची रहिवासी मैत्रीणही सोबत आली. पुढच्या पाचव्या मिनिटाला मुलगी संस्थेबाहेर दारात उभी होती. डिनरपर्यंत आईला परत आणून सोडते, म्हणाली. आईची काळजी घेतल्याबद्दल मला खूप धन्यवाद देत ती त्यांना घेऊन गेली. मी ही मग आता आज्जी लेकीसोबत संस्थेबाहेर गेलेल्या आहेत, आजोबांचे फ्युनरल आटोपून डिनरपर्यंत त्या परत येतील, ही माहिती डॉक्युमेंट करायला उदास मनाने ऑफिसरूमकडे वळले.

~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर
०५.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle