ऐल पैल 22 - नॉस्टॅल्जीया

नकुलला दुसरीकडे रहायला जाऊन महिना होत आला होता. त्रिशाच्या ऑफिस- साल्सा- घर- नकुल या क्रमाने गोष्टी चालूच होत्या आणि नकुल नंतर पायल चा भाग येऊन गाडी पुन्हा स्क्वेअर वन येत होती. फरक एवढाच होता, त्रिशाला आता त्याचा त्रास होत नव्हता. ही परिस्थिती तिच्या सवयीची झाली होती.
नकुल समोर असताना मनातला राग, कन्फ्युजन, सारासार विचार जाऊन पुन्हा त्याची जागा नकुलच कधी घेत हे तिलाही कळत नसायचं, त्यामुळे संपर्क तोडून टाकणं हा उपाय कामाला आला होता. मनात एक पोकळी घेऊन चाकावर फिरत राहण्याऱ्या उंदरासारखं आयुष्य सतत चालत असून तिथेच रहात होतं.

त्रिशा ऑफिसमधून निघाली. बसमध्ये बसल्या बसल्या तिने सहज पर्सनल इमेल अकाउंट उघडून पाहीलं. इमेल स्क्रोल करत असताना 'रिचा वर्मा' नावाचा इमेल तिने उघडून पाहीला आणि पाहून ती एकदम उडालीच. बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग असलेला निओलॉग मधला तो इंटरव्ह्यू कॉल होता. तिने तिथेच बसल्या बसल्या तीन दिवसांनंतरची तिची अवेलेबिलिटी कळवून टाकली. त्या इमेलने काही आठवड्यांपासून चाललेल्या तिच्या स्थिर, संथ, अस्वस्थ आयुष्यात थोडीशी excitement आली.
घरी आल्यानंतर जेवण आटोपून लगेचच तिने कपाटातून बेसिक्स ब्रश अप करण्यासाठी म्हणून जुन्या नोट्स, पुस्तके काढली. हॉल मध्ये येऊन खुर्चीत मांडी घालून नोट्स ची पाने चाळू लागली. घरात येतानाच समोरच्या घरातून आज जास्त माणसांचे आवाज येत असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. नकुल गेल्यापासून तिचा त्या घराशी संबंध तुटला होता. आशिष येता जाता दिसलाच तर फक्त ओळख दाखवणे आणि फॉर्मल चौकशी करणे एवढंच बाकी राहीलं होतं.
बसून तिला कसाबसा अर्धा तास होत नाही तोच समोरून मोठ्याने टिव्हीत चाललेली क्रिकेट कॉमेंट्री, टिव्हीतल्या आणि बाहेरच्या माणसांचा जल्लोष ऐकू येऊ लागला. त्रिशाने दोन तीन वेळा दुर्लक्ष केलं. पण जसं ती थोडंसं एकाग्र होण्याचा प्रयत्न करायची, तसा मोठा आवाज होऊन ते भंग व्हायचं. पाच मिनिटे त्रिशा तशीच बसली. शेवटी न राहवून दार उघडून ती समोरच्या दारासमोर जाऊन थांबली. हो नाही करत तिने बेल वाजवली.
दार उघडले गेले तसा आवाज वाढत गेला आणि समोर पायल येऊन उभा राहीली. त्रिशा एकदम भांबावली. तिच्याच नादात बाहेर आलेल्या पायलचं हसू त्रिशाला पाहून मावळलं.
"ओह, हाय पायल." त्रिशा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
"हाय."
"तू कधी आलीस इथे?" त्रिशाने अडखळत विचारलं.
"संध्याकाळीच."
"अच्छा."
"मी आशिषला बोलावते." म्हणत पायल तिथून जाण्याचं बघत होती.
"नाही, ठिकेय. मी खरंतर हॉल मध्ये जरा इंटरव्यू साठी प्रिपेर करत बसले होते, खूप मोठा आवाज येत होता, म्हणून सांगायला आले होते." त्रिशा अडखळतच बोलत होती.
"ओह, सॉरी, मी सांगते. माझे कझीन्स पण आहेत त्यामुळे गोंधळ अजूनच वाढला."
"थँक यु." त्रिशा ऑकवर्ड हसत म्हणाली.
"ओके." पायल आत जात दार लावून घेऊ लागली तोच त्रिशाने मनाशी काही ठरवत पुन्हा तिला आवाज दिला.
"तुला दहा पंधरा मिनिटे वेळ आहे? मला जरा बोलायचं होतं."
"माझ्याशी?" पायल पुन्हा बाहेर येत म्हणाली.
"हो. तुला वेळ असेल तर."
" नकुलबद्दल?" पायलने तिच्याकडे रोखून बघत थेट मुद्द्याला हात घातला.
त्रिशा गोंधळली. पायल काही म्हणणार तोच सावरून म्हणाली,
"नाही, तुझ्याबद्दलच."
पायलच्या भुवया आपोआप गोळा झाल्या. तिच्याकडून नकार येणार असल्याचं ओळखून त्रिशा आधीच म्हणाली.
"प्लिज पायल, फक्त दहा मिनिटे."
"ठीक आहे." पायल विचार करत म्हणाली.

घरात येऊन दोघी समोरासमोर बसल्या. बाहेरून टीव्ही आणि जल्लोषाचा आवाज येतच होता.
"नकुलने मला सगळं सांगितलं. तुला अंधारात ठेऊन त्याने परस्पर जे ठरवलं होतं ते मलाही पटलं नाही." त्रिशा म्हणाली.
पायलने खांदे उडवले.
"झालं ते झालं."
"तू कशी आहेस आता?" त्रिशाने विचारलं.
"ओके, म्हणजे काय करू शकते अजून? खूपच अनपेक्षित होतं सगळंच." पायल जेवढ्यास तेवढं बोलत होती.
ती काही सेकंद थांबून पुढे म्हणाली.
"सो, तुमचं कसं चालू आहे? त्याने सांगितलं होतं मला तुमच्याबद्दल." पायलने उगीचच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
"नकुल इथून गेल्यापासून आमचा संपर्क नाहीये."
पायलने एकदम त्रिशाकडे पाहीलं.
"काय? हे सगळं घडलं म्हणून?"
त्रिशाने मान खालीवर हलवली.
"त्याने मला ती घटना, त्यामागची कारणं सगळं काही सांगितलं. हे सगळं कळल्यानंतर मला पहिल्यासारखं त्याच्याकडे बघताच येत नाहीये. म्हणून काही दिवस आम्ही असंच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगितलं हे चांगलं केलं पण."
"वॉव.. तुमच्यात एवढे कॉम्प्लिकेशन्स तयार होतील असं मला अजिबातच वाटलं नव्हतं." पायल म्हणाली.
त्रिशाने त्यांच्याबद्दल सांगितल्यानंतर पायलला तिच्याशी बोलायला जरा मोकळं वाटायला लागलं. थोडंसं थांबून ती म्हणाली.
"वी गो लॉंग बॅक यु नो. शाळेत असल्यापासून. आम्ही एकत्र खेळलो, मोठे झालो. ममाला तो आमच्यात खेळलेला आवडायचा नाही, त्याचे बाहेर बरेचसे उद्योग चालायचे म्हणून. त्याच्या त्या ग्रुपबद्दल मला मात्र प्रचंड उत्सुकता असायची. त्याच्याकडून मी त्यांच्या सो कॉल्ड अडवेन्व्हचर्स ची सगळी माहिती घेत असायचे."
पायल नॉस्टॅल्जिक होऊन बोलत होती.
" एकदा त्या मुलांनी एक चोरीचं प्रकरण करून ठेवलं होतं, त्यातून त्यांना पैसे ही मिळाले होते. लॉंग स्टोरी." नकुलने मागे त्रिशाला हे सांगितलं होतं ते तिला आठवलं.
"ते तर माझ्यासाठी खूपच थ्रिलिंग होतं. त्याला मी सहज म्हणाले, मला पण आवडलं असतं तुमच्याबरोबर येऊन ते पैसे उडवायला. मी म्हणाले काय, शाळेतून येताना तो मला बरोबर घेऊन गेला. त्याच्या वाटेला त्यातुन जे पैसे आले होते, त्यात आम्ही चोरून मस्त काय काय खाऊन आलो होतो. नंतर पोलीस वगैरे भरपूर लोचे झाले होते. आपण पण त्यात सामील आहोत हे पाहून अजूनच भारी वाटलं होतं मला "
पायल हसत म्हणाली.
"त्याला काही म्हणून दाखवलं, की ते केल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही. मागे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा गावात रात्री बारा नंतर वेताळ देवळाजवळ एक बाई फिरताना दिसते अशी अफवा होती. ही मुलं तिथे जाऊनही आली होती आणि आम्हाला ती बाई दिसली असं सगळीकडे पसरवून दिलं होतं. एंटर्स पायल! मी आशिषला जाण्याबद्दल म्हणाले, त्याने नेहमीप्रमाणे ते उडवून लावलं. मग मी नकुल ला म्हणाले, काही झालं तरी मला ती बाई पहायचीये. ती सगळी अफवा आहे असं त्याने मला सिक्रेटली सांगितलं पण मला कमीतकमी तिथे जाऊन येण्याची इच्छा होती. बस, म्हणायचा उशीर, मला घेउन जायला तो एका पायावर तयार झाला. आम्ही दोघे प्लॅन करून रात्री घरच्यांना चुकवून दोन किलोमीटर चालत जाऊन तिथे गेलो, थोडावेळ तिथेच थांबलो. त्याला काहीच त्रास नव्हता, पण मी मध्यरात्री माझ्या घरातून चोरून रात्री बाहेर पडतेय , तेही भूत बघायला, हे माझ्यासाठी मोठं अडवेन्चर होतं. झोपलेच नाही मी त्या रात्री! "
त्रिशाने कॉलेजमधल्या पायल-नकुल ला डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. ती साल्सा शिकते हे कळल्यानंतर क्लब मध्ये घेऊन जाण्यासाठी तो किती मागे लागला होता हे तिला आठवलं.
"मला तो आवडायचा त्या मागे कारणं होती यु नो" पायल त्या आठवणींतुन बाहेर येत म्हणाली. "अर्थात, त्याच्या चार्ममुळे मी त्याच्याकडे attract झालेच होते, पण या सगळ्या गोष्टी तो माझ्यासाठी करायचा त्यामुळे मला अगदी स्पेशल वाटत असायचं. सॉरी, मी तुझ्या बॉयफ्रेंड बद्दल बोलतेय, पण आम्ही जास्त जुने आहोत ना? " पायलचा मूड पुन्हा बदलला.
"मग तो प्रसंग घडला आणि आता चार-पाच वर्षांनंतर मला हे सगळं कळालं. केवढी भ्रमात होते मी? खूप कठीण आणि अनबिलिवेबल होतं हे सगळं. "
"मी समजु शकते." त्या प्रसंगावरून पायल नकुलच्या बाजूने काहीतरी बोलेल अशी त्रिशाला अपेक्षा होती. नकुल पायल ने काकांना का सांगितलं नाही आणि काकांपर्यंत ते का गेलं नाही याबद्दल म्हणाला होता, त्रिशाला त्यात आता तथ्य वाटत होतं.
ती पुढे म्हणाली,
"मला तुझ्याशी त्यामुळेच एकदा बोलायचं होतं. आशिषकडून तुझा नंबर घ्यावा असं मला कित्येकदा वाटलं पण कुठलं कारण सांगावं हे कळलं नाही. त्यात यामध्ये तुमचा फॅमिली मॅटर ही गुंतलेला होता, त्यामुळे तुमच्याकडे तो विषय काढायला मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. "
" नकुलने त्यानंतर मला दोन वेळा कॉल केला पण मी उचलला नाही. एवढ्यात मी पुन्हा त्याच्याशी बोलेन असं नाही वाटत मला." पायल म्हणाली.
"हम्म" त्रिशा त्यावर विचार करत एवढंच म्हणाली. "थँक्स पायल. तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. हे सगळं तुझ्यासाठी खूप मोठं आहे पण सगळं विसरून जा एवढच म्हणेन मी." हे म्हणणं किती सोपं आहे, ती मनाशी म्हणाली.
" मीही तुला हेच सांगेन. अर्थात तुझा, तुम्हा दोघांचा निर्णय." पायलला त्या दोघांचा एकत्र उल्लेख करायला जड जात होतं. ती उठली.
"ओके, मी जाते आता. माझे भाऊ म्हणतील कुठे गायब झाली अचानक."
"ओके, भेटू पुन्हा." त्रिशा म्हणाली
पायल घरात गेली त्यानंतर काही सेकंदांनी टीव्हीचा आवाज कमी झाला. सगळ्या गोष्टींवर विचार करून त्रिशा पुन्हा नोट्स चाळायला लागली. नकुल आणि पायल दोघांकडे पहायला तिला वेगळा दृष्टिकोन मिळाला होता.
.............

"Congratulations and welcome to the organization! You will get an email from HR for further details."
"Thank you." म्हणत त्रिशाने स्माईल करत मॅनेजर बरोबर हात मिळवला. एकाच वेळी तिला जड आणि हलकं दोन्ही वाटत होतं. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आज मै उपर फिलींग घेऊन धडाधड पायऱ्या उतरत ती खाली आली. आल्याबरोबर तिने मीनाक्षीला कॉल केला.
"मीनू, सिलेक्शन झालं! " फोन उचलल्याबरोबर ती ओरडली.
"येयss पार्टी" तिकडून मीनाक्षी दबक्या आवाजात ओरडली. तिच्या बाजूने माणसांची वर्दळ ऐकू येत होती.
"कधीही , कुठेही." त्रिशा इकडून म्हणाली.
मीनाक्षीशी बोलत ती बिल्डिंग च्या गेट मधून बाहेर पडली. बोलता बोलता तिचं लक्ष समोर गोल करून उभा असलेल्या ग्रुपकडे गेलं. पाठमोरा, खिशात हात घालून उभा असलेला असं ओळखीचं दृश्य तिला दिसलं.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle