प्रत्येक गावात असा एक हलवाई असतो ज्याचे एखादे पक्वान्न फारच प्रसिद्ध असते जसे आमच्या नाशिक रोडला वास्को हॉटेलजवळचे घी स्टोअरमधले श्रीखंड, नाशिकला पांडेचे खव्याचे गुलाबजाम, मंगेश धन्नालाल अग्रवालची बर्फी, तसेच बासुंदी म्हटली की बुधा हलवायाचीच रबडी बासुंदी. घट्ट रबडी असलेली, चव निव्वळ अप्रतिम अशी अजूनही जिभेवर रेंगाळणारी.मला बासुंदीतली रबडी तशी फारशी आवडायची नाही मग माझी आई ती गाळून फक्त बासुंदी द्यायची. (माझ्या आजीच्या ह्यावरून करणार्या बडबडीला कानाडोळा करून :) )बासुंदी खरंतर दुसर्या दिवशी अफलातून लागते. आदल्या दिवशीच्या तळलेल्या पुर्या कुस्करून एका पसरट वाडग्यात घेऊन त्यावरून बासुंदी घालायची. केवळ अहाहा! बासुंदीचे अनेक प्रकार पण आलेच आहेत जसे की मॅंगो बासुंदी, सिताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी...पण खरं सांगू? मुळ बासुंदीच बरी.नवर्याला कधीची बासुंदी हवी होती. मला म्हणे बुधासारखी नाही जमली तरी तुझ्यापरिने कर. तर खूप खटाटोप करून खालील प्रमाणे केली. ह्यात बदल पण सुचवा म्हणजे पुढच्या वेळी करता येतील.
रबडी बासुंदीची एकदम हिट रेसिपी३ quart full fat half and half milk
साखर चवीनुसार
चारोळ्या
वेलची पावडर
एव्हरेस्ट दुध मसाला पावडर अंदाजाने
गीट्स केशर कुल्फी मीक्स
केशरजाड बुडाची कढईआपापल्या गाव शहरातील हलवायाच्या आठवणी
कंटाळा अजिबात नको
वेळ ४ तास
मंद आचेवर कढईत सगळं दुध ओता. कढईत किती दुध आहे ते बघुन त्याच्या निम्मे आटवायचे.
सतत... अगदी सतत दुध हलवायचे. तळाला अजिबात लागता कामा नये.
१/४ आटलं की केशर, गीट्स केशर कुल्फी मीक्स, चारोळ्या, एव्हरेस्ट दुध मसाला पावडर टाकून, मुळ दुधाच्या निम्मे आटवा.
त्यात चवीनुसार साखर टाकून परत थोडं उकळवा.
जरासं कोमट, गार झालं की फ्रिजमध्ये ठेवा.
साधारण एक तासाने काढून त्यावरची साय सुरीने बारीक करून त्या बासुंदीत घाला.
पुरी बरोबर यम्म लागते.
मी आणि नवर्याने आमच्या नाशिकच्या बुधा हलवायाच्या बासुंदीची
आठवण काढत ह्या बासुंदीचा आस्वाद घेतला. चव त्यांच्याइतकी अफलातून नव्हती पण बरी होती.