*"1992 स्कॅम द हर्षद मेहता स्टोरी "*
हर्षद मेहता हे नाव घेतल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं?
एक श्रीमंत गुजराथी बिझनेसमन ज्यानं शेअरमार्केटमध्ये घोटाळा केला आणि आणखी श्रीमंत झाला? बरोबर ना?
आणि जर तुम्हाला कळलं की त्याची सुरवात चाळीतल्या 2 खोल्यांमधून झाली आणि त्याने सुरवातीला बरेच आॅड जाॅब्ज केले आणि शेअर मार्केट मधली त्याची सुरवात साधा जाॅबर म्हणून झाली, तर.. ?
द बिग बुल, *अमिताभ बच्चन आॅफ शेअर मार्केट* अशा नावांनी मिरवलेल्या 'द हर्षद मेहता' याच्या महत्वाकांक्षेची कथा नक्कीच इंटरेस्टिंग आहे.
घाटकोपर मधल्या 2 खोल्या ते 15000 स्के फूट घर ते लिक्सस गाडीसकट असलेला गाड्यांचा ताफा ते करोडोंचा मालक. वडिलांचा बुडालेला कापडव्यवसाय ते स्टॉक एक्सेंजची उलथापालथ करणारा ब्रोकर हा प्रवास डोक्याला एक *भन्नाट शाॅट* आहे..
फ्राॅडपेक्षा सिस्टीममधले लूपहोल्स शोधून त्यात तो खेळत राहिला. इतरही ते वापरत होतेच पण हर्षद मेहताची उडी मोठी होती. गंमत म्हणजे बाकीचे चोरीछुपे करत असताना हा पठ्ठ्या ते खुलेआम करत होता..
पंतप्रधान कार्यालयापासून व्हाया चंद्रास्वामी ते बँकेतल्या साध्या क्लार्कला पटवण्याची हातोटी त्याच्याकडे होती. मार्केटच्या सेंटीमेंटसची अचूक नाडी त्यानं ओळखली होती. मार्केट मध्ये अनेक वर्ष सट्टा खेळणा-या बेअर आणि बूल च्या तोंडाला फेस आणला होता.
बेकायदेशीर व्यवहार तर होतेच पण सुरवातीचा काॅन्फिडन्स ओव्हर काॅन्फिडन्स होत गेला.
जेव्हा त्याचा मिडास टच होता तेव्हा लोकांनी त्याच्या टिप्सवर दे धुव्वा पैसे छापले.. तो जरा कमी देवच होता मार्केटमध्ये.. आणि स्कॅम बाहेर आल्यावर लोकं अक्षरशः देशोधडीला लागले.. तो नंबर 1 चा खलनायक ठरला..
*लालच* बडी *बला* ठरली..
असे स्कॅम होतात तेव्हा खरं तर ते कधी एकटा माणूस करत नसतो.. खालपासून वरपर्यंत बरीच लोकं त्यात गुंतलेली असतात. तपासयंत्रणांना खूप काही माहितीपण असतं.. अशामध्ये जो सापडेल तो चोर आणि निसटेल तो साव ठरतो. त्यामुळेच अशा अनेक उद्योगातून सिटीबँक सारखी मोठी आॅर्गनायझेशन निवांत सुटली..
हा स्कॅम इतका मोठा होता की या स्कॅमनंतर सिस्टीम मध्ये ब-याच सुधारणा आणाव्या लागल्या.. सेबीचे अधिकार वाढले आणि मार्केटवर नियंत्रण आलं.. डिजीटल एरा मुळे तर रेकाॅर्डस आणि ट्रँझॅक्शनमध्ये ट्रांस्परन्सी आली..
पण एक गोष्ट नक्की की इतिहास जरी हर्षद मेहताला मार्केट मधला खलनायक म्हणून ओळखत असले तरी तो एक गट्स असलेला हुशार व्हिजनरी होता हे नक्की..
सुचेता दलाल नावाच्या एका जर्नालिस्टने हा घोटाळा उघडकीला आणण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. त्यांच्या पुस्तकाच्या आधारे
या घोटाळ्यावर सोनी लिवने एक वेबसिरीज आणलीये..
*"1992 स्कॅम द हर्षद मेहता स्टोरी"*
हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसिरीज खिळवुन ठेवते..
सगळ्या कलाकरांचे नॅचरल अभिनय आणि नाॅन ग्लॅमरस लूक झकास जमलेत. यात मुख्य कलाकार प्रतिक गांधी, श्रेया धन्वंतरी ते अनंत महादेवन, रजत कपूर पर्यंत सगळेच भूमिकेला न्याय देतात. स्टॉक मार्केट मनी मार्केट मधल्या टेकनिकल टर्म्स सामान्य माणसाला समजतील अशा पद्धतीने पुढे येतात.
८० -९० चा एरा छान उभा राहतो. कथानक दिग्दर्शन पार्श्वसंगीत दमदार आहेच.
चांगली जमून आलेली सिरीज आहे..
क्राइम किंवा फॅमिली ड्रामा बघून कंटाळला असाल तर ही सिरीज एक उतारा आहे.
सम रिअल बिझनेस बघितल्याचं समाधान मिळतं..
Sony liv वर आहे.
नक्की बघा.
*सायली कोठावळे मठाधिकारी*