आज सकाळी उठल्यावर बऱ्याच दिवसांनी त्रिशाला संपूर्ण मोकळं वाटत होतं. उठल्यानंतर पंधरा वीस मिनिटे तिने बेडवर बसून कालच्या सगळ्या गोष्टींची उजळणी करण्यात घालवले, विशेषतः रात्री तिच्यात आणि नकुल मध्ये जे काही घडलं होतं त्याची. पहिल्या दिवसापासून त्यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काल रात्री कोणी काहीच न बोलता संपलं होतं यावर तिचा विश्वास ठेवूच शकत नव्हती. रविवार चा दिवस यापेक्षा अजून चांगला काय असू शकतो? मीनाक्षीचा आज दिवसभर ओम बरोबर वेळ घालवण्याचा प्लॅन होता त्यामुळे चक्क सुटीच्या दिवशी रडत का होईना ती उठून आवरायला लागली होती. त्रिशाही तिचं सगळं उरकून निवांत टीव्हीसमोर जाऊन म्युजिक चॅनल सर्फ करत बसली. मीनाक्षी बाहेर पडल्यानंतर ती दार लावायला उठली तेव्हा नकुल जिन्यातून वर येताना दिसला.
"हेय" नकुलने तिला पाहून हात वर केला, नेहमीच्या मोठ्ठ्या स्माईल ऐवजी नाजूक हसला.
क्युट!! एका रात्रीतच दृष्टीत केवढा बदल होऊ शकतो या विचाराने तिला हसू आलं. पापण्या फडफडवत तिने डोक्यातले विचार झटकले आणि दारातून बाहेर आली.
"व्हाट्स सो फनी?" नकुलने त्याच्या दाट भुवया गोळा करत विचारले.
"नॉट फनी!" त्रिशा हसत म्हणाली.
"त्या तुमच्या एडवर्डला बेलाच्या मनातलं ऐकू येत नाही म्हणून तो का फ्रस्टेट होत असेल ते मी समजू शकतो"
त्रिशा मनमोकळी हसली.
"ठीक आहे, थेटच विचारते. काल जे घडलं त्याबाबत आपण कधी बोलणार आहोत?"
"नेमकं कशाबद्दल?" नकुल काहीच न घडल्यासारखं दाखवत असला तरी ते त्याला जमत नव्हतं.
"माझ्याबद्दल तुझं मत एकदम कसं बदललं?" त्रिशा त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली.
"ओह! दॅट वज नथिंग. आधीच खूप ताणलं गेलं होतं, आता संपवून टाकणं गरजेचं होतं. दॅटस् ऑल! " असं म्हणत तो त्याच्या घराच्या दाराकडे निघाला. त्रिशाने पुढे होऊन त्याचा दंड धरला. त्याने मागे बघत आधी हाताकडे आणि मग वर तिच्याकडं पाहीलं.
"मला जाणून घ्यायचंय"
त्याने मोठ्याने श्वास सोडला.
"ठीक आहे!" तो तसं म्हणल्याबरोबर त्रिशा तिच्या घरात जाऊन फ्रीज सोडून जे काही बंद करण्यासारखं होतं, करून त्याच्याकडे आली.
तोवर तो सोफ्याला टेकून, पायावर पाय टाकून खाली फरशीवरच बसला होता. हातातल्या रिमोट ने चॅनेल सर्फ करत होता. ती त्याच्या शेजारी त्याच्या दिशेने तोंड करून मांडी घालून बसली.
"आशिष कुठेय?" तिने बसल्याजागी आत डोकावत विचारलं.
"सकाळीच पायलला, त्याच्या बहिणीला भेटायला गेलाय. कालच्या पार्टीत तिला येता आलं नाही म्हणून. त्याच्याकडून लंच उकळल्याशिवाय तिला राहवलं नसतं"
त्रिशा यावर फक्त डोकं वर खाली हलवून त्याच्याकडे पहात बसली.
त्याचं तिच्याकडे लक्ष जाताच त्याने मान हलवली.
"ओके,ओके" थोडं थांबून शब्द गोळा करत तो बोलायला लागला "तुला बाबा नाहीयेत हे काल मला कळलं"
ती काही म्हणणार त्या आधीच तो पुन्हा बोलायला लागला.
"मीनक्षीला बाकीच्यांनी सहज तुझ्याबद्दल विचारलं म्हणून तिने सांगितलं, हेही सांगितलं की तुला त्याबद्दल बोलायला आवडत नाही."
"हम्म म्हणजे सिम्पथीमुळे तू मागचं एवढं महाभारत विसरलास"
" सिम्पथी? हो. पण फक्त तेवढंच नाही" बोलताना मध्येच तो थांबला "काही वर्षांपूर्वी मी ही यातून गेलो आहे, त्यामुळे मला जेव्हा कळलं त्यानंतर मी तुला हार्ड टाईम देऊच शकलो नसतो."
त्रिशा शांत बसून त्याच्याकडे पहात होती. तिला त्याच्याबद्दल अजुन जाणून घ्यायचं होतं. यु लिटल हिपोक्रीट! स्वतःबद्दल कोणाजवळ बोलायला तुला नको असतो! ती स्वतःशी म्हणाली. पण नकुलला तिने तसं विचारण्याची गरज नव्हती, त्याला सांगायला कधीच हरकत नव्हती.
"माझी दहावी झाली आणि त्या सुट्ट्यातच बाबा गेले. त्या आधी जवळजवळ सहा महिने ते बेड पेशन्ट होते"
नकुल शून्यात बघत आठवत म्हणाला.
"शाळेत असताना मी एकदम भटका होतो. कायम बाहेर मित्रांबरोबर, त्यांच्या मित्रांबरोबर भटकत असायचो. मी घरी येत नाही तोवर आई, बाबा, ताई सगळ्यांच्या डोक्याला वैताग असायचा. बऱ्याचदा भांडणं घेऊन यायचो ते वेगळंच"
"त्याबद्दल मला अजिबात शंका नाहीये " त्रिशा त्याला बाहेर आणण्यासाठी म्हणाली.
"त्यावरून मी खूपदा बाबांचे बोलणे खाल्ले होते. आमचं नातं साधारण असं होतं. मी काहीतरी करणार आणि ते मला रागावणार, आणि रिपीट. त्यांच्या बोलण्याचा मला नंतर नंतर काही फरकही पडत नसायचा. मी दहावीत होतो तेव्हा एक मोठा मॅटर झाला. माझ्या त्याच मित्रांनी थ्रिल म्हणून एक दिवस गावातल्या कोणाच्यातरी गाडीचा पार्ट चोरला, तो विकला आणि मिळालेल्या पैशात पार्टी केली. वेल, चोरताना मी त्यांच्यात नव्हतो पण नंतर त्या पैशात मजा करताना होतो. चोरणारे भुरटेच, एका दिवसांत पकडले गेले. गोष्ट पोलिसांपर्यंत गेलेली पाहून माझे हातपायच गळाले. एवढे दिवस फक्त रागवून सोडून देणारे बाबा आता माझी कशी पूजा बांधतील त्याचा विचार करूनच मी अर्धमेला झालो होतो. पोलीस स्टेशन मध्ये आम्ही पाच सहा जणं, आमचे पालक, ज्याचा पार्ट चोरला तो मालक अशी सगळी जत्रा जमली होती. आमच्यातले दोघे सोडले तर आम्ही सगळे अंडर एज होतो. बऱ्याच चर्चा, बोलणी आणि आमच्यावर शिव्यांचा वर्षाव झाल्यानंतर त्या मालकाने आणि पोलिसांनी मिळून आम्हा सगळ्यांकडून त्या पार्ट ची नुकसान भरपाई आणि वर चोरल्याबद्दल दंड अशी रक्कम घेऊन मग आम्हाला सोडायचे ठरवले. मला वाटलं होतं, पैसे तर सोडाच पण बाबा मला घरातून कायमचं हाकलून लावतील. पण बाबा तो पूर्ण दिवस काही बोलले नाही. माझ्या वाटेला आलेली रक्कम त्यांनी जमा केली. रात्री आई आणि ताई मात्र माझ्यावर भडकल्या. पोलीस स्टेशन ची पायरी चढावी लागली हे तर होतंच, वर भुर्दंड भरावा लागला त्यामुळे त्या जास्त तळतळ करत होत्या. पण त्यापेक्षा बाबांचं गप्प बसणं मला खूप लागत होतं. त्यांनी माझ्याशी संबंधच तोडून टाकलाय अशीच माझी खात्री झाली होती. अशाच तंग वातावरणात आमचं जेवण उरकलं. रात्री हॉल मध्ये मी एकटा नुसताच पडून राहीलो होतो तेव्हा बाबा आले आणि एव्हढंच म्हणाले,
"भानगडी जेव्हा स्वतःच्या स्वतःला निस्तरता येतील आणि बापाची गरज लागणार नाही अशाच वेळी कर. तोपर्यंत आम्ही सांगतो तसं वाग"
त्या एका वाक्याच्या जोरावर मी पूर्ण वर्ष अगदी शहाण्या मुलासारखं काढलं. एवढं होऊन सुद्धा दुसऱ्याच दिवशी ते ऑफिसवरून येताना माझ्यासाठी फुटबॉल विकत घेऊन आले होते. मागे वर्षभरापूर्वी त्यांनी मला मित्राकडे होता तसा क्रिकेटचा महागडा सेट घेऊन दिला नव्हता आणि मी चिडून तीन चार दिवस त्यांच्याशी बोललो नव्हतो, ते आठवून मला स्वतःचीच लाज वाटली. त्या पूर्ण वर्षात पुढे जाऊन बाबांना मला त्यांचा मुलगा म्हणायला अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याबद्दल बरंच काही मी ठरवलं होतं. पण नंतर बाबाच राहिले नाहीत.
ते गेले तेव्हा आम्ही सगळ्या बाजुंनी कमकुवत झालो. मानसिक आर्थिक. म्हणायला माझे काका होते पण पैशांचा प्रश्न आला तसे त्यांनी हात वर केले. त्या काळात मी आणि ताई काही ना काम करून खर्चाला हातभार लावत होतो. माझं इंजिनिअरिंग करण्याचं स्वप्न होतं पण आता तेवढा खर्च करण्याची आमची परिस्थिती नव्हती. सेव्हिंज त्यावर उडवण्याइतका घरच्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता. दुसरं काही करण्याची माझी इच्छा नव्हती. .मी पुन्हा पहिल्यासारखा झालो. तोवर बारावीत आलो होतो, अभ्यास, करियर हे विषय सोडूनच दिले होते. पण बाबा कदाचित अजूनही माझ्या पाठीशी होते.
गौतम समदरिया, म्हणजे आशिष चे वडील होलसेल गुडस् चे व्यापारी आहेत. आशिष टपोरीगिरी करण्यात आमच्यात कधीच नव्हता पण आमची मैत्री त्या आधीपासून होती. आम्ही बरोबर मोठे झालो होतो. ताई, मी आशिष, पायल आणि त्यांची चुलत भावंडं आम्ही सगळे लहान होतो तेव्हा जवळपास रोज त्यांच्या त्या मोठ्या दुकानात खेळायचो. बाबा आणि त्यांचीही चांगली ओळख होती. कुठूनतरी त्यांना माझी अवस्था कळली. एक दिवस त्यांनी मला दुकानात बोलावून घेतलं, काही प्रश्न विचारले आणि थेट तुझ्या शिक्षणासाठी मी खर्च करतो म्हणाले. त्या बदल्यात रोज कॉलेज झाल्यांनंतर इथे येऊन काम करावं लागेल ही अट घातली. नंतर कमावता झाल्यावर मग जमेल तसं ते पैसे परत करण्याची मुभा दिली. आमच्या पूर्ण एरियात माझी विशेष ख्याती असतानाही त्यांनी एवढी तयारी दाखवल्यामुळे मी भारावून गेलो. कुठलाच विचार न करता मी त्यांच्या अटी स्वीकारल्या. आणि खरोखर त्यांच्याकडे मी अजिबात न कुरकरता पडेल ते काम केलं. दुकानातल्या मुख्य अकाउंटंट च्या हाताखाली करण्यासाठी अकाउंटिंग चं काम शिकून घेतलं, रोज रात्री कॅश मोजणं, बिल्स लावून ठेवणं, वेळ आली तर सामानांची खोकी, पोते उचलायला मदत करणं इथपासून ते आशिष ची आई- साधना समदरिया, त्यांनी कॉलेजातून येताना आणायला सांगितलेली भाजी आणणं, स्वयंपाकघरातलं गॅस सिलेंडर बदलून देणं, त्यांच्या घरातल्या लहान मुलांना आणून नेऊन सोडणं इथपर्यंत कामं केली"
इथे त्याने बोलता बोलता एक पॉज घेतला. बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट वगळून सांगायची असल्यास तसा.
"कॉलेजमधून आलो की रात्री दहापर्यंत मी तिथेच असायचो.तिथुन पुढे अभ्यास. पुष्कळ वेळा मला कॉलेजला दांडी मारायचीही वेळ येत असायची. फक्त परीक्षा असतील त्या काळात आधी आठ दिवस आणि परीक्षेचे दिवस ते मला सुट्टी द्यायचे. मी आणि आशिष बरोबर शिकलो. त्याला माझे कष्ट पाहून त्याच्या पपांचा राग येत असायचा. त्याच दिवसांमध्ये आम्ही अजून चांगले मित्र झालो. सो फार, ते दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात कठीण आणि सगळ्यात चांगले दिवस होते. बाबा तेव्हा असायला हवे होते असं नेहमी वाटतं. पुढे माझं इंजिनिअरिंग झालं, कमवायला लागलो. त्यांचे पैसे चुकते करणं ही प्रायोरिटी ठेवली. फक्त बाबांच्या नावामुळे त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं होतं. त्यांना माझ्याकडून फुकट काम करून घेण्याचीही गरज नव्हती, केवळ माझी परीक्षा म्हणून आणि मला पैशांची किंमत कळावी यासाठी ठरवून त्यांनी हे केलं, हे मला नंतर मी कमवायला लागल्यावर कळलं. या सगळ्यांतून मी जे काही शिकलो ते माझ्या या शिक्षणापेक्षा खूप जास्त होतं. आज माझ्यात जे काही चांगले गुण असतील ते केवळ माझे बाबा आणि या माणसांमुळे आहेत"
त्रिशा एव्हढ्यावेळ त्याच्याकडे एकटक बघत ऐकत होती. शाळेत जाणारा नकुल, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांऐवजी बाबांना घाबरणारा नकुल, रात्री दहापर्यंत काम करून घरी आल्यावर अभ्यास करणारा नकुल हे सगळे नकुल तिला डोळ्यापुढे दिसले. आता त्याच्या प्रत्येक आठवणींबरोबर ती स्वतःच्या आठवणींची तुलना करून पहात होती. शेवटी त्याने हात तिच्या चेहऱ्यावरसमोर नेऊन हलवला तेव्हा ती वर्तमानात आली.
"आपण स्वतःवर आलेल्या परिस्थितीचा केवढा बाऊ करतो याचा विचार करत होते. तुझ्या अर्ध सुध्दा मी हँडल करू शकले नाही आणि अजूनही करू शकत नाही. तू ज्या सगळ्यांतून गेला आहेस, त्यामानाने मी खूप जास्त आरामात, लाडात वाढलेय आणि तरी.. " डोन्ट.." त्याने त्याची बोटं तिच्या ओठांवर ठेवली. त्याने काढून घेतल्यानंतर तिने त्याचा हात दाबून धरला.
" आपल्यावर आलेली वेळ आपली असते, दुसऱ्यांबरोबर कमी-जास्त अशी तिची तुलना होऊच शकत नाही. करायची पण नाही. परीक्षेत सगळ्यांना सारखे मार्क पडत नसतात, मला वेळीच मदत मिळाली नसती तर मी नापास झालो असतो."
"नाही" त्रिशा मान हलवत म्हणाली " मी अजून त्यातून बाहेर आले नाहीये. मी बाबांच्या नसण्यावरून अजून पूर्ण मूव्ह ऑन झालेली नाहीये. कितीही प्रयत्न केला तरी मला अजूनही जमत नाहीये"
" कोणी सांगितलं तुला मूव्ह ऑन होण्यास?त्याच्या बरोबर जगायचं शिकून घे. हे सगळं घडलेलं आपली स्ट्रेंथ आहे, विकनेस नाही"
यावर त्रिशाकडे बोलायला काहीच नव्हतं. हा दृष्टिकोन तिच्यासाठी नवा होता. आजवर तिने हे सगळं कोणाजवळ बोलून न दाखवल्यामुळे ती तिच्याच गुंत्यात अडकून पडली होती. तो कुठल्यातरी अगम्य भाषेत बोलतोय अशा नजरेने ती त्याच्याकडे पहात राहीली. शेवटी त्याने मान हलवत डोळे मिटून एक मोठा श्वास घेऊन सोडून दिला, तिने अजूनही धरून ठेवलेला हात सोडवून घेतला, स्टेडी फास्ट मोशन मध्ये तिच्याकडे पूर्ण वळून तिचे ओठ ओठात घेतले. दोन सेकंड हलकासा किस करून तो पुन्हा बाजूला झाला. तिचा ब्लडफ्लो डोक्यापासून ते पायापर्यंत प्रवास करत गेला तरी यावेळी दोघांसाठी हे अगदीच अनपेक्षित नव्हतं.
"याचा पण काहीच अर्थ नसेल ना?"
पाय सरळ करत त्याच्या दंडाला हाताने वेटोळा घालून टीव्हीतली चित्रं बघत ती म्हणाली
त्याला हसू आलं.
"मला कळला की सांगतो" म्हणत तो परत रिमोट घेवून चॅनेल सर्फ करायला लागला.
क्रमशः