मागच्या आठवड्याभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातली एक सकारात्मक म्हणजे ज्या आज्जींची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आलेली होती, त्यांची नंतरची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या रहिवाश्यांची आणि सर्व कर्मचाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आली.
तरीही त्या ज्या मजल्यावर राहत होत्या, तो मजला आयसोलेट करण्यात आला आणि ह्या आज्जी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर आज्जी आजोबांना चौथ्या मजल्यावर म्हणजेच जिथे मी गेले दोन महिने ड्यूटीला होते, तिथे शिफ्ट करण्यात आले आणि तो मजला पुन्हा एकदा आयसोलेट करण्यात आला.
त्या मजल्यावर आत्तापर्यंत राहत असलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या रहिवाश्यांना पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. त्यांनाही रूमबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले होते. जेवणही रुममध्येच सर्व्ह केले जाणार, असे समजले असल्याने त्यातल्या सोशल नेचरच्या आज्जी आजोबांमध्ये पॅनिक परीस्थिती निर्माण झाली.
१ जुलैला आजोबांच्या फ्युनरलाला जाऊन आलेल्या आज्जींची गोष्ट सांगितली आहेच, त्याच दिवशी सर्व आज्जी आजोबांना करोना परिस्थिती आणि दुपारच्या कॉफीब्रेकला सर्वांनी रूममध्येच थांबावे, असे सर्वांना कळवण्यात आल्यावर पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या बाहुलीवाल्या आज्जी पॅसेजमध्येच एकदम जोरजोराने रडायला लागल्या. एक नर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होती. ही परिस्थिती अवघड आहे, पण आपण शांतपणे ती स्वीकारून त्यातून मार्ग काढला पाहिजे, हे ती आज्जींना सांगत होती. माझी घरी जायची वेळ झाल्याने मी जायला निघाले होते, तेवढ्यात समजले की पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या आज्जी आजोबांना कॉफी, लंच, डिनर ब्रेक्समध्ये रूममध्ये बसण्याची गरज नसून ते दोन ग्रुप्समध्ये कॉफीरुम्स मध्ये सुरक्षित अंतरावर बसू शकतात. अर्ध्या तासांचे दोन टाईम स्लॉट्स बनवण्याचे मग त्या दिवशी ठरले.
अचानकपणे बनवलेल्या आणि बदललेल्या नियमांमुळे गोंधळ उडालेला असल्याने काही आज्जी आजोबांना त्यांच्या रूममध्ये कॉफी-केक सर्व्ह केला गेला आणि काही जण कॉमन डायनिंग रूममध्ये बसलेले दिसले. मी सहज एका रूममधल्या आजोबांना भेटून चौकशी केल्यावर समजलं, की ते कॉफीची वाट बघत बसलेले आहेत. मग त्यांच्या शेजारच्या रूममध्येही अशाच दुसऱ्या आज्जी कॉफीची वाट पाहत बसलेल्या दिसल्या. स्टाफला फोन करून विचारले असता, त्यांना ही गोष्ट माहिती नसल्याचे कळले. करोनामुळे बाकी फ्लोअर्सवरून ह्या फ्लोअरवर शिफ्ट व्हावे लागल्याने डबलबेड टाकून रुम्स शेअर करणाऱ्या आज्जी आजोबांमुळे त्या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांची संख्या आता 30 च्या वर होती. त्यामुळे कोणाची कॉफी पिऊन झाली आहे आणि कोण बाकी आहे, हे काम रूम टू रूम जाऊन चेक करणं आवश्यक होतं. किचनमध्ये आधीच मॅनपॉवर कमी असल्याने माझी घरी जायची वेळ झालेली असूनही मग मी प्रत्येक रूममध्ये जाऊन त्या त्या आज्जी आजोबांनी कॉफी-केकचा आस्वाद घेतला आहे की नाही, ते बघून, नसेल घेतला, तर फ्लोअरवरच्या डायनिंग हॉलमध्ये त्यांना जायला सांगून, स्वतःहून जमत नसल्यास त्यांची व्हीलचेअर रोल करून त्यांना तिकडे पोहोचवण्याचं काम केलं आणि मग घरी आले.
दुसऱ्या दिवशी मला फक्त पहिल्या फ्लोअरवरच परत ड्यूटी करायला सांगितले गेले. दुसरा आणि चौथा फ्लोअर आयसोलेट केला गेला असल्याने आता मला तिकडे न पाठवता पहिल्या फ्लोअरवरच थांबण्याचे सांगण्यात आले. मग तिसऱ्या फ्लोअरचे काय? असे विचारले असता एका केअर युनिट सहकाऱ्याला आज त्या फ्लोअरवर ड्यूटीसाठी नेमलेले असून इतर दोन फ्लोअर्सवरही या प्रकारची व्यवस्था केली गेली असल्याचं समजलं. आता कोणत्याही फ्लोअरवरचे एम्प्लॉयीज एकदा त्या फ्लोअरवर काम करायला लागल्यावर त्यांना इतर फ्लोअरवर जाण्याची बंदी करण्यात आली, जेणेकरून कमीतकमी सोशल कॉन्टॅक्ट.
शिवाय ईमेलमध्ये वाचून समजलं की आज्जी आजोबांच्या आंघोळीसुद्धा घालायला बंदी करण्यात आलेली आहे. जे काम १.५ मीटर पेक्षा कमी अंतर ठेवून किंवा १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊन करावे लागते, ते रद्द करण्यात आले असून त्यात आंघोळ येत असल्याने तिला बंदी करण्यात आली. अर्थात, जे आज्जी आजोबा स्वावलंबी आहेत, ते स्वतःच्या हाताने आंघोळ करू शकतील. जे नर्सवर अवलंबून आहेत, त्यांना मात्र फक्त झटपट स्पंजिंग केले जाणार असल्याचे कळले. हा नियम नुकताच आलेला असल्याने आधीच उकाडा आणि त्या दिवशी आंघोळ नसल्याने एका आज्जींची प्रचंड चिडचिड झाली आणि माझ्याजवळ त्या जरा चढ्या आवाजातच ह्या विषयी तक्रार करायला लागल्या. मी त्यांना शांतपणे सुरक्षित अंतर आणि वेळेचे नियम सांगायला लागले,
ते तोडून एक चिडलेली सहकारी मध्येच येऊन आज्जींना रागावलेल्या स्वरात सांगायला लागली, जे नियम बनवलेले आहेत, ते आहेत, त्यावर वाद नको. आहे, ते स्वीकारा. आज्जी मग परत चिडल्या. माझ्याकडे पॉईंट आऊट करून, 'मी हिच्याशी बोलते आहे. तू मध्ये मध्ये बोलण्याचं कारण नाही. तू गप्प बस', असे म्हणून माझ्याकडे बघून 'तू बोल गं' म्हणाल्या. मी त्या सहकारी मुलीला, 'मी त्यांना आंघोळ न घालण्याचं कारण नीट समजावून सांगते आहे. कारण कळलं की त्या नाही चिडणार', असे सांगितले. ती सहकारी दुखावलेली दिसत होती. काही न बोलता तिकडून ती निघून गेली आणि मग मी आज्जींना नीट पद्धतीने नियम समजावून सांगितले. आता आज्जी एकदम समजून घेण्याच्या मूडमध्ये होत्या, त्यामुळे त्यांनी माझं सगळं नीट ऐकून घेऊन मला 'थँक्स' म्हणून त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या.
ह्याच फ्लोअरवर बाहुलीवाल्या आणि इटालियन आज्जीही असल्याने आणि आमचे स्पेशल बॉंडिंग निर्माण झालेले असल्याने त्यांना मला ह्याच फ्लोअरवर जास्तवेळ थांबल्याचे बघून अतिशय आनंद झाला असल्याचे, दोघींनीही सांगितले. मागचा पूर्ण आठवडा मी पहिल्या मजल्यावरच ड्यूटीला असल्याने तेथील सर्व आज्जी आजोबांना व्यवस्थित भेटू शकले, त्यांना वेळ देऊ शकले. त्यातच ज्यांचे मिस्टर नुकतेच वारले, त्या आज्जीही आल्या. त्यांनाही मला रोज वेळ देता आल्याने, त्या फार खुश होत्या.
ह्या आज्जी मधूनच दुःख विसरतात आणि मधूनच त्यांना सर्वकाही आठवून एकदम रडायला येते, भावना अनावर होतात, हे लक्षात आले असल्याने मी त्यांना जास्तीतजास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला. एकदिवस हवामान पावसाळी आणि वादळवाऱ्याचे असल्याने त्या फिरायला गार्डनमध्ये गेल्या नव्हत्या. त्यांना मी आपण फ्लोअरवरच सोबत राऊंड मारुया, हे सुचवल्यावर त्यांना फार आनंद झाला. गेल्या चार वर्षांपासून त्या ह्या संस्थेत राहत असून सोशल नेचरच्या असल्याने त्यांना त्या फ्लोअरवरच्या बऱ्याच आज्जी आजोबांच्या गोष्टी माहिती होत्या, असे त्यांच्या बोलण्यातून समजले.
'ह्या ह्या रूममधल्या अमुक आज्जी आधी माझ्यासारख्याच मिस्टरांसोबत डबल रूम मध्ये राहत होत्या, बरंका! आता मिस्टर वारल्याने सिंगल रूममध्ये मूव्ह झाल्यात, अशी माहिती, तसेच एक आज्जी त्यांच्या एकेकाळी म्हणजे सिनियर केअर होममध्ये शिफ्ट होण्याआधी शेजारीण होत्या, अशी माहिती आणि इतरही बऱ्याच जणांविषयी त्यांनी मला सांगितले. एखाद्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत फिरते आहे, असे त्यांच्यासोबत चालतांना मला वाटत होते.
हीच गोष्ट बाहुलीवाल्या आज्जींची. खूप पूर्वी त्यांच्या रूममध्ये एकदाच जाऊन सगळ्या चित्रविचित्र बाहुल्या बघून अस्वस्थ झाले होते, हे मागे एका भागात सांगितले आहेच, नंतर त्या क्वारंटाईन फ्लोअरवर आल्यानंतर आमचे बॉंडिंग तयार झालेले होते, हेही मागे लिहिले होते, आणि आता आठवडाभर रोज भेटून आमच्या फार छान गप्पा झाल्या. त्या ओघात त्यांनी मला बऱ्याच गंमती जमती सांगितल्या, फॅमिली अलब्म्स दाखवले. आत्ता त्या जशा थुलथूलीत आहेत, तशा त्या एकेकाळी नव्हत्या. त्यांच्या मिस्टरांनी त्यांना बरीच मारझोड केली, मग त्यांच्या आजारी तब्येतीच्या कारणावरून मुलांची कस्टडी स्वतः कडे घेतली. त्यांची मुलं-मुलीही त्यांना रेअरलीच भेटतात, असे समजले. त्यांची एक मुलगीही दुसऱ्या एका अशाच संस्थेत नर्स असून एकदा तिथे आज्जी काहीतरी उपचारासाठी गेलेल्या असतांना ती त्यांना भेटली, तेवढीच त्यांची भेट, असे त्यांनी सांगितले. गंमत म्हणजे ह्या ७० वर्षांच्या आज्जींचा एक ५२ वर्षांचा बॉयफ्रेंड असल्याचे मला नवीनच समजले. आज्जी विभक्त झाल्यानंतर एकट्याच त्यांच्या घरी राहत असतांना हा ही त्याच बिल्डिंगमध्ये राहत होता- अजूनही राहतो आणि बिल्डिंगचा केअर टेकर म्हणून जॉब करतो. हा आणि आज्जी जमेल तेंव्हा भेटतात, असे कळले. त्या देखण्या 'तरुणाचा' फोटो त्यांनी टेबलवर ठेवलेला आहे.
आज्जींनी ह्या सगळ्या बाहुल्या कशा जमवल्या, ह्याचीही गोष्ट मला सांगितली. त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या त्यात फारच कमी, मात्र लोकांनी कचऱ्यात फेकलेल्या आणि त्यांना आवड आहे असे समजल्यावर संस्थेतल्या आज्जींनीही त्यांना काही आणून दिल्याचे कळले. एक बाहुली अगदी हुबेहूब छोट्या बाळाच्या आकाराची असून तिचा किस्सा आज्जींनी मला सांगितला. त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक जोडपं राहत होतं आणि त्यांना मूलबाळ होत नव्हतं, तर त्यातल्या जोडीदाराने त्याच्या जोडीदारीणीला ही बाहुली आणून दिली. त्याने ती फ्रस्ट्रेट झाली आणि जोरजोरात भांडायला लागली. मला बाहुली नको, खरंखुरं मूल हवं आहे. फेक ती बाहुली आधी जाऊन, असे सांगितल्यावर त्याने ती बाहुली खाली जाऊन कॉमन कचऱ्याच्या डब्यात टाकली. आज्जी तेंव्हा तिथेच होत्या. त्या म्हणाल्या, मी नेते ती, आणि उचलून घेऊन गेल्या आपल्या घरी. असे आज्जींकडून त्यांच्या बाहुल्यांचे एकेक किस्से ऐकण्यात मी पार रमून गेले.
तशाच इटालियन आज्जी. आमोरे मियो सकीना, लिबे सकीना म्हणत मला रोज एकेक गंमती जमती सांगत होत्या, माझे मनोरंजन करत होत्या. त्यांचे क्रोएशियन बॉयफ्रेंड आजोबा त्याच मजल्यावर राहत असल्याने ते दोघे रोज एकत्रच सर्व फूड ब्रेक्सना डायनिंग रूममध्ये बसत असत आणि रँडमली ग्रुप्स पाडल्यानंतर त्यांना दोघांना वेगवेगळे ग्रुप्स मिळाल्याने आज्जी एकदम डिस्टर्ब झाल्या. त्यांनी मला ही गोष्ट सांगितल्यावर मी हे काम जिने केलं आहे, तिला त्यांना एकच टाईम स्लॉट देण्याची विनंती केली. तिने ती मानून त्यांना एक स्लॉट दिल्यावर आज्जींचा आनंद गगनात मावेनासा झाला.
ह्या आज्जी त्या क्रोएशियन आजोबांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या असून त्या स्वतः विधवा आणि आजोबा मात्र घटस्फोटित आहेत. ह्या मितभाषी आजोबांना सिगरेटी फुंकण्याचे व्यसन असल्याने ते सतत खाली गार्डनमध्ये जात असतात, ते बऱ्यापैकी फिट असून कसे चालले आहे, ह्या प्रश्नाचे जर्मनमध्ये उत्तर, 'इमर गुट', म्हणजे, 'नेहमीच चांगले' असे हसत सांगत असतात, तर ह्या बडबड्या आज्जी स्थूल असून सतत तक्रारी करत असतात आणि आज्जींना चालण्या फिरण्याची विशेष आवड नसल्याने त्या आजोबा रूमबाहेर गेले, की त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांचे बेडशीट नीट करणे, रूम आवरणे, हे काम करत बसतात. आजोबांना इकडे सर्व्हिस करणाऱ्यांचे काम आवडत नाही, मीच लावलेले, त्यांना आवडते, असे अभिमानाने मला एकदा सांगत होत्या. एकदा रात्री आजोबांना बेडशीटमध्ये शू झाल्याचे आज्जींकडून कळले. त्या आजोबांच्या रुममध्ये उभ्या राहून नर्सला सतत सूचना देऊन नाकी नऊ आणत होत्या. आजोबा फिरून यायच्या आत हे बेडशीट बदला, सगळे नीट स्वच्छ लावा, असे जरबीने सांगून स्वतःला चालता, वाकता येत नसूनही धडपडत तरीही मन लावून एखाद्या संसारी सुगृहिणीसारखे ते काम करत होत्या.
जनरलीच लंचनंतर मी गार्डनमध्ये एक दोन चकरा मारत असते, तेंव्हा हे आजोबा तिकडे बसलेले होते, मग आज्जीही आल्या. त्या दिवशी संस्थेत बाहेरील दुकानांतून वस्तू आणून आज्जी आजोबांना विकत घेऊ देण्याचा दिवस होता, जेणेकरून त्यांना बाहेर जाऊन सामान आणायला नको. ते घेण्याच्या निमित्ताने आज्जी तिकडे आल्या होत्या. मला पाहून त्या परत रूमकडे जाण्यासाठी लिफ्टमध्ये जाताजाता परत आल्या.
त्यांनी चोकोबार आईस्क्रीमची काही पाकिटं घेतलेली होती. आमोरे मियो सकीना, घे, हे खा म्हणून एक मला देऊन आजोबांनाही दिले, तर त्यांनी घ्यायला नकार दिला. मग मी आणि आज्जींनी बाकावर बसून त्या आईस्क्रीमचा आस्वाद घेत घेत गप्पा मारल्या. आज्जींना जर्मन विशेष येत नसल्याने त्या तोडक्यामोडक्या भाषेत व्यक्त होतात. माझेही जर्मन काही ग्रेट नसल्याने मला त्याने त्रास होत नाही, मात्र आजोबा आज्जींवर फार इरिटेट झालेले दिसले. त्यांनी थोडावेळ शांतपणे सिगरेट फुंकली, मग आज्जींना (अर्थातच जर्मन भाषेत) ओरडले, 'ए गप्प बस गं बाई, किती भुणभुण भुणभुण लावली आहेस कानाला, तू काय बडबडतेस, ते एकतर इथे कोणालाही समजत नाही. बंद कर ते थोबाड!" आजोबांचे हे रूप माझ्यासाठी नवीन होते. भाषा अतिशय तुसडी असली, तरी चेहऱ्यावरचे भाव आणि टोन प्रेमाच्या माणसाशी बोलतोय, असाच होता, त्यामुळे माझी आणि आज्जींची नजरानजर झाली आणि आम्ही दोघी प्रचंड हसलो. आज्जींनी बडबड काही थांबवली नाही. मग मीच जरावेळाने तिकडून उठून आज्जींना चोकोबारसाठी धन्यवाद देऊन फ्लोअरवर परत गेले.
एकंदरीतच आपल्या घरच्या माणसांसोबत राहत असल्याचा फील मला ह्या पहिल्या मजल्यावर मागच्या आठवड्यात आल्याने मी जॉब करते आहे की एका घरातून उठून दुसऱ्या घरी जाते आहे, असेच मला वाटत होते. थोडक्यात, हा आठवडा माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर ठरला!
~सकीना(कुमुद-प्रमोद) जयचंदर
१४.०७.२०२०
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com