प्रिगादी प्रागादी पिप्पारकोगीद

नोव्हेंबर महिना उजाडला की आमच्या इटुकल्या शहरातली पिटुकली दुकानं सज्ज होतात ख्रिसमच्या तयारीला. सुंदर सुंदर ख्रिसमस ट्री, कलात्मक वेष्टनात सजवलेले मार्झिपान(१), निरनिराळे 'अडवेंट कॅलेंडर्स'(२) यांच्या जोडीला हवेत मंद असा 'पिप्पारकोक' अर्थातच 'जिंजरब्रेड' बिस्किटांचा घमघमाट. कुरकुरीत अशी हि बिस्किटं खायला जितकी चविष्ट तितकच त्यावर केलेलं कलात्मक नक्षीकामही बघत रहावं असं.

या बिस्किटांचं मूळ जरी मेसोपोटेमिया आणि ग्रीक संस्कृतीत असलं तरी जिंजरब्रेड आणि ख्रिसमस हे युरोपमधलं खास समीकरण. असं म्हणतात ग्रीकांकडून रोमन, रोमनांकडून जर्मॅनिक टोळ्या आणि तिथून मग युरोप असा जिंजरब्रेडचा प्रवास. जवळजवळ सर्वच देशांमधे ख्रिसमससाठी ही बिस्कीटं बनवली जातात. उत्तमोत्तम जिंजरब्रेड बनवण्याचा मान युरोपात जातो तो जर्मनीकडे. जर्मनीमधलं नुरेंबर्ग शहर 'Gingerbread Capital of the World' म्हणून ओळखलं जातं. Hansel and Gretel या परीकथेतल्या चेटकीणीच्या जिंजरब्रेड घरापासून प्रेरणा घेऊन, या बिस्किटांपासून घरं बनवण्याची प्रथाही जर्मनीत सुरु झाली आणि पुढे जगभर पसरली.

मध्ययुगात राय धान्याचं पीठ, मध आणि रेशीम मार्गे उपल्ब्ध होणार्‍या मसाल्याच्या पदर्थांचा वापर करुन बनवली जाणारी ही बिस्कीटं महागड्या मधामुळे सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नव्हती. पण एकोणीसाव्या शतकात साखरेचा शोध लागला आणि मधाची जागा साखरेने पटकावली. यानंतर मात्र हे जिंजरब्रेड घरोघरी बनू लागले.

ही बिस्किटं बनवायचे साचेही प्रतिकात्मक असत. एका विशिष्ठ आकाराच्या साच्यातून काढलेली बिस्किटं खाल्ल्यावर बुद्धी वाढणे, घरादारात धनधान्य, संपत्ती येते (जसं की डुकराच्या आकारतली बिस्किटं खाल्ली की नशीब हमखास फळफळतं) असा समज मध्ययुगात होता. औषध म्हणूनही या बिस्किटांचा वापर केला जात असे.

तर, याच जिंजरब्रेडचा वापर करुन बनवलेल्या कलाकृतींचं एक छोटसं प्रदर्शन - 'पिप्पारकोगी मानिया' (piparkoogimaania) आमच्या शहरात डिसेंबरमधे भरतं. या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी अट एकच - प्रदर्शनात ठेवली जाणारी वस्तू ही जिंजरब्रेडने बनवणे आवश्यक आहे. २००६ साली सुरु झालेल्या या प्रदर्शनात स्थानिक आर्किटेक्ट, डिझाइनर्स, व्यावसायिक कलाकार अशी सर्जनशील लोकं कलाकृती सदर करतात. यावर्षी या प्रदर्शानाचा विषय आहे 'फॅशन'. या वर्षी सादर झालेल्या काही निवडक कलाकृतींची एक झलक :

dress

boot

shirt

nakshi

sewingmachine

kimono

shorts

japan

fashion

jacket

dress1

socks

vogue

gaadi

bag

---

टिपा:
(१) मार्झिपान - साखर आणि बदामाच्या पिठापासून बनवलेला एक गोड पदार्थ
(२) अडवेंट कॅलेंडर (Advent calendar) - ख्रिसमच्या आगमनाची मोजणी करण्यासाठी हे कॅलेंडर वापरलं जातं.
प्रिगादी प्रागादी पिप्पारकोगिद (Prigadi-pragadi Pipparkoogid) - हे इस्टोनियन भाषेतलं एक टंग ट्विस्टर आहे.
***

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle