चिठ्ठी भाग 10-
https://www.maitrin.com/node/4004
"म्हणजे?
देवबाप्पा, कुछ कुछ होता है आणि त्याखालपासून सुरू होऊन चिठ्ठीच्या शेवटच्या टोकाकडे निर्देश करणारा बाण?
याचा अर्थ काय शेठ?"
जयंतानं असं विचारताच सगळ्यांचेच डोळे अनुकडे लागले.
अनु मात्र त्यात काय मोठंसं असा भाव चेहर्यावर आणून सांगू लागला.
"बाबा, पहिली चिठ्ठी देवबाप्पाला लिहायची होती. पहिलं कुठलंही काम देवबाप्पाच्या चरणी असं काकुआज्जी म्हणतात ना? मग?
आणि चिठ्ठी नेहमी हिंदी मध्येच लिहितात किनै. म्हणून लिहिलं तसं". अनु आता शोभाताईंकडे वळून बोलत होता.
"अनु, अरे चिठ्ठी कुठल्याही भाषेत लिहू शकतो. हिंदी मध्येच नाही", मुग्धाने घाईघाईने स्पष्ट केलं.
"मग मला आधी सांगितले नाहीस तू?
मलाही लिहिताना सारखं वाटत होतं की देवबाप्पाला हिंदी येत असेल की नाही म्हणून "
अनुचा सूर तक्रारवजा झाला एव्हाना.
"अरे देवबाप्पाला हिंदी जाऊ दे पण आधी अक्षर तरी कळायला नको? कछ कछ काय? बाण काय?"
जयंतानं असं म्हणताच अनुची स्वारी फुरंगटली.
ते पाहून शोभाताईंनी अनुला जवळ घेत डोळ्यांवर चष्मा चढवला व ती चिठ्ठी ताब्यात घेऊन त्या न्याहळू लागल्या.
"अनु कुछ मधल्या क खालचा उकार कुठे गेला?"
"विसरलो मी" अनुने जीभ चावली.
"आणि हा बाण कसला?"
"मी चिठ्ठीच्या इकडच्या बाजूला होतो ना! मग देवाला कसं कळणार मीच चिठ्ठी लिहिली ते. म्हणून मी माझ्या कडे बाण काढला", अनु आव आणून सांगत होता.
"अनु गुलामा! तुला किती वेळा सांगितलं लिहिताना शब्द खायचे नाहीत म्हणून?", सुमा ओरडली.
"बघा ना शोभाताई, याला किती वेळा लिहायला बसवलं तरी हा काना, मात्रा, अक्षरं, वेलांट्या.. सगळं खातो मध्येच.
आता पण अनुराग असे कोण लिहित बसेल म्हणून हा बाण काढून मोकळा झाला बघा. हो ना रे?"
सुमाक्काला सगळं कसं माहिती असतं हे अनुला न सुटलेले कोडे होते. चोरी पकडली गेली तेव्हा त्याने परत शोभाताईंकडे धाव घेतली. त्यांनी पण त्याला जवळ घेतले व असं नाही करायचं वगैरे समजावलं जे नेहमी प्रमाणे अनूला ऐकायलाच गेलं नाही.
"पण तुला कुछ कुछ होता है असंच का लिहावंसं वाटलं?"
नीलूने पोलीस खाक्या चालवला.
"अगं पोलीस ताई, रोज नाही का काकुआज्जी पेपर वाचतांना म्हणत- अरे देवा, काय काय होतं या जगात?!
मीही तेच तर लिहिलंय
- देवबाप्पा, कुछ कुछ होता है!"