या महिन्यात हे अपर्णा वेलणकर अनुवादीत, ग्रेगरी रॉबर्ट्स लिखित 'शांताराम' हे भरभक्कम १४०० पानांचं पुस्तक वाचलं. सर्वात आधी सांगायचं तर पुस्तक अनुवादीत आहे हे कुठेच जाणवत नाही. त्यातलं मुख्य पात्र लिन ऑस्ट्रेलीयन आहे पण तो मुंबईत येऊन मराठी शिकलेला आहे त्यामुळे मराठीतले संवाद कुठेच खटकत नाहीत. मुळ पुस्तक मराठीतच लिहीलं आहे असं वाटतं. अनुवाद्कर्त्या अपर्णा वेलणकर ग्रेगरीला प्रत्यक्ष भेटल्या आहेत. पुस्तक वाचुन झाल्यावर ही भेट किती हिमतीची आणि महत्वाची होती हे फारच जाणवतं. त्या ज्या चिमटीत न येणार्या पात्रांच्या आणि मुंबईच्या भाषेबद्दल प्रस्तावनेत लिहीतात त्यावर त्यांनी किती मेहेनत घेतली असेल हे पुन्हा पुन्हा जाणवतं.
कथा आहे भारतात आलेल्या स्वतः लेखक ग्रेगरी ( पण बनावट पासपोर्टवर लिण्डसे या नावाने ) किंवा लिनची. लिन ऑस्ट्रेलियन तुरुंग फोडून पळतो, न्युझिलंड हुन मग भारतात मुंबईत येतो; त्याला इथे भेटलेल्या भारतीय , अभारतीय लोकांशी जवळीक करतो. त्याचे नविन झालेले मित्र प्रभाकर, जॉनी, डिडियर, उल्ला, मोदेना, कार्ला, माफिया डॉन कादरभाई, अब्दुल्ला ,मुंबई पोलिस अशा अनेक एकमेकाच्या पायात पाय अडकलेल्या लोकांची आणि त्यांच्या आयुष्याची कथा. प्रभाकरच्या दुर्गम गावात जाऊन सहा महिने राहुन मराठी भाषा शिकणारा लिन मनाने भारतीय होतो. मुंबईतल्या झोपडपट्टीत रहातो, तिथे लोकांना मदत करुन, त्यांचा विश्वास आणि प्रेम जिंकतो पण शेवटी रिकामाच राहातो. हळुच केव्हातरी माफिया गँगमधे त्याचा प्रवेश होतो आणि त्याचं आयुष्य बदलुन जातं. अनेक अत्यर्क आणि भयंकर घटना त्याच्या आयुष्यात घडलेल्या दाखवल्या आहेत. त्या घटना, भेटणारे मित्र,मैत्रिणी, कादरभाई यांची जवळीक आणि त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न यांची मनावर पकड घेणारी कथा.
काही वर्णनं अतिशय बिभिस्त, ओंगळवाणी, किळसवाणी आहेत, कसंतरी होतं वाचताना. काही प्रसंग आणि जागा शिसारी आणणार्या आहेत. ८०च्या दशकातल्या मुंबईचं वर्णन, ड्रग्ज, त्याची सह़ज उपलब्धता, माफीया डॉन, अंडरवर्ल्ड आणि तिथे चालणारे धंदे, पैशासाठी सगळीकडे कानाडोळा करणार्या मुंबई पोलिसांच भ्रष्टं वागणं याबद्दल लिहीलेलं माझ्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय घरतल्या मुलीला हादरवणारं आहे.
या पुस्तकातली सगळी पात्र खरी नाहीत पण घटना खर्या आहेत असं लेखकाचं म्हणणं आहे. केवळ लेखक आणि त्याचा मित्र प्रभाकर ( आणि त्याचे आई वडील भाऊ) हे खरे आहेत त्यांचे फोटो वगैरे नेटवर उपलब्ध आहे. या अंडरवर्ल्ड आणि माफीया बद्दलच्या बातम्या पेपरमधे वाचत आपली पिढी मोठी झाली पण साधारण ९५/ ९८ नंतर त्या बातम्या अचानक एकदम कमी झाल्या. तरिही ती नावं , घटनांमधील साम्य त्यामुळे काहीशी तुलना होत रहाते. काही पात्र मात्र कोणा कोणा रियल लाईफ व्यक्तींवरुन लिहिली गेली आहेत ते थोडंसं लक्शात येतं. उदा म्हणजे कादरभाई हे माफीया डॉन करिम लाला वरुन लिहीलं गेलं असावं. तसच कासिम भाई हे हाजि मस्तान किंवा वरदराजन , नावं नसली तरी दाऊद् आणि रमा नाईक टोळीचा उगम किंवा त्यातली गँगवॉर्स हे धागे जाणवत रहातात. आणि त्यामुळे भितीही वाटते. अंडरवल्र्ड संदभातले विशिष्ठ लोकल पक्ष, त्यांचे लीडर, आणि मराठी बाणा यांचे चुकार उल्लेख दचकवतात. ८० ते ९० च्या आसपास आपण ऐकलेली एके४७ आणि तशा शस्त्रांचा व्यापार, त्यात गुंतलेला पाकिस्तान, अफगणिस्तान, इराण , पॅलेस्टीनी, रशिया अमेरिका यांचा गुंता , हेरॉइन, हशिश, गर्दची नशा यासगळ्या गोष्टी कशा एकमेकात अडकलेल्या आहेत ते वाचायला भयंकर आहे.
मुंबईत झोपडपट्ट्या आहेत आणि माणसं किडामुंगीसारखी घाणीत रहातात हे माहिती असलं तरी त्याच मुंबईत गुलामांचा बाझार, सहज नशा विकत मिळणार्या जागा, हेरॉईन घेऊन पडून रहाण्यासाठी असलेली बिळं, औषधांचा काळाबाजार, कुष्ठरोग्यांची वसाहत आणि तिथला काळाबाजार, किळसवाणी वेश्यागृह, पैसे फेकले की कुठल्याही देशाचा बनावट पासपोर्ट , विसा आणि बनावट ट्रवल हिस्ट्री पासुन डिग्री पर्यंत कोणतही कागदपत्र मिळणार्या जागा आहेत. ताज हॉटेलचे रेस्टॉरंट , कॅफे लिओपोल्ड, गेट वे, कफ परेड अशा हायफाय मानल्या जाणार्या जागा मुळात काळाबाजार, वेश्या व्यवसाय आणि नशेच्या घाणीच्या दलदलीची गोंडस रुपे आहेत/होत्या हे वाचल्यावर सैरभैर व्हायला होतं.
साध्या परदेशात जायला कराव्या लागणार्या त्या डॉलर खरेदीचा विचार केला तरी त्या खरेदी मागे काळा धंदा, आणि तो धंदा चालवणारं अंडरवर्ल्ड होतं हे दिस्तं. डॉलर आणि सोनं यांचा काळाबाजार का सुरु झाला, आणि का होत रहातो हे वाचणं इंटरेस्टींग आहे. नायक लिनच्या बरोबर आपणही हे शिकतो. बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचा संबंध कसा आला , त्यासाठी लिन कसा मध्यस्त ठरला याबदलच्या कहाण्याही आहेत. नायक लिन ( म्हणजेच लेखक ग्रेगरी) याने एक्स्ट्रा म्हणुन काम केलेल्या एका सिनेमाचा उल्लेखही आहे आणि त्यात खरोखरच तो आहे.
कादरभाईशी केलेल्या तत्वज्ञान , भौतिकशास्त्र आणि निती अनितीच्या लंब्याचौड्या गप्पा आहेत. त्या गप्पा म्हणुन गहन असल्या तरी माफीया डॉन ( आणि तो खर्या असण्याची शक्यता) कडून आलेलं निती अनितीचं भाषण फारसं पटत नाही आणि त्यामुळे जरा इरिटेटही होतं.
प्रभाकर हे पात्र खरं आहे, तो सच्चा मित्र आहे, माणुस म्हणुन चांगला असेलही पण मी एक मुलगी म्हणुन विचार केला तर असा माणूस समोर आल्यावर जसं वागेल ( म्हणजे आपल्याला एकुण्च रस्त्यावर , प्रवासात ज्या नजरेचा, हातवार्यांचा सामना करावा लागतो तसंच ) त्याचा विचार करुन अस्वस्थ वाटलं.
कार्ला हे पात्रही खरं नाही पण तिचं वागणं फारसं विसंगत वाटत नाही काही घटना सोडता. तिच्या जागी असणारी मुलगी अशीच वागेल असं वाटलं. पण हातातोंडाशी आलेलं सुखी जीवनाचं चित्र ती का विस्कटते हे तिने सांगुन सुद्धा कळत नाही.
अफगणिस्तान प्रवास आणि त्यात घडलेल्या घटना , त्यातुन नायकाचे सहीसलामत वाचणे भाग फारसा पटलेला नाही आणि खराही वाटला नाही. खरतर इतरही मुंबईतल्या सगळ्या /बर्याचशा घटना घडल्या असतीलही पण त्या सगळ्याच नायक लिनबरोबर घडल्या असतील असं वाटत नाही. आजुबाजुला, कोणा इतरांबरोबर घडलेल्या घटनाही लिनच्या आयुष्यात दाखवल्या असतील अशी एक शंका आली. लिनचा बॉलिवुड सिनेमा आणि त्यातल्या लोकांशी संबंध पहाता एखाद्या सिनेमा आणि हिरोची स्टोरी लिहिल्यासारख्या आहेत का असंही वाटलं. त्या काळातल्या हिंदी सिनेमात नाही का समाजाने केलेल्या अन्यायामुळे पेटून जाऊन नायक गुन्हेगारीच्या मार्गावर जायचा पण तो मुळात खुप चांगला आहे वगैरे दाखवायचे तसं वाटलं काही वेळा. बर्याच ठिकाणी नायक मी 'त्यांच्यासारखा' नाही / मी माफिया नाही पण माफीया बरोबर काम करतो / मी कोणाचा खुन केलेला नाही वगैरे गोष्टी सांगतो. पण ते ही मला पटलं नाही. कधी शस्त्र न बाळगलेला माणुस ऑस्ट्रेलियन तुरुंगात धारदार लोखंडी कांबीने तुरंगातल्या गुंडाला अलमोस्ट मरेस्तोवर मारु शकतो आणि अवघ्या काही सेकंदात कपडे बदलुन काही घडलंच नाही असं वागू शकतो हे न पटण्यासारखं आहे. कोलाबातल्या लॉकअपमधे आणि ऑर्थररोड तुरुंगात स्वतःहुन मारामारी ओढवुन घेऊन ' सिनेमात मुद्दाम मारामारी करणार्या, चेहर्यावरुन शांत पण आतमधे सुडाची संतापाची आग पेटलेल्या सिनेमातल्या अमिताभ' सारखा वाटला काहीसा (काला पत्थर? ).
पुस्तकाचं नाव शांताराम आहे. हे नाव प्रभाकरच्या आईने लिनला दिलं. पण त्या शांताराम नावाला साजेसं काहीच त्याच्या आयुष्यात नव्हतं आणि नंतरही घडलेलं नाही. त्यामुळे नाव नुसतच नाव आहे त्याचा पटेलसा काही संदर्भ नंतर आला नाहीये.
एवढं सगळं होऊन शेवट काही कंक्ल्युसिव नाही म्हणजे अचानक एका ठिकाणी थांबलो असं झालं. जे कळलं ते आधीच तर माहिती होतं लिनला असंही वाटून गेलं. तरिही कादंबरी आवडली. हातातून सोडता येत नव्हती इतकी गुंतुन गेले वाचताना. काही ठिकाणी नायकाच्या, इतर पात्रांच्या वागण्याचा अॅनालिसिस छान आहे, ( कदाचित खर्या , कदाचित खोटया ) प्रसंगात अडकलेल्या नायकाने, पात्रांनी काय विचार केला, काय केलं हे वाचणं रोचक आहे. डीडीअर सारख्या एखाद्या दारुड्या आणि ज्याला काही विचारसरणी नसावी अशा मोदेनाकडून जिवनाबद्दलचे महत्वाचे विचार ऐकणे कदाचित फिल्मी असले तरी कथा, पात्र, घटना तुमच्यावरची पकड सोडत नाहीत. मधेच पुस्तक वाचताना हे पात्र खरं असेल का, हा कुठला भाग, हा कुठला संदर्भ असं गुगलवर शोधावसं वाटतं इतकं तुम्ही त्यात गुंतून जाता आणी वाचताना ते खरं वाटत रहातं हे पुस्तकाच ( अनुवादाचं ) यश आहे. चांगलं पुस्तक म्हणजे त्या पुस्तकात तुम्ही किती गुंतता, पुस्तक संपल्यावरही त्याचं गारुड उतरत नाही असा मापदंड लावला तर हे पुस्तक त्यात वरचढच आहे.
नोंद - इंग्रजी पुस्तक मी वाचलं नाही त्यामुळे त्यात संवाद कसे किंवा काय ते माहित नाही.
अशा विषयावरचं मी वाचलेलं कदाचित पहिलंच पुस्तक, पण माझं वाचन पुरेसं नाही त्यामुळे जे वाटलं ते लिहीलं, महत्वाचं म्हणजे खरच लिहावसं वाटलं.
अजुन एक नोंद - सिनेमासाठी हा विषय मोठ्ठा असला तरी वेबसिरिज बनू शकेल ( अजुन पर्यंत का बनली नसावी ?) अश्लाघ्य भाषा, शिव्या, सेक्स, बिभत्स हाणामारी, रक्तरंजित घटना, अनेक देशांची पार्श्वभूमी, युद्धातले प्रसंग असा सगळाच मसाला एकत्र मिळेल
'शांताराम'
लेखक - ग्रेगरी रॉबर्ट्स
अनुवाद - अपर्णा वेलणकर