अनोखी  लायब्ररी  : The Midnight Library by Matt Haig

"Between life and death, there is a library.. and within that library, the shelves go on forever. Every book provides a chance to try another life you could have lived. To see how things would be if you had made other choices." 

नोरा सीड.. एक पस्तिशीची तरुणी.. एकटीच, अनेक संधी आणि मार्ग नाकारून जन्मगावातच जगणं संकुचित करून घेतलेली. फार कोणाच्या नजरेत न येता मूकपणे आयुष्य ढकलणारी. स्वतःच तयार केलेल्या पिंजऱ्यात इतकी अडकत जाते की शेवटी तिच्याही सहनशक्तीचा कडेलोट होतो.. निमित्त, तिच्या पाळीव मांजराचा मृत्यू. तिथून सुरवात होऊन एकेक घटना घडत जातात ज्या तिच्या पश्चात्तापाची धग अधिकाधिक वाढवत जातात. स्वतःच्या अस्तित्वाचाच पश्चात्ताप.. ती तिचं निरर्थक आयुष्य संपवायचं ठरवते. 

..  ती पोहोचते 'Midnight Library' मध्ये.. लायब्ररीयन तिथले नियम सांगते.. तिचं सगळ्यात मोठं/जड पुस्तक : Book of Regrets तिला देते. आणि तिला एक संधी मिळते.. Regrets undo करायची, 'जर-तर' चं जंजाळं सोडवण्याची.. त्या त्या वेळी वेगळे निर्णय/ निवड केली असती, तर असू शकणाऱ्या तिच्या समांतर आयुष्यात डोकावण्याची.. एकेका पुस्तकात डोकावून तिच्यासोबत आपणही उत्सुकतेने तो प्रवास करून बघतो.. पण प्रत्येक प्रकारच्या आयुष्यात जसं जुने रुतलेले काटे निघतात तसे कुठे न् कुठे नवे पश्चात्ताप असतातच..  त्यामुळे नियमांनुसार ती अपरिहार्यपणे परत लायब्ररीत येते.. परत परत तेच चक्र.. कुठेच तिला तिचं 'perfect version of life' मिळत नाही.. 

या अद्भुत लायब्ररीतली ती लायब्ररीयन, नोराच्या 'root life' मधलं  तिचं स्थान, नोराचा भूतकाळ, तिचे  आई-वडील -भाऊ या नात्यांतले ताणेंबाणे, तिचा प्रियकर, जवळची मैत्रीण ...  तिने  घेतलेले निर्णय  यासगळ्यांच्या तिच्या आयुष्यावरच्या गडद छाया ..  हे  मुळातून वाचायला हवं.  ती जन्म आणि मृत्यू  यांमधे असलेल्या 'लायब्ररी' ची कल्पना, नियम, अनेक समांतर,अगदी काटकोनातही असणारी आयुष्यं, त्या असंख्य शक्यता .. त्यासंदर्भात नोरा आणि लायब्ररीयन यांतले संवाद अशी वेगळीच मांडणी वाचकाला खिळवून ठेवते.

ह्या सगळ्या प्रवासात नोराला लक्षात येत जातं.. ते 'Book of Regrets' आता छोटं होत चाललंय.. तिची choices ची निवड अधिकाधिक सुधारत चालली आहे, मात्र फक्त निवड करणंच तिच्या हातात आहे, 'outcomes' नाही. सगळंच स्वतःचं perception आहे. तिला हवंहवंसं, तिच्या मते 'perfect life' सापडतंही. 'जर' तिने  'असे' निर्णय घेतले असते तर.. हे तिचं आयुष्य असू शकलं असतं. आता मात्र ती स्वतःच ह्या इतक्या 'perfect'  आयुष्यात 'उपरी' आहे. ते अनुभवतांना तिला लख्ख जाणवतं, तिच्या मूळ आयुष्यात नेमकं काय कमी होतं.. नक्की काय चुकत होतं .. 

त्या आकळण्यामुळे, चुका दुरुस्त करण्याच्या तीव्र  इच्छेमुळे ती लायब्ररीत परत येते खरी. पण तिच्या 'root life' मध्ये तर तिने 'मृत्यू' ची निवड केलेय.... पण आता मात्र तिला 'जगायचं' आहे! तिला स्वतःचं नवं पुस्तक लिहायचं आहे!!  'जर-तर' च्या भोवऱ्यात न अडकता आत्ता आहे ते आयुष्य जगायचं आहे  - तेच तिचं स्वतःचं/ ती स्वतः घडवेल असं 'perfect life' असू शकतं... आहे!! 

या नव्या जाणिवेच्या प्रकाशात तिला तिच्या आयुष्यातल्या असंख्य शक्यता/ रस्ते-वळणे/ आशा-आकांक्षा दिसू लागतात.. आणि त्रास, दुःख, वेदना, एकटेपणा नैराश्य यांसह सुद्धा तिची जीवनेच्छा तरारून येते! मृत्यूची इच्छा करत रोज कण कण मरतांना, साक्षात मृत्यूच्या दाहक दर्शनाने मात्र तिच्यातलं हीन ते सारं गळून जातं, उरतो तो केवळ जगण्याचा उत्सव:

"जुनी इंद्रिये जुना पिसारा, सर्व सर्व झडणार

नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मज फुटणार - सुंदर मी होणार

सुंदर मी होणार!

मृत्यू म्हणजे वसंत माझा, मजवरी फुलणार

सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्ये घडणार

सौंदर्ये घडणार!!"

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle