पुस्तक परिचय - पाकसिद्धी

पुस्तक परिचय - पाकसिद्धी

नुकतेच नवीन क्षेत्रात मी तेव्हा पाऊल ठेवले होते. निमित्त होते ते माझे लग्न झाल्याचे. यावेळेपर्यंत स्वयंपाक नामक कलेच्या आसमंतात (हो, आसमंतच. कारण आता कळतंय की 'इथे' sky is the limit असतंय..) भरारी सोडाच, पण पंखांची फडफडदेखील करण्याची'तसदी' मी कध्धीच घेतलेली नव्हती. याची पार्श्वभूमी व अपरिहार्य पडसाद (परिणाम म्हणत नाहीये कारण याबाबतीत ऐकलेले शेरे ताशेरे मालिकेतील echo प्रमाणे) कानांत अधूनमधून उमटत राहतात ;काही विशेष प्रसंगी, कोणते हे जाणकारांनी ओळखले असेलच.. ही:ही:) हा काही प्रस्तुत लेखाचा विषय नव्हे. तो सवडीने लिहीन म्हणते..

तर तात्पर्य हे, की नवलाईच्या त्या गोड गोजिऱ्या दिवसांत वयाच्या व नात्याच्या ऐन तारुण्याच्या भरात अस्मादिकांनी नी>>>ट स्वयंपाक शिकण्याचं ठरवून टाकलं ..आंतरजालाने तोवर जीवन व्यापलेलं नव्हतं. त्यामुळे पाकशास्त्रविषयक पुस्तकाला गुरू मानण्यास हरकत नव्हती.

एकदा एका पुस्तक प्रदर्शनात मी नेहमीप्रमाणे हरवले असता, एका यापूर्वी न पाहिलेल्या ऐकलेल्या पुस्तकाने लक्ष वेधले.

'पाकसिद्धी'
लेखिका सौ. लक्ष्मीबाई वैद्य.

वर म्हटल्याप्रमाणे हा नवलाईच्या दिवसांतील प्रसंग असल्यामुळे असेल कदाचित, तर नवरोबांनी माझं त्या पुस्तकापाशी रेंगाळणं हेरलं आणि मग पुस्तक आमच्यासह घरी प्रवेश करतं झालं.. (अहाहा : रम्य आठवणी)

आणि आता पुस्तकाचे उद्घाटन करूया.

लेखिका ह्या हुजूरपागा शाळेत गृहशास्त्र विषयाच्या मुख्य अध्यापिका. तीस वर्षे अनुभव. याखेरीज विविध ठिकाणी प्रवास, तेथील पाककृती शिकणं, प्रत्यक्ष आचाऱ्यांशी चर्चा, पाकशास्त्र परीक्षक म्हणून काम अशा साऱ्याचा परिपाक म्हणजे प्रस्तुत पुस्तक. नेमकी प्रमाणे, तपशीलवार पाककृती, पारंपरिक पदार्थ ते आधुनिक विदेशी पदार्थ अशी व्याप्ती ही पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये तर आहेतच ;परंतु पुस्तक उघडल्यापासूनच लक्षात येते, मौजेची वाटते ती लक्ष्मीबाईंची जुन्या वळणाची शब्दयोजना. काही मासले -

  • डोसा वा इडलीसाठी त्या डाळ 'वाटत' नाहीत, 'रुबतात'.
  • पिठलं 'आंगूळभर' तरी आटवायचं म्हणजे शिजतं. *आलं लसूण यांची वाटलेली 'गोळी' असते नि ती चमचाभर वगैरे नाही तर 'चिंचोक्याएवढी' असते बरं..
  • स्नॅक्स हे 'मधवेळेचे' पदार्थ, तर मटार हे 'सोले' असतात.
  • पुलावात 'पसाभर' काजू घालायचे नि कूट करताना दाणे वाटीच्या तळाने 'खरंगटायचे'.
  • हिंग 'वालाएवढा' आणि पावाची 'चकती' ; फणसपोळी 'वाफलून' कोशिंबीर इ. इ.

नवविवाहित स्त्रीला विशेषतः घरी इतर कुणी अनुभवी गृहिणी नसताना उपयुक्त ठरतील अशा कितीतरी बारीकसारीक सूचना व माहिती दिली आहे. साधारण आवाका - शेगडीसाठी कोळसे कसे आणायचे चारजणांच्या कुटुंबासाठी लागणारी भांडी व इतर स्वयंपाकघरातील सामग्री पाणी भरणे, स्वयंपाकघर व इतर स्वच्छता (कचऱ्याचे व्यवस्थापन), दुधाचे प्रकार दुभत्याचं कपाट समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार पदार्थ शिजण्यासाठी लागणारा वेळ, आच, भांड्याला 'बूड: देणं, धान्याची निवड, साठवणूक, भाज्यांचा दर्जा, खरेदी, पोषणमूल्य, इ. अक्षरशः अगणित बाबींचा ऊहापोह केला आहे. तत्कालीन प्रचलित गृहव्यवस्था गृहीत धरून लक्ष्मीबाईंनी बहुतांशी सूचना गृहिणीवर्गास उद्देशून केलेल्या आहेत हे लक्षात येते. त्यामुळे गृहिणीचा' साडी' हाच पोशाख आहे व त्या अनुषंगाने स्वच्छता व टापटीप कशी राखावी, ते सांगताना त्या - "बाहेरून आल्यावर साडी बदलून मगच स्वयंपाक करण्याचे " सुचवतात. (हे वाचल्यानंतर कधी बाहेरचे कपडे न बदलता स्वयंपाक करताना किंचितशी खंत पटकन मनात येऊन जाते. अर्थात सोयीचे तेच केले जाते). यामागचे कारण - रस्त्यावरील धूळ, थुंकलेले वगैरे साडीच्या काठाला लागून त्याचा संसर्ग अन्नास होऊ शकतो. किंवा शेपटा बांधून स्वयंपाक करावा, म्हणजे केसांच्या बटा हाताने मागे सारत बसाव्या लागत नाहीत. बघणारे वा जेवणारे यांस किळस वाटू नये म्हणून स्वयंपाक करताना हाताशी रुमाल ठेवून साफसफाई (नाक वगैरे ची) करणे, तीही नजरेआड; पण हा स्वच्छता सांगावा एकतर्फी नाहीये. जेवणाऱ्या माणसाने ताटातील खरकटं ताटाबाहेर न ठेवता वाटीत वा ताटाच्या कोपर्‍यात ठेवून त्यावर वाटी झाकण ठेवावी म्हणजे उष्टंशेण (?) करणारीस किळस वाटत नाही, हेही त्या सांगतात. (पक्षीः द ग्रेट इंडियन किचन चित्रपट)

खरं तर त्यावेळी ही जंत्री वाचताना मला दडपण व कंटाळा येऊ लागला होता. हे सर्व झेपण्यातलं नाही, असंच वाटत होतं. (हो. ह्या टापटीप सूचना द्यायला भवताली पुरेशी मंडळी आधीपासून होतीच ना) पण संयमाने पुढे वाचत गेल्यावर वेगवेगळ्या उपयोगी व चवीच्या गोष्टी नजरेस आल्या. पोळीसाठी कणीक कशी भिजवायची, पोळ्या बिघडण्याची कारणे, भाकरीचे तंत्र, घरगुती कुकर, दळणयंत्र, थर्मास, आईस्क्रीम पॉट, फ्रीज यांचे तंत्र व निगा राखणे..

तळण करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी, गोडाच्या पदार्थांपेक्षा तिखटमिठाच्या पदार्थांसाठी तेलाचे उष्णतामान अधिक लागते ; कोणती कडधान्ये भिजण्यास किती तास, मोड येण्यासाठी किती तास इ. माहिती दिली आहे.

उसळी, चटण्या, रायती, भाज्या, भाताचे प्रकार, पक्वान्ने इ. भोजनामधील नित्याची मंडळी तर आहेतच; शिवाय फ्रेंच टोस्ट, जेली, केक वगैरे फिरंगी पाहुणे (आता तेही घरचेच) हजेरी लावून जातात. मसाला, भाजणी, लोणची अशी साठवण आहे नि आजाऱ्यासाठी पथ्यकर पदार्थ आवर्जून दिलेले आहेत.

पाककृती सांगताना सहजच लक्ष्मीबाई Dos and Donts नमूद करतात, ज्याची- माझ्यासारख्या (अति) सामान्य रांधणाऱ्यांना अजूनही गरज असते. वाढप कसं नि किती करायचं, हे वाचताना जणु (कोणत्याही) सासूबाई बोलताहेत, असा भास मला झाला होता. (संदर्भ - बचकाभर वाढून एकदाचं काम आटपून टाकायचं नाही)

अपूप, चिंचेची कढी, गाकर, गोळे सांभारे, भोपळ्याची पुरी, काकडीचे दडपे पोहे, टॉमेटो लोणचे, बैठा नारळीभात इ. मला आवडलेले पदार्थ वानगीदाखल.

काही वर्षांपूर्वी वाचून पाहिलेल्या या दक्ष पुस्तकाची, ह्या लॉकडाऊन काळात पुनर्भेट झाली. तोवरच्या काळात आंतरजालीय वावरामुळे अंमळ नजरेआड गेलं होतं. परवा हाती लागलं तेव्हा लक्षात आलं की त्याभोवताली असलेली इतर पुस्तके सुस्थितीत आहेत ;पण का न कळे, ह्या पुस्तकाची वाळवीशी जवळीक झाल्यासारखी वाटते आहे. वाईट तर वाटलंच, यावर उपाययोजना सुरू आहे पण फळली नाही तर.. तत्पूर्वी पुन्हा एकदा वाचून इथेही भेट घडवू असा विचार केला.
लेखिकेच्या शब्दांत “हे पुस्तक वाचून काळजीपुर्वक पदार्थ केल्यास तो बिघडणार तरी नक्कीच नाही.” (हा दिलासाच तर महत्वाचा , नाही का)
सध्या कुठे उपलब्ध आहे, याची मात्र कल्पना नाही.

पुस्तक - पाकसिद्धी
लेखिका - लक्ष्मीबाई वैद्य
प्रकाशक - उत्कर्ष प्रकाशन

--------------------------
मैत्रिणीनो, अन्नपूर्णा .... धाग्यावर प्रतिसाद न देता वेगळा धागा काढत आहे.
(माबो) इतरत्र पूर्वप्रकाशित.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle