ऐल पैल 23- भेट

"ओके मीनू, घरी आले की बोलू." त्रिशाने त्याच्याकडे बघत फोन ठेऊन दिला.
ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघत ती पुढे आली. जशी ती त्यांच्याजवळ येत होती तसं तिच्या दिशेने तोंड करून उभा असणाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे जाऊ लागलं. त्यांना तसं बघताना पाहून त्यानेही मागे वळून पाहीलं.
त्याला पाहून त्रिशाचा नकळत आ झाला आणि एकदम तोंडावर हात ठेवत ती हसायलाच लागली. तो आश्चर्याने डोळे मोठे करत तिच्याकडे पूर्ण वळून उभा राहीला. ती एवढी का हसतेय ते कळून तोही हसायला लागला. किती दिवसांनी त्याचं आजूबाजूचा आसमंत उजळवून टाकणारं मोठ्ठं हसू तिला दिसलं होतं. त्यावरून बळच नजर हटवून तिने बाकी लोकांकडे पाहीलं.
"सॉरी.." ती हसत हसतच म्हणाली.
"तू जरा बाजूला येतोस?" पुन्हा त्याच्याकडे पहात हसू आवरत म्हणाली. अनपेक्षित भेटीने दोघेही आतून हलून गेले होते. काहीच न बोलता ग्रुपपासून दोघे लांब आले.
"काय झालं हे तुला नकुल?" त्याच्याकडे वळून उभा रहात ती हसत म्हणाली.
नकुलचा नेहमीचा क्रू कट जाऊन केस जरा वाढलेले होते. मुलांचा एरव्ही असतो तसा रेग्युलर हेअर कट तयार झाला होता.
"एवढं हसू येण्यासारखं काही नाहीये. " तिच्या हसण्यावर नकुल रागावत, हसत, थोडासा लाजत म्हणाला.
"आणि तू चक्क लाजतोयस?" म्हणत ती अजूनच हसायला लागली. "अगदीच साधा, सभ्य मुलगा दिसतोयस ! नकुल ला कुठे सोडून आलास?"
ती तसं म्हणल्यावर त्याने चेहऱ्यावरचे सगळे भाव घालवून दिले.
"मला सगळ्यांकडून कॉम्प्लिमेंट्स मिळल्यात उलट." तो मान जरा वर करत म्हणाला.
"अर्थात...मी नाही कुठं म्हणाले." ती त्याच्या डोळ्यांत खोलवर बघत म्हणाली
"नकुल वाटत नाहीयेस्, असं म्हणाले."
चेहऱ्यावर हलकंसं हसू घेऊन ती त्याचा उभा नाजूक चेहरा, कॉफी डोळे, धारदार लांब नाक, पातळ गुलाबीसर ओठ, कान, गळा सगळ्याचे निरीक्षण करू लागली. किती दिवसात तिला तिच्या आवडीचं हे दृश्य दिसलं नव्हतं. आजूबाजूची पर्वा न करता सरळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारुन त्याच्यात लपून जावं आणि परत कधीच बाहेर येऊ नये असं तिला वाटलं. त्या विचारांनी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती.
तिचं हसू ओसरून ती त्याच्याकडे एकटक बघायला लागली तसा तोही तिचा चेहरा वाचत तिच्या एकेका डोळ्याकडे आलटून पालटून बघत राहिला. त्याच्या घशाला कोरड पडली. नकळत त्याने एक मोठा श्वास घेतला.
"कसा आहेस नकुल?" त्रिशा तसंच एकटक बघत म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून पापण्या फडफडवत तो भानावर आला.
" कसा दिसतोय?"
" नेहमीसारखाच. चार्मिंग."
तो खाली बघत हसला.
"तू? जरा बारीक झाल्यासारखी वाटतेयस्." तिच्याकडे खालून वर बघत म्हणाला.
"खरंच? हल्ली भरपूर गोड खातेय पण." ती म्हणाली.
"मला सगळ्या गोड गोष्टी वर्ज्य आहेत हल्ली." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
ती ओठ न उघडता हसली. त्याच्या प्रत्येक वाक्याने आणि आवाजाने तिला भरून येत होतं.
"बाय द वे, इथे कसा?" त्रास देणारे विषय बदलत ती म्हणाली.
"हे मी तुला विचारलं पाहीजे. हा माझा एरिया आहे."
"तुझं ऑफिस इथे नाहीये." ती म्हणाली.
" ऑफिस इथून पंधरा मिनिटांवर तर आहे. ते समोरचं सेवन सीज बघतेयस? " तो मागे बघत म्हणाला. "महिन्यातून एकदा तरी आम्ही तिथे जेवायला असतो."
तिने डोकं वर खाली हलवलं.
"इथल्या निओलॉग मध्ये माझा आज फायनल इंटरव्ह्यू होता, सिलेक्ट झाले." ती म्हणाली.
"रियली? Congrats.. " खुश झाल्याचा अभिनय करत त्याने हात पुढे केला. या सगळ्या औपचारिक गोष्टी बोलण्याची त्याला अजिबात इच्छा नव्हती.
तिने हात मिळवला. तो तसाच ओढून त्याला तिला जवळ आणत नेहमीसारखं खोलवर किस करावंसं वाटलं. बळच त्याने हात सोडला, त्याने धरून ठेवलेला हात खाली घेत तिने त्याची मूठ वळवली.
"हे सगळं कुठल्या आनंदात?" ती त्याच्या डोक्याकडे डोळ्यांनीच इशारा करत म्हणाली.
"सहज, बदल म्हणून. डोक्यावर जास्त केस असले म्हणजे उबदार पण वाटतं."
ती खळखळून हसली. ती आपल्यामुळे हसतेय बघून तो स्माईल करत राहिला.
"शर्ट पण नवा दिसतोय." त्याच्या रॉयल ब्लु, ब्लॅक चेक्स असलेल्या फॉर्मल शर्ट कडे पाहत ती म्हणाली.
त्याने शर्ट कडे पाहून परत वर पाहीलं.
"तू कसं ओळखलं?"
"अंदाज." ती खांदे उडवत म्हणाली. "आधी कधीच पाहीला नव्हता."
तो तिला काही म्हणणार तेवढ्यात मागून ग्रुपमधल्या मुलीचा आवाज आला.
"ठाकूर.. येतोएस का? "
तेवढी काही मिनिटे आपण कुठेतरी बाहेर आहोत, आपल्या आजूबाजूला लोक आहेत हे सगळं दोघे विसरून गेले होते. आजूबाजूचं सगळं धूसर झालं होतं. तिच्या आवाजाने दोघे पुन्हा सध्याच्या जगात परत आले.
त्याने एकदा मागे वळून पुन्हा त्रिशाकडे पाहीलं. तिने त्या मुलीकडे पहात भुवया उंचावून पुन्हा सरळ रेषेत आणल्या.
"मला जावं लागेल" नकुल म्हणाला.
"मलाही."
खिशात हात घालून डोकं खाली वर करत दोन पावलं उलटे चालत तो वळाला.
पुढे गेल्यानंतर मागे वळत त्याने तिला बाय केलं. बाईकवर बसल्यानंतर हेल्मेट घालताना त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहीलं. तिने खालच्याखालीच हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला.

ऑफिसला जातानाच्या प्रवासात इंटरव्ह्यू, सिलेक्शन सगळं काही विसरून ती बसच्या खिडकीला टेकून डोळे मिटून नकुलचा विचार करत राहीली.
भेट होणं किती गरजेचं असतं! लांब राहून विचार स्वच्छ राहात असतील, विचार करायला वेळ मिळत असेल पण नुसतंच विचारांमध्ये किती दिवस एखाद्याला जिवंत ठेवायचं.. आज जर अशी अचानक भेट झाली नसती तर मी स्वतःहून त्याला भेटायचं ठरवलं असतं...? तो म्हणाला असता तर मी गेले असते की पुन्हा तू घाई करतोयस म्हणाले असते...? एवढे दिवस संपर्क तोडून मी काय तीर मारला होता..? पायलशी भेट होइपर्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकले असते का मी..? आणि ती भेटलीच नसती तर हे चक्र असंच सुरू राहीलं असतं... त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून फक्त त्याची एक अर्धवट चूकच लक्षात ठेवून हळूहळू त्याच्यापासून दूर जात राहिले असते... शेवटी मलाच काही फरक पडला नसता... त्याच्याबद्दल जे नकारात्मक मत बनवून घेतलं होतं, पुढे जाऊन स्वतःला त्याला सोडून दिल्याचं तेच कारण सांगितलं असतं आणि तेच खरं मानत आले असते... आणि त्याचं काय? तो कसलीच तक्रार न करता कधीतरी माझा निर्णय होईल या भरवशावर थांबून आहे...पुढे फक्त त्याची सवय मोडली म्हणून त्याला मी नाही म्हणून सांगितलं असतं तर त्याला काय वाटलं असतं..?
तिने एक मोठा श्वास घेतला.
भेट झाली ते चांगलंच झालं... इतके दिवस रुटीन आपलंसं करत न संपणाऱ्या चक्रात अडकून बसले होते, त्यालाही अडकून ठेवलं होतं... त्याला आज भेटून मला परत कळून चुकलंय की मला तो किती हवा आहे..!

ऑफिसमध्ये उशिरा दिवस सुरू झाल्यामुळे रोजच्या ठराविक तासांचं काम , रिजाईनच्या प्रोसिजर्स मुळे तिला तिथून निघायला उशीर झाला होता. घरी येऊन जेवण आटोपून ती हॉल मधल्या मऊ खुर्चीत, समोरच्या कॉफी टेबल वर पाय ठेऊन, मान मागे टाकून, डोळे मिटून निवांत बसली. आईला नव्या जॉबबद्दल फोन करून सांगायचं ही तिला नको झालं होतं. उद्या सकाळी निघताना सांगेन असा विचार करून ती अजून पसरून बसली.
एखाद्या मिनिटाने टेबल वर ठेवलेला फोन वाजलाच.
"प्लिज नको." ती तशीच डोळे मिटून म्हणाली.
रिंग वाजतच होती. तिने लांब हात करून फोन घेतला. नकुल चं नाव झळकताना पाहून तिचे डोळे टक्क उघडले. खूप वर्षांनंतर स्क्रीनवर नकुल चं नाव दिसतंय असं तिला वाटलं. तिने पटकन हिरवं बटन सरकवलं. हॅलो म्हणण्याच्या आधीच तो बोलायला लागला.
"मला वाटलं होतं तू दिवसभरात मला एखादा कॉल करशील."
त्याचा आवाज शांत आणि गंभीर ऐकू येत होता.
तिचं पुढचं बोलणं तोडत तो पुन्हा बोलला,
"एखादा टेक्स्ट तरी करशील असं वाटलं होतं"
त्याचा तो स्वर ऐकून टेबलवरचे पाय तिने खाली घेतले. ताठ बसली.
"नकुल, मी करणारच होते." काहीच न सुचून ती म्हणाली.
"इनफ... इतके दिवस मी स्वतःला समजावत होतो, काही झालं तरी तुला डिस्टर्ब करायचं नाही. आज आपली भेट झाली, तीही चुकूनच, त्यानंतर तुझ्याकडून आपण नक्की कुठे आहोत याचं काहीतरी स्टेटस मिळेल असं मला वाटलं होतं. एखादं जेस्चर तरी.
क्लिअरली, तू सगळं विसरली आहेस, तुला आता कशाचाच काही फरक पडत नाहीये."
तो न थांबता बोलला.
" नकुल असं नाहीये." ती कळवळून म्हणाली.
" मग कसं? दिवसभरात साधा एक टेक्स्ट ही न करण्याचं कोणतं कारण आहे तुझ्याकडे?"
"मी आज खूप बिझी होते, त्यात रिजाईन वगैरे.."
तो पलीकडून उपरोधिक हसला, तिचं बोलणं थांबलं.
"हेच म्हणतोय मी. तुझं ऑफिस, तुझ्या बाकी पर्सनल गोष्टीच तुझ्यासाठी नेहमी प्रायोरिटी वर आहेत, मी कधीच ओल्ड न्यूज झालोय. मीच इकडे मूर्खासारखा कुठल्यातरी बारीकशा धाग्याला धरून आशा ठेऊन बसलो होतो." तो रागावून बोलत होता.
"नकुल, असा एकही दिवस नव्हता जेव्हा मी तुझा विचार केला नाही. मी ठरवतेय, ट्रस्ट मी! " ती म्हणाली.
"आय ऍम डन त्रिशा. मी खूप कंटाळलोय या सगळ्या अधांतरी गोष्टींना. तुही बाकीच्यांसारखा फक्त स्वतःचा विचार करतेयस. इतके दिवस मला तसं वाटत नव्हतं पण तू मला फक्त गृहीतच धरून होती हे आज व्यवस्थित कळतंय."
तिचं पुढचं बोलणं तोडत तो म्हणाला,
"मला वाटतं मी तुला भरपूर वेळ दिला. तू म्हणतेस तसं महिनाभर विचार करूनही तू अजून कन्फ्युजच असशील तर पुढेही त्याला काही होप्स नाहीयेत. हे संपवलेलंच बरं. हो, तुला ब्लेम ची काळजी आहे ना? मी माझ्याकडूनच आधी तसं सांगतो. इट्स ओव्हर!"
"नकुल, प्लिज.. "
तिचं बोलणं पूर्ण न ऐकताच त्याने फोन ठेऊन दिला.
त्रिशाने नंतर तीन- चार वेळा त्याला फोन केला, प्रत्येक वेळी पूर्ण रिंग वाजून बंद झाला. शेवटी तिला स्वीच्ड ऑफ चं रेकॉर्डिंग ऐकू आलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle